06-turningभावाचा अकाली मृत्यू माझ्या आयुष्याचा टìनग पॉइंट ठरला. माझ्या २४ वर्षांच्या वैवाहिक जीवनात व २४ वर्षांच्या वकिली पेशात आज मी ताठ मानेने उभी आहे. भाऊ-भावजयांचे भांडणतंटे व त्याचे परिणाम ‘याचि देहि याचि डोळा’ पाहणारी मी आज मुंबई कुटुंब न्यायालयात वकिली करते आहे. कौटुंबिक कलहाला सामोपचाराने मिटवण्याचे प्रयत्न करत मी माझ्या मृत भावाला आदरांजली वाहते आहे. मी एका सुखवस्तू कच्छी-जैनवाणी कुटुंबात जन्मले. माझ्या घरी आई-वडील, माझा एकुलता एक भाऊ, सहा मोठय़ा बहिणींच्या पाठीवर जन्मलेले घरातील आठवे अपत्य व भावडांमधले शेंडेफळ असणारी मी असे एकूण १० जणांचे हसते खेळते गोकुळ नांदत होते. रुईया कॉलजचे दिवसही मित्र-मैत्रिणींसोबत कट्टय़ावर मैफिली जमवत, टिवल्याबावल्या करत आणि माझा भावी साथीदार विवेकसोबत िहडत फिरत घालवले. बाबांचे स्वतचे किराणामालाचे दुकान होते, त्यामुळे घरात पैशांची कमतरता त्यांनी कधीच भासू दिली नाही. माझ्या मोठय़ा पाचही बहिणींची लग्ने झाली. कालांतराने भावाचेही लग्न झाले आणि तिथेच सारे बिनसले..

वहिनीला स्वतंत्र संसार मांडायचा होता, तर भावाला संयुक्त कुटुंबातच राहायचे होते. या मतभेदामुळे घरात भांडणे रोजचीच झाली होती. याच कारणावरून वहिनी रुसून माहेरी निघून गेली ती साडेतीन वर्षे परतलीच नाही. याच काळात माझ्याहून मोठय़ा बहिणीचे लग्न झाले. भावाचा असा मोडलेला संसार पाहून तो पुन्हा उभा राहावा या आशेने सर्वानी त्याची समजूत घालून त्याला स्वतंत्र बिऱ्हाड थाटण्यासाठी राजी केले. ५ मे १९८९ रोजी त्यांनी वेगळी चूल मांडली. भाऊ नव्या घरातून दुकानावर येत असे. मात्र स्वतंत्र घरातही तो सुखी नसल्याचे त्याच्या वागण्या-बोलण्यावरून वाटत असे. माझे वकिली शिक्षणाचे शेवटचे वर्ष होते. भावाची ही अवस्था पाहून आई नैराश्येत गेली होती, आयुष्यातील उरलेले दिवस ती अक्षरश रेटत होती.
आणि अचानक तो दिवस उजाडला.. २४ जून १९८९ च्या सकाळी ९ वाजता घरी पोलिसांचा फोन आला, ‘तुमच्या भावाने स्वतला जाळून घेतले आहे ताबडतोब या!’ त्यावेळी माझे वय होते २१ वर्षे. झाला प्रकार पाहून मी पार गांगरून गेले होते. त्याच रात्री ११-३० वाजता आम्हा ७ बहिणींचा एकुलता एक भाऊ वारला! वहिनी घरातील भांडीकुंडी, सोनं-नाणं गोळा करून माहेरी निघून गेली. अवतीभवतीची माणसं, मित्र, नातेवाईक, पत्रकार, पोलीस सात दिवस अवतीभोवती फिरली व सात दिवसांत सारा तमाशा संपला!
मुलाच्या मृत्यूने वेडी झालेली आई, धक्क्याने अबोल झालेले बाबा व या सगळ्या प्रकारात बावरून गेलेली मी, आम्ही तिघेच घरात उरलो. एके संध्याकाळी विवेकचे मोठे बंधू वकील प्रदीपदादा आले व म्हणाले, ‘‘अशी खचून जाऊ नकोस. आयुष्याला नव्याने सुरुवात कर. आई-बाबांना सांभाळ, दुकान चालव. तुला जगायचे आहे.’’ मी हिमतीने सात दिवसांनी दुकान उघडले तर ‘आमचे पैसे दे, तुझ्या भावाने उधारीने नेलेल्या मालाचे पैसे दे’ अशा नाना सबबी सांगत लोक येऊ लागले. एकूण १२ मागणीदार ७ लाख रुपयांच्या मागण्या घेऊन आले. बाबा अबोल झाले होते, काहीच समजत नव्हते काय करावे? बहिणी व भाऊजींनी दुकान विकूनकर्ज फेडण्याचे सुचवले. मी मात्र आलेल्या सर्व मागणीदारांना ठणकावून सांगितले की, ज्याच्याकडे लेखी पुरावा आहे, त्यांचेच पैसे मी देईन, बाकीच्यांचे नाही. ज्याला जे करायचे ते त्याने करावे.’ माझ्या या वक्तव्यांमुळे बाजारात, आमच्या समाजात खूप आरडाओरड झाली, त्रागा झाला. मीही या सर्व गोष्टींची फिकीर केली नाही.
