|| अर्चना जगदीश

माणसाला निसर्गाबद्दल अनादिकालापासून प्रचंड कुतूहल वाटत आलं आहे.  निसर्ग समजून घेण्यासाठी तेव्हापासून सुरू झालेली धडपड अव्याहत सुरू आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती, हे स्त्रीरूप म्हणूनच जनपदाला सहज माहीत आहे. वैदिक वाङ्मयातदेखील निसर्गाचं स्त्रीरूप वेगवेगळ्या प्रतीकांमधून विस्तृतपणे मांडलं आहे. पाश्चिमात्य धार्मिक विवेचनात आणि गेल्या काही दशकांमध्ये सुरू झालेल्या मानववंशशास्त्रासारख्या ज्ञानशाखांमधूनही निसर्ग-पृथ्वी हे मातृरूपच कल्पिलेलं आहे. म्हणूनच कदाचित निसर्ग-पर्यावरण समजून घेण्यात, ते समजावून सांगण्यात आजवर स्त्रियांनी मोलाची भूमिका बजावलीय.

स्त्रियांना मुळातच निसर्गाबद्दल, भवतालाबद्दल आत्मीयता असते. आजूबाजूच्या झाडं-झुडपं, जंगलं, प्राणी-पक्षी, पर्वत-झरे, नद्या, वारा आणि वाटा सगळ्यांबरोबर त्या स्वत:ला सहज जोडू शकतात. शिवाय स्वत:चा आणि परिस्थितीचाही शोध घेण्याची अजोड क्षमता त्यांच्यात असते. माणसाखेरीज इतर जीवनाचा वेध घेण्याची स्त्रियांची प्रेरणादेखील आदिम आहे. स्त्री संशोधकांनी एकदा का एखादं काम स्वीकारलं तर त्या ते झोकून देऊन करतात. उत्कटता हा तर असं काम स्वीकारणाऱ्या स्त्रियांच्या अस्तित्वाचा गाभा असतो. निसर्गसंवर्धन – संरक्षणाच्या प्रश्नांकडे सजगतेने बघणं, त्यातलं सातत्य आणि आहे ते जपून ठेवण्याची धडपड हाही त्यांचा स्थायिभाव!

निसर्ग-परिसर-प्राणी आणि भवतालातले सगळे घटक समजून घेण्यात अनेक स्त्री संशोधक, अभ्यासक, आंदोलक यांचे योगदान म्हणूनच मोठे आहे. स्त्रियांनी केलेला जंगलातल्या प्राण्यांचा अभ्यास, कपि-वानरांचा अभ्यास, साहस आणि संशोधन एकत्र करून केलेला सागरी जीवांचा अभ्यास आणि पुढे ते वाचविण्याची धडपड हे सगळंच प्रेरणादायी आहे. आज माहिती महाजाल आणि संगणकामुळे त्यांच्या हकीकती नेहमी कानावर पडत असतात, दिसत असतात. अर्थात, अनेकदा ते खोलवर वाचून-समजून घेणं मागे पडतं आणि त्यांच्या कामातून त्या काय सांगू पाहतात हेही लक्षात येत नाही.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर अनेक स्त्री संशोधकांनी, संशोधक म्हणून सुरुवातीचा काळ व्यतीत केला. नंतर मात्र त्या आपल्या अभ्यासविषयात म्हणजे प्रजातीत इतक्या गुंतून गेल्या, की त्या प्राण्यांचं आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण हेच त्यांचं ध्येय बनलं. ओरिया डग्लस हॅमिल्टन आणि सिंथिया मॉस या दोघी आफ्रिकेतल्या आलेसोम्बी अभयारण्यातल्या हत्तींच्या अभ्यासात, संशोधनात रमल्या आणि हत्ती वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या. पुढे आपल्या अथक परिश्रमांनी त्यांनी तिथल्या भवतालात बदलही घडवला. स्त्रिया संशोधन करताना उत्कटतेने काम करतात. गुंतून पडायचं नाही असं ठरवूनही आपल्या अभ्यासविषयात म्हणजे प्राणी-पक्षी अथवा जंगल- आदिवासी यात गुंतून जातातच. ज्या अशा गुंतून गेल्या त्यांनीच पथदर्शी काम केलं. अर्थात असं गुंतून न जाता फक्त संशोधन करणाऱ्या आणि त्यातून इतरांना संरक्षणासाठी मार्ग दाखविणाऱ्या स्त्रियांचं योगदानही मोठंच आहे.

