साधकानं काय स्मरावं, काय विसरावं आणि काय सोडावं, याबाबत पू. बाबा बेलसरे यांनी केलेलं मार्गदर्शन संक्षेपानं पाहू. साधकानं काय सोडावं? तर पू. बाबा सांगतात, ‘‘दुसऱ्याच्या दोषाचा काथ्याकूट करणं, विकारांना सहज वश होणं, आचारभ्रष्ट होऊन समाजात वावरणं, आपल्या साधनाची टिमकी वाजवणं, फार खाणं, फार निजणं आणि फार बोलणं, तसंच फार काळजी करणं आणि उगीच वेळ वाया घालवणं, या गोष्टी साधकानं सोडणं आवश्यक आहे.’’ आता आपल्याला वाटेल, या गोष्टी काय आपल्याला माहीत नाहीत? पण गंमत हीच असते की माहिती सगळं असलं, तरी ऐन वेळेला ते आठवत नाही आणि त्या अवधानानुसार जगणं साधत नाही! तेव्हा या सर्वपरिचित, पण अनुभवाच्या दृष्टीनं बऱ्याचदा अपरिचित, अशा या मुद्दय़ांचा विचार करू. पहिलाच मुद्दा आहे, ‘दुसऱ्याच्या दोषाचा काथ्याकूट न करणं.’ यालाच आपण परनिंदा म्हणतो. बरं ही निंदा अशी आहे की ती थांबतच नाही. दुसऱ्याच्या दोषावर चर्वितचर्वण करून काय साधतं? तर त्याच दोषाचं मनन, चिंतन घडतं. त्यातून आपल्या दोषांकडे मात्र सोयीस्करपणे पूर्ण दुर्लक्ष होतं. पुढे सांगतात की, ‘फार खाणं, फार निजणं आणि फार बोलणं’ टाळलं पाहिजे. थोडक्यात साधकाच्या सर्व जीवनव्यवहारात एक परिमितता हवी. स्वामी विवेकानंद एक पाऊल पुढचं टाकून सांगतात की, ‘फार खाणारा किंवा अतिशय कमी खाणारा आणि फार निजणारा किंवा अतिशय कमी निजणारा याला योग साधणार नाही.’ म्हणजेच अतीही नको आणि अत्यंत तुटपुंजंही नको. अर्थात हे सांगणं साधनेच्या प्रारंभिक टप्प्यासाठीचं आहे. एकदा साधन पक्कं आणि पक्व झालं की आहार आणि निद्रा यावर साधकाचा ताबा निर्माण होतो. पण आपण मात्र खाणं आणि निजण्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यात अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं! तोंडानं बोलणं, हा बोलण्याचा एक प्रकार आहेच, पण आज विविध अद्ययावत संपर्क साधनांद्वारे जो अखंड संवाद सुरू असतो तोही यात अंतर्भूत केला पाहिजे.  कारण आज प्रत्यक्ष संवाद कमी झालाय, पण या अद्ययावत संपर्क माध्यमांद्वारे संदेशवहनाचा ओघ अखंड सुरू आहे आणि वाढत आहे. अध्यात्माच्या आड काय काय येतं, यावर एकानं सांगितलं की, ‘विकार वगैरे आड येत असतीलही, पण सध्याच्या काळात व्हॉटसअप, फेसबुक वगैरे अधिक आड येतंय!’ यातला गंमतीचा भाग सोडा, पण खरंच आपला कितीतरी वेळ या माध्यमांमध्ये गुंतून वाया जात असतो. त्यातही प्रचारी संदेश आणि त्यावरील उत्तरं-प्रत्युत्तरं यात वेळ जातोच, त्याचबरोबर शुद्ध वैचारिक पातळी आणि आंतरिक समतोलही खालावत असतो. या माध्यमांची ताकद मोठी आहे आणि त्याद्वारे सकारात्मक गोष्टीही साधता येतात, जगभरातली कितीतरी माहिती आणि दुर्मीळ होत चाललेला ज्ञानसाठाही काही क्षणांत हातोहात गवसतो, पण त्यांचा सुयोग्य वापर न होता गैरवापरच अधिक होतो. तेव्हा साधकानं फार ‘बोलणं’ टाळलंच पाहिजे ते असं प्रत्यक्ष आणि समाजमाध्यमांवरचंही आहे. कारण या ‘बोलण्यात’ वा ‘व्यक्त होण्यात’ नाहक वेळ वाया जातो आणि त्या सर्व चर्चा, वाद यात खऱ्या अर्थानं टिकाऊ किंवा आपल्याला समृद्ध करणारं काहीच नसतं. उलट आपलं व्यक्त होणं अधिकाधिक झापडबंद होण्याचाही धोका असतो.

चैतन्य प्रेम