– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

गेल्या वीसेक वर्षांत विविध मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी बलात्कार करणाऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. मानसशास्त्र वेगवेगळय़ा सामाजिक-जैविक सिद्धांताचा दाखला देत असलं, तरी गुन्हा करत असताना बलात्कार करणाऱ्याच्या मनात नेमकं काय घडतं, हे अद्याप

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

शास्त्राला समजलेलं नाही. मात्र या गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी त्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे..

दिनांक २३ डिसेंबर २०१७. मी आणि माझे सहकारी डॉ. जयेश देसले नगरच्या सत्र न्यायालयात उपस्थित होतो. दोन शस्त्रक्रिया आणि उपचार केलेल्या एका पावणेतीन वर्षांच्या मुलीच्या खटल्यात ‘एक्स्पर्ट विटनेस’ म्हणून साक्ष देण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. गंभीर स्वरूपाच्या शारीरिक जखमा झाल्यानं रुग्णालयात दाखल करताना ती मुलगी बेशुद्धावस्थेत होती आणि तिची प्रकृतीही चिंताजनक होती. तिच्यावर आम्ही उपचार केल्यानं इतर पुराव्यांच्या जोडीनं आमची साक्षही निर्णायक ठरली आणि दीड वर्षांत खटल्याचा निकाल लागला. ७ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायमूर्ती अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल देताना ‘कोवळय़ा मुलीवरील अत्याचाराची गंभीर आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना’ या शब्दांत आपल्या भावना नोंदवल्या. अपहरण, बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार या गुन्ह्यांसाठी ३२ वर्षांचा आरोपी बाळू बर्डे याला मरेपर्यंत जन्मठेपेची आणि २५ र्वष सक्तमजुरीची शिक्षा झाली. तेव्हा पीडित मुलीला न्याय मिळाला अशीच  तिचे वकील, तपास करणारे पोलीस आणि आम्ही, आमची सगळय़ांची भावना होती. आज मागे वळून बघताना वाटतं, ‘मिळाला तो न्याय योग्यच होता. तशी शिक्षा अशा गुन्ह्यांसाठी असायलाच हवी, मात्र पीडितांबरोबर गुन्हेगाराच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. गुन्हा घडण्यापूर्वी, घडताना आणि घडल्यानंतरच्या त्यांच्या मन:स्थितीचा विचार केला, विशेषत: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा अशा पद्धतीने विचार केला, तर कदाचित काही गुन्हे आपण रोखू शकतो.’

बलात्काराच्या घटनेकडे आपण बऱ्याचदा ‘लैंगिक हेतूनं प्रेरित’ गुन्हा म्हणून बघतो. मात्र निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर त्यावर वेगळय़ा अंगानं चर्चा होत आहे. या खटल्यातील आरोपींची माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुलाखत घेतली, त्यातून ते  इतर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे दोषी किंवा अट्टल गुन्हेगार किंवा मानसिकदृष्टय़ा विकृत नव्हते, तर उलट वरकरणी इतर अनेक सामान्य पुरुषांसारखेच भासत होते. मग ते असं पाशवी कृत्य करायला का धजावले असावेत? ‘इंडियाज् डॉटर’ या माहितीपटासाठी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान या प्रकरणातील एक आरोपी मुकेश सिंगनं असं सांगितलं होतं, की ‘जर पीडित मुलगी आणि तिच्या मित्रानं त्यांच्याशी भांडण केलं नसतं, तर त्यानं त्यांच्यावर शारीरिक अत्याचार (आणि निर्भयावर बलात्कार) केले नसते. पीडित मुलीनं प्रतिकार केला नसता, तर अशी शारीरिक हिंसा झाली नसती. ज्या स्त्रिया रात्री घरातून बाहेर पडतात त्यांना दोषी ठरवलं पाहिजे’ असं त्याचं मत होतं. मला वाटतं, हे विधान आपल्या सामाजिक जडणघडणीतील दोषांवर बोट ठेवतं. लैंगिक अत्याचार घडण्यासाठी स्त्रीलाच जबाबदार धरणाऱ्यांची आपल्या समाजाची मानसिकताच मुकेश सिंगच्या उद्गारांतून दिसते. या प्रकरणातला दुसरा आरोपी रामसिंग याला १८ डिसेंबर २०१२ रोजी ‘मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’समोर हजर केलं असता, त्यानं ओळख प्रक्रियेत भाग घेण्यास नकार दिला होता. तो वारंवार मद्यपानही करायचा हे तपासात उघड झालं. त्याचा अति रागीट स्वभाव, मालकाशी झालेलं भांडण या गोष्टींवरून मित्र त्याला नावं ठेवू लागले होते, चेष्टा करू लागले होते. त्यामुळे तो बिथरला असावा. नंतर ११ मार्च रोजी रामसिंगचा मृतदेह त्याच्या कोठडीत व्हेंटिलेटरच्या शाफ्टला लटकलेला आढळला. ही आत्महत्या होती की हत्या, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.    

