श्रुती तांबे

समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

तंत्रज्ञान आणि संस्कृती यांची भिन्न गती, समाजाची विषमतायुक्त आर्थिक स्थिती यांचे परिणाम समाजगटांच्या नीतीवर, मतीवरही होतात.. 

१९९० नंतर उदयाला आलेली ‘नेटवर्क सोसायटी’ आता जगभर स्थिरावली आहे. जगाची विभागणी आता ‘डिजिटली कनेक्टेड’ आणि ‘डिजिटली नॉट कनेक्टेड’ या दोन जगांमध्ये झाली आहे. या डिजिटल डिव्हाइडची बरीच चर्चा तांत्रिक अंगाने झाली असली, तरी सामाजिक, सांस्कृतिक, मानसशास्त्रीय परिणाम कोणते? संगणक-स्मार्टफोनच्या परिघातल्या डिजिटल विश्वात जर तुम्ही सामील नसाल, तर तुम्ही वंचिततेच्या ज्या कृष्णविवरात खेचले जाता, तिथून बाहेर यायच्या शक्यता आहेत का?

एकीकडे २१व्या शतकातलं तंत्रज्ञान आणि दुसरीकडे त्याच्या मागून फरपटत येणारं सामाजिक वास्तव अशा आजच्या जगण्यात अनेक प्रकारचे विरोधाभासही आता दृग्गोचर झालेले आहेत. मंगळयान आणि अनेक उपग्रह अवकाशात अचूकपणे सोडणारा, रडारला न दिसणारी क्षेपणास्त्रं बनवणारा आपला देश. सुपरपॉवर होण्याची महत्त्वाकांक्षा मिरवणारा. मग देशाच्या राजधानीपासून केवळ २०० किलोमीटरवरचा चौघा उच्चजातीय पुरुषांनी दलित मुलीवर केलेला निर्घृण बलात्कार आणि भयंकर हिंसकपणे केलेली क्रूर हत्या आपल्याला कशी थांबवता येत नाही?

एखाद्या व्यक्तीचं जगणं, बोलणं आणि त्याचं वास्तव जेव्हा दोन ध्रुवांवरचं भासतं, वास्तवातली माणसं, घटना यांच्यापासून फारकत घेतल्यासारखी ती व्यक्ती जगत असते. अशी व्यक्ती एकाच वेळी शरीरानं एका जगात असते आणि मनानं दुसऱ्या जगात. तेव्हा त्या व्यक्तीच्या अवस्थेचं निदान स्किझोफ्रेनिया किंवा छिन्नमनस्कता असं करतात. आपला समाज असाच छिन्नमनस्कतेच्या बिंदूवर आज उभा आहे. अर्थरचना, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमांतून दिसणारं जग जे दाखवत आहे आणि सर्वसामान्यांचं जे वास्तव आहे ते अगदीच वेगळं आहे.

सामान्यांच्या नजरेतून पाहिलं, तर पाश्चात्त्य आधुनिकतेचं हवंहवंसं अप्राप्य जग सहज न्याहाळता येतं आणि मुक्तीचा भ्रामक तात्पुरता अवकाश मिळतो सेलफोनच्या खिडकीतून. एरवीचं आयुष्य मात्र ते जगतात जात, आर्थिक वर्ग, लिंगभाव, धर्म, ग्रामीण-शहरी या निकषांनी बद्ध अशा विषमतेवर आधारलेल्या सामाजिक विश्वात. दारिद्रय़रेषेच्या किंचित वर सरकलेल्या कोटय़वधी सर्वसामान्यांना उच्चमध्यमवर्गीयांचं जगणं मोहवतं, यात काय आश्चर्य? नव्या सहस्रकानं जगभरच्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या भौतिक जीवनाविषयीच्या आकांक्षा अधिकच फुलवल्या. या आकांक्षांच्या पाठीमागे असणारं आंतरजाल, त्या जाळ्यात जोडलेले जगभरचे प्रदेश आणि त्यातल्या सामाजिक- सांस्कृतिक आयुष्याचं एकसाचीकरण हे एकविसाव्या शतकाच्या मानवी जीवनाचं वास्तववादी परंतु क्षणभंगुर प्रारूप बनलं आहे. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं जाळं आपल्या अवाढव्य देशातल्या अब्जापेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य आहे. केवळ भारतातच नाही, तर या शतकारंभी युरोपातल्या स्पेन, इटली या तुलनेनं गरीब देशातल्या किती तरी भागांत हा ‘डिजिटल डिव्हाईड’ अनुभवाला येत होता. आज महामारीनंतरच्या अंतरभान ठेवण्याच्या काळात ‘ऑनलाइन’ हा परवलीचा वाक्प्रयोग बनला आहे. अतिमहत्त्वाच्या कार्यालयीन बैठका, परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोडवणं, दवाखान्यातले अतिदक्षता विभाग – या ठिकाणी वीज आणि आंतरजाल जोडणी यांचा लपंडाव अखंड प्रत्ययाला येतो. महाराष्ट्र, केरळातल्या स्मार्टफोन आणि डेटा पॅक परवडत नसल्यानं आत्महत्या करणाऱ्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या दिसतात. कधी आपण माहिती तंत्रज्ञानसज्ज एकविसाव्या शतकात असतो, तर कधी आपण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात. तसंही बलात्कार झालेल्या मुलीला दोषी मानणं, मुलींनाच नैतिकतेचे खोटे डोस पाजून उच्चजातीच्या गुन्हेगारांच्या कृत्यांवर पांघरूण घालणं हे सामाजिक पातळीवर विसाव्या शतकाचाच प्रत्यय देत असतं. म्हणजे एकाच बातमीपत्रात या दोन बातम्या आल्या तर त्यांना दिलेले प्रतिसाद भारतात भिन्न असतात. हीच ती छिन्नमनस्कता.

