आवाज उठू लागला आहे, पण..

स्त्रियांवर होणाऱ्या लंगिक अत्याचारात सर्व सत्ता एकवटलेला पुरुष तिचा सहज कचरा करू शकू अशाच मस्तीत असतो. मात्र आता माध्यमाच्या जगात अधिराज्य असणाऱ्या तरुण तेजपालांचं प्रकरण

स्त्रियांवर होणाऱ्या लंगिक अत्याचारात सर्व सत्ता एकवटलेला पुरुष तिचा सहज कचरा करू शकू अशाच मस्तीत असतो. मात्र आता माध्यमाच्या जगात अधिराज्य असणाऱ्या तरुण तेजपालांचं प्रकरण, तथाकथित आध्यात्मिक बाबा म्हणजे आसाराम बापू यांच्यावरचे बलात्काराचे आरोप, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गांगुली यांच्याविरोधातली तरुण वकील स्त्रीची तक्रार अशी अनेक बोलकी उदाहरणं आहेत, ज्यात स्त्रिया केवळ अगतिकतेनं सर्व सहन करत राहाणार नाहीत हाच हुंकार पुढे येतो आहे.. तसाच एक आवाज उठला आहे सिरसा जिल्ह्य़ातल्या खेडय़ातल्या स्त्रीचा, आपल्याच पतीच्या विरोधात.. काय होणार तिचं?
माझ्या पतीला सत्ता हवी होती म्हणून तो माझ्याकडे काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांची माणसं पाठवत होता.’’ – २९ जून. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राचं उलगडलेलं अख्खं मधलं पान. दोन पानं एकत्र करून तयार झालेल्या भल्या मोठय़ा जागेत व्यापून असलेल्या त्या लेखानं लक्ष वेधून घेतलं, त्या लेखाचं हे शीर्षक. मोठय़ा काळ्या पाश्र्वभूमीवर उमटलेली पांढरी अक्षरं, पण त्याहीपेक्षा माझी नजर रेंगाळली, त्या लाल ओढणीत जवळ जवळ स्वत:ला पूर्ण झाकून टाकणाऱ्या चेहऱ्यावर. नाकात छोटीशी गोल नथनी अडकवलेली समजत होतं. कारण फक्त तो नाकाचा शेंडा, लाल अलवाणासारख्या ओढणीतून डोकावत होता. त्या अलवाणासारख्या लाल रंगानंही मला अस्वस्थता आली.
 तसं म्हटलं तर स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या, हुंडाबळींच्या, जिवंत जाळून टाकण्याच्या, बेकायदेशीरपणे गर्भजल परीक्षा करून गर्भपात करण्याच्या किती तरी बातम्या, लेख येत असतात. सगळंच चिंता वाढवणारं असं असतं. मात्र एखादा लेख आपल्या मनात जास्तच प्रश्न निर्माण करतो. आपलं मन त्यात गुंतायला लागतं. सत्याच्या शोधासाठी आपण कधी तर्काचा आधार घ्यायला लागतो किंवा कधी परिस्थितीतली माणसं, प्रसंग संगतवार लावून हाती काय येईल याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वस्तुनिष्ठ मुलाखतवजा त्या लेखानं माझी अशीच काहीशी अवस्था झाली.
