‘‘माझे व्हायोलिन गातं असं जे लोकांना वाटतं, त्यामागं गाण्याला साथ करण्यासाठी लागणारं पर्फेक्शन, त्याचबरोबर माझ्यातला संगीतकार या दोन्ही गोष्टी सहायक ठरल्या असतील असं मला वाटतं. निरनिराळ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम करताना किती तरी बारकावे शिकायला मिळाले. फडकेसाहेबांची गाणी शिकताना, वाजवताना कमालीचा आनंद मिळायचा.’’ सांगताहेत ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘स्वर आले दुरूनी’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘आज प्रीतीला पंख हे लाभले रे’, ‘कोटी कोटी रूपे तुझी’,  ‘आज आनंदी आनंद झाला’ सारखी गाणी संगीतबद्ध करणारे आणि एस. डी. बर्मन, मदनमोहन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, सी. रामचंद्र, नौशाद, खय्याम, शंकर-जयकिशन, जयदेव व रवींद्र जैन आदी संगीत दिग्दर्शकांसाठी साँग व्हायोलिनिस्ट म्हणून काम करणारे जेष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग.
मी ज्या तऱ्हेने व्हायोलिन वाजवतो, त्याचा उल्लेख लोक ‘गाणारं व्हायोलिन’ असं करतात. ते ऐकताना मला सुखद वाटतं. मात्र हे सारं साध्य होईपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. मी बारा वर्षांचा असताना वडील मोटार अपघातात मरण पावले. कुटुंब उघडय़ावर पडलं. पैसे मिळविण्यासाठी मोठा भाऊ आजीचं दुकान चालवायचा. दुधाचे रतीब घालायचा. थोरला भाऊ व्हायोलिन वादनाच्या शिकवण्याही घ्यायचा. तेव्हा माझा ओढा गाण्याकडे होता.        पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे मी गाणं शिकत होतो. घरात चालणारी शिकवणी पाहून मीही व्हायोलिन शिकलो. नंतर गाण्याच्या कार्यक्रमामध्ये व्हायोलिनची साथ करू लागलो. गाण्यासारखं वाजवू लागलो, याचं कारण भावगीतांच्या कार्यक्रमांना भरपूर साथ केली, त्यात लपलेलं आहे.
मी आज जे वाजवतो त्याचा उगम तिथला असला तरी मध्ये विकासाचा प्रवाह सतत ओघवत राहिला, यामुळेच खरं तर हे साध्य झालं. त्या वेळच्या त्या कार्यक्रमामध्ये शब्दांसारखा प्रभाव वादनातून आणण्याच्या कौशल्याचा उपयोग मला नंतरच्या काळात चित्रपटगीतांमध्ये साथ करताना झाला. चित्रपटगीतांना संगीत देताना झाला. स्वत:ला गाणं येत असल्यानं गळ्यातल्या जागा हातातून कशा निघतील याचा विचार सतत करत गेलो. माझी ग्रहणशक्ती सुदैवानं चांगली होती. लहाणपणापासूनच मी नोटेशन खूप जलद व अचूक लिहू शकायचो. त्याचाही उपयोग झाला.
हे सारं सांगताना मला आवर्जून एक घटना सांगावीशी वाटते. मी पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमध्ये होतो. तिथं एकदा गॅदरिंगमध्ये विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात मी सोलो व्हायोलिन वादन केलं. सुरुवातीला थोडीशी शास्त्रीय रागदारी वाजवली. नंतर त्या काळातली लोकप्रिय मराठी व हिंदी गाणी वाजवली. प्रत्येक गाण्यानंतर समोरचे विद्यार्थी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत होते. रंगत चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता करताना मी ‘आयेगा आनेवाला’ वाजवलं. मला दिलेली वीस मिनिटं संपली. पडदा पडला, पण टाळ्या थांबत नव्हत्या. ‘वुई वाँट जोग’ असा श्रोत्यांचा पुकारा सुरू झाला. प्राचार्यानी सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापकांना बोलावून सांगितलं की, ‘‘जोग छानच वाजवतो आहे, पण त्यामुळे इतरांनी खूप कष्टांनी बसवलेला कार्यक्रम रद्द करून कसं चालेल? तुम्ही श्रोत्यांना सांगा, दुपारचे हे सगळे कार्यक्रम बघा. रात्री जोगचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवू.’’ मग ते ऐकून विद्यार्थी खूष झाले. रात्रीच्या सत्रात सगळ्यात शेवटी मी सुमारे पाऊण तास वाजवत होतो. विविध गुणदर्शनातला उत्तम कार्यक्रम म्हणून मला विशेष पारितोषिक देण्यात आलं.
