scorecardresearch

वाचायलाच हवीत : समृद्ध संस्कृतीचा अपरिहार्य भाग

असहमतीचे आवाज : स्त्रिया केवळ भावनाप्रधान, सौंदर्यलक्ष्यी ललितलेखन करू शकतात, असा समज करून दिलेल्या जगात एक स्त्री तर्कनिष्ठ विचार करत वैचारिक मांडणी करू शकते, याचं एक उदाहरण म्हणजे रोमिला थापर यांचं ‘व्हॉइसेस ऑफ डिसेन्ट’ हे पुस्तक.

वाचायलाच हवीत : समृद्ध संस्कृतीचा अपरिहार्य भाग

नीरजा

असहमतीचे आवाज : स्त्रिया केवळ भावनाप्रधान, सौंदर्यलक्ष्यी ललितलेखन करू शकतात, असा समज करून दिलेल्या जगात एक स्त्री तर्कनिष्ठ विचार करत वैचारिक मांडणी करू शकते, याचं एक उदाहरण म्हणजे रोमिला थापर यांचं ‘व्हॉइसेस ऑफ डिसेन्ट’ हे पुस्तक. आपल्या देशात पूर्वापार कोणत्याही एकाच विचारसरणीचं अस्तित्व नव्हतं, तर त्या त्या काळांत बहुसंख्याकांच्या विचारसरणीला छेद देणारे किंवा समांतर जाणारे ‘असहमतीचे आवाज’ही अस्तित्वात होते, हे इतिहासतज्ज्ञ असलेल्या रोमिला दाखवून देतात. इतिहासाचे दाखले देत एक स्त्री अशा असहमतीच्या आवाजांचे महत्त्व सांगते, ती येत्या काळात आपलं मत ठामपणे मांडणाऱ्या स्त्रियांसाठी पायवाट ठरावी. यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

‘व्हॉइसेस ऑफ डिसेन्ट’ हे रोमिला थापर यांचं पुस्तक २०२० मध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याचा मिलिंद चंपानेरकर यांनी ‘असहमतीचे आवाज’ या नावानं केलेला अनुवाद गेल्या वर्षी ‘पपायरस प्रकाशन’नं प्रसिद्ध केला आहे. आज जो माहोल आपल्या आजूबाजूला आहे, त्या काळात हे पुस्तक येणं आणि त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. कोणत्याही राष्ट्रासाठी, त्याच्या सांस्कृतिक उभारणीसाठी, प्रवाही संस्कृतीसाठी हे ‘असहमतीचे आवाज’ किती महत्त्वाचे असतात, हे विसरत चाललेल्या काही लोकांना  त्यांच्याच इतिहासात नेऊन आरसा दाखवण्याचं काम रोमिला थापर यांनी या पुस्तकात केलं आहे.

   इतिहासकार म्हणून जागतिक मान्यता पावलेल्या रोमिला थापर या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त इतिहासाच्या मानद प्राध्यापिका आहेत. २०१९ मध्ये दिल्लीत दिलेल्या व्याख्यानानंतर हा दीर्घ निबंध त्यांनी लिहिला. कोणत्याही देशाची सभ्यता-संस्कृती समजून घेण्यासाठी त्या देशात उमटलेल्या असहमतीच्या आवाजांचा अभ्यास आवश्यक ठरतो, कारण ज्या जगात आपण राहातो, त्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याशिवाय ज्ञानाचं संवर्धन केलं जाऊ शकत नाही, या भूमिकेतून रोमिला थापर यांनी हा निबंध लिहिला आहे.

   स्त्रिया या भावनाप्रधान असतात, त्या जास्तीत जास्त कविता, कथा लिहू शकतात किंवा सौंदर्यलक्ष्यी ललितलेखन करू शकतात, असा काहीसा समज करून दिलेल्या जगात तर्कनिष्ठ विचार करत एक वैचारिक मांडणी स्त्री कशी करू शकते, याची अनेक उदाहरणं जगभरात आहेत. रोमिला थापर आणि त्यांचं लेखन हे असंच एक उदाहरण आहे. असहमती म्हणजे एखाद्या माणसाचे दुसऱ्या माणसाबरोबर मतभेद असणं. हे मतभेद रोजच्या जगण्यातल्या कर्मकांडांपासून ते विचारांपर्यंत कोणत्याही गोष्टींबाबतीत असू शकतात. म्हणजे समाजात राहाणाऱ्या प्रत्येक माणसाची रोजची कर्मकांडं, समाजातली एकूण वर्तणूक किंवा नागरिक म्हणून विविध नियम पाळण्याची कर्तव्य. यापासून ते त्यांचं धर्माचरण किंवा वेगवेगळय़ा विचारधारांचं अवलंबन, यापर्यंत अनेक गोष्टींबाबत मतमतांतरं असू शकतात, वाद होऊ शकतात, या गृहीतकावर आधारलेली ही मांडणी आहे.

