‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चं यंदाचं दहावं वर्ष! पहिल्या वर्षांपासूनच उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळय़ामध्ये यंदाही आव्हानात्मक परिस्थितीशी दोन हात करत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या नऊ ‘सामान्यांतील असामान्य’ स्त्रियांच्या कथा उलगडल्या, तर ‘दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’च्या निमित्तानं पुरस्कारार्थी ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाटककार, पटकथाकार सई परांजपे यांचे विचार सर्वांना ऐकायला मिळाले. त्याच वेळी ‘स्वराशा’ या कार्यक्रमामधून तरुण दमाच्या गायक-गायिकांनी आशा भोसले यांची उत्तमोत्तम गाणी सादर केली. नुकत्याच मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाचा हा वृत्तांत..

‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता..’ निदा फाजली यांनी मांडलेली ही खंत जणू काही स्त्रियांना मान्यच नसावी! आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर स्वत:साठीच नव्हे, तर समाजासाठीही जाणतेपणाने कार्य उभारणाऱ्या स्त्रिया.. कधी परिस्थितीमुळे एखादी जबाबदारी अंगावर आल्यानंतर निडरपणे ती पूर्ण करणाऱ्या स्त्रिया.. स्वत:पुरतं मर्यादित न राहता इतरांनाही धीराचा हात देत आपल्याबरोबरीनं पुढे नेणाऱ्या स्त्रिया.. या सगळय़ा जणी नियतीच्या अधीन राहात नाहीत. आव्हानांशी झगडून स्वत:ची नियती निर्माण करणाऱ्या या स्त्रिया म्हणूनच शक्तीरूपी दुर्गेचं प्रतीक ठरतात! अशा एक नाही, दोन नाही.. ९९ दुर्गाचा शोध घेत त्यांचा यथोचित सन्मान करणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळय़ानं यंदा दशकपूर्तीचा गौरवशाली टप्पा पूर्ण केला.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

प्रसिद्धीची वा मदतीची अपेक्षाही न बाळगता गावखेडय़ातून शहरापर्यंत समाजानं प्रेरणा घ्यावी असं कार्य उभारणाऱ्या दुर्गाशक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या दहाव्या पर्वाचा सोहळा उल्लेखनीय ठरला. शुक्रवारी, ३ नोव्हेंबर रोजी दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहा’त झालेल्या या भव्य पुरस्कार सोहळय़ात समाजासाठी योगदान देणाऱ्या नऊ दुर्गाचा मान्यवरांच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२३’ देऊन सन्मान करण्यात आला. आत्मशोधातून गवसलेली कार्यप्रेरणा आणि उपजत बुद्धी व कलागुणांचा उपयोग करत स्वत:बरोबरच समाजाचं जीवनमान उंचावण्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य उभारणारी ही स्त्रीशक्ती! गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीत हा उपक्रम अधिक प्रगल्भ झाला आहे, याचीच प्रचीती यंदा पुरस्काराच्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या दुर्गाकडे पाहून येत होती. खणखणीत कर्तृत्व, धारदार बुद्धी आणि प्रभावी वाणीनं समोरच्याला जिंकून घेणाऱ्या दिग्दर्शिका, नाटककार, पटकथाकार सई परांजपे यांचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’नं झालेला गौरव हा या दशकपूर्ती सोहळय़ाचा कळसाध्याय ठरला.

हेही वाचा… सूर संवाद: मी राधिका!

‘‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दुर्गा असते आणि त्या दुर्गेमुळे आपलं आयुष्य घडलेलं असतं. अत्यंत पुरुषी अशा प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये एखाद्या स्त्रीनं आपलं स्थान निर्माण करणं हे खूप कौतुकास्पद आहे. अडथळय़ांची शर्यत पार करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येतं. या सोहळय़ात ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्या व्यक्तीला दिला जातो, तीही तितकीच प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान असते, हे गेल्या काही वर्षांतील ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कारांच्या मानकरी पाहिल्यास लक्षात येईल,’’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी उपक्रमाच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेतला. आतापर्यंत ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे, निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला आहे. कुबेर यांनी सांगितलं,

‘‘यांच्यापैकी प्रत्येकीची स्वत:ची एक मांडणी आहे, हातोटी आहे, धाटणी आहे. त्याच मांदियाळीतलं सई परांजपे हे एक मोठं नाव आहे.’’

आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, चित्रपट, लेखन असा कर्तृत्वाचा विस्तृत परीघ असलेल्या सई परांजपे यांना ‘पिरामल ग्रुप’च्या उपाध्यक्ष

डॉ. स्वाती पिरामल आणि ‘उषा काकडे ग्रुप’च्या उषा काकडे यांच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘‘जातिवंत, अभिजात मराठी भाषाप्रेम आणि अत्यंत गोड, प्रेमळ दरारा असं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सई परांजपे यांचा सन्मान सामाजिक आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. स्वाती पिरामल यांच्या हस्ते होणं हाही एक वेगळा योग आहे. राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तीच्या सत्काराला एका तितक्याच कर्तृत्ववान अमराठी व्यक्तीची उपस्थिती औचित्यपूर्ण आहे,’’ अशी भावनाही कुबेर यांनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात गेली पन्नास वर्ष कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती पिरामल यांनी आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवावर नाटक लिहिण्याचा मानस असल्याचं या वेळी सांगितलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रंगभूमीचा अ्नुभव असलेल्या आणि चित्रपट क्षेत्रावर पकड असलेल्या सई परांजपे यांचं त्यांनी कौतुक केलं. ‘‘सई परांजपे यांनी आठव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली होती. आज त्यांचं वय ऐंशीच्या वर आहे तरीही त्या तितक्याच प्रभावी लेखन करत आहेत,’’ असं म्हणत अशा प्रतिभावंत व्यक्तीचा सन्मान करण्याचं भाग्य लाभलं, याबद्दल पिरामल यांनी आनंद व्यक्त केला.

‘‘गेल्या नऊ वर्षांत सत्कार करण्यात आलेल्या अनेक जणी आजही आमच्या संपर्कात आहेत,’’ असं ‘लोकसत्ता चतुरंग’ पुरवणीच्या फीचर एडिटर आरती कदम यांनी सांगितलं. ‘‘प्रत्येकीचं नवीन काही तरी सुरू असतं. कुणी नवीन शोध घेतं, संशोधन करत असतं, कुणी उद्योगात नवीन पाऊल टाकतं, कुणाला परदेशातून आमंत्रण येतं. या सगळय़ा गोष्टी आजवरच्या ‘दुर्गा’ पुरस्कारांच्या मानकरी आवर्जून आम्हाला कळवतात,’’ असं सांगत हा गौरवयज्ञ असाच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘‘पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या दुर्गाच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्यवैविध्याबरोबरच आपल्या कामातून समाजातील लोकांच्या आयुष्याची प्रत सुधारण्यासाठी घेतलेले कष्ट हा समान धागा जाणवतो. यंदाही या पुरस्कारांसाठी आलेल्या साडेतीनशे नामांकनांमधील प्रत्येक स्त्रीचं कार्य उल्लेखनीय होतं,’’ असंही आरती कदम यांनी सांगितलं. अंतिम नऊ दुर्गा निवडण्याचं आव्हान लीलया पेलणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, उद्योजिका अदिती कारे-पाणंदीकर आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने या परीक्षकांचेही त्यांनी आभार मानले.

सोहळा सुरेख!

