खऱ्या सत्पुरुषाच्या मुखातून शुद्ध ज्ञानाचा प्रवाह सुरू होता. तो ऐकताना जो-तो तल्लीन झाला होता. सत्संग सुरू असतानाच जेव्हा ओघानं कुणी काही विचारू लागलं, तेव्हा एकानं जणू सर्वाच्याच मनातला प्रश्न विचारला. हा प्रश्न असा होता की, ‘‘इथं जेव्हा आम्ही आपलं बोलणं ऐकत असतो तेव्हा जणू जगाचा विसर पडतो. पण इथून बाहेर पडलो की पुन्हा नेहमीच्या धबडग्यात सगळं लयाला जातं. जी शांती मन इथं अनुभवतं ती झपाटय़ानं ओसरते. मग जी मन:शांती इथं लाभते ती बाहेर गेल्यावरही टिकत का नाही?’’ सगळ्यांचेच चेहरे त्या प्रश्नानं खुलले होते. कारण जे उत्तर मिळणार होतं, ते सर्वासाठीच होतं. सत्पुरुष हसून म्हणाले, ‘‘मी बोलतो ते सोडून द्या. पण खरा सत्संग जो असतो ना, तो काळाच्या पकडीतला नसतो. काळही जणू थबकला असतो. तो काळाच्या पकडीत नसल्यामुळे तो सत्संग अनुभवणाराही त्या क्षणांपुरता भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही विसरतो! अर्थात भूतकाळातील दु:खाच्या आठवणी, भविष्यकाळाविषयीची चिंता आणि वर्तमानात वाटत असलेली जगण्याची भीती, हे सारं काही तो विसरतो!! त्यामुळे त्या काळापुरतं तरी प्रत्येकाचं मन व्यवधानमुक्त आणि म्हणूनच अर्थात चिंतामुक्त असतं. इथून बाहेर पडताच भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या चिंतेनं वर्तमानाबाबत काळजी दाटून येत असते.’’ काहींच्या मनात आलं की, वर्तमानाची चिंता वाटणं स्वाभाविक नाही का? जीवनाबाबत बेफिकीर कसं राहाता येईल? त्यांच्या चेहऱ्यावरचा हा प्रश्न वाचल्यागत सत्पुरुष उद्गारले, ‘‘तुम्हाला वाटतं वर्तमानाची चिंता केलीच पाहिजे. पण तुम्ही खरंच कशी चिंता करता, याचाही विचार केलात का? त्या चिंतेतून ठोस आणि योग्य निर्णयापर्यंत तुम्ही कधी पोहोचता का? समजा मुलाच्या शिक्षणाची तुम्हाला चिंता वाटते आणि ती सदोदित तुम्ही करता, पण मुलाला अजून तुम्ही शाळेतही घातलेलं नसेल, तर त्या चिंतेला काय अर्थ आहे? तेव्हा खरी चिंता कशाची केली पाहिजे, हेच आधी आपल्याला कळत नाही. ज्या मनानं आपण जीवनाला सामोरं जातो ते मन तकलादू ठेवून जीवनातल्या अडचणी कोणत्या ताकदीनं आपण सोडवणार? ज्या बुद्धीनं त्या अडचणींवर मात करण्यासाठी ठोस निर्णय घेतला पाहिजे त्या बुद्धीला खऱ्या आत्मबोधापासून वंचित ठेवून तुम्ही जीवनातल्या समस्यांचा साकल्यानं विचार तरी कसा करू शकणार? तेव्हा मन, चित्त आणि बुद्धीची जडणघडण करण्यालाही अग्रक्रम नको का? त्याकडे दुर्लक्ष करून जीवनातल्या अडचणींना सामोरं जाता येईल का? या मूळ आंतरिक विकासाकडे दुर्लक्ष होतं म्हणूनच वर्तमानातल्या जगण्याची भीती वाटते. ही भीती असते ती जगण्यात येणाऱ्या संकटांची, कल्पनेनं त्यांचं स्वरूप आपण जे वाढवून ठेवतो त्याची. मग आपण एखाद्या चमत्कारासाठी आसुसतो. कोणा सत्पुरुषानं नुसता आशीर्वाद द्यावा आणि संकटं कधीच वाटय़ाला येऊ नयेत, अशी आपली अपेक्षा असते. पण जोवर आंतरिक जडणघडणीसाठी तुम्ही जे करणं आवश्यक आहे, ते त्यानं सांगूनही तुम्ही करीत नसाल, तर मनातल्या कल्पना, चिंता, अविचार कधीच ओसरणार नाहीत आणि काळजीही संपणार नाही. त्यासाठी आधी आपली आंतरिक जडणघडणच अत्यावश्यक आहे. कित्येक संत-सत्पुरुषांनी त्या जडणघडणीसाठीच तर विपुल बोध करून ठेवला आहे. त्या बोधाचं चिंतन, मनन हाही सत्संगच तर आहे!’’