‘होणार..’ संपणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांनी हुश्श केलं. श्री-जान्हवीला बाळ कधी होणार, कलाला शहाणपण कधी येणार, सरू मावशीचं लग्न, असे प्रश्न आता मार्गी लागणार असं वाटताच आता मधेच एक ‘पण’ आल्याची चर्चा आहे.
अडीच वर्ष सुरू असलेली ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही लोकप्रिय मालिका लवकरच संपतेय अशी बातमी आली आणि प्रेक्षकांना धक्का बसला. अर्थात धक्का सुखदच होता. कारण ‘बास करा आता’, ‘संपवा ती मालिका’ असा नारा प्रेक्षकांकडून होत होता. या मालिकेवर होणाऱ्या विनोदांना मध्यंतरी उधाणच आलं होतं. जान्हवीच्या बाळावरून ही विनोदांची गाडी घसरली ते ‘काहीही हं श्री’ आणि ‘कलाऽऽऽ गप्पऽऽऽ बस..’ याकडे. आता पिंटय़ा, जानूच्या बाबांचं ऑपरेशन असं सगळ्यावर विनोद झाले. तरी मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही. एकीकडे या मालिकेचा शेवटचा भाग दोन जानेवारीला असल्याची माहिती मिळत असली तरी दुसरीकडे ती संपणार नाही अशीही चर्चा होतेय. चर्चा तर होणारच; कारण ही मालिका टीआरपीत नेहमी पहिल्या तीनमध्येच असायची. त्यामुळे सध्या मालिका संपणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पण मालिका संपली तर मालिकेतल्या अर्धवट गोष्टी पूर्ण झालेल्या दाखवण्याची शक्यता जास्त आहे. मालिका संपली नाही तर ती किती काळ लांबवली जाईल याचा अंदाज बांधणं मात्र कठीण आहे. तुर्तास मालिका संपणार आहे असं समजून मालिकेतल्या उपकथानकांचं काय होणार याचा विचार करुया.
‘जान्हवीला बाळ कधी होणार’ हा जणू देशाच्या गंभीर प्रश्नांपैकी एक प्रश्न होता. तो आता तरी निकाली लागेल असं प्रेक्षकांना वाटू लागलंय. मालिका महिन्याभरात संपतेय खरी, पण मालिकेत सध्या सुरू असलेल्या अनेक उपकथानकांना पूर्णविराम लागणार तरी कसा आणि केव्हा.? म्हणजे जान्हवी बाळ कधी होणार हे तर आहेच. पण, जोडीला सरू मावशीचं लग्न कधी होणार, बेबीआत्या तिच्या नवऱ्याच्या घरी कधी जाणार, कला म्हणजे जानूची आई कधी सुधारणार, जानूच्या बाबांचं ऑपरेशन कधी होणार वगैरे वगैरे.. पण, प्रेक्षकहो, या सगळ्याचा विचार मालिकेच्या टीम आणि चॅनलने केला आहे. मालिका महिन्याभरात संपणार असली तरी या सगळ्या उपकथानकांचा शेवट गोड नक्की होणार असं समजतंय. यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो जान्हवीच्या बाळाचा. आता हे नाही दाखवलं तर प्रेक्षक काय आणि कसे व्यक्त होतील हे वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे बाळ तर दाखवणारच. पण, बाळासोबत इतरही अनेक गोष्टी हॅपनिंग असणार यात शंका नाही.
सरू मावशीच्या लग्नाचा विषय खूप ताणला होता. अखेरीस तोही निकाली लागला. सरू मावशी आणि पप्पू म्हणजे प्रद्युम्नचं लग्न झालं. चला, महत्त्वाच्या काही कामांपैकी एक काम झालं तर.. जानूने गोखल्यांच्या घरात आल्यापासून सगळ्यांना सगळं मिळवून देण्याचा जणू काही विडाच उचलला होता. सुरुवातीला आईआजीचं मन जिंकलं. छोटय़ा आईला इंग्रजी शिकवलं. प्रत्येक सासूला त्यांच्या आवडीच्या कामात गुंतवलं. नंतर लक्ष्मीकांतकाकांना आणि मग श्रीच्या बाबांना म्हणजे तिच्या सासऱ्यांना घरात आणलं. बँकेतल्या कामापेक्षा तिने हेच काम अगदी चोख केलंय बरं. पण, असो.. ‘गोकुळ’ सुखाने नांदू लागलं हेही नसे थोडके! पुढे तिचा स्मृतिभ्रंश, श्री-जान्हवीची ताटातूट हे सगळे महाताणलेले ट्रॅक आले आणि गेले. प्रेक्षक इथेही कंटाळला खरं तर पण, मालिका बघतही राहिलाच. पण, काहीही म्हणा, पटकथालेखनाचं यात श्रेय म्हणावं लागेल. एकेक घटना फार शिताफीने एकमेकांत गुंतवल्या होत्या. मालिका वाढतेय, कंटाळा आलाय असं प्रेक्षक म्हणायचे कारण ते मालिका बघायचे आणि कंटाळा यायचा तरी बघायचे. असं ते चक्र सुरू होतं. असो, विषयांतर नको. मुद्दा आहे तो यात दाखवत असलेल्या उपकथानकांचं काय होणार?
