मुलाखत : अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

फोनी चक्रीवादळाचा अंदाज अचूक ठरल्याने मोठय़ा प्रमाणावर मनुष्य तसंच वित्तहानी टाळणे शक्य झाले. हवामानाच्या या अचूक अंदाजामागे नेमके आहे तरी काय याचा वेध घेणारा प्रादेशिक हवामान केंद्राचे पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी साधलेला मान्सूनपूर्व संवाद-

मान्सून म्हणजे काय? त्याची शास्त्रीय व्याख्या काय सांगता येईल?

सर्वसाधारणपणे उत्तर आणि उत्तर प्रू्व दिशेने जे वारे वाहत असतात, त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच नैऋ त्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना मान्सून म्हणतात. अरबी समुद्रावरून नैर्ऋत्य दिशेने वारे वाहायला लागले की आपण म्हणतो की, मान्सून सुरू झाला आहे.  पण हे वारे म्हणजे मान्सून, असं म्हटलं की लोकांना पटत नाही. हे नैर्ऋत्य दिशेने वाहणारे वारे आपल्यासोबत बाष्प घेऊन येतात. ते आपल्याकडे येतात तेव्हा त्यातून ढग तयार होतात. त्यातून पाऊस पडतो. कोकण किनाऱ्यावर हे ढग जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस पडतो. तर काही ढग सह्य़ाद्री पर्वताच्या पलीकडेही (रेन श्ॉडो रिजन) जातात, त्यातून मध्य महाराष्ट्रात, मराठवाडय़ामध्ये पाऊस पडतो.

सर्वसाधारणपणे मान्सूनच्या दोन शाखा असतात. एक अरबी समुद्रावरील शाखा आणि दुसरी बंगालच्या उपसागरावरील शाखा. या दोन्ही शाखा जून ते सप्टेंबर दरम्यान कार्यन्वित असतात. विदर्भात जो पाऊस पडतो, तो बंगालच्या शाखेकडून मिळतो.  महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण विषम स्वरूपाचे आहे. सह्य़ाद्रीमुळे कोकणात तो मुसळधार किंवा अतिमुसळधार असतो. पाण्याची कमतरता असलेले जे प्रदेश आहेत (मध्य महाराष्ट्र, मराठवाडा) तेथील भौगोलिक रचनाच पावसासाठी प्रतिकूल आहे. या भागात ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. तुलना करता तोच पाऊस कोकणात २५०० ते ३००० मिलीमीटर पडतो. कोकणात पाऊस थोडा कमी झाला तर फारसा फरक पडत नाही. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा थोडा जरी पाऊस कमी झाला तरी त्याचे परिणाम आपल्या दिसायला लागतात. भारताच्या विविध भागांत पडणाऱ्या सरासरी पावसाची नोंद ही वेगवेगळी असते. त्यात कोकणात सर्वात जास्त पावसाची नोंद असते. मात्र, महाराष्ट्राच्या आतील बाजूस तोच पाऊस ६०० ते ८०० मिलिमीटर पडतो.

मान्सूनचे कोणत्या तारखेला आगमन होणार हे हवामानशास्त्र विभाग कशाच्या आधारे स्पष्ट करते?

१ जून ही केरळमध्ये मान्सून येण्याची सरासरी तारीख आहे. त्याच्या १० दिवस अगोदर तो अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होत असतो. आयएमडी २००५ पासून केरळमध्ये मान्सूनचे  कधी आगमन होणार याविषयीचेअंदाजपत्रक जारी करते. मागील १३ वर्षांचे अंदाज बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या हिशोबाने केरळमध्ये पाऊस कधी येणार याचे पूर्वानुमान मे महिन्याच्या मध्यावर हवामान विभाग प्रसिद्ध करते. त्यामुळे केरळला आम्ही मान्सूनचे प्रवेशद्वार म्हणतो.

परदेशात भारतासारखा मान्सून पडतो का? त्यात काय फरक आहे?

