scorecardresearch

व्यर्थ चिंता नको रे : विंचू चावला!

जेव्हा या भावनिक मेंदूत सुखाची रसायनं कमी होतात तेव्हा प्रयत्न करूनसुद्धा नकारात्मक विचारांना, औदासिन्याला, बेचैनीला, चिंतेला सोडचिठ्ठी देता येत नाही.

व्यर्थ चिंता नको रे : विंचू चावला!

डॉ. आशीष  देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

साधारणपणे १८ टक्के  लोकांना आयुष्यात बेचैनी वा औदासिन्याचा आजार होण्याची शक्यता आहे, पण इतरांनाही आयुष्यात नकोसे अनुभव येतातच. परिस्थितीचा प्रत्येकाच्या मनावर कसा परिणाम होणार हे मात्र ज्याच्या-त्याच्या मेंदूतल्या सुखाच्या रसायनांवर अवलंबून असतं. ही सुखाची रसायनं बनवणं जरी पूर्णत: आपल्या हातात नसलं, तरी त्यासाठी आपले काही प्रयत्न नक्की सहाय्यभूत ठरतात, तर काही मारक ठरतात. संकटाचा विंचू चावल्यावर मेंदू कसा काम करतो, हे म्हणूनच जाणून घ्यायला हवं.

आपल्या मराठीत ‘भारूड’ नावाचा काव्याचा इरसाल प्रकार आहे. कोपरखळ्या मारत अनुभवाचे बोल मनापर्यंत पोहोचवण्याचा इतका सुंदर प्रयत्न क्वचितच वाचायला मिळतो. संत एकनाथ महाराजांची विविध भारूडं प्रसिद्ध आहेतच.  त्यातलं एक लोकप्रिय भारूड म्हणजे –

विंचू चावला वृश्चिक चावला। कामक्रोध

विंचू चावला। तम घाम अंगासी आला ॥धृ॥

पंचप्राण व्याकुळ झाला। त्याने माझा प्राण चालिला। सर्वागाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण। मज नांगा मारिला तिने। सर्वागी वेदना जाण। त्या इंगळीची ॥२॥

या विंचवाला उतारा। तमोगुण मागे सारा। सत्त्वगुणा लावा अंगारा। विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥

सत्त्व उतारा देऊन। अवघा सारिला तमोगुण। किंचित् राहिली फुणफुण। शांत केली जनार्दने ॥४॥

आपल्यापैकी बहुतेकांची या विंचवाशी गाठ नक्की के व्हा ना के व्हा पडली असेल. घरात, शाळेत, कॉलेजात, ऑफिसात, प्रवासात, सुट्टीवर असताना, कधीही हा विंचू नांगी काढू शकतो. अपयश, नुकसान, विरोध, हेवेदावे, गैरसमज, मृत्यू अशा अनेक अनुभवांतून तो आपल्यावर सूड घेत असतो. त्या वेळी असह्य़ वाटणाऱ्या त्या वेदना काही दिवसांत शमतात नि आपण ‘कालाय तस्मै नम:’ म्हणून मोकळे होतो. आता त्यातही काही लवकर मोकळे होतात, तर काहींना त्या वेदनांतून बाहेर यायला बऱ्यापैकी वेळ लागतो.

