भयंकर तिरीमिरी झाली मनाची! भावनांचा उद्रेक झाला. रागाच्या भरात एका पित्याच्या हाती जात्याचा जाडजूड खुंटा आला. दुसऱ्याच्या हाती भरलेलं पिस्तूल. आपल्या मुलींचं बोलणं, वागणं पटलं नाही, त्यांचं अपयश सहन झालं नाही म्हणून मारण्यासाठी बापाचे हात आणि मेंदू तयार झाले. मुलींचे खून झाले. एक सांगलीत झाला, एक हरियाणात. सारा देश हळहळला.

स्वत:च्या मुलींना मारण्यासाठी या माणसांच्या हाती शस्त्र येण्याआधी त्यांच्या मनात, मेंदूमध्ये काय काय घडलं असेल? याचा मानसशास्त्रीय अभ्यास बराच झाला आहे. आजही होतो आहे. आपल्या हातून खून झाल्यावर भानावर आलेल्या, तीव्र पश्चात्ताप झालेल्या आणि कठोर शिक्षेची मागणी करणाऱ्या मेदूंचा अभ्यासदेखील झाला आहे. माणसाच्या अशा भावनिक उद्रेकाच्या अवस्था होत असताना त्याच्या मेंदूमध्ये असंख्य जटिल रासायनिक प्रक्रिया क्षणार्धात घडतात. विविध रसायनांची अतिशय वेगाने देवाणघेवाण होते. मेंदूच्या विविध भागांतून ‘न्युरोन्स’ म्हणजे ‘मज्जापेशीं’मधून जे संदेशवहन होत असतं, ते नेहमीपेक्षा वेगळं असतं. विपरीत असतं. काही आगंतूक ‘केमिकल्स’ यावेळी प्रचंड उसळी घेतात. आजवर यावर बरंच संशोधन झालं आहे. त्यांना याबाबतचं मेंदूविज्ञान त्यामुळे अगदी सगळं कळलं आहे असं नाही. पण अलीकडे बऱ्याच जटिल रासायनिक घडामोडींचा वेध घेतला गेला आहे. एवढंच नव्हे, तर अशा उद्रेकी वर्तनाचं अगदी जनुकीय मूळदेखील शोधण्यात आता काहीसं यश मिळालं आहे. मानवी ‘डीएनए’मधल्या ‘सीएनआर १’ या जनुकाच्या अस्तित्वामुळे अशी उद्रेकी व्यक्तिमत्त्वे बनतात, असा कयास मांडला गेला आहे. या प्रकारच्या संशोधनातून जे जीवशास्त्रीय निष्कर्ष काढले जातात त्यांचं महत्त्व हे आहेच. तसं असणार. मात्र आपण अशा विपरीत वागण्याचा दोष सर्वस्वी मेंदूतील रासायनिक प्रक्रिया किंवा माणसाच्या जनुकीय रचनेवर टाकला तर त्याला ‘बायोलॉजिझम’ (जीवशास्त्रवाद) असं म्हणतात. म्हणजे याचा शास्त्रीय आधार घेऊन ‘यात त्या माणसाचा वैयक्तिक दोष नाही, ना त्याच्या कुटुंबाचा, ना त्याच्या सामाजिक पर्यावरणाचा,’ असं काही लोक म्हणू शकतात. असं जे विपरीत घडतं ते सगळं त्या त्या व्यक्तीच्या शरीरात घडणाऱ्या प्रक्रियांमुळे घडतं. (जणू माणूस हा केवळ रसायनांचे एक बंडल आहे! आपल्या हातात काही नाही).

अर्थात एक चांगली बाब अशी की, यातील बरेच संशोधक, मानसशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ हे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणाचा यात काहीच हात नसतो असं म्हणत नाहीत. अनेक शरीरबाह्य कारणांचा परिणाम माणसाच्या वागणुकीवर होत असतो हेही ते नाकारत नाहीत.

ज्या दोन घटनांच्या निमित्ताने आपण चर्चा करत आहोत, त्यातील दोन्ही ‘वडील’ माणसं कोणी सराईत गुन्हेगार नाहीत. दोघेही कुटुंबवत्सल होते. आपल्या मुलींना प्रेमाने खाऊ-पिऊ घालणारे, त्यांच्या प्रगतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे, काही चांगले संस्कार करू इच्छिणारे, मुलींना प्रोत्साहन देणारे वडील होते. मुलींची वाढ आणि विकास नीट व्हावा, त्यांचं भवितव्य उज्ज्वल असावं असंच त्यांना वाटत असणार. कदाचित या इच्छेचाच अतिरेकी आविष्कारच या घटनांमधून दिसतो आहे का, याचा शोध घ्यायला हवा.

‘नीट’च्या सराव परीक्षेत मुलीला चांगले गुण मिळाले नाहीत म्हणून यातील पित्याला, धोंडीराम भोसले यांना फार वाईट वाटलं. त्यांना प्रचंड राग येऊन संताप झाला. खूप बोलले. त्यांची मुलगी, साधना त्यांना उलटून बोलली की, तुम्ही कुठं कलेक्टर झालात, साधे शिक्षकच, मुख्याध्यापक झालात ना? वाद वाढला. वडिलांच्या स्वप्रतिमेला (अहं) झळ बसली असावी. सारासार विचार संपला. थेट हिंसाच झाली.