मालिकांमधील सगळीच पात्रं तशी लक्षात राहण्यासारखी. सहा सासवा तर अति गोड. बेबीआत्या वगळता बरं. ती खाष्ट नाही. पण, गुडी-गुडीही नाही. स्पष्ट बोलणारी, सडेतोड. तिच्या याच वागण्यामुळे आणि नवऱ्याशी न पटल्यामुळे ती त्याला सोडून माहेरी आली, अशी पाश्र्वभूमी मालिकेत आहे. पण, मग ही पुन्हा त्याच्याकडे जाणार का, हा एक प्रश्न. जानूने इतरांचे प्रश्न जसे मार्गी लावले तसेच ती बेबीआत्याचाही लावणार, असा विश्वास प्रेक्षकांना तरी आहे. म्हणजे चॅनल किंवा निर्मात्याने हे ठरवलं नसलं तरी प्रेक्षकांनी त्यांच्यापुरतं हे पक्कं ठरवलं होतं. एवढं ठरवण्याइतपत प्रेक्षकही हुशार झालेत आता. बेबीआत्याही मालिकेच्या अखेरच्या भागांमध्ये सगळे मतभेद विसरून नवऱ्याकडे परतणार असल्याचं कळतं.
‘अंत भला तो सब भला’ असं सिनेमांच्या बाबतीत म्हटलं जायचं. आता ते मालिकांच्या बाबतीतही म्हटलं जातंय. एका महिन्यात मालिकेत एवढय़ा सगळ्या गोष्टी दाखवणं म्हणजे मालिकेच्या शीर्षकानुसार खरंच ‘तारेवरची कसरत’ आहे. मालिकेत सगळे बदल होतील पण, कलाबाई कधी सुधारतील याचा अंदाजही बांधता यायचा नाही. या बाईंकडे बघून ‘आई कशी असू नये’ याचे धडे मिळतात. पराकोटीची चीड यावी अशा या कलेला खाष्ट शब्दही कमीच आहे. पण, ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आशा शेलार यांनी लाजवाब काम केलंय. एखाद्या प्रसंगात कला आली की, राग राग करणाऱ्या प्रेक्षकांचं व्यक्त होणं ही खरं तर त्या अभिनेत्रीला मिळालेली दादच आहे. एक वेळ अनिल आपटे सुधारेल; काय, विसरलात त्याला? जानूशी लग्न करण्यास इच्छुक असलेला पन्नाशीचा वर. तर, एक वेळ तो सुधारेल पण, कलाचं जरा कठीणच वाटतं, असाच विचार प्रेक्षक करताहेत. पण मालिकेच्या अखेरीस कलेचं सुधारणं, सुनेला मनापासून स्वीकारणं या गोष्टी घडलेल्या दिसू शकतात. जानूच्या बाबांचं ऑपरेशन होण्याचीही शक्यता आहे.
हे झालं मालिका संपणार असेल या अंदाजावर. पण, संपणार नसेल तर मारुतीच्या शेपटाप्रमाणे ती वाढतच जाईल यात तीळमात्रही शंका नाही. मालिका संपणार असल्याची बातमी ज्या वेगाने पसरली त्याच वेगाने ‘संपणार नाही. अफवा आहे ती’ ही बातमीही वेगाने पसरली. त्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडालाय. त्यात नव्या मालिकेचे प्रोमोही झळकताहेत. त्यामुळे कोणतीतरी एक संपणार हे जाहीर आहे. आता त्यात ‘होणार..’चा नंबर लागणार असल्याची शक्यता जास्त आहे.
साधारणपणे, मालिका कमी कालावधीत शेवटाकडे न्यायची असेल तर कसरत असते. मग अशा वेळी काही वर्षांनी किंवा महिन्यांनी मालिका पुढे सरकलेली दाखवतात. पण, इथे ठरावीक महिन्यांची लीप घेतली असं न सांगता मालिकांच्या प्रसंगातून मालिका पुढे सरकल्याचा उल्लेख होणार असल्याचं समजतं.
‘होणार सून..’ शेवटाकडे जात असली तर त्यातल्या सगळ्या उपकथानकांना पूर्णविराम देऊन जाईल असं दिसतंय. मालिकेसह श्री-जान्हवी, त्यांचं बाळ, पिंटय़ा, कला, बेबीआत्या अशा सगळ्यांवर होत असलेले विनोद, थट्टामस्करीही लवकरच संपेल!
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11