त्या वेदनांतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न माणसानं सदोदित केला. आदिमानवाच्या लहानपणापासूनच त्याला त्याच्या आई-वडिलांकडून ‘जे हवंय ते मिळवणं’ याचं बाळकडू मिळालं असणार. पण जसजसं वय वाढत जातं तेव्हा ‘जे मिळालंय ते हवंहवंसं वाटणं’ हेच जास्त आवश्यक वाटायला लागतं. बहुतेकांच्या आयुष्यात ‘नको रे’चे अनुभवच अधिक असतात. पण अशाही लोकांत काहींना ‘नभ मेघांनी आक्रमिले’ची भावना असते, तर काहींना जाणवते ती त्या ढगांची सोनेरी किनार! ती सोनेरी किनार दाखवण्याचा घरगुती प्रयत्न (प्रेम-सहानुभूती-सहवास-स्वास्थ्य) जेव्हा फोल ठरतो, तेव्हा लोक घराबाहेरचे प्रयत्न करायला लागतात. आभाळापासून जमिनीपर्यंत दिसणाऱ्या (ग्रह-तारे-दगड-धोंडे-धातू) नि न दिसणाऱ्या (देवादिक-भूतखेत-बाधा), चल (कोंबडे-बोकड इत्यादी) आणि अचल (झाडं-खोडं-पाळं-मुळं) या सगळ्यांचा वापर लोकं आवर्जून करतात. जेव्हा यातली कुठलीही पद्धत थोडय़ाफार प्रमाणात बऱ्याच लोकांना भावते, तेव्हा ती समाजात प्रस्थापित होते. आयुष्यातल्या सोनेरी किनारीसाठी आसुसलेली माणसं आयुष्यात निदान अजून घनगर्जना तरी होऊ नयेत या अपेक्षेनं श्रद्धेपोटी बुद्धी जेव्हा गहाण ठेवतात, तेव्हा अंधश्रद्धेची सुरुवात होते नि विवेक जेव्हा गहाण ठेवतात तेव्हा भक्तीदंभाची! अशी दांभिकता ‘यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत’ अशा परिस्थितीत बाबा, गोसावी, मांत्रिक-तांत्रिक, अवतार पुरुषांनाच ‘केशवा’आधी जन्मास घालते. भावुक श्रद्धेपोटी किती तरी जणांना आपल्याला ‘ताटातलंच वाटीत मिळतंय’ हे समजतही नाही नि ‘वाढपी’च देवासमान वाटतो.

एकदा एक गोष्ट वाचली होती. मानवाची निर्मिती केल्यावर देवादिक स्वर्गात उत्सव  करत असतात. माणसाच्या शरीराचं नि कुवतींचं कौतुक करता करता त्यांना मेंदूच्या अमर्याद क्षमतेबद्दल काळजी वाटते. या मेंदूचा वापर करून माणसानं स्वर्गावर चढाई केली तर? देवादिक चिंतेत पडताच नारदमुनी येतात आणि निरसनासाठी श्रीकृष्णाकडे पाठवतात. श्रीकृष्ण त्यांना माणसाचं सुख लपवायचा सल्ला देतात, ज्यामुळे माणूस दु:खी राहील नि जो दु:खी असेल तो स्वर्ग समजूच शकणार नाही, जिंकायचा विचारच सोडा! श्रीकृष्णाच्या बुद्धीचे गोडवे गात, देवादिक सुख कुठे लपवायचं या विचारात पडतात. एव्हरेस्टवर केव्हा तरी तेनझिंग-हिलेरी पोहोचणार, बम्र्युडा त्रिकोणातही पाणबुडय़ा पोहोचणार नि अंतराळातही वाऱ्या लवकरच होणार हे जाणून पर्वतराई, सागरतळ, अंतराळ या काही सुख लपवण्याच्या जागा होऊ शकत नाहीत, हे त्यांना कळून चुकतं. पुन:श्च श्रीकृष्णाला पाचारण करताच, माणसाचं सुख त्याच्या मनातच लपवायचा सल्ला मिळतो. ‘वेडा’ माणूस ‘सुखाच्या शोधात’ कंदील घेऊन ‘आभाळापासून जमिनीपर्यंत दिसणाऱ्या (ग्रह-तारे-दगड-धोंडे-धातू) नि न दिसणाऱ्या (देवादिक-भूतखेत-बाधा), चल (कोंबडे-बोकड इत्यादी) आणि अचल (झाडं-खोडं-पाळं-मुळं)’ गोष्टींत सुख शोधत बसेल, पण स्वत:च्या मनात शोधण्याचा प्रयत्नच करणार नाही. म्हणतात की तेव्हापासून माणसाला दु:खाचा शाप भोवतो आहे.

पण माणूस भलता अतरंगी!

‘जामोंके बाद मेरी न कायनात जानता मैं, पर फिरदौस रुए गर जमीं अस्त, ये जझबात समझता मैं।’ हे कुठे तरी त्याला समजलं.