त्या संपूर्ण लेखात म्हटलं तर काहीशी विस्मयकारक हकीकत मांडलेली होती. ईशा रॉय या पत्रकार स्त्रीनं प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेऊन तो लेख लिहिलेला आहे. ही हकीकत घडलेली आहे राजस्थानमध्ये. देह विक्रय करणाऱ्या एखाद्या वेश्येकडे तिच्या दलालाने गिऱ्हाईकं पाठवावीत, असं या हकीकतीचं वर्णन करावं का, असाच प्रश्न मला पडला. पण लगेचच असं वाटणं गरच होतं हेही मला जाणवलं. याचं कारण तिला तिच्या नवऱ्यानं चक्क गुंगी देणाऱ्या गोळ्या देऊन तिच्या त्या अवस्थेत तिच्याकडून ही कृत्यं करवून घेतली होती. स्वत:ला राजकारणात पाय रोवता यावेत म्हणून खुद्द पतीनेच आपल्या पत्नीकडे वासना भागवण्यासाठी परकी किंवा पसेवाली माणसं पाठवत राहिल्याची ती हकीकत होती. स्वत: तो होता त्यापेक्षा बडी राजकारणी माणसं त्याच्या माहितीची होती. तिच्यापर्यंत पोचवण्याएवढी त्याची जवळीक त्या बडय़ा किंवा प्रस्थापित राजकारण्यांकडे होती. आपणही आमदार-खासदार बनू शकतो इथपर्यंतची पातळी त्यानंही हस्तगत केलेली होती. म्हणजे एखाद्या पानाच्या टपरीवर उभा राहून गिऱ्हाईक पकडणारा तोही काही किरकोळीतला दलाल नव्हता. तर त्यापेक्षा मजबूत ताकदवान. ज्याच्याविरोधात तिनं पहिल्यांदा बोट दाखवलं व पोलीस तक्रार करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले, जो तिचा साक्षात पती होता, त्याचं नाव ओम प्रकाश. या स्त्रीनं फक्त नवऱ्याविरोधात तक्रार केली नाही. तर त्याच्यासह एकूण १७ जणांवर तिनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या १७ जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधले रसायन व खत खात्याचे मंत्री निहालचंद मेघवाल हे आहेत. त्यांना जयपूर जिल्हा न्यायालयानं नोटीसही बजावलेली आहे. त्यामुळे तर या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं.  
   तिचा नवरा ओम प्रकाश राजस्थानमधल्या एका खेडय़ातल्या गरीब कुटुंबातला मुलगा. विष्णोई समाजाचा.(विष्णोई ही जात नाही तर जमात मानली जाते. झाडे तोडून नयेत, प्राण्यांना मारू नये असं निसर्गाशी काही अतूट नातं मानणारी ती जमात आहे, जात नव्हे).  राजकीयदृष्टय़ा महत्त्वाकांक्षी असणारा हा तरुण त्याच्या महाविद्यालयीन काळात अ.भा.वि.प.चा कार्यकर्ता होता. पुढे पंचायत समितीवरही तो निवडून आला होता. त्यांच्या खेडय़ातून जयपूरला जाणारा तोच पहिला मनुष्य होता. तो रीअल इस्टेटच्या उलाढाली करू लागला. राजकारणात पाय रोवायचे म्हणजे लोकांची सेवा करायची किंवा लोकांच्या प्रश्नांवर आंदोलनं करायची यापेक्षाही काही वेगळंच करण्याची गरज असते हे व्यवहारी शहाणपण त्याला आलं होतं. एवढंच नाही तर आधुनिक जगात पसा मिळवण्याचे तथाकथित प्रतिष्ठा आणि वजन दाखवणाऱ्या वस्तूही त्यानं कमावल्या होत्याच. त्याच्याविरोधात तक्रार देणाऱ्या त्याच्या पत्नीच्या सांगण्यानुसार ओम प्रकाशकडे काळी सफारी गाडी, पांढरी स्कॉर्पिओ, पांढरी एन्डीव्हर, पांढरी जिप्सी, निळी  इंडिगो अशा गाडय़ा आहेत. जयपूरला मोठं घर आहे वगरे. थोडक्यात त्यानं स्वत:चा भरपूरच ‘विकास’ करून घेतला होता. अशा या ओमप्रकाशच्या पत्नीनं नोव्हेंबर २०११ मध्ये दोन पोलीस ठाण्यांकडे धाव घेतली. तसं तिचं लग्न होऊन एक वर्षही झालेलं नव्हतं.