आणखी एक पारितोषिक माझी वाट पाहात होतं. तो माझ्यासाठी सुखद धक्का होता. हॉलच्या पलीकडच्या बाजूला ख्यातनाम संगीतकार सुधीर फडके राहात होते. ‘रात्रीची शांत वेळ, हॉलचे दरवाजे उघडे. त्यातून ध्वनिक्षेपक. त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत ते वादन छान ऐकायला येत होतं. फडकेसाहेबांनी घरात बसल्या बसल्या तो सगळा कार्यक्रम ऐकला. कुमठेकर नावाचा माझा एक वर्गमित्र त्यांच्या घरी काही कामासाठी दोन-तीन दिवसांनी गेला असताना त्यांनी माझ्या वादनाचा विषय काढला. त्याला म्हणाले, ‘‘खूप सुरेल आणि गोड हात आहे त्याचा. त्याला माझ्या घरी घेऊन ये.’’ निरोप कळल्यावर मी गेलो. त्यांना भेटल्यावर त्यांनी कौतुक करत विचारले, ‘‘माझ्या ऑर्केस्ट्रात वाजवायला याल का?’’ मी घाबरतच ‘होय,’ म्हटलं अन् ‘प्रतापगड’ नावाच्या चित्रपटापासून त्यांच्याकडे वाजवायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मी मालती पांडे, कालिंदी केसकर, बबनराव नावडीकर हे नामांकित गायक व सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या कार्यक्रमामध्ये साथ करीत असे. रोहिणीताईंच्या क्लासमध्ये तालमी चालायच्या. तिथलं माझं वादन शेजारी राहणारे प्रल्हाद होंबळ हे बासरीवादक ऐकत. ते ‘प्रभात’ फिल्म स्टुडिओतला संगीत विभाग सांभाळायचे. त्यांनी बोलावल्यामुले ‘श्रीगुरुदेव दत्त’ या लो बजेट चित्रपटासाठी संगीतसाथ करायला मी जाऊ लागलो. तिथं संगीतकार स्नेहल भाटकरांच्या मार्गदर्शनाखाली तालमी सुरू झाल्या.
रोहिणीताईंकडच्या तालमींना साथीला जातच होतो. तिथं गायनासाठी कुसुम वाड नावाची गोरी पान, तेजस्वी डोळ्यांची मुलगी यायची. सडसडीत बांधा. स्वच्छ व टापटिपीची राहणी. ती मला पहिल्याच भेटीत खूप आवडली. तिच्याही घरची परिस्थिती माझ्यासारखीच खूप गरिबीची. त्यामुळे कुसुम गाण्याच्या छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमात भाग घेऊन थोडे फार पैसे मिळवू लागली. त्यांचं बिऱ्हाड लवकरच ‘प्रभात’च्या जवळ आलं. अधून-मधून मी त्यांच्या घरी जाऊ लागलो. तीही माझ्या घरी यायची. माझ्या आईलाही ती खूप आवडली होती. आम्ही लग्न करायचं ठरवलं, पण त्याला माझ्या काकांचा विरोध होता. एका वर्गमित्राच्या मदतीनं आमचं लग्न झालं.
कालांतरानं आकाशवाणीवर तिला कार्यक्रम करायचा असताना पाच-सहा गाणी तयार करायची होती. ‘पहिलं गाणं तुमचंच हवं,’ म्हणून ती हट्ट धरून बसली. मला आठवलं की, ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी ग.दि.मां.नी लिहिलेलं ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे गाणं तो प्रसंगच पटकथेतून बदलल्यामुळे बाजूला पडलेलं होतं. ते माझ्या मित्रानं जपून ठेवलं होतं. ते मी आणलं. त्याला पटकन् चाल लागली. कुसुमला ती शिकवली. कार्यक्रमात ती ते फार सुरेख गायली. सर्वत्र त्याचं कौतुक झालं.
ती प्रचंड दाद पाहून आकाशवाणीनं नंतर मालती पांडे या गुणी आणि गोड गळ्याच्या गायिकेकडून ते ‘साँग ऑफ द मंथ’साठी ध्वनिमुद्रित करायला मला सांगितलं. याचं कारण या कार्यक्रमासाठी कलावंत ‘ए’ ग्रेडचा लागायचा. कुसुमची ग्रेड तेव्हा ‘बी’ होती. मालतीबाईंच्या आवाजातल्या या गीताचंही प्रचंड स्वागत झालं. हिरव्या चाफ्याचा सुगंध त्या वेळी भारतात एकुलत्या एक असलेल्या एचएमव्ही कोलंबिया ग्रामोफोन कंपनीपर्यंत गेलेलाच होता. त्यांनी ते ध्वनिमुद्रितेसाठी मागितलं. अशा रीतीनं प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गीताबद्दल नंतर मला ग.दि.मा. म्हणाले, ‘अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गाण्याचं तू सोनं केलंस रे.’
