‘कुसुम मनोहर लेले’चा अजब योगायोग ही विनिता ऐनापुरे यांची प्रतिक्रिया वाचली. श्रेय नामावलीत आपले नाव असावे याकरिता ऐनापुरे यांना खूपच प्रयत्न करावे लागले. प्रसंगी न्यायालयातही दाद मागावी लागली. त्यानंतर जेव्हा जेव्हा नाटकाच्या जाहिराती वर्तमानपत्रात येत असत त्यात ऐनापुरे यांचा उल्लेख असा यायचा – ‘नराधम विनिता ऐनापुरे’ म्हणजे कादंबरीचे नाव आणि लेखिकेचे नाव याच्यामध्ये हायफन नाही किंवा विसर्ग नाही. मला अशा जाहिराती वाचल्याचे आठवते. ऐनापुरे यांनी आपल्याला न्यायालयात हरविले किंवा वृथा अहंकार यामुळे कदाचित अशी जाहिरात केली गेली असावी. त्या वेळेस ऐनापुरे यांना, अत्यंत वाईट फोनही यायचे तेही निनावी हेही मला माहीत आहे. साडेतीन टक्के इतकाच पसारा असलेल्या आपल्या मराठी साहित्य विश्वात आणि नाटय़ जगतात अशाही नाटय़मय घटना घडत असतात; हा काही योगायोग नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेश देशपांडे, डोंबिवली (पश्चिम)

अभ्यासपूर्ण लेख

‘अडकित्त्यातील सुपारी’ हा १२ मे रोजी प्रसिद्ध झालेला मेघना वर्तक यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. संबंधित व्यक्तींना जास्त भावू शकेल, मनाला भिडू शकेल. मनामनातला, दिवसेंदिवस वाढत जाणारा, भेडसावणारा अशा विषयाला आपण भिडलात हे नक्की कौतुकास्पद आहे. अशा पालकांची ‘मनोवस्था’ आपण मानसशास्त्रीय नजरेतून समाजासमोर आणलीत. हे मानसशास्त्राच्या अभ्यासाविना, निदान जाणून घेतल्याशिवाय कठीण आहे. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे – परदेशी राहाणाऱ्या मुलंमुली, सुना यांची पण मतं जाणून घ्यायला हवीत.

विष्णू यादव, ठाणे

आध्यात्मिक साधना

१२ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘आकाशा’ला गवसणी या लेखातील सुषमा शिंदे यांनी आकाशबरोबर केलेल्या अफाट कष्टांची गोष्ट वाचली आणि मन भरून आलं. अशा इतरही कहाण्या वाचनात आल्या आहेत, पण आपण अगदी साधेपणे इतकी कठीण कामगिरी जणू काहीच विशेष नाही अशा रीतीनं सांगितली आहे हे बघून फार आदर वाटतो. सगळ्यात हलवून टाकणारी स्थिती म्हणजे कित्येक कुटुंबात या मुलांकडे तर पूर्ण दुर्लक्षच केलं जातं. तुम्ही नुसतं कर्तव्यच नव्हे तर एक प्रकारे मोठी आध्यात्मिक साधना केली आहे.

आशुतोष जोशी

चिंतनीय लेख

‘पुरुष ‘माणूस’ झालेला नाही..’ हा २८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला राजन खान यांचा लेख चिंतनीय निश्चितच आहे. पशूमध्ये नसलेली बलात्कारी वृत्ती मनुष्यप्राण्यात आली याचे कारण त्याची वैचारिक पातळी. शारीरिक शिक्षेने गुन्हेगारास सुधारणे शक्य नाही. तो अधिक चेतवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मानसशास्त्रीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन उपचाराचा ठोस उपाय शोधावा.

नरेश नाकती, बोरिवली (प.)

निरोगी वर्तमान दु:खी करण्याची गरज नाही

मेघना वर्तक यांचा लेख वाचला. आवडला. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे तर आज, महानगरीय, अर्धमहानगरीय शहरांमध्ये फारच थोडय़ाफार प्रमाणात शिरकाव केलेल्या या समस्येला पुढे कदाचित अक्राळविक्राळ स्वरूप प्राप्त होणारच नाही, याची खात्री नाही. म्हणून या लेखाद्वारे मंथनाला सुरुवात करून दिलीत याबद्दल धन्यवाद. आत्मकेंद्रीवृत्ती वाढतेय हे नक्की. स्वार्थी होण्याकडे कल वाढतोय. त्याला करिअरिस्टीक स्वभाव असल्याचा मुलामा चढवला जातोय. तथाकथित स्पर्धा फार वाढलीये, असा कांगावा पण वाढलाय. त्यातून पुढे ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ वाढीला लागलेय. यात कुणालाच काहीच वावगे वाटत नाही, ही खरी चिंतेची व दु:खाची बाब आहे.

अशा प्रकारे दुष्टचक्रात सापडलेल्या मध्यमवयीन आईबापांना काही मार्ग सुचवता येतो का, ते बघण्यासाठी हा प्रतिक्रियेचा मार्ग मी स्वीकारलाय. आपली मुले अशाच वागणार आहेत, टोचून बोलून घायाळ करणार आहेत, असेच गृहीत धरून उर्वरीत भविष्याचे, स्वकेंद्रित नियोजन इथून पुढे करावे लागणार आहे. हे अवघड आहे. फारसा व्यावहारिक विचार न करण्याची सवय असलेल्या मनाला ही नवी सवय लावून घ्यावी लागणार आहे. मुले, मुलगी, जवळचे-दूरचे असे नातेवाईक, मित्र यांना तुम्हाला गृहीत धरून चालण्याच्या सवयीपासून हळूहळू परावृत्त करून, तशा सवयी लावल्या पाहिजेत. मुले शिक्षणासाठी बाहेर पडायला सुरुवात झाली की, हळूहळू असली इंजेक्शन्स दिली पाहिजेत. मग कुठे पुढे जाऊन सवय होते. त्याग नावाची, एकतर्फी शोषणावर आधारित भयंकर भोंगळ व भंपक कल्पना त्यागलीच पाहिजे. स्त्रिया लवकर बळी जातात. नवऱ्यांनी सावध राहून बायकोला रोखले पाहिजे. आणि ऐकतच नसेल तर, ‘‘मला माझे वैयक्तिक आयुष्य आहे, तुमचे तुम्ही पहा,’’ असेही प्रसंगी म्हणता आले पाहिजे. हळूहळू वातावरणनिर्मिती केली की, आपापला मतलब सिद्ध करता येतो. कुणी तुमच्या नादी लागत नाही. आपले बोट आपल्या पालकांनी केव्हाच सोडलेय. आता आपले आपल्यालाच पाहावे लागणार, याची जाणीव मुलांना वेळच्यावेळी व्हायला हवी. अगदी नड पडलीच तर आर्थिक मदत होईल, शारीरिकची अपेक्षा करू नका, हे धाडसाने म्हणता आले पाहिजे. ‘‘काय करणार, म्हातारपणी आधार देणारी तीच असतात,’’ अशा पराभूत मानसिकतेतून आजचे निरोगी वर्तमान दु:खी करण्याची गरज नाही. आपले म्हातारा-म्हातारी आपल्यावर अवलंबून नाहीत, हे एकदा पोरांच्या लक्षात आले की बऱ्याच गोष्टी सरळ होतात. हे विवेचन मी माझ्या, स्वानुभवावरून करत आहे. बघू यात ना, प्रयोग करून.

दीपक कुलकर्णी

मराठीतील सर्व वाचक प्रतिक्रिया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta reader response on chaturang article
First published on: 26-05-2018 at 06:56 IST