वैशाली बिनीवाले
गर्भावस्थेच्या पहिल्या त्रैमासिकाचा काळ स्त्रीसाठी अतिमहत्त्वाचा असतो, कारण त्या काळात गर्भ तयार होत असतो. उशिरा झालेली गर्भधारणा व संप्रेरकांमधील कमतरता यामुळे काय होऊ शकते? गरोदरपणात व प्रसूतीमध्ये नेमके कोणते धोके उद्भवू शकतात. ‘मिस्ड अॅबॉर्शन’ म्हणजे काय? याविषयी…वनिताला गेले पाच-सहा दिवस खूप थकल्यासारखं वाटतंय. पित्त वाढलंय, सारखं मळमळतंय. नेहमी येणारी मासिक पाळीसुद्धा दोन-तीन दिवस उलटून गेले तरी आलेली नाही. ही लक्षणं गरोदरपणाची आहेत का? सुचित्राला अंगात थोडी कणकण वाटते आहे. वारंवार लघवीला जावं लागतंय. मासिक पाळीची तारीखही उलटून गेली आहे. हा लघवीचा जंतुसंसर्ग असेल की गरोदरपणाचं लक्षण? प्रीतीची मासिक पाळी चुकलीय. आठ दिवस उलटून गेले तरी गरोदरपणाची इतर कोणतीच लक्षणं जाणवत नाहीएत.
प्रीती गरोदर असेल ना?
गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना वेगवेगळी लक्षणं जाणवतात. शरीरामध्ये ‘एचसीजी’ (Human chorionic Gonadotropin) व ‘प्रोजेस्टेरॉन’ या दोन संप्रेरकांची पातळी वाढल्याने ही लक्षणं जाणवतात. नियमित येणारी मासिक पाळी तारीख उलटून गेली तरी येत नाही. काही जणींना मळमळ, उलटी व पित्ताचा त्रास होतो. जिभेवर कडवट चव येते. भूक लागते, पण काही खावंसं वाटत नाही. स्तनांमध्ये जडपणा येतो. लघवीला वारंवार जावं लागतं. अशक्तपणा येतो, खूप झोप येते. गरगरतं, चक्कर येते. अंगात कणकण वाटते. काही स्त्रियांमध्ये वासाची संवेदना तीक्ष्ण होते. अत्तर, फोडणीसारखे तीव्र वास सहन होत नाहीत. काही जणींना मानसिक असंतुलनाची समस्या भेडसावते, चिडचिड होते. अर्थात ही लक्षणं प्रत्येक गर्भवती स्त्रीला जाणवतीलच असं नाही. काही स्त्रियांना पाळी चुकल्यानंतरही कोणतंच लक्षण जाणवत नाही, तर काही जणींच्यात ही लक्षणं इतकी तीव्र होतात की त्यासाठी वैद्याकीय सल्ला व औषधोपचार घ्यावे लागतात. गर्भनिदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात गर्भवती स्त्रीच्या शरीरात ‘एचसीजी’ या संप्रेरकाचं प्रमाण वाढतं. लघवी व रक्तामधील ‘एचसीजी’ची वाढलेली पातळी मोजून गर्भनिदान केलं जातं. गर्भधारणेचं निदान करण्यासाठी सोनोग्राफीचासुद्धा उपयोग केला जातो.
दीपाची मासिक पाळी चुकल्यावर तिने घरीच ‘गर्भनिदान’ तपासणी केली. (Urine Pregnancy Test) चाचणी नकारात्मक आल्यामुळे तिने मासिक पाळी येण्यासाठी गोळ्या घेतल्या. गोळ्या घेऊन १५ दिवस झाले तरी मासिक पाळी न आल्यामुळे ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात केलेल्या गर्भनिदान चाचणीमध्ये ती गरोदर असल्याचं लक्षात आलं. गोळ्या घेतल्याने बाळाला काही त्रास होईल का अशी चिंता दीपाला वाटू लागली. काही वेळेला मासिक पाळी चुकल्यानंतरही गर्भनिदान चाचणी नकारात्मक येऊ शकते. उशिरा झालेली गर्भधारणा व संप्रेरकांमधील कमतरता ही त्याची महत्त्वाची कारणं. अशा वेळी गर्भनिदान चाचणी आठ दिवसांनी परत करावी. मासिक पाळी येण्यासाठी घ्यायच्या गोळ्यांमध्ये संप्रेरके असल्याने त्या वैद्याकीय सल्ल्यानेच घ्याव्यात.