हे सारं आवर्जून सांगायचं कारण असं की, माझे व्हायोलिन गातं असं जे लोकांना वाटतं, त्यामागं गाण्याला साथ करण्यासाठी लागणारं पर्फेक्शन, त्याचबरोबर माझ्यातला संगीतकार या दोन्ही गोष्टी सहायक ठरल्या असतील असं मला वाटतं. निरनिराळ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम करताना किती तरी बारकावे शिकायला मिळाले. फडकेसाहेबांची गाणी शिकताना, वाजवताना कमालीचा आनंद मिळायचा. डेक्कन स्टुडिओ किंवा नवयुग स्टुडिओतही रिहर्सल संपल्यावर आम्हा वादकांचा अड्डा जमायचा. चहा पिता पिता त्या दिवशी झालेल्या रिहर्सलवर आम्ही बोलायचो. स्वरांची उजळणी करायचो. त्यात जेवायचंही भान राहात नसायचं. तो काळच संगीतातलं बरंच काही शिकवून जाणारा होता. फडकेसाहेबांच्या स्वररचना आणि ग.दि.मां.च्या शब्दरचना मनात घर करून असायच्या. दिवस-रात्र आम्ही त्यातच बुडालेले असायचो. नोटेशन लिहिण्यातल्या माझ्या कौशल्यामुळे ‘ऊन-पाऊस’ चित्रपटाच्या वेळी फडकेसाहेबांनी मला त्यांचा साहाय्यक करायचं ठरवलं. त्याआधी त्यांनी माझी परीक्षा घेतली. काही दिवस ते मला बाकीच्या वादकांना गाणं शिकवायला सांगून ‘बाहेर जाऊन येतो’ असं म्हणायचे. बाहेरून माझं काम बघत असायचे. हे मला खूप नंतर समजलं.
         वसंत पवार या संगीत दिग्र्दशकाकडेही मी वाजवू लागलो. तिथं आमच्या ताफ्यात बारनेटो नावाचा एक उत्तम व्हायोलिनवादक होता. त्याच्याकडून मला पाश्चात्य स्वरलिपीची माहिती मिळाली. त्यानं ती मला छान शिकवली. वसंत पवार पट्टीचे सतारवादक होते. त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती. गाणं लिहून समोर ठेवलं, की शीघ्र गतीनं चाल लावण्याचं त्यांचं कौशल्य थक्क करणारं होतं. राम कदमांनी शास्त्रीय संगीताची बैठक असतानाच लोकसंगीत भरपूर ऐकलेलं होतं. त्याचा वापर करताना ते मूळचा ढाचा न बदलता त्यात नावीन्य आणायचे. वसंत प्रभूंची ‘गंगायमुना डोळ्यात उभ्या का?’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ आणि ‘कृष्णा मिळाली कोयनेला’ ही गीतं मी हमखास माझ्या सोलो वादनाच्या कार्यक्रमामध्ये वाजवायचो. त्यांची रिहर्सलची पद्धत मला अत्यंत परिणामकारक वाटली. ते आधी मुखडा गाऊन दाखवायचे. नंतर वादकांना वाजवायला सांगायचे. नोटेशनची पद्धत रूढ न झालेला तो काळ. मुखडा नीट बसला की पुढचा एक-एक अंतरा त्याच पद्धतीनं बसवून घ्यायचे. चक्क चार तासांच्या रिहर्सलमध्ये संपूर्ण गाणं पाठ व्हायचं. मग दुसऱ्या दिवशी गाण्यामधले संगीतखंड शिकवायचे. तेही त्याच पद्धतीनं प्रत्येक अंतऱ्याचे संगीतखंड छान बसल्यावर सुरुवातीचं संगीत आणि त्याला जोडून गाण्याचा मुखडा वाजवायला लावायचे. दोन दिवसांत सर्व वादकांचं ते गाणं उत्तम रीतीनं पाठ व्हायचं. पहिल्यापासून गाणं त्यातल्या भावांसकट वाजवायची माझी धडपड असल्यानं माझ्यावर त्यांचा विशेष लोभ होता.
त्याच सुमारास ‘गीतरामायण’ सुरू झाले. त्यात मी फडकेसाहेबांचा साहाय्यक होतो. त्यातल्या विविध प्रयोगांमधून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. पुढं ‘गीतरामायणा’च्या बाबूजींच्या कार्यक्रमांमध्येही मी साथ करू लागलो.