सोमरस, सुरा, शराब, मिर्ह, कोकोआ, चरस, गमंजा, तंबाखू, कत्था,अफीम यांसारख्या एक ना अनेक निसर्गातील ‘किमयागारां’ना त्यानं कामाला लावलं. ‘शिद्दतसे लोग सारे मोहताज कुछ लम्होंके, वोही खुशीको पाने अंगार निगलता मैं’चा बोध घेत, काही क्षणांसाठी तरी ‘सोनेरी किनार’ अनुभवायचा प्रयत्न केला. दारूमुळे

१८ लाख लोक तर तंबाखूमुळे ८० लाख लोक असे सुमारे १ कोटी लोक दर वर्षी मरतात, तरीही या उत्तेजकांपाठी, तात्पुरत्या सुखासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत, खून पाडले आहेत, युद्धं केली आहेत. ही ‘रसायनं’ मेंदूवर काय किमया करत असतील? कशी करत असतील? काही लोकांमध्ये ‘राक्षस’ कसा निर्माण होत असेल? नि बहुतेकांना ‘गर फिरदौस रुए गर जमीं अस्त’चा अनुभव का नि कसा येत असेल? हे समजून घेण्याचा जसा जसा माणसानं प्रयत्न केला, तसा तसा मेंदूच्या रहस्यांचा उलगडा व्हायला लागला.

ही उत्तेजकं रक्तातून मेंदूपर्यंत जाताच तिथे सुखाची रसायनं मेंदूतल्याच कच्च्या मालानं तयार करतात. परिस्थिती ‘जैसे थे’ असूनही या रसायनांनी मेंदूला तात्पुरत्या सुखाचा अनुभव होतो. मग आता असा विचार करा, की ही मेंदूतली रसायनं काही कारणांनी कशानंही वाढलीच नाहीत तर काय होईल? माणसाला सुखाचे अनुभव मिळणार नाहीत, बरोबर? आणि जर कमी झाली तर? सुखाचे अनुभव सोडा, पण दैनंदिन आयुष्यही उदास, निरस, कंटाळवाणं होईल. नेहमीच्या आयुष्यातही सकाळी आपण तरतरीत असतो आणि रात्री (किंवा झोपेआधी) चिडचिडे/ थकलेले असतो. मोबाइलची बॅटरी चार्ज केल्यासारखा आपला मेंदू झोपेत रसायनं ठोसतो  नि दिवसभरात त्याला गळती लागते. आगरकरांच्या गणितासारखा हा रसायनांचा रतीब नि दिवसभराची गळती आपल्या मनातला सुखाचा/ दु:खाचा/ बेचैनीचा अनुभव ठरवतात. ताणतणावांनी ही गळती वाढते आणि बहुतेक वेळी व्यायाम, छंद, मित्रपरिवार, चौरस आहार, भरपूर पाणी, जीवनसत्त्वं, काही तरी नवीन शिकणं, यांनी रतीब वाढतो. या सगळ्यांना ‘चांगले’ विचार, योग्य निर्णय, चांगल्या सवयी लाभल्या, की या रसायनांच्या आपसूक निर्मितीची सोय होते. पण प्रत्येक माणसाची तब्येत वेगळी असते. कोणात ही रसायनं सहज तयार होतात, तर कोणात काही अडचणी येतात. त्या अडचणींची कारणं बहुधा  जनुकीय असतात, म्हणजे आपल्या हातात नसतात. म्हणजे वर दिलेल्या सर्व गोष्टी करूनसुद्धा जर ही सुखाची रसायनं जरुरीपेक्षा कमीच तयार होत असतील, तर सकाळी उठल्यावर उमेद येणार तरी कशी? मनाला शांतता लाभणार तरी कशी?

एका मोठय़ा नारळाच्या आकाराचा आपला मेंदू जर त्याच्या कामांच्या जागा जाणून घेण्यासाठी लाटला, तर कदाचित शिवाजी पार्काएवढा पसरेल. या सगळ्या कामाच्या जागा एकमेकांशी जोडलेल्या असतात मेंदूच्या पेशींनी. ज्या भागात सुखाची रसायनं आढळतात, त्याला आपण भावनिक मेंदू म्हणतोय. हा मेंदू विचारभान, देहभान, स्मरणभान आणि परिस्थितीभानाशी जोडलेला असतो. जेव्हा या भावनिक मेंदूत सुखाची रसायनं कमी होतात तेव्हा प्रयत्न करूनसुद्धा नकारात्मक विचारांना, औदासिन्याला, बेचैनीला, चिंतेला सोडचिठ्ठी देता येत नाही.

