जाणते लेकरू, माय लागे दुरी धरू.. तुकाराम महाराजांचा भाव आहे. कारण एकदा लेकरू मोठं झालं, त्याला ज्ञान होऊ लागलं की माय त्याला कडेवर घेत नाही, पदोपदी त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. तसं तुझं ज्ञान झालं की ज्ञातेपणाचा अहंकार लगेच चिकटतो. गायीच्या आचळाला चिकटलेली गोचीड जशी दूध न पिता गायीचं रक्तच शोषते, ती गत होते. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत परमात्मभाव जागा होण्याची शक्यता असताना प्रत्येक गोष्टीत अहंभाव जागा होऊ लागतो!

म्हणून मला ‘जाणोनी नेणते’च ठेव, अशी आळवणी तुकाराम महाराज करतात. असं झालं की लेकरू जसं मातेला धरूनच असतं त्याप्रमाणे तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. जाणत्या लेकराला माय दूर ठेवतेच, पण कधी कधी तर आईच्या दृष्टिआड राहण्यात जाणत्या लेकरालाही स्वातंत्र्याचा भ्रम होत असतो! तेव्हा मला जाणतं नव्हे, नेणतंच ठेव, असं तुकोबा म्हणतात. भक्तिप्रेमाचं हे मधुर दर्शन आहे. तर ज्याच्या अंतकरणात आत्मकल्याणाची थोडी का होईना, पण खरी तळमळ निर्माण झाली आहे, त्या मुमुक्षुलाही भगवंताची साक्षात प्रेमखूण हवी असते! म्हणजे भगवंत सदैव पाठीशी आहे, याचं चालतं-बोलतं, साक्षात म्हणजे डोळ्यांना दिसणारं प्रत्यंतर हवं असतं. ही प्रेमखूण म्हणजेच खरा सद्गुरू!

सुरुवातीला हा भाव असतो की, देवाचं दर्शन हवं असेल, तर जो त्याच्याशी एकरूप आहे त्याची भेट झाली पाहिजे. सदगुरू तत्त्वाची खरी महत्ता, खरी व्यापकता तोवर उमजली नसतेच. देव आणि मी, यांच्यातला तो मध्यस्थ मात्र वाटत असतो. नव्हे, भल्याभल्या आध्यात्मिक तत्त्ववेत्त्यांचंही असंच भ्रामक मत आहे, की गुरूची गरजच काय? बरं असं म्हणणाऱ्यांना सामान्य शालेय ज्ञानसुद्धा गुरूकडूनच घ्यावं लागलं होतं आणि सर्वात व्यापक अशा अध्यात्मज्ञानासाठी मात्र म्हणे गुरूची गरजच नाही! तर प्रथम देव आणि माझ्यातला गुरू हा मध्यस्थ वाटत असतो, पण जसजसा सहवास वाढत जातो, श्रवण-मनन-चिंतन आणि त्यानुरूप आचरण सुरू होतं, तसतसं जाणवू लागतं की, सदगुरू हा मध्य-स्थ आहेच.. पण तो माया आणि मी, भ्रम आणि मी, मोह आणि मी, अज्ञान आणि मी यांच्या मध्ये तो उभा आहे! हा सदगुरू हीच भगवंताचं त्याच्या अंशरूप जीवावर प्रेम असल्याची खूण आहे. ही खूण लाभली, खरा सदगुरू जीवनात आला की खरं जगणं सुरू होईल! जगण्याची जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं आणि जगण्याचं मोल कळू लागेल.

कमळाचं पान पाण्यात बुडत नाही. ते पाण्यावरच तरंगत असतं आणि त्याच्यावर पाणी पडलं तरी ते टिकत नाही, लगेच ओसरून जातं. तसा सदगुरूच्या आधारे व्यवहारात वावरत असूनही मी व्यवहारात बुडणार नाही. एखाद्या योग्याचं मन जसं उन्मन असतं त्याप्रमाणे माझ्या मनावर निंदा-स्तुतीचा अर्थात कोणत्याही अनुकूल वा प्रतिकूलतेचा काहीच परिणाम होणार नाही. हा प्रपंचच मला स्वप्नवत भासू लागेल आणि म्हणून त्यात राहूनही  माझा दृष्टिभ्रम होणार नाही. म्हणजेच आहे ते न दिसणं आणि नाही ते भासणं, हा जो मायेचा गुण आहे त्याचा माझ्यावर प्रभाव पडणार नाही. पण हे साधेल कधी? तर, भगवंताची सदगुरूरूपी प्रेमखूण मिळाली, तरच! त्याच्या सहवासाशिवाय आणि त्यानं केलेल्या बोधानुरूप माझ्या आचरणात पालट झाल्याशिवाय यातली एकही गोष्ट जिवासाठी असाध्यच आहे.