X

१७८. जुडगा

किल्ल्याच किल्ल्या जमवल्या आहेत. म्हणजे अध्यात्माबद्दल भारंभार माहिती तर आहे.

तुकाराम महाराज सांगतात की, हरिच्या नामाचा छंद जडला आहे. छंद म्हणजे काय? तर चाळा. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही न सुचणं. थोडा वेळ जाताच मनानं आपसूक त्या गोष्टीकडे वळणं आणि रमून जाणं. तसा मला नामाचा छंद लागला आहे, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. त्या नामाच्या छंदामुळे काय झालंय? तर, ‘‘शुचिर्भूत सदा वाचा!’’ हे देहबुद्धीनं भरलेलं जे भूत होतं ना ते निव्वळ वाचेच्या जोरावर शुद्ध झालं आहे, असं म्हणा. किंवा सरळ अर्थ म्हणजे, या नामाच्या छंदानं वाचा शुचिर्भूत झाली आहे, शुद्ध झाली आहे, पवित्र झाली आहे. मागे आपण पाहिलं होतं की वाचा म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. वाचा म्हणजे व्यक्त होणं आहे. तर जिवाचं व्यक्त होणं हे नामानं शुद्ध झालं. या जगाशी ज्या ज्या इंद्रियद्वारांनी संपर्क आणि संबंध होतो, मग ते जगाला आत घेणारे डोळे असतील,  जगातला स्वर आणि शब्द टिपणारे कान असतील,  जगासमोर आपला भाव शब्दांच्या आधारे व्यक्त करणारं मुख असेल.. तर ही सारी इंद्रियद्वारं एका नामानं शुद्ध झाली. मग असा जो भक्त आहे, तो हरिचा दासच होतो. दास म्हणजे त्या भगवंताच्या सेवेशिवाय त्याला दुसरं काही सुचत नाही. त्याच्या जीवनाला दुसरा कोणताही उद्देश उरत नाही. त्याला त्या सेवेवाचून दुसरं काही करवत नाही. असा जो हरीचा दास असतो त्याच्यासाठी अशुभ म्हणून काही उरत नाही! सर्व दिशा, सर्व वेळा, सर्व ग्रहमान त्याच्यासाठी शुभच असतं! पुन्हा इथं पेठे काका यांच्या ‘चिंतनक्षण’ या पुस्तिकेतील एका वचनाची आठवण होते. ते म्हणतात, ‘‘आपले तोंड देवाकडे नसले म्हणजे देवाचे तोंड कुठे करावे, अशा गोष्टींची चिंता जरा जास्त लागते!’’ तेव्हा ज्यानं हे चराचर जन्माला घातलं, त्याला कुठली दिशा पवित्र आणि कुठली दिशा अपवित्र? मग अशा देवाशी जो अभिन्नत्वानं अंतरंगातून जोडला जातो, त्याला तरी कुठली शुभ दिशा आणि कुठली अशुभ दिशा? त्याच्यासाठी सर्व दिशा एकसमान. कारण ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरूनिया!’ अशी कुठली दिशाच नाही, ज्या दिशेला तो सद्गुरू मला सांभाळण्यासाठी उभा नाही. अशी कुठली जागाच नाही, जिथं तो माझी काळजी घ्यायला समर्थपणे उभा नाही! हा खरा निर्भयतेचा, निश्चिंतीचा अनुभव. तो प्राप्त करून घेणं हा खरा लाभ. तो ज्याच्या आधारावर प्राप्त होतो, त्याची प्राप्ती ही खरी परमप्राप्ती! पण हा अनुभव आपलासा कधी आणि कसा होणार? तर त्यासाठी प्रत्यक्ष साधनाच हवी आणि ती आपल्यालाच सुरू करायला हवी. पेठे काका सांगतात, ‘‘परमार्थाच्या कुलुपाच्या अनेक किल्ल्या आहेत, पण सर्व किल्ल्यांतली अडचण एकच आहे की, कुठलीही किल्ली प्रत्यक्ष वापरल्याशिवाय कुलूप उघडत नाही!’’ (चिंतनक्षण, भाग सातवा). आपली गत अशीच झाली आहे की, जवळ किल्ल्यांचा भलाथोरला जुडगा आहे. किल्ल्याच किल्ल्या जमवल्या आहेत. म्हणजे अध्यात्माबद्दल भारंभार माहिती तर आहे.  ती पटपटा बोलता येते, सांगता येते, लिहिता येत! म्हणजे किल्ल्या खूप खळखळवता येतात. पण कुलूप उघडायचं मात्र राहूनच जातं! म्हणजे साधनेबद्दल, विविध साधना मार्गाबद्दल भारंभार बोलतो.. बोलून बोलून दमतो, पण कोणत्याही एका मार्गानं ठामपणे काही जात नाही! जोवर ठामपणे वाटेवर पाऊल ठेवून चालायला सुरुवात करीत नाही, तोवर मुक्कामाला पोहोचणंही काही साधत नाही!