21 September 2020

News Flash

बुद्धाचा निर्वाण मार्ग

बोध गया येथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली.

भारतातील अनेक राजांनी बुद्धाने सांगितलेला जगण्याचा मार्ग स्वीकारला.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन विशेष – भव्य दिव्य वास्तू
बुद्धाचा निर्वाण मार्ग मांडणारी बोरोबुद्दूर ही दहामजली वास्तू इसवी सन ७७८ ते ८५० या काळात सलेंद्र राजघराण्याच्या काळात बांधण्यात आली. जगातले सगळ्यात मोठे बुद्ध मंदिर म्हणून आज ते ओळखले जाते.

बोध गया येथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धवचनांच्या आधारे बौद्ध भिख्खू मार्गक्रमण करू लागले. भारतातील अनेक राजांनी बुद्धाने सांगितलेला जगण्याचा मार्ग स्वीकारला. एक काळ असा होता, संपूर्ण भारत बुद्धाच्या मार्गानेच जात होता. त्याच काळात व्यापाराबरोबर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार संपूर्ण आग्नेय आशियात झाला. तसाच तो इंडोनेशियातदेखील झाला. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकांत बौद्ध धर्माचा प्रसार जावा बेटांवर (सध्याच्या इंडोनेशियातील एक प्रांत) मोठय़ा प्रमाणात झाला होता. तेव्हा तेथे त्या काळात महायान पंथीयांचा प्रभाव अधिक होता. त्याचेच प्रत्यंतर बोरोबुद्दूर या वास्तूमध्ये दिसून येते. बुद्धाचा निर्वाण मार्ग मांडणारी ही वास्तू सलेंद्र राजघराण्याच्या काळात बांधण्यात आली. इसवी सन ७७८ ते ८५० हा त्याच्या निर्मितीचा सर्वसाधारण काळ समजला जातो. जगातील सर्वात मोठे बुद्ध मंदिर म्हणून या वास्तूची ओळख आहे. युनेस्कोच्या वारसास्थळांपकी ही एक महत्त्वाची वास्तू आहे.

इंडोनेशिया आज अधिकृतपणे मुस्लीम देश म्हणून ओळखला जातो; पण इतिहासकाळात तेथे बौद्ध आणि िहदू राजांचा प्रभाव होता. तसेच तेथील राजसत्ता सुबत्तेत होत्या. सलेंद्र राजांची सत्ता मध्य जावा प्रांतावर होती. राजसत्ता स्थिर असतात, सुबत्तेत असतात तेव्हा कला आदी विषयांना अधिक वाव मिळतो. तसाच तो संपूर्ण जावा प्रांतात मिळाल्याचे सातव्या, आठव्या आणि नवव्या शतकातील प्राचीन वास्तूंमुळे जाणवते. सुबत्तेचे दुसरे उदाहरण म्हणजे त्या काळातील इतर देशांशी व्यापार सुस्थितीत असणे. भारताचा सागरी व्यापार सुस्थितीत असल्याचे पुरावे आपल्याला चौथ्या शतकापासूनच्या अनेक प्रवाशांच्या नोंदीवरून दिसून येतात. फा हाएन हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी चौथ्या शतकात भारतात आलेला प्रवासी. त्याने परतीचा प्रवास समुद्रमार्गाने केला. श्रीलंकेतून त्याने व्यापारी जहाजाने प्रवास सुरू केला आणि तो जावा बेटांवर उतरला. तेथून त्याने दुसऱ्या व्यापारी जहाजाने जावा बेटांवरून चीनकडे प्रस्थान ठेवले. त्याच्या पाच महिन्यांच्या जावामधील वास्तव्यात त्याला बौद्ध धर्माचा फारसा प्रसार दिसला नाही. मात्र िहदू धर्म आणि वर्णव्यवस्था असल्याचे तो त्याच्या प्रवासवर्णनात नमूद करतो. बोरोबुद्दूर आणि तेथील इतर वास्तूंवर, कलाविष्कारावर गुप्त आणि गुप्तोत्तर कलेचा प्रभाव जाणवत असल्याचेच वर्णन तज्ज्ञ करतात. चौथ्या शतकात बौद्ध धर्माचा पगडा जावा प्रांतात नसला तरी आठव्या शतकात मात्र तो वाढल्याचे दिसून येते.

