साधक हा सावधच असला पाहिजे. पण ही सावधानता कशाबाबत आहे? तर आपल्या मनात अशी कोणती इच्छा येत नाही ना, जी सद्गुरूलयतेपासून, त्यांच्या बोधापासून आपल्याला दूर करील, आपल्याकडून अशी कोणतीही कृती होत नाही ना जी सद्गुरूंना रुचणारी नाही, आपल्या मनात असा कोणताही विचार येत नाही ना, जो विकल्पाचं बीजारोपण करील, या बाबत साधकानं अखंड सावध, दक्ष असलं पाहिजे. या रीतीनं मन, क्रम आणि वाणीनं लक्ष्मण सदोदित सीताराममय होता आणि म्हणूनच निहाल म्हणजे चिंतामुक्त होता. म्हणूनच श्री अवध भूषण रामायण सांगतं की, ‘‘स्वसुख त्यागि सिय राम हित सावधान सब काल। सेवइ मन क्रम बचन ते लछिमन सदा निहाल।।’’ तेव्हा साधकानं परमतत्त्वाचं भान सदोदित बाळगलं पाहिजे, सावध होऊन बाळगलं पाहिजे आणि ही सावधानता मन, क्रम, बचन या तऱ्हेने स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही पातळ्यांवरच्या वावरण्यात असली पाहिजे. त्यात आत्मसुखाचाच विचार असला पाहिजे, देहसुखाचा नव्हे. साधक खऱ्या अर्थानं चिंतामुक्त कसा होईल, हेच यातून सांगितलं आहे. माणसानं मन, क्रम आणि वाणीनं म्हणजेच भावना, आचार आणि उच्चारानं चिंतनाशी इतकं एकरूप झालं पाहिजे की चिंतेला शिरकाव करण्यास उसंतच सापडू नये! माणूस जसा विचार करतो, तसा घडतो. ज्या गोष्टीचं सदोदित चिंतन करतो, त्या गोष्टीशी एकरूप होतो. त्यामुळे संकुचिताचं चिंतन सोडून माणसानं व्यापकाचं चिंतन साधलं पाहिजे, व्यापकाशी आंतरिक ऐक्य साधलं पाहिजे. आणि नुसतं चिंतन नव्हे, तर कृतीही त्या चिंतनाला सुसंगत होत आहे ना, याचं अवधान सांभाळत गेलं पाहिजे. कधी ते साधेल, कधी साधणार नाही. कधी चुकाही होतील, पण तरीही आत्मपरीक्षणाची, आत्मनिरीक्षणाची प्रक्रिया थांबता कामा नये. या ‘श्रीअवध भूषण रामायणा’त पुढे तर फार बहारीचं वर्णन आहे. लक्ष्मणाची प्रभुभक्ती अशी विराट होती की प्रभुंच्या सुखासाठी त्यानं पंचमहाभूतांनाही कह्य़ात ठेवलं होतं! हवं तर मला त्रास द्या, पण माझ्या प्रभुंना तुमच्यामुळे त्रास होता कामा नये, असं त्यानं बजावलं होतं. त्यामुळे लक्ष्मणाच्या भीतीनं वाराही प्रभुंच्या भोवती सुखदायी स्वरूपातच वाहात होता. सूर्यही चटका देणाऱ्या उन्हाचा संचार करीत उष्मा वाढवत नव्हता. पावसाळ्यात ढगही प्रभुंच्या निवासालगत सुखद वर्षांव करीत होते. लक्ष्मणाच्या भीतीनं पृथ्वीदेखील जिथं जिथं प्रभु चरण ठेवत तिथे तिथे मृदुकोमल बनत होती. हे सारं वर्णन साधकाच्या अंतरंगाचं आहे हो! सद्तत्त्वाशी संयोग हवा आहे ना, मग आपलं अंतरंग कसं असलं पाहिजे, याचं हे वर्णन आहे. सद्तत्त्वाशी संयोग हवा आहे ना? मग अंतरंगात वासनांचं वारं नको, त्यांचा झंझावात नको. विकारांचा दाह नको. आसक्तीयुक्त इच्छांचा वेडावाकडा वर्षांव नको. ज्या हृदयभूमीवर प्रभू चरण ठेवणार आहेत, तीही मृदु असावी. तिच्यात स्वार्थकठोरता नसावी. विकल्पाचे, संशयाचे खडे नसावेत. अनिच्छेचे काटे नसावेत. जेव्हा या तऱ्हेनं साधकाचं अंत:करणही सर्वस्वी परमतत्त्वाला अनुकूल होतं तेव्हाच त्याच्या मनाचं सुमन होतं आणि मग अ-मन होतं. म्हणजेच त्या परमतत्त्वाशिवाय मनाला मननाला दुसरा विषयच उरलेला नसतो. चित्ताला चिंतनाला दुसरा विषय नसतो. बुद्धीला बोधाचा दुसरा विषय उरला नसतो. अहंभावना सोहंमय होऊन गेली असते. खऱ्या संयोगभक्तीचं हे विराट रूप आहे.

– चैतन्य प्रेम