प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com
पुलवामाच्या घटनेनंतरच्या घडामोडींचे वृत्तांकन करताना देशभरातील बहुतांश प्रसिद्धीमाध्यमांनी आणि नागरिकांनीदेखील ताळतंत्र सोडून युद्धखोरीची भाषा सुरू केली होती. एकंदरीच या घटनांमुळे आपण अभिनिवेशी युद्धखोर आहोत हेच यातून जगाला दाखवून देत आहोत.

कारगिल, १९९९ – भारतीय सैन्याने भल्या पहाटे टायगर हिल काबीज केली. वार्ताकन सर्वात आधी आपणच करावे असे कोणत्याही पत्रकाराला वाटणे, तेवढेच साहजिक. मात्र ते करण्याच्या नादात नंतर विख्यात झालेल्या एका महिला पत्रकाराने आपण नेमके कोणत्या पॉइंटवरून वार्ताकन करीत आहोत, त्याची माहिती ‘लाइव्ह’ जाहीर केली. तो पॉइंट कळल्यानंतर, व्हायचे तेच झाले. त्या नंतरच्या काही क्षणांमध्येच वार्ताकन सुरू असताना तिथे मागच्या बाजूस असलेल्या भारतीय सैन्याच्या बंकरवर पाकिस्तानी क्षेपणास्त्र येऊन आदळले. पाच सैनिकांचे प्राण आपल्याला गमवावे लागले. एका पत्रकाराच्या मूर्खपणामुळे.

२६/११- दोन-तीन दिवस सुरू असलेला दहशतवादी संघर्ष टिपेला पोहोचलेला असतानाच ताजमधून अडकलेल्या काही जणांची सुटका करण्यात आली. त्या वेळेस त्या सुटका झालेल्या व्यक्तींच्या मागे पत्रकार धावत सुटले होते त्यांचे बाइटस् मिळविण्यासाठी. दहशतवादाच्या छायेत ४८ तास काढलेल्या व भेदरलेल्यांच्या मागे असे लागणे त्या क्षणाला लाजवणारे होते. ताजमधील कारवाई सुरूच होती. परिस्थिती गंभीर आणि युद्धसदृशच होती त्या क्षणीदेखील.

पुलवामानंतर – केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर जैश-ए-मोहमदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने सीमापार कारवाई केली. पाकिस्ताननेही भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या एफ १६ ला हुसकावून लावताना आपले मिग बायसन कोसळले आणि वैमानिक िवग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यांच्याकडून तपासादरम्यान माहिती काढून घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अधिकारी कसोशीने करीत होते. कुठे राहता, घरी कोण कोण असते, अशा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ‘ही माहिती मी तुम्हाला सांगणे लागत नाही,’ असे उत्तर अभिनंदन देत होते. आणि त्याच वेळेस पलीकडे भारतात वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी त्यांचे घर शोधून काढले. एवढेच नव्हे तर खुलेआम त्याच्या कुटुंबीयांची माहिती देण्यास सुरुवात केली होती. आपला जवान पाकिस्तानात माहिती नाकारतोय आणि वाहिन्या मात्र तीच माहिती खुलेआम देत आहेत. अनेक देशांचे छुपे हेर आपल्याकडेही असतातच किंवा या वाहिन्या पाकिस्तानातही दिसू शकतात, त्यावर त्यांचेही लक्ष असेलच याचा विसर आपल्याला पडलेला होता.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ४० जवान शहीद झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सैन्यदलावर झालेला हा आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. साहजिकच होते की देशभरात त्याची प्रतिक्रिया उमटणार. झालेही तसेच. पण गेल्या काही वर्षांतील अशा घटनांनंतरचा प्रसारमाध्यमांचा अनुभव फारसा चांगला नाही. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांना स्वयंनियमावली किंवा आचारसंहिता असावी का, या प्रश्नावर खूप चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र युद्धसदृश परिस्थितीमध्ये आपण काय नेमके काय करावे याचे भान अद्याप प्रसारमाध्यमांना खास करून चॅनल्समधील पत्रकारांना फारसे आलेले दिसत नाही, हेच पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये लक्षात आले.