इसवी सनाच्या तिसऱ्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान जावा आणि सुमात्रा या बेटांचे दक्षिणपूर्व भारताशी चांगले संबंध असल्याचे तेथे सापडलेल्या काही शिल्पांवरून जाणवते. या काळात बौद्ध आणि िहदू हे दोन्ही धर्म तेथे अस्तित्वात होते. सातव्या शतकात दक्षिणपूर्व भारतातील पल्लव लिपी पश्चिम जावा येथे काही अभिलेखांसाठी वापरण्यात आली होती. मध्य जावानिज राजघराण्याचा तेव्हा येथे प्रभाव होता. ते शिवाचे भक्त होते. त्यानंतर उदयास आलेल्या सलेंद्र राजघराण्याचे वर्चस्व मध्य जावावर पुढील ८८ वष्रे होते (इ.स. ७७४ ते इ.स. ८६४). सलेंद्र घराण्यावर तांत्रिक बौद्ध तत्त्वज्ञानाचा, वज्रयानाचा प्रभाव होता. याच काळात बोरोबुद्दूरची उभारणी करण्यात आली. बोरोबुद्दूरच्या वास्तुरचनेत हा प्रभाव थेटपणे दिसून येतो.

बोरोबुद्दूरची अतिभव्य अशी वास्तू लांबून पाहताना पिरॅमिडप्रमाणेच भासते. जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर म्हणून ते ओळखले जाते. आज आपण जी वास्तू पाहतो ती बऱ्यापकी पुनर्बाधणी केलेली वास्तू आहे. कारण या परिसरात असलेला मेरपी डोंगरावरील जिवंत ज्वालामुखी. बोरोबुद्दूरजवळच असलेले प्रांबनन हे िहदू मंदिर संकुल तर या ज्वालामुखीमुळे पूर्णत: भुईसपाटच झाले होते. तुलनेत बोरोबुद्दूरचे कमी नुकसान झाले होते.

पिरॅमिडसारखी असणारी ही दहामजली भव्य वास्तू बुद्धाच्या निर्वाणाचा मार्ग मांडणारी आहे. एकूण दहा टप्प्यांमध्ये याची रचना आहे. पहिल्या पाच टप्प्यांची रचना चौकोनी आहे, तर पुढील चार टप्पे हे वर्तुळाकार आहेत. नववा टप्पा हा छोटासाच आहे, तर सर्वात शेवटचा टप्पा हा ३५ मीटर उंचीचा एक स्वतंत्र स्तूप आहे. ही प्रचंड वास्तू पाहताना केवळ त्याची भव्यता, कलाकुसर, शिल्पकलेने दडपून जाण्यापेक्षा त्यातून वास्तुनिर्मात्यांना काय अभिप्रेत आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. येथे असंख्य शिल्पपट्टिका कोरलेल्या आढळतात. पहिल्या पाच चौकोनी रचनेत सिद्धार्थ ते बुद्ध असा प्रवास, जातक कथा अशा अनेक शिल्पपट्टिका कोरलेल्या आहेत. त्यांची एकूण संख्या दोन हजार ६७२ इतकी आहे. त्यातील ललित विस्तारची शिल्प कोरलेल्या पट्टिकांचा अर्थ उलगडला असून अन्य शिल्पपट्टिकांचा अर्थ पूर्णत: उलगडलेला नाही. या शिल्पपट्टिकांचा अर्थ तेथील जाणकार मार्गदर्शकांकडून समजावून घेतला, तर ही वास्तू पाहताना आपल्या ज्ञानात भर पडेल. अन्यथा केवळ तिच्या भव्यतेवरच आपण भाळून जाऊ. अर्थात ती तेवढी भव्य आहे हेदेखील खरे आहे. पायथ्यापासून सर्व टप्प्यांमधून सर्व शिल्पपट्टिका न्याहळत नुसते चालायचे ठरवले तरी निर्वाणाच्या टप्प्यावर पोहोचेपर्यंत तब्बल पाच किलोमीटर एवढे अंतर भरते. संपूर्ण वास्तूसाठी एकूण ५६ हजार ६०० घनमीटर दगड वापरण्यात आला आहे. या संपूर्ण वास्तूवर बुद्धाच्या चार मुद्रा दर्शविणाऱ्या ५०४ मूर्ती आहेत. दुसऱ्या वर्तुळाकार टप्प्यात एखादी भव्य घंटा उपडी ठेवल्याप्रमाणे जाळीदार स्तूप आहेत. या स्तूपांमध्येदेखील बुद्धाच्या मूर्ती आहेत.

ही सर्व रचना वज्रयानातील मंडलाप्रमाणे, बुद्धाच्या विश्वतत्त्वानुसार केली आहे. सुरुवातीचे पाच टप्पे हे काम धातू, पुढील तीन टप्पे रूप धातू आणि शेवटचा टप्पा अरूप धातू अशी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. थोडक्यात निर्वाणाला पोहोचण्याचे जे टप्पे आयुष्यात मांडले आहेत त्याचीच ही रचना आहे. या वास्तूचे हवाई चित्रण पाहताना वज्रयानातील मंडलाची रचना स्पष्टपणे दिसून येते.