  विविध भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत राहाणारा कोणताही माणूस किंवा या माणसांनी बनलेला समाज हा एकसाची, एकजिनसी किंवा कोणत्याही प्रकारचे अंतर्विरोध नसलेला असूच शकत नाही. अगदी पुरातन काळापासूनही जगभरात ही मतमतांतरं होती आणि त्यावर वादविवाद होत होते. वैचारिक मतभेद होते. वेगवेगळय़ा विचारव्यूहांवर चर्चा आणि खल होत होते आणि कधी कधी त्यावर सामोपचारानं मार्गही काढला जात होता. त्यामुळे असहमती ही माणसाच्या स्वतंत्र अस्तित्वाला पूरक असलेलीच गोष्ट आहे आणि ती असणं हे सुदृढ समाजाचं लक्षण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न रोमिला थापर या दीर्घ निबंधात करताना दिसतात.

  कोणताही समाज कधीच एकजिनसी नसतो, तर विविध विचारांच्या माणसांनी भरलेला असतो. अनेकदा असं म्हटलं जातं, की या देशात असहमतीचे आवाज नव्हते. आपण एकसंध होतो. या देशाची हिंदूत्व हीच विचारधारा होती. हिंदू धर्म हा सहिष्णू असल्यानं हिंदू धर्मानं सर्व विचारांचा स्वीकार केला होता. त्यामुळे हिंदू धर्माच्या इतिहासात असहमती व्यक्त करणारे गटच नव्हते. आपल्या सहिष्णुतेला छेद देणाऱ्या या वेगवेगळय़ा कल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे आल्या आणि त्यामुळे विविध गट निर्माण झाले आणि ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. या युक्तिवादाचा प्रतिवाद करण्यासाठी आर्यकाळापासून आजवरच्या महत्त्वाच्या काळाचा पट घेऊन वेगवेगळय़ा काळांत भारतात हे ‘असहमतीचे आवाज’ कसे उमटत राहिले आहेत, याची चर्चा रोमिला थापर या पुस्तकात करतात.

   अतिप्राचीन काळापासून लोकांनी असहमती व्यक्त केली आहे. विरोधी मत मांडताना वादविवाद केलेले आहेत किंवा असहमती असल्याचं एकमतानं मान्य केलं आहे किंवा प्रसंगी त्यातून सहमतीचा मार्ग काढला आहे, असं  रोमिला त्यांच्या उपोद्घातात म्हणतात. ‘असहमती व्यक्त करण्याच्या आकृतिबंधांमध्ये जरी बदल झालेला असला, तरी ऐतिहासिकदृष्टय़ा असहमतीची अभिव्यक्ती अव्याहतपणे सुरू आहे. असं म्हणतानाच समाज पुढे जायचा असेल तर असहमती व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा,’ असंही मत त्या मांडतात आणि या संपूर्ण दीर्घ लेखात अनेक उदाहरणं, इतिहासातले दाखले देत भूतकाळापासून वर्तमानापर्यंत येतात.

  पूर्वीच्या काळी असहमती व्यक्त करणारे अनेक आवाज होते आणि ते आवाज किती व्यापक स्तरावर होते हे सांगण्यासाठी रोमिला थापर त्या त्या काळांतील आर्य, दस्यू, श्रमण अशा संस्कृती, भक्ती आणि सुफी संप्रदायासारखे विविध संप्रदाय यांविषयी बोलत बोलत गेल्या दोन शतकांतली भारतातली आधुनिक असहमतीची चळवळ, महात्मा गांधीजींचा सत्याग्रह, आजचा राष्ट्रवाद आणि निषेधाचा सामाजिक उद्गार, इथपर्यंत पोहोचतात आणि एक भलामोठा ऐतिहासिक पट आपल्यासमोर उलगडत जातात. वैदिक संस्कृतीबद्दल बोलताना त्या काळात असलेल्या ‘अन्यां’चा उल्लेख आपण फारसा करत नाही. पण ऋग्वेदात वारंवार विभिन्न लोकांचे संदर्भ आलेले आहेत. त्यात आर्य वर्णाबरोबरच दास किंवा दस्यू (मूलनिवासी) यांचे संदर्भ वारंवार येतात, हे सांगतानाच

