अवयव जपताना

अपघातात एखादा अवयव शरीरापासून तुटला तर जीव वाचवायच्या नादात लाखमोलाच्या तुटलेल्या अवयवाकडे दुर्लक्ष होतं आणि ‘योग्य वेळ’ निघून गेल्यानं कृत्रिम अवयवाच्या साहाय्यानं जगण्याची ‘वेळ’ अपघातग्रस्त रुग्णावर येते.

अपघातात एखादा अवयव शरीरापासून तुटला तर जीव वाचवायच्या नादात लाखमोलाच्या तुटलेल्या अवयवाकडे दुर्लक्ष होतं आणि ‘योग्य वेळ’ निघून गेल्यानं कृत्रिम अवयवाच्या साहाय्यानं जगण्याची ‘वेळ’ अपघातग्रस्त रुग्णावर येते. कोणती आहे ही ‘योग्य वेळ’ आणि असा अपघात आपल्या समोर घडला तर त्या स्थितीत नेमकं काय करु शकतो आपण? हे सांगणारा लेख.
को णत्याही प्रकारचं ‘काळ’ आणि ‘वेळे’चं गणित न पाळता अचानक उद्भवणारी आपत्कालीन घटना म्हणजे अपघात! ही अपघाती घटना अनेकदा शरीराला आणि मनाला कायमच्या वेदनेचं शल्य देऊन जाते. अशीच वेदनादायी घटना नुकत्याच रेल्वे अपघतात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिच्याबाबतीत घडली. तिला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली म्हणून तिच्यावर लवकर उपचार होऊ शकले, मात्र ही मदत अधिक जागरूक, सजगतेने मिळाली असती तर कदाचित तिला तिचेच हात परत मिळाले असते. होय, पूर्णत: कापले गेलेले अवयव आपल्याला योग्य काळजी घेतल्याने परत मिळू शकतात, कारण असे अपघात सातत्याने घडत असतात. अगदी आपल्या अवतीभोवती.
मनुष्याचं जीवन खरं तर लाखमोलाचं. त्यातही आपल्या शरीराचं मोल तर पैशात गणलं न जाणारं! अशावेळी अपघातात एखादा अवयव शरीरापासून तुटला तर जीव वाचवायच्या नादात लाखमोलाच्या तुटलेल्या अवयवाकडे दुर्लक्ष होतं आणि ‘योग्य वेळ’ निघून गेल्यानं कृत्रिम अवयवाच्या साहाय्यानं जगण्याची ‘वेळ’ अपघातग्रस्त रुग्णावर येते. अपघातामध्ये प्रामुख्याने मनगट, कोपरापासूनचा हात, पूर्ण हात तसंच गुडघ्यापासूनचा पाय, पाऊल इत्यादी भाग शरीरापासून तुटतात, कापले जातात. असे घडणारे अपघात जेव्हा आपण ऐकतो किंवा त्याची दृश्यं टी.व्ही. वर पाहतो, त्यावेळी मनाला खूप वेदना होतात. परंतु असा अपघात आपल्या समोर घडला तर त्या स्थितीत नेमकं काय करायचं? हे माहीत नसल्यानं परिस्थितीपुढे हतबल होतो आणि आपण काहीच करू शकलो नाही याचे वेदनादायी शल्य आयुष्यभर बाळगतो.
असे अपघात प्रामुख्याने पुढील ठिकाणी होतात.  १) घरामध्ये- स्वयंपाक घरात. हे प्रामुख्याने सुरी, विळी किंवा कोयत्याने मांसाहारी पदार्थ कापताना होतात. मुख्यत: बोटं तुटणं यात दिसून येतं. २) रेल्वे ट्रॅकवर गाडीतून पडल्याने, गाडीत चढताना हात सटकून पडल्याने आदी अपघात. यात प्रामुख्याने हात-पाय तुटण्याची शक्यता खूप असते. ३) औद्योगिक कारखान्यांमध्ये- प्रामुख्याने जिथं छोटी-मोठी कटिंग मशिन्स असतात तिथं. इथे प्रामुख्याने मशिनमध्ये बोट, मनगट, हात येऊ शकतो. ४) लिफ्टमुळे  होणारे अपघात – लिफ्टचा दरवाजा अर्धवट बंद झाला आणि लिफ्ट खाली गेली तर अवयव अडकल्याने असे अपघात होतात. ५) गुन्हेगारीत – कोयत्याने वार झाल्यास. ६) घरातही सोसाटय़ाचा वारा येऊन घराच्या वा खिडकीच्या दारात बोटं अडकून अपघात होतात. ७) रस्त्यातील वाहन अपघातात हात पाय कापले जाऊ शकतात.
 वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आता अशा अपघातग्रस्तांचा जीव वेळेत उपचार केल्यास वाचू शकतो. एवढंच नाही तर तुटलेला अवयव योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीनं हाताळून प्लास्टिक सर्जरीतील तज्ज्ञ डॉक्टरांकडे पोहचला तर रुग्णाला त्याचा जीव वाचण्याबरोबर तुटलेल्या अवयवाची पुनर्जोडणी (वैद्यकीय भाषेत अवयव प्रत्यारोपण, रिइन्प्लांटेशन) केल्यानं खऱ्या अर्थानं जीवनदान मिळू शकतं. या शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी (सुघटन शल्य चिकित्सा) सुपर स्पेशालिटी विभागात केल्या जातात. आजपर्यंत अनेक अपघातग्रस्त रुग्णांना व त्याच्या तुटलेल्या अवयवांना ‘वेळेत’ रुग्णालयात आणलं गेल्यानं अवयव प्रत्यारोपण केलं गेल्यानं यशस्वीरीत्या अपघातातूनही जीवनदान मिळालं आहे. अर्थात हे यशस्वी पण साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? तत्काळ कोणते कसे निर्णय घ्यायचे? अवयव हाताळणी कशी करायची? तसंच अत्यंत अमूल्य असलेलं ‘वेळचं’ गणित आणि त्यातील गुंतागुंत या विषयी सविस्तर माहिती दिली ती प्लास्टिक सर्जरीतील नामवंत तज्ज्ञ डॉ. मुकुंद थत्ते यांनी. दहाहून जास्त वर्षे डॉ. थत्ते हे सायन रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत कार्यरत होते. आज ते  या शस्त्रक्रिया करीत नाहीत तर त्याही पेक्षा महत्वाची सुपर स्पेशालिटी असलेली सर्जरी करतात, ती म्हणजे तुटलेल्या नव्‍‌र्हज् जोडणं. हा भाग ‘मायक्रो अंॅड हॅन्ड’ सर्जरीत येतो. हे नव्‍‌र्हज् जोडणीचं जोखमीचं आणि आव्हानात्मक काम जगातले फार थोडे सर्जन्स करतात. त्यापैकी डॉ. मुकुंद थत्ते हे एक होत. आज ते वाडिया, शुश्रूषा आणि बॉम्बे हॉस्पिटलशी संलग्न असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की आज प्लास्टिक सर्जरीत खूप प्रगती झाली आहे हे सत्य. पण अपघात झालेली प्रत्येक केस ही तज्ज्ञांना एक आव्हान असते. अवयव प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असलेली शस्त्रक्रिया असते. त्यामुळे यशस्वितेची शक्यता ५०-५० टक्के अर्थात हे यशसुद्धा प्रामुख्याने तीन गोष्टीवर अवलंबून असते. १) योग्य वेळेत अपघाती रुग्ण व त्याचा तुटलेला अवयव रुग्णालयात पोहोचणं २) प्लास्टिक सर्जरीची अहोरात्र सेवा उपलब्ध असलेल्या जवळच्या रुग्णालयाची निवड करणं. ३) अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाची शारीरिक स्थितीची अनुकूलता.