डिजिटल जगाच्या दुनियेची किल्ली ज्यांच्या हातात आहे त्यांनाच विनाव्यत्यय खाचखळग्यांशिवाय सुख उपलब्ध आहे आणि ते मिळवण्याच्या क्षमतेत खंड पडण्याच्या शक्यता नाहीत. तर कोटय़वधी लोकांच्या हातात सेलफोन असले तरी त्यांचा वापर सतत खंडित आहे. दहा-वीस रुपयांचा रिचार्ज हाच परवलीचा शब्द असलेल्या या कोटय़वधींसाठी विजेची, रोजगाराची आणि रिचार्जच्या पैशाची उपलब्धता, सततचं स्थलांतर यावर वापर ठरतो.

त्यांच्या हातातल्या सेलफोनमागचं तंत्रज्ञान चालतं ते डिजिटल कृष्णविवराच्या तत्त्वावर. संपूर्ण जगाचे जणू भाग पडले आहेत- कृष्णविवरातलं जग आणि कृष्णविवराबाहेरचं जग. तंत्रज्ञानाच्या संरचनेतच एक दुफळी आहे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’- नव्या प्रकारचे दोन वर्ग. अनंत अवकाशातल्या कृष्णविवरांसारखीच, आपल्या सभोवतालची कृष्णविवरं खेचून घेत आहेत सर्वाना. की आपण अदृश्यच आहोत इतरांसाठी? म्हणजे पर्यायानं कृष्णविवरातच आहोत का आजमितीलाही?

चर्चेतलं हे तंत्रज्ञान खरोखर भारतासारख्या देशात राबवायचं, तर त्या प्रमाणात तेवढी तांत्रिक सज्जता आपल्याकडे नाही. या सगळ्या अपेक्षा आणि वास्तवातल्या अंतराला उद्देशून मान्युएल कास्टल्स यांनी ३० वर्षांपूर्वीच संपूर्ण मानवी जग हे संरचनात्मक छिन्नमनस्कतेत अडकलं आहे, असं म्हणून ठेवलं आहे. स्ट्रक्चरल स्किझोफ्रेनिया. भांडवलशाहीला नफ्याचं चक्र अधिक वेगानं चालावं म्हणून आर्थिक व्यवहार, तंत्रज्ञानाची देवघेव आणि कामगारांचं स्थलांतर वेगानं हवं आहे. परंतु तो वेग सांभाळू शकेल अशा पायाभूत संरचना, आराखडे, ढाचे निर्माण व्हायला कोणत्याही समाजात दीर्घ कालावधी लागतो. या तीन पायांच्या शर्यतीचं काय करायचं? आणि तंत्रज्ञानाचा वेग साधला, तरी संस्कृतीचा वेग निराळाच आहे- मानवी आयुष्याच्या मूल्यांच्या, जगण्याच्या चौकटीतल्या बदलांचा वेग खूप कमी आहे. ही सांस्कृतिक छिन्नमनस्कता.