मी नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. दररोज सकाळी ५ वाजता उठून पाणी भरणे, स्वास्थ्य हरवलेल्या आईला अंघोळ घालून, धुणी-भांडी, केरकचरा काढून ७ वाजता दुकान उघडत असे. दुकानात माल लावून बाबांना दुकानात बसवून, पुन्हा मी घरी येऊन स्वयंपाक करून शेजारील रामप्यारी मम्मी, रंजनभाभी यांच्या भरवशावर आईला टाकून पुन्हा दुकानाकडे येत असे. पुन्हा दुपारी घरी जाऊन आईला जेवण भरवून, औषध देऊन झोपवून मशीद बंदरला होलसेल मार्केटला मालाच्या खरेदीसाठी जायचे. दुपारभर फिरून तीन साडे तीनपर्यंत घरी परतायचे. संध्याकाळी आईला चहा-नाश्ता देऊन रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून, पुन्हा ५ वाजता दुकानात जायची. रात्री ९ वाजता आईला जेवण भरवून, औषध देऊन, भांडी घासून केरकचरा काढून पुन्हा दुकानात जायची ते रात्री ११ वाजता दुकान बंद करून दिवसभराच्या कमाईचा हिशोब करून घरी यायचे.
भावाच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा माझा प्रयत्न चालू होता. मी पुरावे जमवत होते. जिवाची शाश्वती नव्हती, साथ होती ती फक्त विवेक आणि त्याचे बंधू प्रदीपदादांची व (निवृत्त) एसीपी सुधीरदादाची. प्रदीपदादांनी मला समजावले की, भावना तू हे थांबव. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळतेच, तू तुझ्या आई-वडिलांना सांभाळ. त्याप्रमाणे मी दोन वर्षे दुकानात राबून पैसा जमा केला, लोकांची सात लाख रुपयांची देणी फेडली. बाबांचे नाव बाजारात व समाजात खाली पडू दिले नाही आणि दुकानही स्वतच्या मालकीचे राहिले.
१९९१ साली मी माझी वकिली सुरू केली. त्याच वर्षी डॉ. विवेक जाधवशी प्रेमविवाह झाला. नवा डाव सुरू झाला. सकाळी सहा वाजता उठून सासर व माहेरील स्वयंपाक करून कोर्टात वरिष्ठ वकील राजीव पाटील व सीमा सरनाईक यांच्याकडे मी वकिली शिकत असे. त्यानंतर संध्याकाळी आधी आईकडे जाऊन स्वयंपाक करायची, मग सासरच्या घरी स्वयंपाक करायची. सासरच्या खेळीमेळीच्या वातावरणात कामाचा क्षीण कधी कळला नाही.
विवेक पुढील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेला तेव्हा त्याच्यासोबत मलाही घेऊन गेला. पण आम्ही परत आपल्या लोकांमध्ये, घरी मुंबईला आलो. माझ्या या संसारात प्रेमळ सासू-सासरे, समंजस पती, विनोदी आजेसासू व मावससासू, अनुमावशी, सख्खी शेजारीण, चुलत नणंद रज्जूअक्का या सर्वाचा सहवास माझ्यासोबत होता. यांच्यासोबत सासर-माहेर करत संसाराची १० वर्षे मी गुण्यागोिवदाने नांदले. १९९८ साली माझ्या पहिल्या मुलीला- विभाला माझ्या पदरात घेण्याच्या माझ्या निर्णयाला मला सासरच्यांनी साथ दिली. २००० मध्ये माझ्या दुसऱ्या मुलीचा- वृंदाचा जन्म झाला. मुलींच्या संगोपनासाठी मी माझी उच्च न्यायालयाची पॅ्रक्टिस-सरकारी वकिली सोडली. अंधेरीला वेगळा संसार थाटला, पण शनिवार-रविवार मात्र सासरी डिलाईल रोडला माहेरपणाला सासुबाईंकडे जात होते. त्यानंतर ६ महिन्याने मी कुटुंब न्यायालयात वकिलीला पुन्हा सुरुवात केली. आज मलाच आश्चर्य वाटतं की मी एवढं सगळं कसं काय करू शकले. भावाचा अकाली मृत्यू माझ्या आयुष्याचा टìनग पॉइंट ठरला. सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. आज माझ्या या २४ वर्षांच्या वैवाहिक जीवनात व वकिली पेशात मी ताठ मानेने उभी आहे. भाऊ-भावजयांचे भांडणतंटे व त्याचे परिणाम ‘याचि देहि याचि डोळा’ पाहणारी मी आज मुंबई कुटुंब न्यायालयात वकिली करते आहे. कच्छी वाणी समाजाची ‘केंद्रीय मध्यस्थी समिती’ची वकील यानात्याने कौटुंबिक कलह सामोपचाराने मिटवण्याचे प्रयत्न करत मी माझ्या मृत भावाला आदरांजली वाहते आहे.