एक विवाहित स्त्री, तीसुद्धा राजस्थान आणि हरियाणा या दोन राज्यांच्या एका भौगोलिक कोपऱ्यात सामावलेल्या सिरसा जिल्ह्य़ातल्या खेडय़ातली. इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसताना जिचं लग्न ठरलं. ५ फूट ८ इंच अशी असलेली उंची तिच्या लग्नाचं घरच्यांच्या काळजीचं कारण होतं. अशात तिचं ओम प्रकाशबरोबर लग्न झालं. त्या जेमतेम अठरा वर्षांच्या मुलीत अशी हिंमत निर्माण होणं हे नक्कीच नोंद घेण्याएवढं आश्चर्यकारक मानायला हरकत नाही. जरा प्रयत्न केला तर मारहाण होऊन जीवसुद्धा घेतला जाऊ शकतो अशा दबावांना राजस्थानमधली ती नवविवाहित मुलगी कशी पुरून उरली? हा तिचा प्रवास तिच्या एकटीच्या धीटपणावर जसा प्रकाश टाकतो तसंच जात पंचायतींचं वर्चस्व असणाऱ्या राज्यांमध्ये कधी कधी जात पंचायतीही पतीविरोधात जाणाऱ्या व अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या स्त्रीला मदतकारक ठरू शकतात. अर्थात त्याला दुसराही एक पदर आहे तो म्हणजे हे त्यांचं वागणं अंतर्गत तेढातूनही होऊ शकतं. म्हणूनच गुंतागुंतीच्या वास्तवातून वाटचाल करणाऱ्या स्त्रियांना केवळ कुटुंब आणि जात पंचायती यावर अवलंबून का राहावं लागावं, असाही माझ्या मनात प्रश्न आला.   कोणाला वाटेल की, ही शिकलेली असल्यामुळेच तिला हा धीटपणा आला असेल; पण अशा धीटपणाचा शिक्षणाशी संबंध असतोच असं नाही, किंबहुना नसतोच असं म्हणायला हरकत नाही. कारण हरियाणा आणि राजस्थान ही दोन्ही राज्यं सगळ्या जुन्या परंपरा जास्त घट्ट पकडून असलेली राज्यं आहेत. हा कर्मठपणा कठोरपेक्षा क्रूरपणे व्यक्त होणाऱ्या घटनांमधून जगापुढे येत असतो. खापपंचायत म्हणजे जात पंचायत निर्णय घेऊन मर्जीनं लग्न करणाऱ्या तरुण-तरुणींना जिवे मारण्याचे नुसते आदेशच काढत नाहीत, तर त्याची अंमलबजावणीही होते.मला १९८७ सालची राजस्थानमधली गाजलेली सतीची विदारक कहाणी आठवली. ती रुपकुंवरही जेमतेम अठराच वर्षांची होती. मुख्य म्हणजे तीही दहावीपर्यंत शिकलेली होती. तिच्या लग्नालाही जेमतेम आठच महिने झाले होते आणि देवराळा या तिच्या सासरच्या गावी २४ वर्षीय पती मालसिंग याच्या मृत्यूनंतर तिनं सती जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाचा सारा साजशृंगार करून रीतसर नवऱ्याचं डोकं मांडीवर घेऊन सती गेली. आसपासच्या गावकऱ्यांसह सारा गावच त्या घटनेचा उत्सव करायला जमा झाला होता. यातूनच मग सती मंदिरं बांधली जातात. सतीच्या कहाण्या नेहमीच जिवंत ठेवल्या जातात. त्यातूनच समाजात आणि स्त्रियांच्या मनातही पतीधर्म रुजतो. हाच पतीधर्म पाळून पतीचे अपराध सहन करणाऱ्या पारंपरिक स्त्रीला छेद देणारी भूमिका अतिशय धीटपणाने या राजस्थान मधील या तरुण स्त्रीनं घेतली आणि थेट पतीविरोधातच तक्रार केली.