यातल्या अनेक स्त्रियांनी निसर्गाबद्दल लिहिलंय. निसर्ग आणि स्त्रिया यांच्यातला हळुवार भावबंध त्यांनी जगासमोर उलगडला आहे. या सगळ्या लिहिण्यातून  कसदार साहित्य तर तयार झालं आहेच, पण निसर्गाचा विनाश करत जगणाऱ्या आजच्या जगाला, आपण काय गमावत आहोत याची विदारक जाणीवही या लिखाणाने करून दिली. एलिझाबेथ वूडीसारख्या स्वत: आदिवासी असलेल्या संशोधिकेनं आपल्या कथा-कवितांमधून उत्तर कॅनडातले आदिवासी आणि सामन मासे यांच्यातलं नातं सांगितलंय. बिरुटे गालडिकाजनं बोर्निओमधल्या ओरांगउटांनबरोबर भावनिक बंध तयार होताना आलेले हृद्य अनुभव तिच्या ‘रिफ्लेक्शन्स ऑफ ईडन’ या पुस्तकात मांडलेत. सिंथिया मॉसनं हत्ती एकमेकांशी कसा मूक संवाद साधतात याचं अत्यंत सुंदर विवेचन ‘एलिफंट मेमरीज’मध्ये केलं आहे.

आज पुस्तक वाचनाचा जमाना जवळजवळ लुप्त होत चाललाय पण तरीही बिरुटे गालडिकाज, डायन फॉसी, जेन गुडाल यांची त्यांच्या अभ्यास विषयांवर लिहिलेली पुस्तकं वाचायलाच हवीत. त्यातून जर वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण यासाठी काही काम संशोधन करायचा असेल तर त्या तिघी आणि इतरही अनेक संवेदनशील स्त्रियांचं लिखाण वाचलं पाहिजे. जेन गुडालने तिचं पाहिलं पुस्तक, ‘इन द शॅडो ऑफ मॅन’ १९७६ मध्ये लिहिलं आणि आपली समज कशी बदलत, सुधारत गेली हे ती अजूनही सांगते आहे त्यासाठी ‘सीड्स ऑफ होप’ तिनं २०१३ मध्ये पूर्ण केलं. हे वाचताना संशोधनातल्या चिकाटीबद्दल तर शिकायला मिळतंच, पण स्त्रियांचा प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो. या सगळ्या जणी माणूस नावाच्या प्रजातीबद्दलही सतत नव्याने सांगत राहताना दिसतात.