साधारणपणे १८ टक्के लोकांना आयुष्यात बेचैनी/ औदासिन्याचा आजार होण्याची (किंवा विंचू चावण्याची!) शक्यता आहे. बाकीच्या बहुसंख्य लोकांमध्येसुद्धा आयुष्यात   ‘न-आलेले-बरे’ असे अनुभव येतात. पण जनुकीय रचना आणि जीवनशैलीमुळे त्यांना तात्पुरती बाधा होते किंवा त्यांचा त्यांच्या नात्यांवर/ कामावर/ स्वास्थ्यावर परिणाम होत नाही. मग त्यांना ज्या गोष्टींनी तारून नेलं असं त्यांना वाटतं, त्याचा पुरस्कार ते करतात. निराश असणाऱ्या १८ टक्के लोकांनाही आजार होण्याआधी ‘न-आलेले-बरे’ असे अनुभव येतात आणि त्यांनाही त्यांचे तारणहार माहीत असतात. पण जेव्हा मेंदूतली सुखाची रसायनं एका विशिष्ट पातळीपेक्षा खाली उतरतात, तेव्हा तिथे पूर्वानुभव कामी येत नाही नि दुजानुभवही. ही रसायनं वाढवण्यासाठी उत्तेजक घेणं म्हणजे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ ही स्थिती. मेंदूतली सुखाची रसायनं वाढवण्यासाठी जी रसायनं ‘औषध’ म्हणून दिली जातात त्यांना ‘दु:ख-मारक’ (Anti- Depressant) औषधं म्हणतो.

मेंदूच्या आजारांमध्ये स्मृतीभ्रंशाचे आजार सोडले, तर फारच कमी आजारांत अख्खा मेंदू बिघडतो. पण रक्तातून येणारी ही औषधं साहजिकच जिथे औषध नको, तिथेही पोहोचतात. तिथे ती पोहोचताच त्याचे काही तात्पुरते त्रासही जाणवतात. पण रेल्वेच्या डब्यात गर्दीच्या वेळी बाकावर बसायला आलेला चौथा माणूस जसा आधी बसलेल्या तिघांना त्रासदायक वाटतो, तसंच नवीन आलेलं हे औषध सुरुवातीला वाटतं. एकदा ते मेंदूनं आपलंसं केलं, की त्याचे ‘चांगले’ परिणाम दोन-तीन आठवडय़ांत दिसायला लागतात. दुर्दैवानं मानसोपचारातील औषधांबद्दल समाजामध्ये असलेल्या गैरसमजांमुळे कित्येक लोक त्यांच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणांपासून हकनाक दूर राहातात. इतर शरीर-औषधशास्त्राच्या औषधांप्रमाणे या औषधांनाही सहा ‘क्लिनिकल ट्रायल्स’च्या अग्निदिव्यातून जायला लागतं. ‘हिपोक्रेटिक ओथ’- ‘इलाज नाही जमला तरी चालेल, पण इजा करू नका’ला लक्षात ठेवून, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांवर कडक नजर ठेवली जाते आणि त्यांची सतत नोंदणीही केली जाते. जगातल्या विविध प्रांतांतील डॉक्टरांच्या संशोधनातून औषधांचे बारीकसारीक परिणाम आणि दुष्परिणाम नोंदवून मगच ते औषध वापरात आणण्यास परवानगी मिळते. ही परवानगी मिळाल्यावरही जर औषधांचे परिणाम किंवा दुष्परिणाम त्यांच्या वापरास अयोग्य वाटले, तरी औषध वापरण्यावर बंदी येऊ शकते. इंग्रजीत म्हटलं जातं, ‘Doubt about self refines you, and doubt about others defines you!’. आधुनिक वैद्यकशास्त्राला जी जनमान्यता मिळाली आहे, ती याच स्वत:च्या ‘डोळ्यातलं कुसळही’ शोधण्याच्या तयारीमुळे. बाकी मुसळही न दिसणाऱ्या जाहिरातबाजांच्या  हातात ‘आयुर्वेदाचं’ काय होणार याची चिंता मात्र व्यर्थ म्हणता येणार नाही!

 

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2021 at 01:06 IST

संबंधित बातम्या