नवव्या शतकात सलेंद्र राजांच्या काळातील हे बांधकाम अकराव्या शतकात ज्वालामुखीने जवळपास उद्ध्वस्त झाले होते. १२ व्या शतकानंतर या वास्तूकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अठराव्या शतकात जावानीज लोकांनी येथे भेटी दिल्याचे काही उल्लेख सापडतात; पण बोरोबुद्दूर खऱ्या अर्थाने प्रकाशात आणले ते १८१५ मध्ये सर स्टॅमफोर्ड राफेल्स या ब्रिटिशाने. त्याने या वास्तूच्या संवर्धनाचे काही प्रयत्नदेखील केले. नंतर १८८५ मध्ये इजरमान यांच्या काळात येथे बरेच उत्खनन झाले. त्यातूनच जमिनीखाली गाडल्या गेलेल्या संस्कृत भाषेतील शिलालेखांवरून याचा काळ ठरवता आला. १९०७ पासून व्हॅन इर्प या डच व्यक्तीने चार वष्रे पुनर्उभारणीचे काम केले. त्यामुळे ही वास्तू काही प्रमाणात आकारास आली. मात्र त्या कामात काही त्रुटी होत्या. काही शिल्पांतील जोडकामाचे संदर्भ नीट लावले नव्हते. १९५६ पासून मात्र युनेस्कोचं लक्ष या वास्तूकडे गेलं. १९६३ ते १९६८ या काळात प्रचंड मोठं काम हाती घेतलं गेलं. त्यातूनच आजची वास्तू उभी राहिली आहे.

हा सारा परिसर दोन भागांत विभागला आहे. मुख्य वास्तू आणि परिसरातील पार्क. पार्क परिसरात वस्तुसंग्रहालय, जहाज संग्रहालय, माहिती केंद्र, अभ्यास केंद्र अशा अनेक सोयीसुविधा आहेत. पार्कमधून बोरोबुद्दूरला हत्तीवरून आणि छोटय़ा ट्रेनमधून सफारीची सुविधा आहे.

नवव्या शतकातील निर्माणकर्त्यांच्या कल्पकतेला, कौशल्याला दाद देतानाच आजदेखील हे सारं इतक्या आत्मीयतेने जोपासणाऱ्यांनादेखील सलाम करावासा वाटतो. तब्बल ७०० कर्मचारी येथे कार्यरत आहेत. मेरिप डोंगरावरील जागृत ज्वालामुखीचं संकट आजही आहेच. (२०१८ च्या मे महिन्यात या ज्वालामुखीच्या राखेचा एक हलकासा थर बोरोबुद्दूरवर जमा झाला होता.) येथील यंत्रणा हवामान खात्याशी सतत संपर्कात असते. संकटाची चाहूल मिळताच धूलिकणांनी या वास्तूवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून

संपूर्ण वास्तू झाकता येईल अशी प्लास्टिकची आच्छादनं जपान सरकारने पुरवली आहेत. आपत्कालीनप्रसंगी स्वयंसेवकांची मोठी

फौज उभी राहते.

एखाद्या प्राचीन वारसास्थळावर एका वेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा याचे नियम त्या वास्तूची सद्य:स्थिती, पर्यावरण वगरे बाबींवर ठरलेले असते. त्या नियमांनुसार प्रवेश देणे गरजेचे असते; पण बहुतांश वेळा ते पायदळी तुडवले जातात. बोरोबुद्दूरला एका वेळी १५ हजार पर्यटकांना प्रवेश दिला जातो. महत्त्वाचे म्हणजे येथे कमालीची स्वच्छता आहे; पण ‘कचरा टाकल्यास दंड’ अशा आशयाची कसलीही सूचना लावलेला फलक कोठेही दिसत नाही.

बोरोबुद्दूरपासून दोनेक तासांच्या अंतरावर सातव्या-नवव्या शतकांतील िहदू आणि बौद्ध धर्माच्या त्या परिसरातील अस्तित्वांच्या खुणा दर्शवणारी जवळपास ३० विविध वारसास्थळे आहेत. प्रांबनन प्लेन नावाने हा सारा परिसर ओळखला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येथील बहुतांश वास्तू जमीनदोस्त झाल्या होत्या. १९९१ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाला आणि या संकुलातील जमीनदोस्त झालेल्या वास्तूंचे पुनर्बाधकाम सुरू झाले. प्रांबनन प्लेनमध्ये महत्त्वाचं आकर्षण आहे ते प्रांबनन मंदिर संकुलाचं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्वतंत्र अशी गगनचुंबी या सदरात मोडणारी ही मंदिरं म्हणजे पुरातत्त्व संवर्धनाचे उत्तम नमुने म्हणावे लागतील.