बिरुटे गालडिकाजच्या प्रदीर्घ संशोधनकाळात जेव्हा ती बोर्निओत ओरांगउटांन या महाकाय कपींचा अभ्यास करत होती तेव्हाचा एक फार हृद्य प्रसंग तिनं सांगितलाय. अकमद नावाची एक ओरांगउटांन मादी आपल्या पिलाला जन्म देत होती. त्या वेळी तिनं बिरुटेला सहज आपल्याजवळ येऊ दिलं होतं. इतकंच काय पण आपल्या नवजात शिशूला हाताळण्याची परवानगीदेखील मूकपणे तिला देऊन टाकली होती. बिरुटेबरोबर नेहमी ओरांगउटांनना खाद्य आणि फळं देणाऱ्या पुरुष मदतनीसाला मात्र अकमदने जवळपासही फिरकू दिलं नव्हतं. या प्रसंगाच्या वेळी बिरुटेंच्या निरीक्षणांच्या आणि छायाचित्रणाच्या आड येणारं झुडूप बाजूला करण्याच्या नादात हा मदतनीस पिलाच्या जवळ जातो आहे असं वाटताच अकमदने आपले मोठे सुळे दाखवत त्याच्या दिशेने झेप घेतली. चपळाईमुळे तो वाचला. खरं तर ओरांगउटांन असा हल्ला करण्याची उदाहरणं अगदी दुर्मीळ आहेत. आताच्या घडीला अकमद गर्भार अवस्थेत भेटली होती. इतक्या दिवसानंतर भेटूनही अकमदने बिरुटेवर विश्वास टाकला होता याचं कारण अकमदला बिरुटेने काही वर्षांपूर्वी चोरटय़ा शिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवलं होतं. पुढे काही दिवस तिची देखभाल करून तिला पुन्हा जंगलात सोडून दिलं होतं. आताची तिची आणि बिरुटेची गाठ तब्बल पंधरा वर्षांनंतर पडली तेव्हाही अकमदला पुन्हा मूक संवाद साधायला काही अडथळा आला नाही. त्यानंतर एकदोनदा अकमद कॅम्पवर आली होती. शेवटच्या वेळी निघण्याच्या थोडा वेळ आधी अतिशय जवळिकीने तिच्यापाशी थांबली. रातकिडय़ांच्या आवाजात रात्र वाढायला लागली तशी तिनं बिरुटेवर विश्वास ठेवत जवळच्याच झाडावर रात्रीच्या निवाऱ्यासाठी घरटं तयार केलं आणि उंच झाडावर निघून गेली. अकमदची ही सगळी गोष्ट सविस्तर सांगून झाल्यावर, त्यांच्या शेवटच्या भेटीचा हृद्य प्रसंग सांगताना बिरुटे लिहिते, ‘ओरांगउटांनच्या भावविश्वात एका कटाक्षातच ते भावना सांगतात आणि समजतात. एकदा समज तयार झाली की ती कायम टिकते. माणसांसारख्या नात्यांच्या परीक्षा तिथे सतत द्याव्या लागत नाहीत!’

स्त्रियांचं विज्ञान समजून घेणं काही वेगळं असतं का? शांतपणे ऐकून घेणं, प्राणी आणि निसर्गाबद्दल अतीव प्रेमभाव बाळगणं, पद्धती आणि सांख्यिकीवर अवलंबून असणाऱ्या शास्त्रीय संशोधनाकडे हळुवार आणि भावगर्भ दृष्टीने पाहणं यामुळे गेल्या तीन-चार दशकांत झोकून काम करणाऱ्या बिरुटे, फॉसी, जेन गुडाल, ओरिया हॅमिल्टन आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया आणि त्यांच्या लिखाणाने जगाला प्राणी संशोधनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन दिलाय. मनापासून कामाचा ध्यास घेणं, त्याबद्दल लिहिणं आणि त्यातून सगळ्या प्रजाती आणि निसर्गाशी आपण कसे जोडलेले आहोत हे सांगत राहण्याचं काम कॅथरीन पायने, अलेक्सान्द्रा मोर्टेन, ज्युडिथ फ्रीमन अशा अनेक स्त्रियांनी केलं आहे. निसर्गसंवर्धनात संशोधन महत्त्वाचं आहेच. पण माणूस आणि निसर्ग यांचं नातं काय आहे हे सांगण्यासाठी केलेलं लिखाण सर्वसामान्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्यातून आपणही  निसर्गसंवर्धनासाठी काही तरी करायला तयार होऊ. प्रत्यक्ष कामाची गरज समजून घेऊ. या शहरीकरणाच्या जमान्यात आपण निसर्गापासून दूर गेलो आहोतच, पण आपल्या मनातून- विचारातूनदेखील निसर्ग हरवत चाललाय. म्हणूनच आपलं भावविश्व निसर्गाशी जोडायचं असेल तर असं लिखाण महत्त्वाचं आहे. आपण निसर्गाशी भावनेच्या पातळीवर जोडले जाऊ तेव्हाच त्याचा विनाश थांबवण्यासाठी कृती करायला प्रवृत्त होऊ.

godboleaj@gmail.com