गर्भावस्थेचा एकूण कालावधी साधारणत: २८० दिवसांचा म्हणजेच ४० आठवड्यांचा असतो. शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून हा कालावधी मोजला जातो. यामध्ये नियमित येणाऱ्या मासिक पाळीच्या साधारणत: १४व्या दिवशी ‘ओव्ह्युलेशन’ झाल्याचं व त्या दोन-तीन दिवसांत स्त्रीबीजाचं शुक्राणूने फलन केल्याचं गृहीत धरलं जातं. अनियमित मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांमध्ये ‘ओव्ह्युलेशन’चा काळ अनिश्चित असल्याने शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेवरून गर्भावस्थेचा कालावधी मोजता येत नाही. गर्भावस्थेचा कालावधी तिसऱ्या महिन्यातील सोनोग्राफीने निश्चित केला जातो.
गर्भावस्थेचा ४० आठवड्यांचा कालावधी तीन भागांमध्ये विभागला जातो. या प्रत्येक भागाला त्रैमासिक (Trimester) म्हणतात. यातील प्रत्येक त्रैमासिकात गर्भवतीला जाणवणारी लक्षणं, तिच्या शरीरात होणारे बदल व तिने घ्यावयाची काळजी वेगळी असते. प्रथम त्रैमासिक गर्भधारणेपासून पहिले १२ आठवडे समजले जाते. पहिल्या त्रैमासिकाच्या सुरुवातीच्या काळात स्त्रीबीजाचे शुक्राणूने फलन केल्यानंतर ‘गर्भ’ तयार होतो. फलनानंतर साधारणत: सातव्या दिवशी हा गर्भ गर्भाशयात रुजतो. यातील काही पेशी गर्भाशयाच्या आतल्या आवरणाला चिकटतात व गर्भाशयातील रक्तवाहिन्यांमधून पोषक द्रव्ये मिळवू लागतात. यानंतर गर्भाची झपाट्याने वाढ सुरू होते. गर्भावस्थेच्या पहिल्या त्रैमासिकात बाळाचे अवयव निर्माण होतात.
मासिक पाळी चुकल्याचं लक्षात आल्यानंतर स्त्रीने लगेच डॉक्टरांना भेटायला हवं. पहिल्या तपासणीमध्ये गर्भधारणेचं निदान करून गर्भवती स्त्रीला तपासलं जातं. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात काही रक्तचाचण्या केल्या जातात. भारतामधील ५० टक्के स्त्रियांमध्ये ‘अॅनिमिया’ अर्थात रक्तक्षय आढळतो. म्हणजेच त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. या स्त्रियांमध्ये गर्भावस्थेच्या काळात काही धोके उद्भवू शकतात. गर्भपात किंवा अपुऱ्या दिवसांची प्रसूती होण्याची शक्यता असते. अशा स्त्रियांचं बाळ कुपोषित असतं. प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव किंवा जंतूसंसर्ग होऊन मातेच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच गर्भावस्थेत हिमोग्लोबिनचं प्रमाण बघून त्यावर उपचार सुरू करायला हवेत.
गर्भावस्थेत रक्तातील साखरेचं प्रमाण तपासलं जातं. सर्वसाधारणपणे ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊन त्यानंतर दोन तासांनी रक्तातील साखरेची पातळी मोजली जाते. अनियंत्रित मधुमेह असल्यास गर्भपाताचा व बाळात व्यंग निर्माण होण्याचा धोका असतो. अशा गर्भवतींच्या बाळाचा आकार व गर्भजलाची पातळी प्रमाणापेक्षा जास्त असते. यामुळे गरोदरपणात व प्रसूतीमध्ये धोके निर्माण होऊशकतात. गर्भारपणात मधुमेहाचं निदान झाल्यास, आहार व औषधांच्या मदतीने तो नियंत्रणात ठेवायला हवा.
गर्भवतींच्या शरीरात ‘थायरॉईड’ संप्रेरकाची कमतरता असल्यास बाळाची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. म्हणूनच गर्भावस्थेत ‘थायरॉईड’ची रक्तातील पातळी तपासून गरजेनुसार उपचार केले जातात. गर्भवतीचा रक्तगट तपासला जातो. रक्तगट ‘निगेटिव्ह’ असल्यास ‘आयसीटी’ (Indirect Coombs Test) ही विशेष चाचणी करून गर्भाला धोका नाही ना, हे बघितलं जातं. ‘थॅलेसिमिया’ची चाचणी केली जाते. एचआयव्ही, हिपॅटायटीस यांसारख्या जंतुसंसर्ग रोगांच्या चाचण्या केल्या जातात. लघवीमध्ये जंतुसंसर्ग नसल्याची खात्री केली जाते.