रोमिला थापर आर्य आणि दास यांच्या एकूण जगण्याचे, त्यांच्या परंपरांचे,धर्मपालनाचे, दासांकडे असलेल्या विविध शक्तींचे, त्यांच्या आर्थिक व्यवस्थांविषयींचे संदर्भ देतात. त्याचबरोबर दाससंस्कृती ही ‘अन्यां’ची संस्कृती होती हे ध्यानात ठेवून जर का ऋग्वेदाचा अभ्यास केला, तर दासांचं अस्तित्व उपेक्षितांपेक्षा थोडं वरच्या स्तरावरचं असल्याचे पुरावे आढळतात, असंही रोमिला इथे नमूद करतात. अर्थात इतिहास हा जेते लिहीत असल्यानं आर्याचे दास समाजाविषयी असलेले समज-गैरसमज आपल्याला उपलब्ध आहेत. पण दस्यूंना याविषयी काय वाटत होतं किंवा दास समाज आर्याकडे कसा पाहायचा, हे कळण्याचे स्रोत आपल्याकडे उपलब्ध नाहीत, हेही त्या सांगतात.

 जैन, बौद्ध, आजिवक अशा श्रमण संबोधल्या गेलेल्या ‘अन्यां’विषयी सांगताना चार्वाक आणि लोकायत यांच्या विचारांची त्या चर्चा करतात. श्रमणांची शिकवण ही आपापल्या ऐतिहासिक संस्थापकांच्या (वर्धमान महावीर, गौतम बुद्ध इत्यादी) विचारांभोवती फिरत होती; पण चार्वाकाचे अनुयायी श्रमण नव्हते. त्यांचे विचार श्रमणांशी मतभेद दर्शवणारे होते, हेही त्या या निबंधात अधोरेखित करतात. चार्वाकाच्या ‘अनुयायांनी केवळ दैवतांचं अस्तित्वच अमान्य केलं इतकंच नाही, तर ज्या गोष्टींचा पडताळा करून पाहाणं शक्य नाही, अशा सर्वच गोष्टी त्यांनी नाकारल्या. नास्तिकता, विवेकवाद आणि प्रश्न विचारण्याची गरज, अशा गोष्टींना तेव्हा ‘पाखंडी मत’ ठरवलं जात नव्हतं, तर विचारवंतांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यायोगे दिला जात होता. जगातल्या सत्य गोष्टींचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं ते शोध घेत होते. चार्वाकाच्या समर्थकांनी कर्मकांडं धुडकावून लावली आणि बाद ठरवली. अशा अनेक आणि विविध प्रकारच्या गटांमध्ये त्या काळात विचारांबाबत वादविवाद झाले.’ त्या वादांतील ‘जिवंतपणामुळे वैचारिक गुंतागुंतीही निर्माण झाल्या. वर्णव्यवस्थेतलं स्वत:चं स्थान अबाधित ठेवण्यासाठी एकाच समूहातला एक गट दुसऱ्या गटावर अन्यपणा लादू शकतो आणि त्यांना आपल्या अधीन करू शकतो,’ असं निरीक्षण नोंदवताना जातव्यवस्था आणि सामाजिक अंतर, अस्पृश्य आणि आदिवासी यांच्याविषयी रोमिला थापर ‘अन्यपणाचा ठसा’ या प्रकरणात विस्तृत चर्चा करतात. 