 १९७३ मध्ये मुंबईत प्रचंड गाजलेलं प्रकरण म्हणजे अरुणा शानभाग बलात्कार. त्यांचं त्यानंतर ४२ र्वष कोमात राहणं हेही कायम चर्चेत राहिलं. २०१५ मध्ये अरुणांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्यावर बलात्कार करणारा सोहनलाल वाल्मिकी ६६ वर्षांचा होता. त्यावेळी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत त्यानं दिलेली प्रतिक्रिया त्याची मानसिकता समजून घेण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. तो म्हणतो, ‘सर्व काही रागाच्या भरात घडलं. आमच्यात वादावादी, हाणामारी झाली. रागाच्या भरात मी काय केलं, ते मला आता आठवत नाही. घटनेनंतर १० र्वष मी झोपू शकलो नाही. शिक्षा होण्यापूर्वी मला एक मुलगी होती. मी तुरुंगात असताना तिचा मृत्यू झाला. माझ्याकडून चूक झाली, म्हणूनच ती  मेली असं मला वाटतं. मला या आठवणींनी कंटाळा आला आहे. मला आता मरायचं आहे..’ मात्र त्याला झाल्या घटनेबद्दल पश्चात्तापही होत होता.  पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्यानं सात र्वष जन्मठेपेची शिक्षा भोगली आणि सुटकेनंतर तो त्याच्या वडिलोपार्जित घरी आणि पुढे सासरी (उत्तर प्रदेशात) राहायला गेला. त्याच्या मुलांच्या मनात मात्र त्याच्याबद्दल अढी आहे. ते म्हणतात, ‘त्यानं आमचं आयुष्य उध्वस्त केलं. ही घटना घडली नसती तर आम्ही आज मुंबईत वास्तव्यास असतो. इथे आम्हाला शाळेतही जाता आलं नाही. स्वत:चं नावही लिहिता येत नाही. मग त्याला कसं माफ करणार?’  रागातून घडलेल्या एका हिंसक घटनेचे आपण कल्पनाही करू शकत नाही  इतके दीर्घकालीन परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि पुढील पिढीवरही झालेले यात दिसून येतात.   

या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी आरोपींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होणं आवश्यक आहे. गुन्हेगारांची मानसिकता, त्यांच्या कृत्यामागील कारणमीमांसा जाणून घेणं गरजेचं आहे. मुळात कुठलीही व्यक्ती गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. जन्माला येतं ते निरागस मूल. पण पुढे घर आणि परिसरातून विविध गोष्टी ते स्पंजसारखं टिपत असतं. मोठय़ांकडून अनुकरणातून शिकत असतं. सकारात्मक क्षमता प्रत्येक मुलात असते, पण त्या क्षमतेचा पूर्ण विकास होण्याची संधी, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, पालकांची शैक्षणिक-आर्थिक कुवत, तिला खतपाणी घालणारं, पोषक सामाजिक वातावरण किती जणांच्या वाटय़ाला येतं? बालपणीचा काळ किती जणांसाठी खरंच सुखाचा असतो? सुसंस्कृतपणा, सभ्यता यापासून कोसो दूर असलेली आणि होरपळलेलं, कोमेजलेलं बालपण वाटय़ाला आलेली मुलं पुढे आपसूक हिंसेच्या मार्गानं जाण्याची शक्यता निश्चितच अधिक.

    जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे समाज आणि राष्ट्र म्हणून आपण आज एका अतिशीघ्र संक्रमणाच्या टप्प्यावर उभे आहोत. पारंपरिक ते उत्तर-आधुनिकतेपर्यंत प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागण्यामागे गतिमान झालेलं आयुष्य, मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था, नात्यांतील ओलाव्याचा- ‘शेअिरग’चा अभाव, आर्थिक असुरक्षितता, वाढलेली आर्थिक विषमतेची दरी, दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव ही काही कारणं असू शकतात. त्यामुळे जे लोक कायम दडपले जातात, ज्यांना अभिव्यक्तीची माध्यमं उपलब्ध नाहीत, कुठलीही संसाधनं हाताशी नाहीत, त्यांच्यातील वैयक्तिक संवेदनशीलता गुन्हेगारी वर्तनाद्वारे सहजतेनं बाहेर पडण्याचा संभव असतो. मग बळजबरी, पुरुषी लैंगिक आक्रमकता हे प्रकार वाढीस लागतात. त्या पुरुषाचे पूर्वानुभव, लहान वयात इतरांकडून आलेले वाईट अनुभव, आजूबाजूच्या वातावरणातून त्याला मिळालेली शिकवण यांचाही परिणाम होतोच. लैंगिक हिंसेकडे वळणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा पूर्वेतिहास असतो. एक तर तो स्वत:च अशा हिंसेची शिकार झालेला असतो किंवा त्यानं आपल्या जवळच्या व्यक्तीला पीडिताच्या रूपात पाहिलेलं असतं. घरात, आजूबाजूला कौटुंबिक हिंसाही या मुलांच्या मनावर परिणाम करू शकते. मग हे लोक विकृत आहेत, की समाजरचना चुकीची आहे?  की हे व्यवस्थेचे बळी आहेत? आयुष्याला दिशा नसणं, नेमकं काय करायचंय याबद्दल स्पष्टता नसणं, ज्याचं अनुकरण करावं असे आदर्शच व्यक्तीच्या परिघात नसणं, समाजात योग्य तो सन्मान मिळत नसल्यानं, हाताला काम नसल्यानं आलेला रितेपणा, वैफल्य आणि मग आपल्याला हवं ते ओरबाडून मिळवायचं ही वृत्ती.. दुर्दैवानं लैंगिक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि सध्याची बदलती सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी, बदललेली जीवनशैली त्याला खतपाणी घालते आहे. एकंदरच पौगंडावस्थेत मुलांच्या मनात भावनांचा कोलाहल उठलेला असतो. त्या वेळी अशी प्रवृत्ती असलेल्या मुलांमध्ये टोकाचा द्वेष किंवा सुडाची भावना अधिक प्रबळ होत जाते. माणूस स्वत:वरचा ताबा गमावून बसतो आणि काहीतरी अघटित घडतं. एकदा त्या व्यक्तीनं लहान मुलावर/ मुलीवर अत्याचार केला, तर तो आणखी इतर मुलांवर अत्याचार करण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. त्यामुळे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी कायदेशीर शिक्षा होणं आवश्यक आहेच, पण त्याबरोबर गुन्हेगारांना मानसिक उपचारांची आणि समुपदेशनाची सुविधा मिळणंही गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं समाज स्तरावरही  बदलत जाणाऱ्या जीवनमूल्यांचा विचार होणं गरजेचं आहे.

   या गोष्टींकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन आज मी आपल्यापुढे मांडतेय. आपण म्हणतो, की माणूस चुकीचा नसतो, तर त्यानं केलेली कृती चुकीची असते. त्यामुळे गुन्हेगारानं केलेल्या चुकीबद्दल, अपराधाबद्दल त्याला शिक्षा व्हायलाच हवी. पण मग आपण त्याचं माणूसपणच कसं नाकारू शकतो? त्या व्यक्तीवर ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारला की समाज म्हणून आपली जबाबदारी संपते का? की खरी जबाबदारी इथे चालू होते?  कारण आपल्याला त्यांच्याबद्दल कितीही तिरस्कार,घृणा वाटली तरी ते समाजाचा एक भाग आहेत.  त्यामुळे हे गुन्हे थांबवण्यात समाजाची भूमिका महत्त्वाचीच आहे.

   अर्थात इथे त्यांच्या कृतीचं समर्थन करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. मला वाटतं, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची व्याप्ती कमी करायची असेल, तर त्यांची बाजूही आपल्याला तितक्याच संवेदनशीलतेनं समजून घेणं आवश्यक आहे. शक्य असेल तिथे उपाययोजनाही अमलात आणणं निकडीचं आहे. दुरुस्त्या करणं गरजेचं आहे.

गुन्हेगारांना, तुरुंगातील कैद्यांना पुन्हा एकदा सामान्य जीवन जगायला लावणारे अनेक उपक्रम, प्रयोग अनेक ठिकाणी होत असतात. त्याचे चांगले परिणाम माहीत आहेतच. ते अधिक विधायक, सकारात्मक झाले तर त्याचा समाजावर चांगला परिणाम होऊ शकतो. त्याचा विचार व्हायला हवा.

nalbaleminakshi@gmail.com