‘‘मोकाशी, परबांची आणखी एक कमाल ऐका. त्यांनी टीव्हीचा रिमोट मोडला. परबांची सून माझ्या सुनेला सांगत होती, ‘‘दादा आजकाल विचित्र वागताहेत. परवा फ्लॉवरपॉट फोडला, काल त्यांनी टीव्हीचा रिमोट मोडला. बरं, काही विचारायची सोय नाही. ते फक्त ‘विठ्ठल विठ्ठल,’ म्हणणार! वच्छीनं सांगितलं म्हणून मला रिमोटचं समजलं.’’ परबाचं हे असं विचित्र वागणं ओकांना मात्र चंदनाच्या झाडाप्रमाणे वाटत होतं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘परब, मी ऐकलं आहे ते खरं आहे का? मला खुद्द ओकांनी सांगितलं आहे. ओक तुमच्याविरुद्ध बोलणार नाहीत.’’ मी प्रश्न टाकला.

परबांनी ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत मान खाली घातली.

‘‘पण या वयात तुम्हाला पतवंडाबरोबर हॉलमध्ये क्रिकेट खेळायची काय गरज होती? प्लॅस्टिकच्या चेंडूनं तुम्ही किमती फ्लॉवरपॉट फोडलात? सून तुमच्यावर रागवणं स्वाभाविक आहे!’’

फ्लॉवर पॉट फुटल्याचं दु:ख, परबांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या चार अश्रूंतून, माझ्या ध्यानी आलं. मला खेद वाटला. परब तोंडातून फक्त ‘विठ्ठल, विठ्ठल’ उच्चारत होते. मी कितीतरी वेळा, चोरून, एका काचेच्या बरणीतून गुळाचा खडा काढतो, दुसऱ्या बरणीतून तूप काढतो, गूळतूप एकत्र मिसळतो व मटकावतो. गेल्या २० वर्षांत मी एकदाही बरणी फोडलेली नाही. आज त्र्याऐंशी या वयातही माझे हात स्थिर आहेत. मधुमेह हा विकार मला चोरी करायला प्रवृत्त करतो. सज्जनाला चोर बनवणाऱ्या मधुमेह या इंग्रजी रोगाचा धिक्कार असो. तेवढय़ात खुद्द ओकच आले. मी विचारलं, ‘‘ओक, पंच्याऐंशी वर्षांच्या, ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणणाऱ्या परबांच्या हातात एवढा जोर आहे? त्यांनी थेट फ्लॉवरपॉटच टिपून फोडला? विठ्ठलनामात शक्ती आहे, असं परब म्हणत असतात खरं!’’ माझ्या उपरोधी स्वरातील आनंद लपून राहिला नव्हता.

फ्लॉवरपॉटबाबत मौन पाळणारे परब सरसावून बोलले, ‘‘विठ्ठलनामात शक्ती आहे, असं मी म्हणत नाही, तुकोबा म्हणतात. ‘विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे। तरी तो काळाचे दात ठेची॥ बहुत तारिले सांगो किती आता। ऐसा कोणी दाता दुजा नाही॥ तुका म्हणे म्या ही ऐकुनिया कीर्ति। धरिला एकांती हृदयामाजी॥’’

ओकांनी खुलासा केला, ‘‘परबांचा चेंडू लागून फ्लॉवरपॉट उभ्याचा आडवा झाला, टेबलावरून गडगडला, खाली जमिनीवर पडला व फुटला. परब व त्यांचा पणतू हॉलमध्ये क्रिकेट खेळत होते हे सत्य आहे. एका भाऊबीजेला सुनेला ओवाळणी म्हणून तिच्या भावानं तो फ्लॉवरपॉट दिला होता म्हणे!’’

ओक परबांची बाजू घेत होते. सत्यवचनी परबांनी स्वत:चं तोंड उघडून, ओकांचं तोंड बंद केलं, ‘‘सुनेचं म्हणणं खरं आहे. तिच्या भावानं फ्लॉवर पॉटची भाऊबीज दिली होती, फ्लॉवरपॉटमध्ये तिच्या भावना गुंतल्या असणार.’’

ओक व परब यांची तोंडातोंडी ऐकताना माझे कान सुखावले होते. मी माझं तोंड उघडलं, ‘‘परब, तुमची कमाल आहे! पंच्याऐंशी उन्हाळे पावसाळे पाहून तुम्ही काहीही शिकला नाही. या वयात तुम्ही क्रिकेट खेळताच कामा नये. खेळायचंच असेल तर खाली उतरा, सोसायटीच्या आवरात, आपल्या ब्लॉकपासून दूर खेळा. कोणाच्या तरी खिडकीची काच फुटेल, पण घरचा फ्लॉवरपॉट वाचेल. खिडकीचा मालक खाली उतरेपर्यंत, तुम्ही व पणतू घरी परता म्हणजे झालं. मुख्य म्हणजे पणतूला शहाणं करा, नाही तर तो मूर्खासारखा खिडकीची काच फोडल्याचं कबूल करून बसेल.’’