येथील िहदू मंदिरं नवव्या शतकात संजय घराण्यातील राजा रकाई पिकातन याच्या कारकीर्दीत बांधली गेली आहेत. आठव्या शतकातील सलेंद्र राजाने बोरोबुद्दूर बांधले, तर या राजाने प्रांबनन येथील संकुलं बांधली. रकाई पिकातन हा राजा िहदू होता. बाराव्या-तेराव्या शतकांत जावा प्रांतातील ज्वालामुखीमुळे मात्र येथील िहदू राजांना बाली बेटाकडे स्थलांतरित व्हावे लागले.

बोरोबुद्दूर असो की प्रांबनन मंदिर संकुल, येथे कमालीची स्वच्छता आहे. वास्तूच्या सभोवतालचा अर्धा-एक किलोमीटरचा परिसर बंदिस्त आहे. उपाहारगृह आणि विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र जागा आहे. अभ्यासकांसाठी विशेष व्यवस्था आहे आणि ही सर्व माहिती देण्यासाठी अनेक भाषांमध्ये मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकदेखील आहेत. आपल्याकडे एखाद्या वास्तूकडे पाहताना त्याच्या धार्मिक बाजूला खूप महत्त्व दिले जाते. तसे ते द्यावे की न द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण त्याही पलीकडे जात एक वास्तुकला, शिल्पकला म्हणून अशा ठिकाणी जायला काय हरकत आहे. त्यातून प्रदेशाची जडणघडण कशी झाली याचा अंदाज येतो आणि आजच्या काळाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभते.

बोरोबुद्दूरजवळच तेथील पर्यटन विभागाने एका गावाचे जतन केले आहे. जुन्या पद्धतीची कौलारू घरे, रहाट असलेली विहीर, पारंपरिक वाद्यं असं बरंच काही आहे. टांग्यातून गावात भटकता येते. माहिती देण्यासाठी मार्गदर्शकदेखील आहेत.

योग्यकर्ता (जोग्जाकर्ता असादेखील उल्लेख केला जातो.) या शहरात राहून ही दोन्ही ठिकाणं सहज पाहता येतात; पण त्यासाठी जरा मोकळा वेळ असेल तर उत्तम. अन्यथा केवळ धावती भेट देण्यात काही अर्थ नाही. योग्यकर्ता हे शहर भटकंती, शॉिपग यासाठी एकदम उत्तम शहर आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर इथे चंगळच आहे. त्यातच येथील रेल्वे स्थानकाजवळील तुगू चौकात मस्तपकी फूटपाथवर बसून इंडोनेशियन कॉफीचा आस्वाद घेता येतो. कधी कधी त्याच रस्त्यावर तरुणांचा एखादा बॅण्डदेखील ऐकायला मिळू शकतो. त्याशिवाय रामायण बॅले पाहण्यासारखा आहे. प्रांबननला तर अनेक वेळा सायंकाळी मंदिर संकुलाच्या मागील मदानात हा रामायण बॅले सादर केला जातो.

इंडोनेशिया म्हटले की केवळ बाली आणि इतर छानछौकीच्या सुविधा असणाऱ्या बेटांचाच उल्लेख होतो; पण येथे प्राचीन वारसा जोपासणारे असे भव्यदिव्य बरेच काही आहे. बोरोबुद्दूरला भेट द्यायची ती त्याच्या भव्यदिव्यतेबरोबरच इतिहासकाळात संस्कृतीचा प्रवास कसा होत गेला आणि आज तिची देखभाल कशी केली जाते हे पाहण्यासाठी.

कसे जावे?

जवळचे शहर : योग्यकर्ता (जोग्जाकर्ता). बाली, जकार्ता येथून नियमित विमानसेवा आहे. बालीपासून विमानाने तासभराच्या अंतरावर असल्याने बालीतील वास्तव्याला जोडून हा प्रवास करता येऊ शकतो. योग्यकर्तामध्ये किमान दोन दिवसांचा मुक्काम करावा.

(सर्व छायाचित्रे : सुहास जोशी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:04 am

Web Title: buddha nirvana
Next Stories
1 मंदिरसमूहांच्या देशा…
2 पिरॅमिडस्
3 वाहिन्यांच्या निवडीत केबलचालकांचा अडथळा!
Just Now!
X