या तीन ही गोष्टींविषयी बोलताना डॉक्टर म्हणाले, ‘अवयव प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी ‘सहा तासात’ रुग्णाचा तुटलेला अवयव जोडून त्यात रक्तप्रवाह सुरू होणं अत्यावश्यक असतं. म्हणून अपघातग्रस्त रुग्णाला तीन तासात पोहचायलाच हवं. कारण रुग्णालयात रुग्ण आल्यावर एक तास शस्त्रक्रियेची पूर्वतयारी करायला लागतो तर दोन तास सर्जरीसाठी लागतात. म्हणून हे सहा तासाचं वेळेचं गणित पाळण्यासाठी लवकरात लवकर रुग्णालय गाठावं, हे उत्तम!
तुटलेला अवयव रुग्णालयापर्यंत नेईपर्यंत कसा हाताळावा हे सांगताना डॉ. थत्ते म्हणाले, तुटलेला अवयव उदा. बोट, पाय, हात इत्यादी. सलाईनमध्ये भिजवलेल्या गॉझमध्ये- विरळ जाळीदार सुती कापड, जे कोणत्याही केमिस्टकडे मिळतं- गुंडाळावा. कॉटनचा गॉझ नसेल तर स्वच्छ रुमाल सलाईनमध्ये बुडवून (भिजवून) त्यात तुटलेला अवयव गुंडाळा. सलाईनही नसेल तर स्वच्छ पाण्यात रुमाल ओला करून गुंडाळा.
हा गुंडाळलेला अवयव स्वच्छ, न वापरलेल्या प्लास्टिक पिशवीत ठेवावा. ही प्लास्टिक पिशवी एका प्लास्टिक वा अन्य धातूच्या डबा वा बॉक्समध्ये ठेवून त्याच्या आजूबाजूला बर्फ ठेवावा. तुटलेला अवयव चांगला राहण्यासाठी तो २ ते ८ डिग्री सेल्सिअस या अचूक तापमानातच ठेवावा लागतो. त्याप्रमाणेच बर्फ ठेवावा. साधारण घरातील फ्रिजमधील १० ते १२ आईस क्युब त्यासाठी पुरेसे असतात, मात्र तुम्ही किती लांबूून प्रवास करता त्याप्रमाणे तपमानाचं नियोजन करणं गरजेचं असतं. कुठल्याही परिस्थितीत हे तापमान ‘शून्य’ डिग्री सेल्सिअसच्या खाली जाता कामा नये. कारण हे शून्याखाली गेलं तर पेशीतील पाण्याचा बर्फ होतो व पेशी मरते.
  म्हणूनच अपघातानंतर तीन तासाच्या आत रुग्णालयात पोचावं व अतितातडीच्या विभागातील डॉक्टर किंवा सिस्टरच्या ताब्यात हा अवयव असलेला बॉक्स स्वाधीन करावा. इतर कुणालाही हा देऊ नये.
रुग्णाच्या रक्तस्त्राव होणाऱ्या भागावर कापड घट्ट दाबावे (प्रेशर बँडेज) मोठी रक्तवाहिनी तुटल्याने रक्तस्त्राव होत असेल तर जखमेच्या वरच्या बाजूस पंच्याने घट्ट बांधावं लागतं. (टुर्निकेट बॅन्डेज्) पण हे फक्त १/२ तासच बांधता येतं. जास्त वेळ बांधलं तर जखमेच्या आजूबाजूला स्नायूंना    रक्त न मिळल्याने तो भाग अधिक गुंतागुंतीचा होतो. त्यामुळे हे प्रेशर बँडेज जास्त सुरक्षित आहे. रक्तस्त्राव मोठय़ा रक्तवाहिनीचा असेल तरच टुर्निकेट बँडेज् बांधावं हे बँडेज् वैद्यकीय
प्रशिक्षित डॉक्टरांनी बांधणं गरजेचं आहे. म्हणूनच
खूपच रक्तस्त्राव होत असेल तर जवळच्या
डॉक्टरची रुग्णालयात पोहचेपर्यंत मदत घ्या व तत्काळ रुग्णालय गाठा.
डॉ. थत्ते यांनी सांगितलं की पुढील गोष्टी अजिबात करू नका. १) तुटलेला अवयव सरळ बर्फावर ठेवू नका. २) अवयव फ्रीझरमध्ये ठेवू नका. ३) सलाईनच्या पाण्यात अवयव बुडवून ठेवू नका. कारण ऑपरेशनसाठी ओल्या कपडय़ात गुंडाळलेला ओलसर अवयव हवा असतो. तो कोरडा असून किंवा पाण्याने ओथंबलेला असूनही चालत नाही.
