खिशात पैसे नसले, तरी माणूस महागडय़ा वस्तूंच्या दुकानांसमोर घुटमळतो. तिथल्या दर्शनी भागातल्या काचकपाटांतील वस्तू आणि त्यांच्या किंमतीची उंची लेबलं वाचतो. काही क्षण त्या वस्तू जणू आपण घेतल्याच आहेत, या भावनेनं त्या निरखतो.. आणि मग पुन्हा आपल्या ऐपतीला साजेशा दुकानांकडे वळतो! तीच गत निदान माझी तरी ज्या एका अभंगानं होणार आहे, त्या अभंगाकडे आता वळू! कारण तुकाराममहाराज उच्चरवानं सांगतात की, ‘सकळांसि येथे आहे अधिकार!’ तेव्हा आपल्याला किती दिलासा वाटतो. आज ना उद्या, या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी आपल्यालाही साधणार आहे. गीतेत भगवंतही सांगतात ना? की अभ्यासाला काहीही अप्राप्य नाही आणि या जन्मी जिथपर्यंत अभ्यास झाला आहे त्यापुढचा अभ्यास पुढच्या जन्मी सुरू राहतो. त्यामुळे अध्यात्माच्या वाटेवर चालत राहणं, जितपत जमेल, जितपत साधेल तितपत अभ्यास करीत राहणं, ही साधना मानून आपण ती करतो. मनावर दडपण नसतं. कसं साधेल, आपल्याला ते साधणं शक्य आहे का, असे प्रश्न मनात नसतात. पण ज्या अभंगाचा उल्लेख केला त्या अभंगाचा पहिलाच चरण थेट आणि कठोरपणे गर्जून सांगतो की, ‘‘जोंवरी विराग नुपजे विषयीं। तों अभ्यास कांही करूं नये!’’ जोवर विषयांबाबत विराग उत्पन्न होत नाही, तोवर काही अभ्याससुद्धा करू नका! अरे बापरे!! एखाद्याला प्रथमच भेटावं आणि त्यानं गर्जून सांगावं की, अमुक गोष्टी पाळायची तयारी असेल तर ठीक आहे नाहीतर मला तुमचं तोंडही बघायचं नाही, तसं आहे हे! अभ्यास केला की मग विषयांबाबत विराग उत्पन्न होतो, असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात आपल्याला विषयांचा तिरस्कार नसतो. त्यात आपण रमतोही आणि त्यात रमत असतानाच ते सोडण्यासाठी आपण प्रयत्नही करीत आहोत, असा भ्रामक समजही आपण बाळगत असतो. वर असंही म्हणतो की, ‘भल्याभल्यांना साधलं नाही, तिथं आपल्यासारख्या सामान्यांना का विषय सुटणार आहेत? अवतारी सत्पुरुषांचंच हे काम. तरीही जमेल तितका अभ्यास करू आणि विषयांच्या पकडीतून स्वत:ला आज ना उद्या सोडवू. कदाचित एखाद्या सत्पुरुषाची गाठ पडेल. त्यानं नुसता आशीर्वाद मुद्रेत हात उंचावला की आपलं काम झालं. मग पटापट साक्षात्कार होईल. परमानंद का काय म्हणतात तोदेखील मिळेल.’ तेव्हा मग असा कुणीतरी आयुष्यात येईल, याची प्रतीक्षा सुरू होते. त्याच्या प्राप्तीसाठी अधेमधे तळमळही निर्माण होते. ती खोटी असते, असं नव्हे, पण विषयांच्या तळमळीची सर या तळमळीला नसते, हे ही खरं! तर अशी आपली गत असताना एकदम कुणी फटकारून सांगितलं की, ‘‘जोंवरी विराग नुपजे विषयीं। तों अभ्यास कांही करूं नये!’’ विषयांचं प्रेम सुटलंय का? नाही ना? मग चालू लागा! अध्यात्मात तुमचं काही काम नाही. विषयप्रेमाचा साप हृदयाच्या पेटीत पाळून भवविष उतरवण्यासाठीच्या साधनेचं नाटक बाहेरून करू नका. अंतरंग सडलेलं असताना बाह्य़रूपाला अत्तरं माखून अलंकार लेवून सजवत बसू नका. त्या सजावटीला साधना भासवू नका. जर अभंगाचा पहिला चरणच असा फटका देतोय, तर पुढे किती तडाखे असतील! म्हणूनच म्हटलं ना? ऐपत नसतानाही आपण दुकानांबाहेर घुटमळतो ना? आणि कोण जाणे, बाजारातल्या त्या पायपिटीत अंतरंगाची खिडकी अवचित उघडेलही!