मुंबईच्या आऊटडोअर जाहिरात क्षेत्रात कार्यरत ‘सिम्बॉयसिस’च्या खात्यावर १०० हून अधिक मोक्याच्या ठिकाणचे फलक (होर्डिग) जमा आहेत. रस्त्यावरील फलक , मोबाइल वाहने, बस, रेल्वे-त्यांची स्थानके, थांबे अशी ठिकाणेही कंपनीने गाठली आहेत. ‘पेप्सी’, ‘फॉक्स स्टुडिओ’ अशा विदेशी कंपन्यांबरोबरच ‘बजाज ऑटो’, ‘हिरानंदानी इस्टेट’, ‘एअरटेल’, विविध सार्वजनिक बँका या ‘सिम्बॉयसिस’च्या ग्राहक आहेत. त्या ‘सिम्बॉयसिस अ‍ॅडव्हर्टायझिंग’च्या संस्थापक-संचालक व ‘सिम्बॉयसिस’ समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना बोरसे यांचा हा प्रवास

जाहिरात क्षेत्रात ‘ओओएच’ हे इंग्रजी लघुरूप परिचयाचे आहे. ‘आऊट ऑफ होम’ म्हणजेच रस्त्यांवर, इमारतींवर दिसणाऱ्या जाहिराती या गटात येतात. छापील जाहिराती तसेच दूरचित्रवाणी यांच्याबरोबरच मोठी आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होत असते. अशा क्षेत्रात वंदना बोरसे गेली २३ वर्षे काम करीत आहेत. त्यांची कंपनी आहे, ‘सिम्बॉयसिस अ‍ॅडव्हर्टायझिंग’.

‘सिम्बॉयसिस’ समूहातील ही कंपनी मुंबईच्या ‘आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टाइज’ क्षेत्रातील अग्रणी कंपनी. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी तिची स्थापना वंदना यांनी केली. वंदना मूळच्या पंजाबी. देहरादूनच्या. माहेरचं आडनाव कोहली. पण लहानपणापासून मुंबई शहरात वास्तव्य. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्या इथे आल्या. सगळं शिक्षण मराठीतूनच झालेलं. विज्ञान शाखेतील स्नातक पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर नरसी मोनजी संस्थेतून व्यवसाय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. घरच्या व्यवसायाशी वंदना यांचा संबंध शिक्षण सुरू असल्यापासूनच आला. करिअर म्हणून त्या घरच्या व्यवसायात स्थिरावल्या नाहीत, पण अगदी तोंडओळखही नसलेल्या क्षेत्रात यश आल्याबद्दल त्या आश्चर्यचकितही होतात आणि तेवढय़ाच त्या समाधानीही आहेत.

वंदना सांगतात, ‘‘माझ्या वडिलांचा छोटा, उत्पादननिर्मितीचा व्यवसाय होता. गृहोपयोगी उपकरणांसाठी लागणारी उत्पादने तेथे तयार केली जायची. माझे शिक्षण सुरू असताना मी अनेकदा तेथे जायची. प्रत्यक्ष कामही करायची. व्यवहारातही लक्ष घालू लागले होते, पण मला तो उद्योग जमला नाहीच. मग मी माझ्या आवडीचं क्षेत्र असलेल्या वस्त्रोद्योग, चर्मोद्योगाकडे वळले.  कपडे, पर्स, बॅग तयार करणे याकडे व्यावसायिकरीत्या वळले. पण मला तिथेही जम बसविता आला नाही.’’

‘‘हे सारे व्यवसाय कर्जभाराच्या ओझ्यात रूपांतरित झाले. माझे उद्योगप्रयोग मी घेतलेल्या आर्थिक सहकार्याकडून थकबाकीकडे घेऊन गेले.  हे सारे जुळत नाही हे पाहून मी एक पाऊल मागे घेतले. नव्या आघाडीसाठी सज्ज होऊ लागले. हे कटू अनुभव जसे मी मागे टाकत गेले तसे हळूहळू का होईना मी परतफेड करीत गेले. माझा सध्याचा व्यवसाय स्थिरावेपर्यंत मी या साऱ्या संकटांतून, आर्थिकदृष्टय़ाही आता सावरले होते,’’ व्यवसायातील सुरुवातीच्या अपयशाच्या पायरीवरील प्रवास वंदना कथन करतात.

‘‘मुद्रा कम्युनिकेशन्स, चैत्रा अ‍ॅडव्हर्टायझिंग सारख्या ठिकाणी काम केलेल्या मंगेश यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर मला जाहिरात या क्षेत्राची जराशी ओळख होऊ लागली. मंगेश खरं तर अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले. पण ‘ओगिल्वी’, ‘लिओ बर्नेट’, ‘मॅडिसन’, ‘लो लिंटास’च्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून ते जाहिरात क्षेत्रात आहेत. म्हटले, हेही करून पाहू यात, घरून तर मार्गदर्शन होतेच. फक्त उडी घ्यायचीच बाकी होती.’’ वंदना सांगतात.

वंदना बोरसे यांनी १९९२ मध्ये ‘सिम्बॉयसिस’ची स्थापना केली. कंपनीच्या त्या संस्थापिका-संचालक बनल्या. १९९३ मध्ये अंधेरी येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ चौकातील पहिल्या फलकाद्वारे ‘सिम्बॉयसिस’ची सुरुवात झाली. आज त्यांच्या ताफ्यात १०० हून अधिक मोक्याच्या ठिकाणी जाहिराती फलक वा (होर्डिग्स)आहेत.

