आत्मा अखंड, शाश्वत आणि अविकारी आहे, असं स्वामी विवेकानंद सांगतात. विकार कसा उद्भवतो? तर बाह्य़ जगातल्या प्रत्येक घटनेचा मनात जो पडसाद उमटतो, जी प्रतिक्रिया उमटते, ती आपल्यातील विकाराच्या प्रतवारीनुसारच असते. म्हणूनच आत्मा अविकारी  असेल, तर बाह्य़ घटनांच्या परिणामांपासूनही तो अलिप्त असलाच पाहिजे. अर्थात तो निर्लिप्तही असला पाहिजे.. आणि आपणही आठवून पहा.. कोणत्याही गोष्टीत आपण जेव्हा गुंग होतो, तेव्हा त्यात आपण स्वत:ला विसरून जातो. अगदी निर्लिप्त होतो. त्या गढून जाण्यात, गुंग होण्यात एक चिंतामुक्त असा आनंद असतो. तर मग सदोदित ती अवस्था ज्या आत्मस्थितीत टिकते, असं स्वामीजी म्हणतात, ती स्थिती प्राप्त करण्यासाठीच खरा प्रयत्न व्हायला हवा ना? आणि त्यासाठीच मनुष्याचा जन्म आहे. त्या जन्माला आल्यावर त्या आत्मस्थितीच्या प्राप्तीसाठीच धर्माचा जन्म आहे! स्वामीजी जरी वेदान्त मताच्या प्रचारासाठीच अखेपर्यंत कार्यरत राहिले, तरी त्यांचा वेदान्त हा जगण्यातला होता. माणसाच्या आध्यात्मिक उत्थानाला त्यांचा सर्वोच्च अग्रक्रम होता आणि या उत्थानाचा संकल्प त्याच्या अंत:करणात उत्पन्न व्हावा यासाठी प्रारंभिक पातळीवर धर्माचंही महत्त्व त्यांना जाणवत होतं. पण माणसाला धर्माची गरज आहे, तशीच धर्मालाही माणसाचीच गरज आहे, हे ते जाणत होते. पण याचा अर्थ धर्माच्या नावावर वेडाचार करून माणसानं आपापसात लढत राहण किंवा वेडगळ समजुती पाळत राहणं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांची काही मतं ही आजही कालसंगत असली, तरी धक्का देऊन आपल्याला जागं करणारी आहेत. एकदा एक गोरक्षक त्यांच्या भेटीला आला. ‘‘आम्ही कसायांकडे जात असलेल्या गायी वाचवतो, तसंच भाकड गायीही सांभाळतो,’’ असं त्यानं स्वामीजींना सांगितलं. या कामासाठी लोकच पैसे देतात, असंही तो म्हणाला. स्वामीजींनी त्याच्या कार्याचं कौतुक केलं आणि मग विचारलं, ‘‘सध्या बंगालात भीषण दुष्काळ पडला आाहे. तब्बल नऊ लाख लोक अन्नावाचून मेल्याचं सरकारच सांगतं. मग त्या लोकांसाठी तुम्ही काय करू इच्छिता?’’ गोरक्षक म्हणाला, ‘‘स्वामीजी माणसं आपलं प्रारब्ध भोगत आहेत त्यामुळे आम्ही त्यात पडू इच्छित नाही.’’ त्यावर उसळून स्वामीजी म्हणाले, ‘‘मग कसायाकडे जाणाऱ्या गायीही त्यांचं प्रारब्धच भोगत आहेत, असं का मानत नाही तुम्ही? गोरक्षण चांगलंच आहे, पण मनुष्यरक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे!’’ (स्वामी विवेकानंदांच्या सहवासात, लेखक- शरच्चंद्र चक्रवर्ती). तेव्हा माणसाचंही रक्षण झालं पाहिजे कारण माणूस हाच धर्माचा आधार आहे. अज्ञेयाच्या शोधातला एकमेव दुवा आहे, असं स्वामीजी जाणत होते. माणसाचं रक्षण म्हणजे त्याच्यातल्या अनंत विकसित क्षमतांचं रक्षण! माणसानं धर्माचं रक्षण केलं, तर धर्मही माणसाचं रक्षण करील. म्हणजे माणूस जर धर्माच्या तत्त्वानुसार जगू लागला, तर ते तत्त्वाधिष्ठित आचरणच त्याच्या मनुष्यत्वाची जपणूक करील आणि त्याला अध्यात्माच्या वाटेवर नेईल, हा त्यांचा दृष्टीकोन होता. त्यांनी म्हटलं आहे की, ‘समग्र मानवजातीचे आध्यात्मिकीकरण, हाच या देशाच्या जीवनकार्याचा मूलमंत्र आहे, त्याच्या अस्तित्वाचा कणा आहे, मूलाधार आहे आणि प्रयोजन आहे!’ खरं तर साधकाच्या जगण्याचा हेतूही तोच असला पाहिजे आणि त्याची प्रत्येक कृती ही आध्यात्मिक भान आणि भाव जपणारी झाली पाहिजे.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क