कोणतीही घटना घडल्यानंतर सरकारनेही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांनी ती घटनाच जणू काही ताब्यात घेतलेली असते. ती घटना दहशतवादी हल्ला किंवा मग पाकिस्तानसंदर्भातील असेल तर मग किती काळ सहन करणार आपण हे हल्ले? पाकिस्तानला प्रत्युत्तर केव्हा देणार? .. आता केवळ युद्ध हाच पर्याय आहे.. हीच वेळ आहे नापाक पाकिस्तानला धडा शिकविण्याची.. मोजक्या वाहिन्या वगळता जवळपास सर्वच वाहिन्यांचे निवेदक आक्रस्ताळे रूप धारण करून घसाफोड करून हेच सांगताना दिसतात.. सुरू होतो टीआरपीचा खेळ. वृत्तवाहिन्यांसाठी टीआरपी किंवा सद्य:परिस्थितीत बार्कचे रेटिंग महत्त्वाचे आहे. किती प्रेक्षक संख्या आहे यावर हे रेटिंग अवलंबून असते आणि रेटिंग त्या त्या वाहिनीला मिळणारा जाहिरातींचा महसूल. त्यामुळे बाकी सारे भान सुटते आणि देशावर झालेला दहशतवादी हल्ला तोपर्यंत टीआरपीसाठीचा खेळ ठरलेला असतो.

पुलवामाच्या हल्ल्यानंतर तर घसाफोड निवेदन करणाऱ्या एका वाहिनीच्या निवेदकाने थेट जनसामान्यांच्याच भाषेत बोलायला सुरुवात केली. पाकिस्तानला धडा केव्हा शिकवणार.. पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, असे मलाही समस्त देशवासीयांसारखेच वाटते आहे! आता पुढे काय? असा बहुसंख्य वाहिन्यांच्या निवेदकांनी विचारलेला प्रश्न हा युद्धखोरीच्याच दिशेने जाणारा होता. केवळ युद्ध हाच पर्याय अशी मांडणी करून विचारण्यात आलेला असा हा प्रश्न होता. युद्धसदृश परिस्थितीच्या वेळेसही माध्यमे टीआरपी रेटिंगसाठी केवळ युद्धखोरीचाच विचार करणार असतील, वृत्तवाहिन्यांचे संपादकदेखील सर्जिकल एअर स्ट्राइकनंतर आपल्या सर्व कर्मचारी वर्गासह ट्रेण्ड म्हणून हातवारे करीत जयघोष करण्यातच चॅनलवर धन्यता मानत असतील तर मग यालाच आधुनिक पत्रकारिता म्हणणार का, असा प्रश्न पडतो.

जगभरात आदर्श कधीच, कुठे अस्तित्वात नसतो. असे असले तरी किमान स्वयंनियमन असायलाच हवे. वाचकांना किंवा प्रेक्षक असलेल्या नागरिकांना त्या घटनेचे विश्लेषण करून सांगावे हे अपेक्षित आहे. मात्र आतंकके खिलाफ अब रण होगा, पत्थर मारते मारते ये लडके आतंकी बन जाते है, भारताला आता न्याय हवा आहे आणि तो केवळ बदल्यातून मिळेल, अशी वाक्यरचना केली जाते. ही युद्धखोरीची भाषा आहे. आपल्याकडील बहुतांश वाहिन्यांनी पुलवामा हल्ल्याच्या वेळेस अशीच युद्धखोरीचीच भाषा केली. हे परिपक्वतेचे लक्षण नाही. भारतातच नव्हे तर पाकिस्तानातील वाहिन्यांचे वर्तनही असेच युद्धखोर होते. सांगा, तुम्ही देशासोबत आहात का, पाकिस्तानला धडा शिकवावा असे तुम्हाला वाटतेय ना, अशी चिथावणीखोर भाषा आपल्याकडेही सर्रास वापरण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या मेळ्यामध्ये माजी लष्करी अधिकारीही सामील होते. जनरल किंवा मेजर जनरल दर्जाच्या या माजी लष्करी अधिकाऱ्यांची भाषादेखील चिरडून टाकू, पाकिस्तानला नष्ट करू, संपवून टाकू अशीच चिथावणीखोर होती. त्यांच्यापैकी प्रत्येकाला याची कल्पना होती की, युद्ध अशक्य आहे.

वाहिन्यांवर जे दाखविले जाते त्याचेच प्रतिबिंब अलीकडे मुद्रित माध्यमांमध्येही उमटलेले दिसते. पुलवामा आणि त्यानंतरचा घटनाक्रमदेखील त्याला अपवाद नव्हता. कारण भारताने केलेल्या सर्जिकल हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी बदला घेतला, अद्दल, धडा शिकवला अशीच शीर्षके मुद्रित माध्यमांनीही वापरली.