 निहालचंद मेघवाल यांच्यामुळे भाजप या पक्षाशी हा संबंधित मामला असल्यामुळे अर्थातच भाजपची प्रतिक्रिया काय आहे हे बघितलं तर त्यांनी अगदी स्पष्टपणेच निहालचंद यांचं निर्दोषित्वच कुठे तरी स्वीकारलं आहे आणि तसं स्वीकारण्याचा आधार अर्थातच पोलीस अहवाल. त्याच्या आधारे ही केस २०१२ मध्ये रद्दबादल केली गेली. त्यानंतर ही स्त्री ट्रायल कोर्टात गेली, तिथेही पोलीस रिपोर्टचंच वजन होतं आणि केस इथेही रद्दबादल झाली. मग ही स्त्री जिल्हा न्यायालयात गेली आणि तेथेही तिची केस रद्दबादल झाली. मात्र पुनर्सुनावणीसाठी तिनं डिस्ट्रिक्ट कोर्टात अर्ज केल्यावर आता निहालचंद यांना न्यायालयाची नोटीस आलेली आहे. साहजिकच अशा स्थितीत काँग्रेस अधिकाधिक आक्रमक आणि टीकात्म भूमिकेत गेली तर आश्चर्य नाही. मात्र या स्त्रीनं जी नावं दिली आहेत त्यात काँग्रेसचे म्हणजे युवा काँग्रेसचे पुष्पेद्र भारद्वाज यांचं नाव आहे, हे काँग्रेसने विसरू नये. इतकंच काय, जयपूरच्या साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल रॉस यांचेही नाव आहे. तसंच राजस्थान जाट महासभेचे आणि रीयल इस्टेट डेव्हलपरचे प्रमुख राधे राम अशी प्रतिष्ठित नावं आहेत.
 स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तर कोणत्याच पक्षानं काही छातीठोकपणे भूमिका घ्यावी अशी स्थिती नाही. त्याला कोण अपवाद म्हणायचं? अगदी ‘दलित की बेटी’ म्हणून ज्या मायावतींकडे तळागाळातली माणसं अपेक्षेने अजूनही बघतात, बहुजन समाज पक्षाच्या मायावती मुख्यमंत्री असण्याच्या काळात आमदार अमरमणी त्रिपाठी यांच्यावर त्यांनी त्यांची प्रेयसी, कवयित्री मधुमिता शुक्ला हिचा खून केल्याचा आरोप झाला. अमरमणी यांच्यापासून होणाऱ्या मुलाबद्दल व त्या दोघांच्या संबंधांबद्दल मधुमिता जाहीरपणे वाच्यता करण्यास तयार असल्याची त्या काळात चर्चा झाली. ती जाहीर सभांमध्ये तडफदारपणे कविता वाचन वगरे करत असे. तिचा खून झाला तेव्हा ती गरोदर होती हे स्पष्ट झालं व डीएनए चाचणीही त्रिपाठींशी जुळली होती. सध्या अमरमणी त्रिपाठी तुरुंगातच आहेत. अशा अनेक कहाण्या आहेत, ज्या वारंवार स्त्रियांसदर्भातले निर्घृण अत्याचार तर पुढे आणतातच, पण त्याचाच एक अविभाज्य भाग असतो तो स्त्रियांच्या धीटपणाचा. स्वत:ला काय हवं आहे याबद्दल असणाऱ्या जागरूकतेचा. थोडा आधार मिळाला तर त्या अधिक नेटानं आवाज उठवायला उभ्या राहू शकतात. या प्रक्रियेत राजकीय गुंतागुंत तयार होणं अनिवार्यच आहे.  पुरुषांच्या तुलनेत संपूर्ण अधिकारशून्य असलेली स्त्री तुलनेत अतिशय ताकदवान असणाऱ्या पुरुषाविरोधात जाते तेव्हा सर्वच पातळीवर विस्फोट होणं साहजिकच आहे. जेव्हा ती कौटुंबिक रीतिरिवाजांना झुगारते तेव्हा तिला बिनदिक्कतपणे कुटुंबातच मारून टाकलं जातं. मग ती मर्जीप्रमाणे लग्न करीन असं म्हणणारी साताऱ्यातली एमएसडब्ल्यू झालेली मुलगी असेल नाही तर कोवळ्या वयातली आरुषी असेल. कुटुंबाच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी मुलीला मारणं हे तिला मारणाऱ्याला तर अजिबात गुन्हाच वाटत नाही.