आपल्या देशाच्या मान्सूनविषयी बोलायचं झालं तर, मान्सून हा वैश्विक हवामानातील विलक्षण प्रकार आहे. तो कित्येक वर्षे जून ते सप्टेंबर या कालावधीत आला आहे. मान्सून एखाद्या वर्षी आलाच नाही, अशी इतिहासात कुठेही नोंद नाही. अर्थात त्याच्या येण्याच्या किंवा जाण्याच्या तारखांमध्ये काही दिवसांचा फरक असतो. मात्र, त्याचा येण्याचा जो कालावधी आहे तो सारखा आहे. मान्सून हा शब्द मौसीन या अरेबिक शब्दापासून तयार झाला आहे. मान्सून केवळ भारतातच येत नाही तर संपूर्ण आशिया खंडात येतो. अशा प्रकारचा मान्सून आशियाशिवायच्या इतर खंडांमधील देशांमध्ये दिसत नाही. भारत हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येतो. म्हणून येथे वेगवेगळे चार ऋतू पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते डिसेंबर, एप्रिल-मे महिन्यांमध्ये चक्रीवादळे निर्माण होतात. यासंदर्भात बंगालच्या उपसागरात नुकत्याच येऊन गेलेल्या फोनी या अतितीव्र चक्रीवादळाचे उदाहरण देता येईल. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये चक्रीवादळे (विजेच्या गडगडाटांसहित पाऊस), गारपीट, वादळी वारे, धुळीचे वारे येतात.  हिवाळ्यात अतिशीत लहरी, उन्हाळ्यात अतिउष्ण लहरी, असे तीव्र बदल हवामानाच्या वेगवेगळ्या ऋतूंत पाहायला मिळतात. इतर देशांमधील हवामान वेगळं आहे. तेथे असा आपल्यासारखा विशिष्ट कालावधीला पडणारा पाऊस नाही. तर, तेथे हिमवादळे असतात. आपल्याकडे दोन प्रकारचे मान्सून आहेत. एक नैर्ऋत्य मोसमी पाऊस आणि दोन ईशान्य मोसमी पाऊस. ईशान्य मोसमी पाऊस हा तमिळनाडू किंवा दक्षिण भारतातील भागांत पडतो. मात्र, नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा महत्त्वाचा समजला जातो. कारण, त्यामध्ये संपूर्ण भारताला पाणी देण्याची क्षमता असते. ८० ते ८५ टक्के पाण्याची गरज ही या पावसामुळे भागवली जाते.

मान्सूनची निर्मिती कोणत्या घटकांमुळे होते?

मान्सूनच्या निर्मितीबाबत असं सांगता येईल की, पृथ्वी सूर्याभोवती तिरकी फिरते. कारण, सूर्याचा आस तिरका आहे. आता सूर्य उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धात आहे, असं आपण म्हणतो म्हणजेच तेव्हा सूर्याचे संक्रमण होत असते. मकर संक्रात तसंच होळीच्या वेळी सूर्य कर्कवृत्तावरून मकरवृत्तावर आणि मकरवृत्तावरून कर्कवृत्तावर येतो. या दोन रेषांवर तो फिरत असतो. साधारणत मान्सूनच्या वेळी सूर्याचं संक्रमण दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात होतं. आपला देश उत्तर गोलार्धात आहे, त्यामुळे जमीन आणि समुद्राचं पाणी तापतं. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होते.

