अर्चना जगदीश
‘जंगलाचे शेतकरी’ मानल्या जाणाऱ्या हॉर्नबिल्स अर्थात धनेश पक्ष्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी थायलंडच्या महिडोल विद्यापीठातल्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापक
पिलाई पूनस्वाद गेली दोन दशकं थायलंडमधल्या जंगलात अथक प्रयत्न करताहेत. त्यांनी चोरटय़ा शिकाऱ्यांना हेरलं आणि धनेशाचं खाद्य असणारी झाडं आणि जंगलं कशी वाचवता येतील यावर काम सुरू केलं. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी ‘घरटे दत्तक योजना’ सुरू केली. पिलाई यांना या कामासाठी मानाचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला आहे.
एखाद्या जंगलात नाही तर देवराईत शांतता असेल तेव्हा; मुख्यत: सकाळी किंवा कलत्या उन्हात अनेकदा सुंदर पक्षी दिसतात नाही तर त्यांचं कूजन ऐकू येतं. यात लांब ताना, नाजूक लकेरी, शिट्टय़ा आणि सुरेल संगीत सगळंच असतं. पण अनेक वेगळे आवाजदेखील कधीकधी लक्ष वेधून घेतात. कोकणात अशा जागांवर फिरताना तुमचं नशीब जोरावर असेल तर उंच पर्णसंभारातून पंखांचा झप-झप आवाज करत उडणारा, नाही तर झाडावर-फांदीवर बसण्यासाठी अलगद उतरणारा पिवळ्या मानेचा मोठा धनेशदेखील दिसतो.
धनेश पक्षी म्हणजे मोठा हॉर्नबिल, कोकणात माडगरुड म्हणून ओळखला जातो, तर त्याच्या इतर जातींना ककणेर, शिंगचोच्या अशी नावेदेखील आहेत. या पक्ष्याच्या वेगवेगळ्या प्रजातींना हॉर्नबिल्स म्हणून ओळखले जाते, पण मराठी तसेच इतर स्थानिक भाषांमध्येही त्याच्या प्रजातींना वेगवेगळी नावं आहेत. एकदा दुपारच्या रणरणत्या उन्हात रत्नागिरी जिल्ह्यतल्या एका देवराईत निघालो होतो, झाडं तर पाहायची होतीच, पण खरं तर गारवा हवा होता. देवराईत जाऊन आम्ही सगळे शांत बसलो होतो आणि तेव्हाच भरदुपारी आम्ही ते अद्भुत नाटय़ बघितलं. आजूबाजूला पसरलेल्या पंधरा-वीस महावृक्षांच्या पर्णसंभारातून दोन-तीन मोठे धनेश पंखांचा आवाज करत गिरक्या घेत दुसऱ्या झाडावर गेले, मागून असेच आणखी दोन आणि नंतर तीन-चार नुकतीच पंख फुटलेली, ढोलीतून बाहेर पडलेली त्यांची पिल्लं. ते सतत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेपावत होते आणि कधी ते पूर्ण दिसायचे तर कधी त्यांची धूसर आकृती. त्यांचं आपल्या धुंदीत चाललेलं हे नर्तन पुढे दहा-पंधरा मिनिटं सुरू होतं. आम्ही नक्की किती धनेश बघतो आहोत आम्हालाही समजत नव्हतं. नंतर लक्षात आलं असे महावृक्ष, शांतता आणि धनेशाचं खाद्य पुरविणारी झाडं आता बाकीच्या परिसरातून संपत चालली आहेत, म्हणूनच ते अशा देवरायांच्या आश्रयाला येतात.
शिंगासारखी त्यामानाने बोजड भासणारी चोच, पिवळी मान, काळे पंख आणि पांढरी शेपूट असणारा हा मोठा पक्षी म्हणजे सह्याद्रीतल्या टिकून असलेल्या जंगलांचं भूषण आहे आणि ही जंगलं भविष्यातही टिकून राहावीत म्हणून महत्त्वाचा आहे. दर वर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये या हॉर्नबिल्सची घरटी बनवण्यासाठी गडबड सुरू होते. हे भव्य, मोठय़ा पंखांचे पक्षी आपलं घरटं जुन्या-प्राचीन वृक्षांच्या ढोल्यांमध्ये करतात. या ढोली आकाराने लहान आणि वृक्षाची फांदी तुटून तयार झालेल्या असतात. आंब्याचे आणि बेहेडय़ाचे असे महावृक्ष आपल्याकडे आता फक्त देवराया किंवा कशाबशा टिकून राहिलेल्या उत्तर सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या जंगलात दिसतात. केरळ आणि तमिळनाडूमधल्या संरक्षित जंगलातही हे पक्षी आढळतात .
