सोन्याच्या दागिन्यांची सुरुवात भारतीय माणसांच्या आयुष्यात अगदी जन्मल्यापासूनच होते. बारातेराव्या दिवशी कान टोचण्यापासून ते नंतर वाळा, साखळी, अंगठी, मुलींना पैंजण असे कितीतरी दागिने हौसेने केले जातात.

अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्य़ा बाळा, तीट लावा, अशा बालगाण्यांतून लहान मुलांच्या दागिन्यांचे सहज उल्लेख येतात, ते त्यांना खेळवताना. प्रत्यक्षात त्यांचा संबंध थेट सोन्याशी येतो तो, जिवती पूजन नि बारशाच्या दिवशी. बाळाच्या नि आपल्या जीवनातल्या सोनेरी क्षणांचे साथीदार होतात, ते हे सोन्याचे दागिने. परंपरा जपण्यासाठी नि हौसेनं केलेले या लहान मुलांच्या सोन्याच्या दागिन्यांची दुनिया काही औरच आहे. जिवतीच्या प्रतिमेपासून ते नजर कवचापर्यंत हे दागिने कितीतरी नावीन्यपूर्ण रूपात पाहायला मिळतात. कधी पारंपरिक, कधी रेडीमेड तर कधी खास ऑर्डरचे.. बारीक तार नि मोत्यांचे मणी, मनगटय़ा, वळं, अंगठी, आमले, रिंगा, कानातले, बांगडय़ा, पाटल्या, ब्रेसलेट, कडं, चेन, गोफ, साखळी, कमरपट्टा, तोरडय़ा वगैरे.. काय घ्यावं नि किती घ्यावं..

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी जिवतीची पूजा केली जाते. जिवतीचा हा ताईत गळ्यात किंवा हातात बांधला जातो. ही जिवतीची प्रतिमा गोल किंवा बदामाच्या आकाराच्या पेंडण्टमध्ये असते. त्यानंतर शक्यतो बाराव्या किंवा तेराव्या दिवशी बाळाचे कान टोचले जातात. कान टोचल्यावर घातलेली तार व्यवस्थित वळवली तर बाळाला ती लागत नाही. बारशाच्या वेळी दिलं जाणारं बाळलेणं हे काही वेळा पारंपरिक म्हणजे आजोबा-पणजोबांपासून वंशपरंपरेनं आलेलं असतं. ते बाळाला दिलं जातं. उदाहरणार्थ गळ्यातली छोटी चेन, त्यात बदामाच्या आकाराचं लॉकेट, मुलाला कडी केली जाते. मुलीला नाजूक पाटल्या-बांगडय़ाही करतात. हे सगळे दागिने घडवताना त्यांच्या कडा लागणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. कारण बाळाची त्वचा फारच नाजूक असते. काही वेळा दागिना सोन्याचा असला तरी त्याची रिअ‍ॅक्शन येऊ  शकते. क्वचित जुन्या दागिन्यांमध्ये हवेमुळे रासायनिक प्रक्रिया घडून त्वचेला अपाय होऊ  शकतो. ते टोचूही शकतात.

विश्वास वैद्य गाडगीळ सराफचे विश्वास वैद्य सांगतात की, आपल्याकडच्या पद्धतीनुसार साडेतीन मुहूर्त नि गुरुपुष्य मिळून वर्षांला आठ-दहा वेळा सोनं घ्यावं. सोन्यातली गुंतवणूक ही खूप फायदेशीर ठरते. सोन्याला रिसेल व्हॅल्यू आहे. हल्ली नॅनोचं जग दागिन्यांतही आलंय. लोकांना कमी वजनाचे पण चांगले दिसणारे सुबक दागिने हवे असतात. मग हौसेनं ऑर्डर देऊन सोन्याच्या तोरडय़ा, सोन्याचे वाळे, कमरेची सोन्याची साखळी करून घेतात. मनगटांमध्ये काळे- सोन्याचे मणी कमी-जास्त किंवा त्यांचा आकार कमी-जास्त केला जातो. बारशाला वळं नि अंगठी घेतलं जातं. शाळेत जाणाऱ्या मुलींना फिक्स कानातले घातले जातात. काही वेळा शाळेच्या सांगण्यानुसार ते काढावेही लागतात.