‘‘या क्षेत्रात आव्हाने तर आहेतच. पण एक स्त्री म्हणून ती अधिक सक्षमतेने पेलावी लागतात. आज या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग अगदी एखाद टक्का आहे.’’ वंदना सांगतात. ‘‘जाहिरातींसाठीची जागा, त्यासाठीची परवानगी शिवाय त्याच वेळी क्लायंट (ग्राहक कंपनी), डिझायनर वगैरे मध्यस्थी अशा सर्व आघाडय़ांवर अक्षरश: लढावे लागते. या क्षेत्रातील नियम, कर हे सगळे सांभाळून व्यवसायात तोटा होऊ द्यायचा नाही; त्याचा कंपनीच्या मनुष्यबळावर विपरीत परिणाम होऊ द्यायचा नाही, हे अतिरिक्त कार्यही करावे लागते.’’

वंदना यांना व्यवसायाप्रमाणेच सामाजिक कार्याचीदेखील तेवढीच आवड. व्यवसाय सुरू केल्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी स्वत:ची ‘दिशा दीप’ ही सामाजिक संस्था स्थापन केली. उपनगरातील दुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी त्या याद्वारे कार्य करतात. तो अनुभव कथन करतात त्या म्हणाल्या, ‘‘सामाजिक कार्याची तर मला लहानपणापासूनच आवड होती. मी पुढेही ते करीत गेले. या कार्याला शिस्त येण्यासाठी सामाजिक संस्थेची स्थापना, तिला नाव देणे, तिची आर्थिक घडी घालणे हे आपसूकच करावे लागले. वर्सोवा, कामाठीपुरा येथे ‘दिशा दीप’चे स्वतंत्र शिक्षण वर्ग चालविले जातात.’’

जाहिरात व्यवसाय सांभाळून वंदना या उपनगरातील झोपडपट्टी परिसरातील मुलांना स्वत: शिकवितात. त्यांचे पती मंगेश बोरसे हे विक्री, विपणन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव व ज्ञान या जोरावर विविध व्यवस्थापन संस्थांमध्ये व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतात. किंबहुना, ‘त्यांच्यामुळेच माझ्यातील शिक्षिका टिकून आहे,’ ही प्रेरणा त्या आवर्जून सांगतात. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या टप्प्यावर मिळालेल्या कटू व्यवसायानुभवातून वंदना खूप काही शिकल्याचे जाणवते. पण स्वत:वर विश्वास आणि अंगी जिद्द असेल तर अपयशावर मात करता येते, हे त्यांनी ‘सिम्बॉयसिस’च्या प्रवासातून दाखवून दिले आहे.

शेवटी ‘सिम्बॉयसिस’ म्हणजे काय तर सहजीवन. म्हणजे एकमेकांवर अवलंबून असलेल्या दोन भिन्न बाबींशी मेळ साधणे. त्याद्वारे आयुष्य आखणे. यश-अपयश हे असेच वेगळे आहेत. पण अपयशाशिवाय प्रयत्न नाही आणि प्रयत्नांशिवाय यश नाही, हेच वंदना यांच्या यशस्वी उद्योजिकेतेतून प्रतित होते.

सिम्बॉयसिस अ‍ॅडव्हर्टायजिंग

१९९३ पासून मुंबईच्या आऊटडोअर जाहिरात क्षेत्रात कार्यरत ‘सिम्बॉयसिस’च्या खात्यावर १०० हून अधिक मोक्याच्या ठिकाणचे फलक जमा आहेत. रस्त्यावरील फलक (होर्डिग), मोबाइल वाहने, बस, रेल्वे-त्यांची स्थानके, थांबे अशी मोक्याची ठिकाणे कंपनीने गाठली आहेत. पेप्सी, फॉक्स स्टुडिओ अशा विदेशी कंपन्यांबरोबरच बजाज ऑटो, हिरानंदानी इस्टेट, एअरटेल, विविध सार्वजनिक बँका ‘सिम्बॉयसिस’च्या ग्राहक आहेत.

वंदना बोरसे

जाहिरात क्षेत्रात अडीच दशके कार्यरत असणाऱ्या वंदना यांनी व्यवसायाला क्षेत्रातील क्रमांक एकच्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक दायित्व आदी शाखा असलेल्या ‘सिम्बॉयसिस’ समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्या इंडिया आऊटडोअर एडव्हर्टायझिंग असोसिएशन व मुंबई होर्डिग ओनर्स असोसिएशनशीही संलग्न आहेत. सुरुवातीच्या कारकिर्दीतील वस्त्रोद्योग, उत्पादननिर्मितीचा अनुभव त्यांना येथे उपयोगी होतो.

व्यवसायाचा मूलमंत्र

प्रामाणिक राहा. कष्ट वाचतात म्हणून तडजोड करू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. व्यवसायात मूल्य सोडू नका. तत्त्वांशी चिकटून राहा. अल्पावधीत नफा, व्यवसाय वाढ म्हणून कधी तरी आमिषेही आकर्षित करतील. पण योग्य मार्गाने व्यवसाय करा. तुलना आणि स्पर्धेतून नैतिकतेला तिलांजली देऊ नका.

आयुष्याचा मूलमंत्र

श्रमाशिवाय पर्याय नाही. तुमचे श्रम जर प्रामाणिक असतील तर मग मागे वळून पाहण्याची गरज नाही. आयुष्यात अनेक आव्हानात्मक प्रसंग येतात; पण डळमळीत होऊ नका. स्वत: ठाम राहा. आपण जे करू ते पूर्णत: यशस्वी होण्यासाठीच, ही जिद्द बाळगा.

वीरेंद्र तळेगावकर  veerendra.talegaonkar@expressindia.com