भारतात हॉर्नबिल पक्ष्याच्या चार प्रजाती आढळतात. शहरात अधून-मधून दिसणारा राखी धनेश, उत्तर सह्यद्रीत जास्त आढळणारा काळा- पांढरा मलबार धनेश, पिवळ्या मानेचा मोठा धनेश आणि स्थानविशिष्ट मलबार राखी धनेश. हा मलबार राखी धनेश त्याच्या लकेरींसाठी प्रसिद्ध आहे आणि तो आकाराने लहान असतो. या सगळ्या धनेशांचं मुख्य अन्न म्हणजे वड-पिंपळाच्या जातीतल्या सर्व झाडांची फळं, तसेच निवळी, बेहेडे, चांदफळ यांसारख्या दुर्मीळ होत चालेल्या वृक्षांची फळं. आणखीही अनेक दुर्मीळ वनस्पतींची वेलींची फळं. या वृक्षांच्या बिया धनेश पक्ष्यांच्या पचनसंस्थेतून विष्ठेद्वारे बाहेर पडल्या तरच रुजतात अन्यथा त्यांची रोपं तयार करणं खूपच अवघड असतं. म्हणूनच या पक्ष्यांना ‘जंगलाचे शेतकरी’ म्हणतात. यांच्यामुळे जंगलात अनेक दुर्मीळ झाडांचं नैसर्गिक पुनरुज्जीवन होत राहतं, मात्र आता सह्यद्रीत देवराया- जंगलं तुटत चालल्या आहेत आणि या पक्ष्यांचं खाद्य असलेली झाडंही तुटत चालली आहेत. ईशान्य भारतातही पूर्वी भरपूर संख्येने आढळणारे मोठे धनेश आता दुर्मीळ झालेत, कारण तिथल्या अनेक आदिवासी जमातींमध्ये लग्नाच्या वेळी वराला मोठय़ा धनेशाच्या चोचीची टोपी भेट द्यायची प्रथा होती. सुदैवाने आपल्याकडे सह्यद्रीत हा धोका नव्हता, पण घरटं करण्यासाठी लागणारी, ढोली असलेली मोठी झाडं आणि इतर वृक्षसंपदा नाहीशी होत चालली आहे म्हणून हे पक्षीही दुर्मीळ होत चाललेत. धनेश पक्षी दर वर्षी एकाच झाडाच्या ढोलीत घरटं करतात आणि त्यांच्या जोडय़ा आयुष्यभरासाठी असतात. शिवाय दर वर्षी त्यांना एकच पिल्ली होतं. हे पक्षी फक्त भारतातच नाही तर आग्नेय आशियातही आढळतात. थायलंड, मलेशिया या देशांमध्येही चोरटी शिकार आणि त्यांचा अधिवास नाहीसा होणं ही ते दुर्मीळ होत जाण्याची प्रमुख कारणं आहेत.
थायलंडच्या महिडोल विद्यापीठातल्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापक पिलाई पूनस्वाद गेली दोन दशकं थायलंडमधल्या धनेशाच्या संरक्षण-संवर्धनासाठी अथक प्रयत्न करताहेत. थायलंडच्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरून त्यांनी अनेक घरटी शोधण्यापासून सुरुवात केली. चोरटय़ा शिकाऱ्यांना हेरलं आणि धनेशाचं खाद्य असणारी झाडं आणि जंगलं कशी वाचवता येतील यावर काम सुरू केलं. इतकंच नाही तर चाळीसहून अधिक चोरटय़ा शिकाऱ्यांना आणि पिले चोरणाऱ्यांना संरक्षणाच्या कामात सहभागी करून घेतलं. एकदा जंगलात फिरत असताना त्यांना अतिरेकी समजून, आर्मीचे लोक जवळजवळ गोळी घालण्याच्या बेतात होते, पण नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. एखादी प्रजाती वाचवायची असेल तर संशोधनपलीकडे जाऊन कृती करावी लागते आणि अर्थातच त्यासाठी संसाधनं म्हणजे पैसे आणि मनुष्यबळ दोन्ही लागतं. म्हणूनच त्यांनी बँकॉकमधल्या धनिकांना मदतीसाठी आव्हान केलं आणि ‘घरटे दत्तक योजना’ सुरू केली. शाळांमधल्या मुलांना घरटय़ांचा अभ्यास आणि नोंदी ठेवण्यात सहभागी करून घेतलं. पिलाई यांना २००६ मध्ये त्यांच्या हॉर्नबिल्स वाचवण्याच्या कामासाठी मानाचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला आहे.