‘‘मोकाशी, परबांची आणखी एक कमाल ऐका. त्यांनी टीव्हीचा रिमोट मोडला. परबांची सून माझ्या सुनेला सांगत होती, ‘‘दादा आजकाल विचित्र वागताहेत. परवा फ्लॉवरपॉट फोडला, काल त्यांनी टीव्हीचा रिमोट मोडला. बरं, काही विचारायची सोय नाही. ते फक्त ‘विठ्ठल विठ्ठल,’ म्हणणार! वच्छीनं सांगितलं म्हणून मला रिमोटचं समजलं.’’

परब पुटपुटले, ‘‘नाशिवंत देह नासेल हा जाणा। का रे उच्चाराना वाचे नाम॥ तुका म्हणे नाम वेदासी आगळे। ते दिले गोपाळे फुकासाठी॥’’

मी खडसावलं, ‘‘परब, आपण आज आपल्या घरी राहतो, तुकोबांच्या घरी नाही. तुम्ही फ्लॉवरपॉट फोडणार, रिमोट तोडणार आणि वरती, आपला देह नाशिवंत आहे हे तुकोबांचे वचन आम्हांला ऐकवणार! या वयात आपण मुलासुनेला काहीही मदत करू शकत नाही, पण कमीत कमी त्यांना आपला उपद्रव होता कामा नये. गेल्या २० वर्षांत मी तुपाची, गुळाची एकही बरणी फोडलेली नाही.’’

ओक म्हणाले, ‘‘परब, तुम्ही आम्हांला तुकोबांच्या वचनातून, या संसारात आस्था ठेवू नका, अडकून पडू नका हा तसा चांगलाच उपदेश करता! एक वेळ वाऱ्याला गवसणी घालणं, आकाशाचे तुकडे पाडणं, पाण्यावरच्या लाटा गुंफू पाहणं या गोष्टीही योग्य ठरतील,पण संसारात आस्था ठेवणं योग्य नाही, असं एक संस्कृत सुभाषित आहे. पण आता ज्या संसारात आपण वावरत आहोत, तो आपला नाही, मुला-सुनेचा, नातू-नातसून यांचा आहे. त्यांच्या संसारातील फ्लॉवरपॉट, रिमोट यांचा तुम्ही निकाल लावणार आणि वर विठ्ठल विठ्ठल म्हणणार! हे योग्य नाही.’’

ओकांनी परबांना ताणलं याचा मला एवढा आनंद झाला की मी ओकांकडे मूळ संस्कृत सुभाषिताची फर्माईश नोंदवली.

ओकांचं तोंडावरचं आश्चर्य सुभाषितातून बाहेर पडलं, ‘‘युज्यते वेष्टनम् वायो:, आकाशस्य च खंडनम्। ग्रथनम् च तरंगाणाम्, आस्था न आयुषि युज्यते॥’’

‘शाबास, ओक!’ असं म्हणत मी परबांवर उखडलो, ‘‘परब, मला तुकोबावाणी ऐकायची नाही. फ्लॉवरपॉट व रिमोट याबाबत लोअर मराठीत माफी मागा.’’

परब अपराधी स्वरात म्हणाले, ‘‘मी क्रिकेट खेळत नव्हतो. पणतू चिंतामणी एकटाच हॉलमध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूची फेकाफेक करत होता. त्याच्या चेंडूनं फ्लॉवरपॉट पडला व फुटला. तो म्हणाला, ‘पणजोबा, मला आई खूप मारेल. हा फ्लॉवरपॉट तिचा आवडता आहे. मी तुमचं नाव सांगतो. तुम्ही ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणा. तुम्हाला कोणी मारणार नाही’ ऋचानं रिमोट मोडला तीही घाबरली. ती मला म्हणाली, ‘पणजोबा, प्लीज मी तुमचं नाव सांगते.’ ऋचानं मला एक गोड पापा दिला. चिंतामणी, ऋचा यांना मार खाण्यासाठी मी त्यांच्या आईकडं कसा लोटू? मला ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणणं भागच होतं. फार फार वर्षांपूर्वी, नरसोबावाडीच्या प्रवासात, माझ्या बायकोनं सोन्याची अंगठी हरवली. सासू सासऱ्यांना ती बिच्चारी कशी तोंड देईल? तिनंही तेव्हा, अंगठी माझ्याकडं ठेवायला दिली होती असंच सासूला सांगितलं होतं. तेव्हाही मी, ‘विठ्ठल, विठ्ठल’च म्हणालो होतो.’’

‘‘सोन्याची अंगठी?’’ माझी वाचाच बसली. सोन्याच्या अंगठीत, गूळतुपाने भरलेल्या शंभर काचेच्या बरण्या विकत आल्या असत्या!

ओक गदगदले, ‘‘परब, माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुम्ही किती सहजपणे दुसऱ्याच्या चुका आपल्या अंगावर ओढून घेता? तुम्ही चंदनवृक्षाप्रमाणे आहात! आपल्याला तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही तो सुगंधित करतो.

‘सुजन: न याति वैरम्,

परहित निरत: विनाशकाले अपि।

छेदे अपि चंदनतरू: सुरभियति मुखम् कुठारस्य॥’

परब ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत होते. कधी नव्हे ते मीही ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणू लागलो. सापाचा पुष्पहार झाला असे माझ्याकडे पाहून ओकांना वाटले असणार!

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व वार्धक्यरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B l mahabal loksatta chaturang marathi articles part
First published on: 22-07-2017 at 01:09 IST