गर्भावस्थेतली पहिली सोनोग्राफी साधारणत: ८व्या आठवड्यात केली जाते. या सोनोग्राफीत गर्भ कुठे वाढतो आहे, किती दिवसांचा आहे, त्याची वाढ व्यवस्थित आहे ना, हे बघितलं जातं. गर्भाच्या हृदयाची स्पंदनं मोजली जातात. बाळ एकच आहे की जुळे-तिळे याची खात्री केली जाते. पहिल्या त्रैमासिकाच्या शेवटी म्हणजेच ११ ते १३ आठवड्यांमध्ये एक विशेष सोनोग्राफी (एन.टी.स्कॅन) केली जाते. यात गर्भामधील गुणसूत्र दोषांच्या शक्यतेची पडताळणी केली जाते. ‘डबल मार्कर’ ही विशेष रक्तचाचणी केली जाते. या दोन्हीचा रिपोर्ट बाळाच्या गुणसूत्रांमधील संभाव्य दोषाचा धोका सांगतो. असा धोका असल्यास गर्भावस्थेच्या दुसऱ्या त्रैमासिकात आपल्याला काही विशेष चाचण्या कराव्या लागतात.
श्रुतीच्या मासिक पाळीची तारीख उलटून पाच दिवस झाले होते. अचानक तिच्या पोटात खूप दुखू लागलं. सोनोग्राफी करताना लक्षात आलं की, गर्भ गर्भाशयात न वाढता गर्भनलिकेत (Fallopian tube) वाढत होता. यामुळे गर्भनलिका फाटून पोटात खूप रक्तस्राव झाला होता. ही समस्या गंभीर असल्याने ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागली. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात पोटात दुखत असल्यास किंवा रक्तस्राव होत असल्यास गर्भपात होण्याची किंवा गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली असण्याची (Ectopic pregnancy) भीती असू शकते. त्यामुळे त्वरित वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा.
१० टक्के गर्भवतींच्यात गर्भपात होण्याची शक्यता असते. पोट-कंबर दुखणं, रक्तस्राव होणं ही गर्भपाताची लक्षणं आहेत. गर्भामधील दोष, संप्रेरकांमधील असंतुलन, गर्भाशयातील समस्या, जंतुसंसर्ग, अति श्रम ही त्याची काही कारणं आहेत. गर्भपाताची लक्षणं जाणवल्यास औषधोपचारांच्या मदतीने काही वेळा गर्भपाताचा धोका कमी करता येतो.
मोहिनीला गर्भारपणाचे दोन महिने पूर्ण झाले होते, तिला कुठलाच त्रास होत नव्हता. आठव्या आठवड्याची सोनोग्राफी करताना गर्भाची वाढ नीट होत नाहीए, हे लक्षात आलं. गर्भाच्या हृदयाची स्पंदनंही जाणवत नव्हती. १५ दिवस औषधं देऊनही गर्भाची वाढ झाली नाही. जेव्हा गर्भवती स्त्रीला गर्भपाताची कोणतीच लक्षणं जाणवत नाहीत, गर्भाची वाढही होत नाही त्याला ‘Missed Abortion’ म्हणतात. अशा वेळी औषधं अथवा शस्त्रक्रियेच्या मदतीने गर्भपात करावा लागतो.
गर्भावस्थेच्या या पहिल्या त्रैमासिकात स्त्रीने विशेष काळजी घ्यायला हवी. या काळात गर्भ गर्भाशयात स्थिरावत असल्याने अति श्रम टाळायला हवेत. नवरा-बायकोने लैंगिक संबंध टाळावेत. लांबचे प्रवास, दगदग करू नये. पुरेशी विश्रांती घ्यावी. या काळात उलटी-मळमळ यासारखे त्रास होत असल्याने साधं, सात्त्विक अन्न खावं. एका वेळेस कमी परंतु दर थोड्या वेळाने अन्नग्रहण करावं. बाहेरील अन्नपदार्थ, शिळे अन्न, तिखट, तेलकट खाणं टाळावं.
गर्भधारणेदरम्यान किंवा गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात ‘फोलिक अॅसिड’ या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास गर्भाच्या मेंदूच्या आवरणांमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते किंवा गर्भपात होण्याचा धोका असतो. म्हणूनच गर्भधारणेच्या आधीपासूनच ‘फोलिक अॅसिड’ची गोळी घ्यायला हवी. गर्भावस्थेच्या पहिल्या त्रैमासिकात फोलिक अॅसिडबरोबरच जीवनसत्त्व ‘ब१२’ची औषधं दिली जातात. उलटी, मळमळ यांसारखे त्रास होत असल्यास त्यांची औषधं वैद्याकीय सल्ल्याने घेता येतात. या पहिल्या त्रैमासिकात बाळाचे अवयव तयार होत असल्याने काही विशेष काळजी घ्यायला लागते. म्हणूनच वैद्याकीय सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नये. क्ष-किरण तपासणी टाळावी. गर्भावस्थेच्या प्रथम त्रैमासिकाबद्दलची माहिती आपल्याला या लेखातून थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला आहे. पुढच्या लेखात आपण गर्भावस्थेच्या पुढील टप्प्यांविषयी माहिती घेऊ.