आम्ही गेली अनेक वर्ष मुख्यत: कोकणात महावृक्ष, देवराया आणि धनेशाची घरटी वाचवण्यासाठी धडपड करतो आहोत. २००८ पासून आमच्या सह्यद्रीतील धनेश वाचविण्याच्या कामात इंग्लंडची क्रिश मंडालिया सहभागी झाली होती. धनेश पक्ष्यांच्या घरटय़ांचा आणि प्रजननाचा अभ्यास करताना ती तासन्तास झाडाखाली बसून राहायची. तिला मराठी यायचं नाही, पण ती तिच्या मोडक्यातोडक्या हिंदीत धनेश आणि जंगलाचं आरोग्य याचं महत्त्व लोकांना सांगत राहायची. कुणी वडापिंपळाची, बेहेडय़ाची झाडं तोडली तर पोटतिडकीने भांडत राहायची. धनेश आणि जंगलं वाचवायची असतील तर महावृक्ष, धनेशाचं खाद्य असलेली झाडं वाचवली पाहिजेत आणि स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे हेच तिच्या कामाने अधोरेखित झालं. क्रिशचा प्रकल्प जेमतेम एक वर्षांचा होता आणि नंतर ती इंग्लंडला परत गेली, दुर्दैवाने तिला कामाचं क्षेत्रही बदलावं लागलं, पण धनेश तिच्या मनात सतत आहे. आता ती इंग्लंडमध्ये भारतीय जेवणाचं एक रेस्टॉरंट चालवते. तिच्या रेस्टॉरंटचं बोधचिन्ह आहे मोठा धनेश. तिने तो निवडलाय कारण हॉर्नबिल्स हे वैविध्यपूर्ण प्रजातींचं जंगल ठरवण्यासाठी, वाढवण्यासाठी काम करतात. तिच्या हॉटेलमध्येही अशीच अन्नातली नि पोषणातली विविधता पुरविणारे पदार्थ असतात. विविधता निसर्गासारखाच आपल्या आहारातही महत्त्वाची आहे सांगायला हॉर्नबिलइतकं चांगलं प्रतीक नाही. धनेश तिच्या मनात आणि कामात असा वर्षांनुवर्ष घर करून बसला आहे. तिच्या धनेशाच्या लोगोमुळे रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक कुतूहलाने चौकशी करतात आणि त्यातले काही महावृक्ष संवर्धन आणि धनेश वाचविण्याच्या कामात सहभागी झाले आहेत .
क्रिशने तिच्या अभ्यासात सत्तरहून अधिक हॉर्नबिलच्या खाद्य वनस्पतींची नोंद केली होती. या सगळ्या वनस्पतींचं संरक्षण कसं होईल यावर आम्ही सतत काम करत आहोत. आमच्या प्रयत्नांनी आजवर हॉर्नबिल्सची तीस घरटी आणि महावृक्ष वाचवले आहेत. साखरपा-संगमेश्वर रस्ता रुंदीकरणामध्ये तीन महावृक्षं आणि त्यावरची हॉर्नबिल्सची घरटी जाणार होती. पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनखात्याबरोबर चर्चा, पत्रव्यवहार आणि अर्ज-विनंत्याकरून ती झाडे आता वाचली आहेत. पूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे सगळ्यांना सहज समजायचं. पण आता जागतिकीकरण, बदलेली मूल्यं आणि विकासाचा रेटा यामुळे एकेका वृक्षासाठी लढावं लागतं. कारण आपण सगळेच निसर्गापासून दुरावत चाललोय.
गेल्या वर्षी जानेवारीत चाफावली-साखरपा रस्त्यावर उरलेल्या एकमेव वडाच्या झाडावर सत्तावीस काळे-पांढरे मलबार धनेश दिसले होते. बाकीचा सगळा परिसर उजाड आणि होती नव्हती ती झाडं वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडलेली. त्या एकाच झाडावर फळं होती म्हणून ते आले होते. इतक्या सगळ्यांना एकच झाड किती दिवस पुरं पडणार? म्हणूनच हॉर्नबिल्स, जंगल आणि झाडं वाचवणं फार महत्त्वाचं आहे आणि ते सातत्यानं करायचं काम आहे. वडाचं रोप लावलं तर ते वाढून त्याला फळ यायला कमीत कमी १०-१५ वर्ष लागतात. कोणतीही प्रजाती वाचवायची असेल तर समाजातल्या सर्व संबंधित घटकांना सहभागी करून घ्यावं लागतं. सोबतच फक्त ती प्रजातीच नाही तर संपूर्ण परिसंस्था वाचविण्यासाठी संशोधनपलीकडे जात प्रत्यक्ष जमिनीवरही काम करावं लागतं हेच खरं.
godboleaj@gmail.com
chaturang@expressindia.com