पुरस्कारार्थी दुर्गाचं कार्य, त्यांच्या वाटय़ाला आलेला संघर्ष आणि त्यावर त्यांनी कशा पद्धतीनं मात केली, हा प्रवास अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सहज शैलीतील निवेदनातून आणि लघुमाहितीपटांमधून उपस्थितांसमोर उलगडला. दुर्गाचा परिचय करून देणाऱ्या संहितेचं लेखन ‘लोकसत्ता’चे शफी पठाण यांनी केलं होतं. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, ‘उज्ज्वला हावरे लेगसी’च्या उज्ज्वला हावरे, ‘व्ही.एस. मुसळणूकर ज्वेलर्स’चे क्षितिज मुसळूणकर आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेड’चे मधुकर पाचारणे यांच्या हस्ते गतिमंद, मूकबधिर आणि विकलांग मुलांसाठी गेली ४१ वर्ष काम करणाऱ्या रेखा बागूल, शेतीचा गंध नसतानाही आव्हानांना तोंड देत यशस्वी शेतकरी झालेल्या संगीता बोरस्ते आणि भारतातील पहिली त्वचापेढी सुरू करणाऱ्या डॉ. माधुरी गोरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’चे गिरीश चितळे, ‘केसरी टुर्स’च्या सुनीता पाटील यांच्या हस्ते ‘कचरावेचक ते पर्यावरणरक्षक’ असा प्रवास केलेल्या सुशीला साबळे, सात लाख हेक्टर जमिनीवर पाणलोटाच्या कामांसाठी पुढाकार घेणाऱ्या वैशाली खाडिलकर आणि ‘खेळघर’च्या माध्यमातून शाळेपलीकडचं शिक्षण देणाऱ्या शुभदा जोशी यांना सन्मानित करण्यात आलं, तर डॉ. स्वाती पिरामल आणि उषा काकडे यांच्या हस्ते शेती आणि जैवतंत्रज्ञानातील संशोधन करणाऱ्या डॉ. रेणुका करंदीकर, अंधत्वावर मात करत आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. कल्पना खराडे आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताची जागतिक विजेती ठरलेली खेळाडू अदिती स्वामी यांचा सन्मान करण्यात आला. अदितीच्या अनुपस्थितीत तिच्या आईने, शैला स्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘‘आई भवानीशी लग्न केल्यानंच शंकरालाही महानता प्राप्त झाली असल्याचा संस्कृत श्लोकातील उल्लेख एक प्रकारे स्त्रीशक्तीच्या महानतेवर प्रकाशझोत टाकून जातो. हाच प्रकाशझोत ‘लोकसत्ता’ने या नऊ ‘दुर्घट भारी’ कार्य करणाऱ्या दुर्गावर रोखलेला आहे आणि त्यात या दुर्गा उजळून निघाल्या आहेत,’’ अशा मार्मिक शब्दांत ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चे सई परांजपे यांनी कौतुक केले. ‘‘मी आशावादी आहे. माझा पेला कायम अर्धा भरलेला असतो. माझ्या कोणत्याही कलाकृतीनं ते पाहणाऱ्याच्या वा वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत असेल तर मी भरून पावते,’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या कार्याप्रति असलेला दृष्टिकोन व्यक्त केला. ‘भातुकली’ हे आपण लिहिलेलं आणि अभिनेता मंगेश कदम, अभिनेत्री लीना भागवत या जोडीची मुख्य भूमिका असलेलं नवं नाटक लवकरच रंगमंचावर येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

नव्वदीतही अत्यंत सहज आणि मधुर आवाजात गाणं गात रसिकांची मनं जिंकून घेणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निवडक मराठी-हिंदी गीतांच्या ‘स्वराशा’ या ‘जीवनगाणी’निर्मित सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमाची साथसंगत या पुरस्कार सोहळय़ाला लाभली होती. आशाताईंनी सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली भावमधुर गाणी, बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेली त्यांची गाणी, याचबरोबर त्यांनी गाजवलेली नाटय़पदं, लावणी, अशी सुरेल गाणी गायिका सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, राधिका नांदे आणि केतकी चैतन्य यांनी सादर केली. ‘‘यशानं आशाताई कधी गाफील झाल्या नाहीत, की दु:खानं त्यांचा तोल कधी ढळला नाही,’’ अशा यथोचित शब्दांत त्यांचं वर्णन करत आशाताईंच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं कुणाल रेगे यांचं ओघवत्या भाषेतील निवेदन, समोर स्क्रीनवरची आशाताईंची दुर्मीळ छायाचित्रं आणि त्यांची सुरेल गाणी याने माहोल फारच रंगला.

आशाताईंच्या सुरेल गाण्यांची साथ, सई परांजपेंसारख्या बुद्धिमान दिग्दर्शिकेचे अनुभवी बोल आणि नऊ दुर्गानी आव्हानात्मक परिस्थितीत उभारलेल्या अतुलनीय कार्याच्या प्रेरक कथा, यांनी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चा दशकपूर्ती सोहळा खऱ्या अर्थानं गौरवांकित झाला.

जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळते, तेव्हा आनंद होतोच आणि जबाबदारीदेखील वाढते. ‘दुर्गा पुरस्कारा’मुळे आनंद झाला आहेच, आता जबाबदारीदेखील वाढली आहे. या पुरस्कारात माझे कुटुंबीय, विद्यार्थी, सहकारी या सगळय़ांचा सहभाग आहे. ‘लोकसत्ता’च्या दुर्गा पुरस्कारामुळे शहरातील कानाकोपऱ्यांत आमच्याबद्दल समजले आणि आमचे कौतुक करण्यात आले.

कानाकोपऱ्यांत आमच्याबद्दल समजले आणि आमचे कौतुक करण्यात आले.

 • रेखा बागूल
  मी छोटय़ा गावातून, शेतकरी कुटुंबातून आले आहे. ‘लोकसत्ता’ने माझी दखल घेतली यासाठी त्यांची मी आभारी आहे. ‘दुर्गा पुरस्कारा’मुळे काहीतरी आणखी करून दाखवण्याची उमेद मिळाली आहे.
 • संगीता बोरस्ते
  ‘दुर्गा पुरस्कार’ हा माझ्यासाठी आनंददायी आणि प्रोत्साहन देणारा ठरला आहे पण त्याच्याबरोबरच एक जबाबदारी येते, ती स्वीकारणेदेखील तितकेच गरजेचे असते. या पुरस्काराबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते, ते म्हणजे वैद्यकीय पुरस्कार बरेच मिळतात, पण हा वेगळा पुरस्कार आहे. त्यामुळे याचे महत्त्व जास्त आहे.
 • डॉ. माधुरी गोरे
  ‘दुर्गा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल मी प्रथम ‘लोकसत्ता’चे आभार मानते, कारण केचरावेचक स्त्रिया या ‘अदृश्य’ असतात. आम्ही पर्यावरणासाठी काम करतो. आमच्या कामाची दखल ‘लोकसत्ता’ने घेऊन हे काम किती महत्त्वाचे आहे हे समाजासमोर आणण्यास मदत केली.
 • सुशीला साबळे
  सर्वप्रथम माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. ‘दुर्गा पुरस्कार’ मिळाला, याचा मला खूप आनंद आहे. तसेच आमच्या संपूर्ण ‘दिलासा’ कुटुंबासाठी हा पुरस्कार मोलाचा आहे. या परिवारातर्फे मी हा पुरस्कार स्वीकारते आहे, याचे मला विशेष कौतुक आहे.
 • वैशाली खाडिलकर
  वंचित मुलांना आनंदाने शिकण्याची संधी मिळावी, यासाठी आम्ही ‘खेळघरा’च्या रूपाने प्रारूप सुरू केलं. हे काम माझ्या एकटीचे नाही, तर संपूर्ण गटाचे आहे आणि त्यांचाही या ‘दुर्गा पुरस्कारा’च्या निमित्ताने सन्मान होत आहे. या पुरस्कारामुळे हे काम समाजापर्यंत पोहोचले, त्यासाठी ‘लोकसत्ता’चे आभार.
 • शुभदा जोशी
  ‘लोकसत्ता’च्या ‘दुर्गा पुरस्कारा’बद्दल खूप ऐकले होते आणि तो कधीतरी आपल्याला मिळावा असेदेखील वाटत होते. तो आज मिळत आहे, त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. या पुरस्कारासाठी ‘लोकसत्ता’ने माझी निवड केल्याबद्दल आभार.
 • डॉ. रेणुका करंदीकर
  ‘दुर्गा पुरस्कार’ मिळाल्यामुळे फारच अभिमानास्पद वाटत आहे. ‘लोकसत्ता’चे आभार यासाठी, की दरवर्षी नऊ कर्तृत्ववान स्त्रियांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार मला मिळाला, याचा आनंद होत आहे.
 • कल्पना खराडे
  सध्या मी ‘एशियन चॅम्पियनशिप’साठी बँकॉक येथे आले असल्याने मला या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, मात्र हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी ‘लोकसत्ता’ची आभारी आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या तिरंदाजी खेळाच्या प्रवासात ‘लोकसत्ता’ने मला नेहमीच मोलाची साथ दिली आहे, त्याचा मला आनंद होतो आहे.
 • अदिती स्वामी
  यंदाच्या दुर्गाच्या निवडप्रक्रियेमध्ये आणि पुरस्कार देण्यातही माझा सहभाग होता याचा मला विशेष आनंद आहे. यातल्या काही दुर्गा सारं काही उपलब्ध असताना त्यातून प्रचंड मोठी झेप घेणाऱ्या आहेत, तर काही जणी हातात काही नसतानाही दूरवर चालत यशस्वी ठरलेल्या आहेत. पराभवांशी सामना करणं हे नशिबात असतं, पराभूत न होणं मात्र आपल्या हातात असतं, हे वचन सिद्ध करणाऱ्या या दुर्गा आहेत. ‘लोकसत्ता’ने त्यांना दिलेली ही शाबासकीची थाप बहुमोल!