तरंगत्या बेटांसारखं आयुष्य जगणारे मूठभर व्यावसायिक आज सर्व क्षेत्रांत दिसत आहेत. जगभरच्या कोणत्याही प्रदेशातलं खाणंपिणं, भाषा, कपडेलत्ते- एकुणात त्यांना सगळं प्राप्य आहे. कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या कृपेनं या जगभरच्या लाखो अभिजनांचं जगणं एका अनाम कोणत्याच प्रदेशाशी जणू नाळ न जोडलेल्या फुग्यात सुरू आहे, असं दिसतं. त्या मोठय़ा फुग्यातल्या जगण्याच्या ठिकाणाला कास्टल्स ‘स्पेसेस ऑफ फ्लोज’ असं संबोधतात. मूठभरांचं तरंगतं, प्रवाही, सुखमय जगणं. तर दुसरीकडे ‘उरलेले’ बहुसंख्य मात्र जिथं राहतात तिथलीच भाषा बोलणारे, रीतीरिवाज, रूढी, परंपरा पाळणारे, त्याच मूल्यचौकटीत विषमता मान्य करून जगताना दिसतात. हे बहुसंख्य लोक जिथं जगतात, तिथं खून बलात्कार सुरूच आहेत, पुरेसं प्यायचं पाणी मिळत नाही, सांडपाणी-कचऱ्याचे प्रश्न गंभीर आहेत. मोठय़ाल्या हायवे, मेट्रो प्रकल्पांसाठी घरं पाडली जातात, महागाई- बेकारीशी सतत लढावं लागतं, दोन वेळचं जेवण आणि मुलांची स्वप्नं कशी पुरी करावी या विवंचनेत हे पालक आहेत. जगण्याच्या या ठिकाणांना कास्टल्स ‘स्पेसेस ऑफ प्लेसेस’ म्हणतात. बहुसंख्याकांचं स्थलबद्ध जगणं.

गेली ३०/४० वर्ष सुपरसंगणक, अवकाशशास्त्रातले शोध या सगळ्यातून तंत्रज्ञानाच्या अचूक, अजेय रूपाची आपल्याला दिलेली खात्री हजारो वेळा खोटी ठरली आहे. न्यूयॉर्कमधले ट्विन टॉवर्स पडेपर्यंत अमेरिकन महासत्तेला ना तो कट कळला, ना हल्ला थांबवता आला. त्यांचे रडार, विमानवेधी तोफा कुचकामी ठरले. जपानच्या तंत्रसज्जतेविषयी ते बुलेट ट्रेनविषयी तोंड फाटेस्तो स्तुती करणारे आपण जपानी त्सुनामीनंतरच्या आण्विक अपघाताची कारणमीमांसा फारशी वाचतही नाही. केवळ बाहेरचं समुद्राचं, पावसाचं पाणी आत जाऊ नये म्हणून आण्विक प्रकल्पाच्या दारावर सील लावले नाही, ही घोडचूक नंतरच्या चौकशी आयोगात मान्य केली गेली. चेर्नोबिल अपघातापासून ते भोपाळ गॅसकांड, अलीकडचं विशाखापट्टणम वायुकांड, विजयवाडय़ातली आग- सर्व मानवी उपक्रमांइतकंच डिजिटल तंत्रज्ञानही चुकणारं, हुकणारं आहे. फक्त त्याविषयीचा अतिआत्मविश्वास अनेकदा त्या तंत्रज्ञानाला आणि त्याच्या वकिलांना जोरदार आपटी देतो.

जागतिकीकरणाच्या विवेचनात केवळ तंत्रज्ञानाच्या वेगाचं, सर्वव्यापी स्वरूपाचं, आर्थिक वाढीचं कौतुक केलं जातं. परंतु संस्कृतीच्या भिंगातून या तंत्रज्ञानाधारित जागतिकीकरणाकडे पाहायला हवं. काही प्रक्रियांचं विश्लेषण केवळ एकाच भिंगातून केलं जातं. आणि इतर सर्व निरीक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. जणू काटेरी तारांच्या कुंपणांनी सीलबंद केलेली, बंदिस्त केलेली बौद्धिक जगं. आज नव्या विश्लेषणाची आणि त्यासाठी बौद्धिक सीमारेषा ओलांडण्याची गरज आहे. नव्या संकल्पना वापरून प्रत्यक्ष तिसऱ्या जगातल्या सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या व्यावहारिक बदलांचे दैनंदिन आयुष्याचे तपशील अभ्यासले, तर सामान्य लोक बिगरडिजिटल आयुष्य जगतानाही ज्या प्रकारे जात, धर्म, आर्थिक वर्ग, लिंगभावाच्या समाजानं आखलेल्या लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा सतत जिगरीनं प्रयत्न करतात, तेही पुढे येईल. तसंच हेच सामान्य लोक अगदी साधं तंत्रज्ञान वापरून रोजच्या जगण्यातले प्रश्न सोडवतानाही दिसतात. आयुष्य सुंदर आहे, कारण ‘रिचार्ज मारून’ तेवढय़ापुरतं क्षणिक का होईना, कोटय़वधी लोक कृष्णविवरातून बाहेर उसळी घेतात आणि कृष्णविवराच्या लोकशाहीकरणाचा आग्रह धरतात.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त समाजशास्त्राचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shruti.tambe@gmail.com