स्त्रियांवर होणाऱ्या लंगिक अत्याचारात सर्व सत्ता एकवटलेला पुरुष तिचा सहज कचरा करू शकू अशा मस्तीतच असतो. माध्यमाच्या जगात अधिराज्य असणाऱ्या तरुण तेजपालांचं प्रकरण, तथाकथित आध्यात्मिक बाबा म्हणजे आसाराम बापू यांच्यावरचे बलात्काराचे आरोप, निवृत्त सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गांगुली यांच्याविरोधातली तरुण वकील स्त्रीची तक्रार अशी अनेक बोलकी उदाहरणं आहेत, ज्यात स्त्रिया केवळ अगतिकतेनं आता सहन करत राहाणार नाहीत हाच हुंकार पुढे येतो. कोणत्याही कारणाने या स्थितीतल्या स्त्रीला  आधार मिळाला तर निदान ती वाचू शकते.
 नवऱ्याविरोधात तक्रार करणाऱ्या सिरसा जिल्ह्य़ातल्या या स्त्रीच्या मागे जात पंचायत आणि तिचं कुटुंब उभं राहणं हेसुद्धा जरा आश्चर्यकारकच आहे. तिच्या गावातील ज्येष्ठ लोक तिचं वर्णन ‘हिम्मतवाली’ म्हणून करतात. घटनाक्रमात तिच्या काकांनी जेव्हा तिच्या जयपूरच्या घरी भेट दिली तेव्हा ओम प्रकाशने आणि त्याच्या भावांनी त्यांना कोंडून घातलं. त्यांना विजेचे शॉक्स देण्यात आले. चार दिवसांनी ते कसेबसे आपल्या अबुबशर गावी परत आले. मग प्रकरण जात पंचायतीकडे गेलंही होतं. भाजपच्याच धरणीया यांच्या घरी पंचयतीची बैठक झाली. त्यात सिरसाहून गाडय़ांच्या ताफ्यातून ७० माणसं घेऊन ओम प्रकाश आपल्या बायकोसह तिथे आला. मात्र जेव्हा तो ‘तिला सोडणार नाही,’ असं म्हणायला लागला तसं तिच्या गावातल्या लोकांनी तिची सुटका केली व एकूण रागरंग असा होता की, त्यांच्या सांगण्यानुसार ओम प्रकाश तिथून पळून गेला. मात्र त्यानं अबुबशर जात पंचायत आणि मुलीचे काका सगळ्यांवर त्याची बायको पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. त्यातून काही जणांना अटक केली गेली. मुलगी घरी सुरक्षित होती. पुढची तिची न्यायाची लढाई जात पंचायत, कुटुंबाच्या पाठिंब्यावर सुरू राहिली.
 केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल हे मागासवर्गाच्या मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले केवळ ४२ वय असलेले भाजपचे खासदार आहेत. एका निवडणुकीत तर त्यांनी पक्षाविरोधातही बंडखोरी केली होती. हे राजकीय षड्यंत्र आहे, अशीच एकूण भाजपची धारणा आहे; पण कोणत्याही पातळीवर जाऊन गुंडगिरी करणाऱ्या ओम प्रकाशशी त्यांचे लागेबांधे होतेच ना. निहालचंदांना वाचवताना सगळ्याच (तथाकथित) दिग्गजाच्या सुटकेचाही दरवाजा सताड उघडा राहणार आहे.
 स्त्रियांच्या संरक्षणाची, प्रतिष्ठेची भाषा करत करत त्या प्रश्नाला कस्पटासमान ठरवता येणार नाही, असं निदान स्त्रियांनी आणि संवेदनाक्षम पुरुषांनी ठामपणे ठरवायला हवं. तरच अधिकाधिक अत्याचारग्रस्त स्त्रिया पुढे येतील. आपल्या वरच्या अन्यायाला वाचा फोडतील.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Voice began to rise against female molestation but

ताज्या बातम्या