 • मृदुला भाटकर (निवृत्त न्यायमूर्ती )
  या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे आशा भोसले आणि बाबूजींची गाणी ऐकायला मिळाली. सई परांजपे यांच्या शेजारी बसून मला या गाण्यांचा आस्वाद घेता आला आणि त्या गाण्यांमागील गमती सईताईंकडून समजल्या. हा खूप छान अनुभव होता. ‘दुर्गा’मधील रेखा बागूल, संगीता बोरस्ते, डॉ. माधुरी गोरे या तिघींना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल आभारी आहे. त्यांचे समाजाप्रति काम मोठे आहे. या कामाबद्दल वाचून मला स्त्रियांनी खऱ्या अर्थाने उंच भरारी घेतली आहे हे जाणवले.
 • आरती अंकलीकर (सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका)
  ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या ‘दुर्गा’चा गौरव केला जातो. मी गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकसत्ता’च्या या अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमाशी जोडले गेली आहे. या सर्व पुरस्कारविजेत्या दुर्गाचे मला विशेष कौतुक करावेसे वाटते. आयुष्यातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्यांनी आपली वाटचाल केली आहे. त्याबद्दल या वर्षीच्या पुरस्कारार्थीचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो.
  ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले, याचा विशेष आनंद आहे.
 • उषा काकडे (उषा काकडे ग्रुप)
  ‘लोकसत्ता’ने १० वर्षांपासून ‘दुर्गा’ जागराची ही संकल्पना सुरू केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यात आम्ही- ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ सहभागी होऊ शकलो याचा आम्हाला अभिमान आहे.
 • गिरीश चितळे (मे. बी. जी. चितळे डेअरी)
  ज्या नऊ दुर्गाचा सन्मान या कार्यक्रमात केला जातो, त्या प्रत्येकीचे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामाबद्दल जाणून घेताना खूप अभिमान वाटतो. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाबद्दल त्यांचे खूप अभिनंदन.
 • उज्ज्वला हावरे (उज्ज्वला हावरे लेगसी)
  ‘लोकसत्ता’चे खूप अभिनंदन. मागील नऊ वर्षे हा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा होतो आहे. ‘लोकसत्ता’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील ‘दुर्गा’चा सन्मान करण्यासाठी आम्ही सहभागी होऊ शकलो याचा आनंद आहे. समाजातील या दुर्गा शोधून त्यांचे कार्य सगळय़ांसमोर ठेवण्याचे खूप मोठे काम ‘लोकसत्ता’ करत आहे आणि पुढेही करत राहो, हीच इच्छा.
 • सुनीता पाटील (केसरी टूर्स)
  ‘लोकसत्ता दुर्गा’ या कार्यक्रमात सहभागी होणे, ही खूप आनंदाची बाब आहे. या नऊ दुर्गा खऱ्या अर्थाने फार मोठय़ा आणि साहसी आहेत. त्यांचा सन्मान करायला मिळाला ही माझ्यासाठी आणि व्ही. एम. मुसळूणकर ज्वेलर्ससाठी
  मोठी गोष्ट आहे. त्यांचे कष्ट आणि त्यामागील कथा खूप प्रेरणादायी आहेत.
 • क्षितिज मुसळूणकर (व्ही. एम. मुसळूणकर ज्वेलर्स)
  ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कार सोहळय़ाचे हे दहावे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या या लेकींचा माझ्या हातून सन्मान करण्यात आला, याचा मला आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेड’ला खूप अभिमान आहे. या सोहळय़ात प्रायोजक म्हणून आम्हाला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.

मधुकर पाचारणे (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लि.)

reshma.raikwar@expressindia.com