लहान मुलांसाठी दागिने खरेदी करताना किंवा त्यांना भेट देताना आताशा पालक नि नातलग फार काळजी घेतात. त्याबद्दल हेमाली पिंगळे सांगते की, सोहम नि प्रथमला पाचव्या दिवशी परंपरेनुसार जिवतीपूजन करून जिवतीची प्रतिमा घातली होती. जिवतीची प्रतिमा टोचू नये, याची काळजी घेतली होती. बाराव्या दिवशी त्यांचे कान टोचले होते. कान टोचल्यावर त्या तारेत मणी-मोतीही घातले जातात. पण अनेकदा ते कपडे घालताना अडकतात. त्यामुळे मी ते घालणं टाळलं नि फक्त तार घालून ती टोचणार नाही, अशी फिक्स करून घेतली. परंपरेनुसार आजीनं त्याच्या बाबांची चेन-पेंडण्ट सोहमला दिली. प्रथमसाठी नवीन चेन केली. बारशाला दोघांनाही भेट म्हणून चेन, वळी मिळाली होती. सणावाराच्या निमित्तानं त्यांना चेन घालते. एरवी सुरक्षेच्या कारणानं बाहेर चेन घालत नाही. सोहमची शाळा नि दोघांच्या बेबी सिटिंगच्या सूचनेनुसार दागिने घालता येत नाहीत. तर स्वप्ना महाजनच्या म्हणते, ‘‘मिहिकाला बारशाच्या वेळी दोन्ही आजोळकडून नि नातलगांकडून भेट म्हणून दागिने मिळालेत. तिच्या बांगडय़ा अ‍ॅडजस्टेबल असल्यानं थोडी मोठी झाल्यावरही घालता येतील. तिची चेन नि अंगठीही नंतर घालता येऊ शकेल. चेन प्लेन नि डिझाइनची आहे. डिझाइन तिला बोचू नये, असं बघून घेतलं होतं. कान बाराव्या दिवशी टोचले असल्यानं ते फिक्स आहेत. कानातल्यांचा नाजूक डिझाइनचा आणखी एक जोड आहे. महिन्याचा वाढदिवस नि सणावाराला एखादा दागिना तिला घालते. बारशाच्या वेळी पणती म्हणून तिच्यावर सोन्याची फुलं उधळण्याऐवजी तिला घालण्याजोगी चेनच केली. सुरक्षेच्या दृष्टीनं तिला घरीच दागिने घालते.’’