माध्यमांमध्ये दोन तट पडलेले होते. पहिला गट राष्ट्रवादाचा जोरदार पुकारा करत होता आणि बदला किंवा सुडाने पेटून उठलेला होता. दुसरा गट शांत आणि संयतपणे आपण कुणाच्याही हातचे बाहुले होणार नाही अशा प्रकारे शांत व संयतपणे घटनेचे वार्ताकन करणारा होता. दुसऱ्या गटातील पत्रकारांची, वाहिन्यांची आणि मुद्रित माध्यमांची संख्या तुलनेने अगदीच कमी होती.

प्रसारमाध्यमांनी असहिष्णुता, सूडभावना दूर ठेवून काम करायचे असते आणि प्रोपगंडामध्ये अडकायचे नसते. सध्या सामान्य नागरिकांना अंकित ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करण्याचा जोरदार ट्रेण्ड आहे. त्यासाठी विविध मार्गाचा वापर राज्यकर्त्यांतर्फे केला जातो. सद्य:परिस्थिती समजून घ्यायला हवी. लोकसभा निवडणुका उंबरठय़ावर आहेत. सत्ताधारी भाजपाला किमान ५० जागा कमी पडतील, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांमध्ये व्यक्त झाला आहे. या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजपा करील, असा अंदाज व्यक्त झाला होता. अलीकडेच तशा स्वरूपाचे विधान भाजपाच्या येडीयुरप्पांनी केलेही. सर्जिकल स्ट्राइकनंतर आता निवडून येणाऱ्या जागांमध्ये निश्चितच वाढ होईल, असे ते जाहीररीत्या म्हणालेही.

सर्जिकल हवाई हल्ल्यानंतर अचानक ३०० दहशतवादी ठार अशी माहिती सर्वच वाहिन्यांनी द्यायला सुरुवात केली. कुठून आला हा आकडा, त्याची माहिती अद्याप कुणालाच नाही. हा प्रोपगंडा तर नव्हे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. त्यावरून सध्या भाजपा आणि विरोधकांमध्ये ठणाठणी सुरू आहे. ती होणारच आणि राजकारण हा सत्ताधारी व विरोधकांचा धर्मच आहे.

युद्धसदृश परिस्थितीमध्ये कधी कधी टीआरपीच्या मागे पळताना प्रसारमाध्यमांचे भान सुटते किंवा मग आपण कधी प्रोपगंडाचा भाग होतो हे तर त्यांनाही कळत नाही, अशी स्थिती आहे. लोकभावनेवर आरूढ होऊन लोकानुनय करणे हे त्यांचे काम नाही. तसे झाले तर मग सामान्य माणसे आणि माध्यमे यांच्यामध्ये फरक तो काय राहिला? अशा प्रसंगी घरातील व्यक्ती गमावणे किंवा शहिदाघरच्यांच्या दुखवेदना यांपासून माध्यमे कोसो दूर असतात. युद्धासाठी जनमत तयार करण्याचे काम त्यांचे नाही. पत्रकारिता आणि प्रोपगंडा यातला फरक त्यांना कळायला हवा, तो त्यांनी वापरलेल्या भाषेतून कळतो.

या संपूर्ण कालखंडात आपले नागरिकांचे वर्तन कसे होते ते पाहणेही महत्त्वाचे ठरावे. बहुसंख्य नागरिकांचे वर्तनही युद्धखोरच होते. हल्ली एखादी घटना घडली की तिचे पहिले पडसाद काही क्षणांमध्येच सोशल मीडियावर उमटतात. इथे प्रत्येक जण जणूकाही तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावातच व्यक्त होत असतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियामध्ये गोष्टी वेगात शेअर होतात. त्यात फेक न्यूजही असते आणि फेक व्हिडीओदेखील. मात्र ते शेअर करताना अनेकांना त्याचे भान नसते. त्याची खातरजमा करावी असेही अनेकांना वाटत नाही. देशभावना शिगेला पोहोचलेली असते. मात्र आता सुज्ञपणाचे भान जसे पत्रकारांनी ठेवणे अपेक्षित आहे, तसे ते सुज्ञ नागरिकांकडेही असायला हवे. सध्याचा जमाना हा नेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय युद्धाचा आहे. तुमच्यावर, तुमच्या देशावर आणि देशात सध्या काय सुरू आहे, काय #ट्रेण्डिंग आहे यावर लक्ष आहे; त्यावरून शत्रूकडून मोर्चेबांधणी केली जाऊ शकते, याचे भान आता नागरिकांनी राखणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या सर्व माध्यमांचा वापर करून शत्रूही आपल्यावर लक्ष ठेवून आहे, याचे भान राखणे गरजेचे आहे. अन्यथा टीआरपीच्या नादात आपण देशहिताचाच बळी दिलेला असेल!