आपला चिंतनप्रवाह हा कधी एखाद्या झऱ्याप्रमाणे जणू संगीतमय लयीत वाहणारा भासतो. तो बोध मनाची तार छेडतो आणि सुखावतो. कधी वेगानं वाहणाऱ्या नदीप्रमाणे तो त्याच्याबरोबर आपल्या विचारांचा वेगही वाढवत नेतो. कधी तो शांत गंभीर समुद्रासारखा लाटांच्या आवर्तनांसह विस्तारत असतो आणि मनातही अनंत लाटा उत्पन्न करतो. तर कधी तो पुरानं रौद्ररूप धारण केलेल्या नदीप्रमाणे असतो जो आपल्याही मनात खळबळ निर्माण करतो. कधी तो बोध सहज समजतो, तर कधी समजून घेतानाही दमछाक होते, मग तो आचरणात आणतानाची दमछाक वेगळीच! पण  बोध सोपा भासो वा कठीण; प्रत्येकवेळी आपलं चित्त, मन, बुद्धी त्यातून काही ना काही ग्रहण करत असते. आपल्या आंतरिक जडणघडणीत प्रत्येक गोष्टीचं काही ना काही मोल असतं. बरं जे पचतं, रूचतं आणि आचरणाला सोपं वाटतं ते ऐकायला आणि वाचायला कुणालाही आवडेल. आपण जे करीत आहोत, त्याचीच कुणी भलामण केली आणि त्यालाच भक्तीचं रूप दिलं, तरी ते आवडतं. प्राथमिक पातळीवर ते ठीकही असतं. लहान मुलाला अभ्यासासाठी चॉकलेट किंवा असं काही प्रलोभन दाखवलं जातं, पण मूल मोठं झाल्यावर हे प्रलोभन दाखवलं जातं का? तेव्हा जे आवडतं त्याचीच भक्ती म्हणून, अध्यात्म म्हणून भलामण करणं सुरुवातीला ठीक असतं, पण जसजसा काळ जातो आणि खरी वाटचाल सुरू होते किंवा ती सुरू होण्याची गैरज निर्माण होते, तेव्हा वास्तविक बोधच आवश्यक असतो. खरं सांगायचं, तर सत्पुरुषाच्या सहज बोलण्या-वागण्यातही वास्तविक बोधच असतो. तो शुद्ध ज्ञानरूपच असतो. मग कधी तो सोप्या शब्दांतला असला, सहज प्रसंगातून सूक्ष्मपणे बिंबवला जात असला, तरी तो शुद्ध ज्ञानाशी अखंड जोडला असतो. तेव्हा काही बोध ऐकायला सोपा वाटतो, काही कठीण वाटतो, पण दोन्हीचीही गैरज आहेच. जे आकलनाच्या कक्षेत आहे तेच सतत ऐकून आकलनाची कक्षा रूंदावत नाही. जाणिवेचा विस्तार होत नाही. एखाद्या कोऱ्या कागदावर चित्रकार चित्र काढू लागतो, तेव्हा खरं तर तो कोरा कॅनव्हास कोरा नसतो! त्याच्या मन:चक्षूंसमोर त्या कॅनव्हासवर चित्र असतंच.  अंतर्मनातलं ते सूक्ष्म आणि परिपूर्ण चित्र प्रत्यक्षात कागदावर उतरताना मात्र स्थूलाच्या मर्यादांमुळे अपूर्णच भासतं! पण प्रातिभ जाणिवेला जे उमगलं ते वास्तवात उतरवताना जो आंतरिक संघर्ष होतो तो जाणिवेची कक्षा रुंदावणाराच असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही कठीण वाचतो तेव्हा ते नुसतं कठीण म्हणून टाळून पुढे जाऊ नये. कारण त्या ‘कठीण’ भासणाऱ्या बोधाच्या चिंतन-मननानंच मनाचं काठिण्य कमी होऊ शकतं, कल्पना क्षमता विकसित होऊ लागते आणि जो सोपा वाटणारा बोध होता त्यातलं काठिण्यही अवचित जाणवू लागतं! ‘नुसतं नाम घ्या, बाकी काही करू नका,’ हा एका वाक्यातला बोध साधासोपा वाटतो. ते नाम घेणं संसार करता करता सहज शक्य आहे, असंही वाटतं. जेव्हा तो बोध आचरणात आणायचा प्रयत्न सुरू होतो तेव्हाच, ‘बाकी काही न करता नुसतं नाम घेणं,’ हे वाटलं तेवढं सोपं नाही, हे लक्षात येऊ लागतं! तेव्हा बोध नुसता बोलण्या-ऐकण्यापुरता, वाचण्या-सांगण्यापुरता राहीला, तर काही उपयोग नाही. कठीण बोधाचंही काठिण्य मनात न आणता सोपेपणा पहावा, जेवढं साधेल तेवढं आचरणात आणत जावं आणि मग जे या घडीला असाध्य वाटतं ते साधण्याचाही अभ्यास वाढवावा!

– चैतन्य प्रेम