जरा वेगळा विचार करून पाहू या. समजा, या परीक्षाच नसत्या किंवा त्यांचं काही विशेष महत्त्व नसतं, त्यांच्यावर अवलंबून ‘मेडिकल’ला प्रवेश नसता, किंवा डॉक्टर होण्यात विशेष ‘ग्लॅमर’ नसतं, वैद्याकीय व्यवसायात पैसाही फार नसता तर काय झालं असतं? समजा, मुलीशी मैत्रीचा, समजुतीचा संवाद झाला असता तर तिनेही वडिलांचा ‘अहं’ नीट सांभाळला असता. शिवाय कलेक्टर होणं किंवा डॉक्टर होणं यातलं महत्त्वच समजा समाजात रूढ नसतं तर…या माणसाने हिंसा केली नसती असं निश्चित म्हणता येईल. मग वर सांगितलेले त्यांच्या ‘डीएनए’ मधले ‘जीन्स’ कसे का असेनात, कोणते का असेनात, त्यांनी मारहाण, हत्या असलं काही केलं नसतं असं म्हणायला जागा आहे. जीवघेण्या स्पर्धांमुळे पोरांचा जीव जाऊ शकतो, हे आता दिवसेंदिवस जास्त स्पष्ट दिसू लागलं आहे. परीक्षेत अपयश पदरात पडलं की काही मुलं थेट आत्महत्येच्या मार्गाने जाताना दिसत आहेत.

या प्रकारच्या भयाण चढाओढीच्या परीक्षा आणि त्यांचं प्रमाणाबाहेर महत्त्व मोठ्या लोकांनीच मुलांसाठी निर्माण केलं, वाढवलं. या मोठ्या लोकांमध्ये पालक तर आहेतच, पण धोरणकर्तेही आहेत. आजकाल अनेक पालक या स्पर्धेच्या उन्मादी वातावरणात ‘आम्ही आमच्या मुलामध्ये ही आर्थिक गुंतवणूक केली आहे,’ असं उघड म्हणू लागले आहेत. मुलांचं परीक्षेतील यश मुलांपेक्षा पालकच जास्त मिरवताना दिसत आहेत. त्यासाठी लाखो रुपये देऊन क्लासेस लावले जातात. मुलंही या जाळ्यात अडकतात. हे सगळं वास्तव निसर्गनिर्मित निश्चित नाही. हे आपण मुलांसाठी निर्माण करून वाढवलेलं वास्तव आहे आणि ते भीषण आहे. याला पर्याय आहेत का? आहेत.

समजा, हे वास्तव पूर्ण बदलता येणार नाही. आणि याला लगेचच अमलात आणण्याजोगे सशक्त पर्याय नाहीयेत, ठीक आहे. स्पर्धा अनिवार्य आहे असं मानू या. तर काय करावं? मुलांना समजून घेता येतं. त्यांचं अपयश समजून घेता येतं. चांगल्या करियरचा, प्रगतीचा एकच एक राजमार्ग नसतो. आजकाल तर तथाकथित राजमार्गापेक्षा अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. पालकांपेक्षा अनेकदा मुलांना जगभरातील अशा विविध पर्यायांची खूप माहिती असते. पालकांनी त्यांचा सन्मान राखायला हवा. त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. अनेकदा तथाकथित प्रतिष्ठावाले, पैसेवाले पर्याय सोडून मुलं जगावेगळी क्षेत्रे निवडताना दिसतात. त्यांना तसं मनासारखं करू द्यावं. जमेल तशी त्यांना मदत करावी. त्यांच्याकडे ‘गुंतवणूक’ म्हणून तर मुळीच पाहू नये. त्यांच्यावर आपली मालकी नसते. पण काही जण ते मानतात.

आपल्या कौतुकाने वाढवलेल्या टेनिसपटू मुलीचा, राधिकाचा ‘टेनिस अकादमी’ बंद न करण्याचा निर्णय पटला नाही, वाद झाले म्हणून वडिलांनीच मुलीवर गोळ्या झाडल्या. गावातलं कोणीतरी म्हणालं की हा बाप लेकीच्या पैशावर जगतो. बापाचा ‘अहं’ दुखावला. मुलीचा निर्धार पक्का म्हणून तिला संपवलं. नेमकं काय झालं त्याचे तपशील अजूनही येत आहेतच, पण राधिका आता नाही. तिच्या वडिलांनी, दीपक यादवनी तिची गोळ्या घालून हत्या केली हे वास्तव मात्र आता बदलू शकणार नाही.

एक मुलगी करियरच्या बाबतीत अपेक्षित प्रयत्न करत नाही म्हणून तिला मारलं गेलं. दुसरी मुलगी पित्याचं म्हणणं ऐकून न घेता यशाची वेगळी पायरी यशस्वीपणे चढली म्हणून तिला मारलं. नेमकं काय चालू आहे, समाजात? नात्यात?

आपण पालकांनी आपल्या चिलया बाळासाठी अत्याधुनिक देव (की दानव?) निर्माण केले आहेत. ते परीक्षा घेतात. यातला एक देव स्पर्धेचा आहे. दुसरा देव स्व-प्रतिष्ठेचा आहे. या देवांच्या परीक्षा कठोर, क्रूर आहेत. आपल्या भक्तीपायी आपली मुलं भरडली जात आहेत. पुराणकथेतला चिलया कथेच्या शेवटी हाक मारली तेव्हा म्हणे पळत उड्या मारत परत आला. चिलयाच्या आई-वडिलांची भक्ती म्हणे खरी होती. या अत्याधुनिक देवांच्या बाबतीतली आपली भक्ती कितीही सच्ची असली तरी भरडली गेलेली आपली बाळे परत येत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक ‘आरोग्यभान’ चे कार्यकर्ते असून युवकांची ‘रिलेशानी’ शिबिरे घेतात.