 श्रमणांप्रमाणेच भक्ती संप्रदायातल्या असहमतीच्या आवाजांबद्दल रोमिला बोलतात. एका भक्ती संप्रदायातही विविध समूह जातींचा, धर्माचा समावेश असल्याचं नमूद करून त्या म्हणतात, ‘धर्माची मांडणी करणारे दोन प्रवाह होते आणि ते एकसमान नव्हते. एक- मंदिराच्या आधारे ब्राह्मणांचं वर्चस्व राखणारा धर्मप्रवाह, जो धनवान होता, राजकीय आणि सामाजिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत होता आणि आपला धर्म श्रेष्ठ असल्याचा त्याचा दावा होता. दुसऱ्या धर्मप्रवाहात अनेकविध प्रकारे धर्म स्पष्टपणे अभिव्यक्त करणारे लोक होते आणि त्यांना बहुतांशी मध्यम जाती, अवर्णाचं किंवा प्रसंगी ब्राह्मणांचंसुद्धा समर्थन प्राप्त होतं.’

 भक्ती चळवळीतल्या संतांनी किंवा सुफी पीरांनीही कोणत्याही धर्माची स्थापना केली नाही. उलट धर्मातल्या काही कर्मठ गोष्टींतून मुक्तता मिळावी असा प्रयत्न त्यांनी केला. संत रविदास, चोखामेळा यांच्यासारख्या संतांनी आणि कबीरासारख्या संत-विचारवंतांनी खुल्या मनानं श्रद्धा बाळगण्याच्या मार्गाचा धांडोळा घेतला. अशा या संतांना वेगवेगळय़ा धर्मातले, तसंच वेगवेगळी सामाजिक पार्श्वभूमी असलेले साधक आणि कवी, गायकही येऊन मिळाल्याचं त्या सांगतात. सुफी कवींनी कृष्णाचं गुणगान करणाऱ्या रचना- दोहे त्या काळात लिहिले होते. 

  हा सांस्कृतिक संकर संस्कृतीच्या वाढीसाठी गरजेचा असतो हे आपण सारेच मानतो; पण समाजातला एक प्रवाह हा कायम एकसाची संस्कृतीची मागणी करत असतो. असा प्रवाह त्या काळातही होता; पण तरीही यवन, शक किंवा तुरुष्क ही त्या काळात लावलेली ‘लेबल्स’ वंशाधारित होती, धर्माधारित नव्हती हे रोमिला इथे आवर्जून सांगतात आणि या लोकांना एकसमान अशा एकाच धर्माचे लोक मानून त्यांना हिंदू किंवा मुस्लीम अशी लेबलं चिटकवण्याचा प्रकार फार पुढच्या काळात झालेला आहे हेही नमूद करतात. भक्ती आणि सुफी संप्रदायातलं आदानप्रदान हा त्या काळाचा विशेष असल्याचं सांगत या काळात अनेक संप्रदाय, अनेक पंथ उदयाला आल्याचंही आपल्या लक्षात आणून देतात. त्या म्हणतात, ‘धर्माच्या एकसाचीपणाचा आणि एकसमानतेचा आग्रह न धरल्यानंच असहमतीला ज्या काही आकृतिबंधाचा आकार लाभला, तो प्राप्त होणं साध्य झालं आणि काही अंशी तसं साध्य होणं आजही सुरू आहे. त्या काळात संघर्ष झाले आणि काही अगदी हिंसक असेही झाले.’ भारतीय समाजातल्या सामाजिक भेदांचा धारदारपणा लक्षात घेतला, तर ही गोष्ट फारशी नवलाची ठरत नाही. असं असलं तरी त्यातले असहमतीचे अंत:प्रवाह आहेत, ते एकमेकांच्या सान्निध्यात राहाण्याचा, एकमेकांना अवकाश देण्याचा आणि वाद असले तरी लवचीकता राखण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करतात. हा सारा इतिहास तिथेच संपत नाही, तर रोमिला पुढे ब्रिटिश साम्राज्याविरोधात पुकारलेल्या स्वातंत्र्यलढय़ापर्यंत पोहोचतात, त्यातल्या अनेक चळवळी, महात्मा गांधीजींचा सत्याग्रह, या साऱ्याशी त्यांची ही मांडणी जोडून घेतात. 