हल्ली एक-दोन मुलं असल्यानं त्यांच्यासाठी शक्य ते सगळं केलं जातं. शिवाय सगळ्यांच्या हौसेला मोल नसतं नि एका परीनं ती चांगली गुंतवणूक होते, असं अनेकदा म्हटलं जातं. पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन नि मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ गाडगीळ यांच्या मते, ‘‘सोन्याचे दागिने हा भारतीय संस्कृतीत एक अविभाज्य भाग मानला जातो, मग ते दागिने म्हणून केलेले असोत किंवा एक गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिलं जात असो. वैशिष्टय़पूर्ण नि वेगळ्या बाजाचे युनिक म्हणावेत, असे दागिने घडवण्यावर आमचा कायमच भर असतो. लहान मुलांसाठीच्या दागिन्यांचा ट्रेण्ड सध्या वाढताना दिसतोय. छोटीशी अंगठी किंवा अनेक पदरी नजर कवच सध्या लोकप्रिय आहे. मुलांच्या हितासाठी म्हणून गणपती किंवा हनुमानाची प्रतिमा असणारी पेंडण्टही अनेक पालक घेतात.’’ तर ज्योती राठोड संगानी म्हणते की, ‘‘ग्रितीला षष्ठीपूजा अर्थात छटीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून सोन्याच्या अंगठीनं मध चाटवला होता. तिच्या बारशाच्या दिवशी आमच्याकडे बऱ्याच काळाने मुलीचा जन्म झाल्याने कानातले, चेन, ब्रेसलेट, बांगडय़ा, कडं, अंगठी, कडदोरा असे खूप दागिने तिला मिळाले. हे दागिने तिला सणावारापुरतेच घालते. यंदा जन्माष्टमीला तिला कृष्णरूप दिलं होतं नि सगळे दागिने घातले होते. तिच्या वर्षांच्या वाढदिवसाची थीम परी असल्याने फक्त चेनच घातली होती. पाचव्या महिन्यात तिचे कान टोचले नि काळ्या मण्यांसह सोन्याची तार घातली. तिच्या बांगडय़ा प्लेन असून कमरपट्टय़ाला लॉक आहे. परंपरा पाळतानाच त्यांची वर्तमानाशी सांगड घालण्यावर मी भर देते.’’ तर गौरी भावे जोशी सांगते की, ‘‘मल्हारला दोन्ही आजोळकडून बारशाला बरेच दागिने मिळालेत. सोन्याची चेन नि सोन्याच्या गणपतीचं लॉकेट दिलंय. हातातली २ कडी नि अंगठी असून बरीच वळी भेट आल्येत. वर्षभर फिक्स बाळी होत्या. त्याचा पॅटर्न भिकबाळ्यांसारखा होता. आता सणावाराला त्याला चेन, कडी घालते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे एरवी आणि शाळेत कोणतेही दागिने घालत नाही.’’

नागवेकर बंधू ज्वेलर्सचे राजू नागवेकर म्हणतात की, सध्याची महागाई लोकांच्या सोने खरेदीवर परिणाम करतेय. बारशाच्या वेळी द्यायला चेन नाही, पण एक ग्रॅमची अंगठी किंवा मग वळं घेतलं जातं. सध्या नाजूक डिझाइनच्या दागिन्यांना अधिक पसंती दिली जाते. तर ज्योती कदमच्या मते, रिद्धिमाला बारशाच्या वेळी कानातले, चेन, मनगटय़ा भेट आल्यात. दसरा-दिवाळी असे मोठे सणवार असताना घरीच किंवा अगदी जवळच्या लग्नकार्यात तिला हे दागिने मी घालते. सुरक्षेच्या विचारानं आणि शाळेनं तशी सूचना दिल्यामुळे तिला एरवी दागिने घालतच नाही. प्रभवलाही कडं, साखळी नि कानात बाळी आहे. त्यालाही ते घरीच घालते. एके काळी सोनं हौस म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून घेतलं जायचं, ते प्रमाण तितकंसं राहिलेलं नाही. तर धनश्री भागवत दीक्षित सांगते की, सोहमला सोन्याचे दागिने फारसे केले नाहीत. जिवती पूजन करून घातलेली जिवतीची प्रतिमा त्याच्या गळ्यात असते. बारशाला त्याला दोन्ही आजोळकडून चेन मिळाल्यात. अंगठी मिळालेय. कान टोचल्यावर बाळी फिक्स होती ती आता काढून टाकली, कारण तो शाळेत जायला लागलाय. सणावारी काही घालायचं ठरवलं, तरी त्याला ते नको असतं. घातलं तरी तो ते काढून टाकायला लावतो. भेट म्हणून आलेल्या वळ्यांचे दागिने करण्यापेक्षा ती पुढं त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील, असा प्रॅक्टिकल विचार आम्ही केलाय.

आपली संस्कृती, परंपरा नि शुभाशुभ संकेतांचं जग, पालकांची हौस नि ट्रेण्ड फॉलो करायची वृत्ती, वाढती क्रयशक्ती आणि व्यावहारिक विचारांची कास धरणं, मुलांचं आरोग्य नि सुरक्षेचा प्रश्न असे कितीही मुद्दे चर्चिले गेले तरी आपल्या लाडक्या ‘सोनू’साठी सोन्याचे दागिने घेणं किंवा त्याला भेट देणं, हे चक्र तूर्तास तरी चालूच राहणार…
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com