अत्यंत कुशल साँग व्हायोलिनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नार्वेकरांनी हिंदी चित्रपटसृष्टीत माझं नाव सुचवलं म्हणून मला माझ्या आवडत्या रोशनजींकडे वाजवायची संधी मिळाली. शास्त्रीय संगीताचा उत्तम अभ्यास, शिवाय पंजाबी अन् लखनवी ढंगाचं लोकसंगीत त्यांनी पचवलेलं होतं. एकदम मस्त माणूस. मदनमोहनजींकडे वाजवताना खूप समाधान मिळायचं. त्यांच्या जवळपास वीस-बावीस चित्रपटांसाठी मी व्हायोलिन वाजवलं. त्यांच्या चाली अत्यंत भावपूर्ण अन् काव्याला न्याय देणाऱ्या व आव्हानात्मक असायच्या. एकदा त्यांना थोडं बरं नव्हतं म्हणून त्यांनी लताबाईंना चाल शिकवायची जबाबदारी माझ्यावर टाकली.
   आशाबाईंसोबतही कित्येक गाणी वाजवली. एकदा एका गाण्यात एके जागी त्यांचा सूर काहीसा वेगळा लागताच मी चटकन त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचंही माझ्याकडे लक्ष गेलं. सगळ्यांना तो ‘टेक ओके’ वाटत असतानाही त्यांनी तो परत घेतला. असं नजरेचंही तादात्म्य निर्माण होतं आणि गायक-वादक निष्ठेनं गाणं अधिक परिपूर्ण करण्यासाठी अपार कष्ट घेतात. अर्थात, हे पूर्वीचं उदाहरण झालं! सध्या शब्दाशब्दाचं स्वतंत्र रेकॉर्डिग, एकेका वाद्याचं स्वतंत्र रेकॉर्डिग असं तंत्र प्रचलित आहे.
‘कुंकवाचा करंडा’, ‘जावई माझा भला’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘सतीचं वाण’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘कैवारी’ व ‘बिरबल माय ब्रदर’ (इंग्लिश) अशा वीस चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून मी काम केलं. अनेक चाहते ज्याबद्दल आवर्जून मला सांगतात, ते ‘हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली’ या गीताचे कवी मधुसूदन कालेलकर यांना गाणं प्रचंड आवडलं. तृप्ततेनं ते कमलाकर तोरणेंना म्हणाले, ‘प्रभाकरनं माझं गाणं इतकं छान केलं आहे की आता मी मेलो तरी चालेल.’ एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, सी. रामचंद्र, नौशाद, खय्याम, शंकर-जयकिशन, जयदेव व रवींद्र जैन अशा बहुतेक सर्व संगीत दिग्दर्शकांसाठी साँग व्हायोलिनिस्ट म्हणून काम करताना मला भरभरून आनंद मिळाला. ते सारं शब्दांमध्ये न मावणारं आहे.
मैफलींच्या काही आठवणी कायमच्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत.   १९८९ सालच्या रामनवमीच्या मुहूर्तावर कल्याण-डोंबिवलीच्या ‘अनवट’ या संस्थेनं माझा कार्यक्रम ठेवला होता. विविध क्षेत्रातले मान्यवर त्या वेळी उपस्थित होते. ही आठवणही खूप सुखावणारी आहे. पुण्यात ‘गाणारं व्हायोलिन’चा पहिला कार्यक्रम झाला तेव्हा प्रेक्षागृहात जागा संपली म्हणून बाहेर गर्दी करून ऐकणाऱ्या श्रोत्यांची आठवणही अशीच चिरस्मरणीय आहे.
‘चतुरंग’च्या कार्यक्रमात मी ‘पराधीन आहे जगती’ हे गीतरामायणातलं गीत वाजवलं. समोर उपस्थित असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी आधी ‘मी मंचावरून काही बोलणार नाही’ असं प्रकृती अस्वास्थ्यामुळे सांगितलेलं होतं, पण नंतर ते स्वत:हून बोलायला उभे राहिले. म्हणाले, ‘आताच जोगांनी ‘पराधीन आहे जगती’ ऐकवलं. माणूस काही बाबतीत पराधीन असतो हे खरं, पण तो स्वराधीनही असतो हे आपण आताच अनुभवलं आहे.’  ‘स्वर आले दुरूनी’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’, ‘कोटी कोटी रूपे तुझी’, ‘हिल हिल पोरी हिला’ यांसारखी मी संगीतबद्ध केलेली गाणी सध्याचे नवे गायक-गायिका कार्यक्रमामधून सादर करतात तेव्हा त्यांना मिळणारा ‘वन्समोअर’ मला खूप खूप सुखावून जातो.
(शब्दांकन : नीला शर्मा)
neela5sharma@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चतुरंग मैफल’ मध्ये
पुढील शनिवारी (२६ ऑक्टोबर)
ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका
फैय्याज.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violin player prabhakar jog
First published on: 19-10-2013 at 01:01 IST