  गतकाळातले ‘असहमतीचे आवाज’ आज आपल्याला काय सांगू पाहातात ते ऐकायला हवं असं त्यांना वाटतं. त्यामुळेच शेवटच्या प्रकरणात त्या म्हणतात, ‘असहमती, विरोध, मतभेद अशा सर्व गोष्टी भूतकाळात केवळ अस्तित्वात होत्या असं नाही, तर समकालीन विचार आणि आचरण यांच्याशी त्यांचा परस्परसंवादही होता आणि त्यामुळे नव्या परिभाषा निर्माण करण्यात त्यांनी योगदानही दिलं होतं. आपण आज जिला भारतीय सभ्यता-संस्कृती म्हणतो, तिच्या घडणीत अशा परिभाषा, विविध जीवनशैलींच्या विलक्षण रचना आणि विविध संस्कृती अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. भूतकाळात आणि आजच्या काळातही ‘इतर’ आणि ‘मी’ यांच्याभोवती घुटमळत राहिलेल्या वाद-संवादाची परिणती काय झाली, ते समजून घेण्याच्या दृष्टीनं असहमतीचे आकृतिबंध ओळखणं आणि त्याची समाजाबरोबरची आंतरक्रिया जाणून घेणं आवश्यक आहे.’

 आज अतिरेकी राष्ट्रवादाच्या आणि समाज एकजिनसी बनवण्याचा काळात असहमती, मतभेद व्यक्त करणारे विरोधी विचार स्वीकारणं आणि त्यावर चर्चा घडवून आणणं गरजेचं आहे. धर्म कधीही स्थिर राहात नाही. समाज बदलतो तसा त्या समाजाशी निगडित धर्मही बदलतात, धार्मिक ओळखीही बदलत जातात, हे समजून घेणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. गेल्या काही वर्षांत उमटलेला ‘असहमतीचा आवाज’ त्या गांधीजींच्या सत्याग्रहाशी जोडतात आणि तो आवाज म्हणजे शाहीनबागमध्ये झालेल्या ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ या कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचा आवाज आहे, असं त्यांना वाटतं. स्त्रिया आपल्या जन्म आणि नागरिकत्वाशी निगडित प्रश्नांबद्दल बोलतात, त्यासाठी चळवळ करतात हे रोमिला थापर यांना महत्त्वाचं वाटतं.  

    असहमती, मतभेद आले, की कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोललं जातं; पण चळवळी, आंदोलनं, वैचारिक मतभेद व्यक्त करण्यासाठी चर्चा, वादविवाद होत राहाणं हे समाजाच्या आणि संस्कृतीच्या प्रवाहीपणाचं लक्षण असतं. धर्मनिरपेक्ष लोकशाहीत तर आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं हे महत्त्वाचं असतं आणि शासनव्यवस्थेलाही या असहमतीच्या आवाजांना ऐकावं लागतं, त्यावर विचार करावा लागतो. रोमिला म्हणतात, ‘अलीकडचा इतिहास पाहिला तरी लक्षात येतं, की नागरिक जेव्हा जेव्हा आपला आवाज बुलंद करतात, असहमती दर्शवतात, तेव्हा तेव्हा राजसंस्था प्रयत्न करूनही हा आवाज दाबू शकत नाही.’ रोमिला थापर यांना वाटतं, ‘नागरिकांना जे म्हणायचं आहे ते राजसंस्थेला ऐकून घ्यावं लागलेलं आहे. राजसंस्था आणि नागरिक, दोघांचे परस्परांप्रति जे अधिकार आणि कर्तव्यं आहेत त्यांविषयी त्यांनी एकमेकांशी परिणामकारक संवाद साधला, तर राजसंस्था आणि नागरिक या दोघांच्याही हाती त्यांचं आणि देशाचं भवितव्य राहू शकेल.’

 जगाचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं, की आंदोलनं, चळवळी यांबरोबर साहित्यातून उमटलेले विरोधाचे सूर, अशा गोष्टींना प्रत्येक राजवटीला तोंड द्यावं लागलं आहे. म्हणूनच विविध विचारधारांचा इतिहास असलेल्या आपल्या देशानं आणि त्यातल्या लोकांनी विरोधाच्या सुरांना दाबून टाकण्यापेक्षा ते ऐकण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण एक आवाज दाबला, तर अनेक आवाज उमटत जातात, हे आपला इतिहास वारंवार सांगतो आहे. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले, तरी ते लोकांच्या मनात तरंगत राहातात, ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती आणि त्याचा इतिहास सविस्तरपणे जाणून घ्यायचा असेल, तर रोमिला थापर यांचं Voices of dissent: An Essay हे पुस्तक किंवा त्याचं मराठीतील भाषांतर आवर्जून वाचायला हवं.

nrajan20@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:04 IST

संबंधित बातम्या