                                                                                         तेलाच्या मसाजची किमया
ch07
‘‘मी एक ते सव्वा वर्षांचा असेन, झोपेतून उठून रांगत येत असता माझा डावा पाय उंचशा उंबऱ्यात अडकला आणि तेव्हापासून जवळ-जवळ तीन-चार वर्षे अस्मादिकांच्या सर्वच शारीरिक क्रिया झोपल्या जागीच होत होत्या; पण जीवनात ‘टर्निग पॉइंट’ यायचा असला म्हणजे तसा योग जुळून येतो आणि आयुष्य आमूलाग्र बदलून जातंच.’’आज मी एकसष्टीच्या प्रांगणात उभा आहे. मी एक ते सव्वा                               मनोहर वैद्य                                    वर्षांचा असेन, तेव्हा मला नियतीनं अपंगत्वाचं आभूषण मला अर्पण केलं! त्या वेळी आम्ही नृसिंहवाडीजवळच्या शिरोळ गावी राहायला असू. मी झोपेतून उठून रांगत येत असता माझा डावा पाय उंचशा उंबऱ्यात अडकला आणि तेव्हापासून जवळ-जवळ तीन-चार वर्षे अस्मादिकांच्या सर्वच शारीरिक क्रिया झोपल्या जागीच होत होत्या; पण जीवनाला ‘टर्निग पॉइंट’ यायचा असला म्हणजे तसा योग जुळून येतो आणि सारे जादूच्या कांडीसारखे बदलून जाते..
अगदी लहानपणी मला अपंगत्व आले. इतके की सगळय़ा क्रिया बिछान्यातच. हे सुमारे चार वर्षे सुरू होते; पण हेही दिवस जायचे होते. माझ्या आई-वडिलांना कोणी तरी सुचवले की, रायबाग इथे एक गृहस्थ अवयवांना मसाज करून बरे करतो. माझे आई-वडील मला त्या गृहस्थांकडे घेऊन गेले. त्या गृहस्थांनी माझ्या पायाकडे एक नजर टाकली आणि काही मिनिटे कसल्याशा तेलाने पायाला मसाज केला आणि अक्षरश: जादूच झाली. चार वर्षे अंथरुणावर आडवा पडलेला मी एकदम उभा राहून काही दिवसांतच चालू लागलो.
माझे आई-वडील व बंधू यांच्या अथक प्रयत्नांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. पुढे मी पुण्याची पर्वती, गगनबावडय़ाचा गगनगड, मुंब्राच्या मुंब्रादेवीचा डोंगर, लेण्याद्रीचा गणपतीचा डोंगर, माथेरानचा डोंगर आणि एवढेच नाही तर माहूरगड आणि वणीचा सप्तशृंगीचा डोंगर पायी चढून उतरून आलो. भीमाशंकर, परशुराम, सज्जनगड, पन्हाळगड, महाबळेश्वर इत्यादी ठिकाणेही पायी चढून पालथी घातली.
मी माझे एम.ए. आणि एलएल.बी.चे शिक्षणही एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे प्रपंच करत पूर्ण केले. माझ्यासारख्या माणसाबरोबर विवाह करून माझी पत्नी मृदुला हिने अत्यंत मोलाची साथ दिली. राज्य सरकारच्या एम.आय.डी.सी.मध्ये, तर केंद्र सरकारच्या नॅशनल इन्श्युरन्स कंपनीत जवळ जवळ ४२ वर्षे नोकरी करून आज मी सेवानिवृत्तीचा उपभोग घेत आहे. माझ्या दोन्ही मुलांची इंजिनीअरिंगची शिक्षणे होऊन तीही मार्गस्थ झाली आहेत.
माझ्या हातून कथा-कविता प्रकाशित झाल्या. एका काव्यसंग्रहाची निर्मितीही झाली, तर मुंबई, सांगली आकाशवाणीवरून माझं स्वलिखित नभोनाटय़ेही प्रसारित झाली. अनेक लेख वर्तमानपत्रे, मासिके यातून प्रसिद्ध झाले, तर एका संगीत नाटकाचे लेखन माझ्या हातून होऊन त्यास मराठी नाटय़ परिषदेचे पारितोषिकही प्राप्त झाले. तसेच माझ्या हातून जलरंग व पेन्सिल शेडिंगच्या माध्यमातून अनेक चित्रकृती साकारल्या! हे सर्व आयुष्यात जे साध्य आणि शक्य झाले ते केवळ जीवनात आलेल्या त्या ‘टर्निग पॉइंट’मुळेच!
जर तेलाचा तो मसाज माझ्या पायाला झाला नसता, तर आजही मी अंथरुणालाच खिळून राहिलो असतो. पुढचं जे काही संपन्न आयुष्य मी जगलो ते घडूच शकलं नसतं. त्या आयुष्य बदलवणाऱ्या वळणाचे शतश: धन्यवाद.