यानंतर महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलची निवड. डॉ. थत्ते म्हणाले. ‘मुंबई शहरात असाल तर महानगरपालिकेची मोठी रुग्णालये. उदा. सायन, नायर आणि केईएम यापैकीच एकाची निवड करणं उत्तम. कारण इथे प्लास्टिक सर्जन, मायक्रो सर्जरी करणारे सर्जन इमर्जन्सीमध्ये तत्काळ उपलब्ध असतात. हे विभाग या हॉस्पिटलमध्ये अगदी चांगले कार्यरत आहेत. शिवाय रुग्णाला इतर दुखापती असतील तर तेही तज्ज्ञ उपलब्ध असतात आणि रुग्णांचा दुसरा फायदा खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत येथील उपचार स्वस्त दराने होतात आणि तेही कुशल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.
यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाची शारीरिक स्थिती. हे शस्त्रक्रियेच्या यशस्वितेसाठी फार महत्त्वाचे असते.
डॉ. थत्ते म्हणाले, ‘सर्वसामान्यांसाठी हे सांगणं फार वैद्यकीयदृष्टय़ा क्लिष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण एवढंच सांगता येईल की तुटलेला अवयव कितीही जपून आणला तरीही अपघातात शरीरातील भाग तुटताना स्नायू वेडेवाकडे तुटले असतील, ओरबाडले गेले असतील तर जोडणी करताना धोका असतो. अनेकदा विषाणूबाधित स्नायू जोडले गेल्यास रुग्णाचा जीव जाण्याचाही धोका असतो. म्हणून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मानावा. अवयव प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञांशी हुज्जत घालू नये. अर्थात यातही हा धोका जास्त गुडघ्यापासून तुटलेला पाय, कोपरापासून तुटलेला हात आदीबाबत जास्त असतो. पण हृदय-मेंदूपासून दूर असलेले अवयव उदा. बोट, मनगट आदी जिथे स्नायू नसतात तिथल्या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होतात. स्नायू नसलेले अवयव जिथे रक्तवाहिन्या हाडं, नस असतात तेथील शस्त्रक्रिया अपघातानंतर ८ ते १० तासांनी करूनही अनेक तज्ज्ञांनी यश मिळवले आहे. या विवेचनावरून लक्षात आलं असेल की अवयव प्रत्यारोपण ही गुंतागुंतीची व जिकिरीची शस्त्रक्रिया आहे. म्हणून
डॉ. थत्ते म्हणतात, ‘अपघातानंतर लवकरात लवकर तुटलेला अवयव योग्य पद्धतीनं जतन करून लवकरात लवकर मोठय़ा महानगरपालिकेच्या रुग्णालयात पोहचा. तुटलेला अवयव हाताळणीमध्ये कोणत्याही शंका असल्यास तत्काळ संबंधित रुग्णालयाच्या तज्ज्ञाशी संपर्क साधा. बाकी काम तज्ज्ञ करतील.’ महत्त्वाचं म्हणजे शस्त्रक्रियेच्या यशस्वितेची अवास्तव अपेक्षा करू नका. पण वैद्यकशास्त्रातील प्रगतीनं एवढे प्रयत्न केल्यावर शस्त्रक्रिया यशस्वी होईल अशी मनात आशा बाळगायला काहीच हरकत नाही. फक्त एवढा अवयव जतन करून आणलाय म्हणजे ऑपरेशन यशस्वी झालंच पाहिजे, असा अट्टहास रुग्णाच्या नातेवाइकांनी धरता कामा नये. म्हणूनच एवढय़ा ‘दिव्यातून’ जाऊन जेव्हा रुग्णाला त्याचा गमावलेला अवयव परत मिळेल, तेव्हा तो नक्कीच सर्वाच्या प्रयत्नांसाठी म्हणेल, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती!    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: While looking after limb

ताज्या बातम्या