दक्षिण गोलार्धातून वाहायला लागलेले वारे उत्तर गोलार्धात येतात. मग, ते आपल्याकडे येतात. यामध्ये पाच घटक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे उष्णतेमुळे तयार होणारा कमी दाबाचा पट्टा. दुसरा म्हणजे विषुववृत्तीय ट्रफ आणि मास्कारीनजवळील जास्त दाबाचा पट्टा, तिसरा घटक सबट्रॉपिकल वेस्टर्लिज आणि ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम. चौथा घटक आहे तिबेटच्या पठारावरील कमी दाबाचे क्षेत्र, तर पाचवा घटक एल निनो आणि ला नीना. हे पाच घटक मान्सूनवर परिणाम करतात. पाकिस्तान आणि राजस्थानमधील भागामध्ये हीट-लो तयार होतो. जमिनीच्या आणि पाण्याच्या तापमानातील फरक (लॅण्ड सी टेम्परेचर कॉन्ट्रास्ट) जास्त असणे गरजेचे आहे, त्यातूनच मान्सूनचा प्रभाव ठरतो. त्याला सेमी पर्मनंट फीचर असे म्हणतात. आमच्या विभागाचे सध्या पाकिस्तान आणि राजस्थानच्या तापमानावर लक्ष आहे. या सर्व गोष्टी पावसाची सुरुवात होण्यासाठी गरजेच्या आहेत. एकदा मान्सून सुरू झाला की, वेगळे घटक काम करतात.

महाराष्ट्राचा विचार करता २००८ चा अपवाद वगळता, विभागाने वर्तविलेले अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस यामध्ये विसंगती दिसते. ती विसंगती का आढळते?

हवामान विभागाने नुकतेच २०१९चा पाऊस कसा असेल, यासंदर्भात पूर्वानुमान दिलेले आहे. त्याला आम्ही दीर्घकालीन पूर्वानुमान म्हणतो. यंदा ९६ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही सरासरी कुठली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. १९५१ ते २००० या काळामधील संपूर्ण देशभरातील पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर आहे. ही सरासरी चार महिन्यांची म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यानची आहे. म्हणजेच ८९ सेंटिमीटरच्या ९६ टक्के असं ते गणित आहे. याला मॉडेल्सचा म्हणजे गणितांचा आधार असतो. त्याच्यामध्ये आम्ही नोंदी घेतो. त्यावरून अंदाज वर्तविला जातो. पाच पॅरामीटर्सच्या आधारावर आम्ही पहिला अंदाज देतो. हा अंदाज संपूर्ण देशासाठी असतो. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीला किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात आम्ही दुसऱ्या टप्प्यातील पूर्वानुमान देतो. त्यात पुढील चार महिने पाऊस कसा असेल याचा अंदाज असतो. तेव्हा आम्ही संपूर्ण देशाचं पूर्वानुमान न देता देशाच्या चार भागांचं पूर्वानुमान देतो. मध्य भारत, ईशान्य भारत, वायव्य भारत, दक्षिण भारत या चार मोठय़ा भूखंडांसाठी पूर्वानुमान देतो. आम्ही दिलेला अंदाज प्रत्येकाने आपापल्या राज्यासाठी लावू नये. कारण, एका राज्याला गृहीत धरून हा अंदाज दिलेला नसतो. मात्र, लोक हवामान विभागाने दिलेल्या अंदाज आपापल्या राज्यासाठी लावतात आणि त्यांचा अपेक्षाभंग होतो. गेल्या वर्षी देशात ९१ टक्के पाऊस पडला तर, महाराष्ट्रात ८० टक्के पाऊस पडला. त्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्याचाच परिणाम म्हणजे आता त्या भागात निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती. वर्तविलेले अंदाज चुकले अशी चर्चा करताना पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की, ते अंदाज आहेत. मान्सून ही मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारी प्रणाली आहे. तिचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामागे असणारे घटक फार लांब अंतरावर आहेत. या घटकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. त्यांच्या बारीकसारीक नोंदी हवामान विभाग घेतं नंतर त्या शासनाकडे पाठविल्या जातात.

वादळी पाऊस गारपीट, ढगफुटी, विजा पडणे, गारा पडणे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या गोष्टी विशिष्ट ठिकाणीच घडतात. तर, या घटनांचा आणि त्या ठिकाणातील वातावरणाचा काय संबंध असतो का?

या घटनांचा अभ्यास करण्यासाठी हवामानशास्त्र विभागाकडून मोठं पाऊल उचललं गेलं आहे. त्यासाठी डॉप्लर रडारची यंत्रणा उभारली गेली आहे. विजांचा शोध घेण्यासाठी लाइटनिंग डिडक्शन यंत्रणा उभी केली आहे. महाराष्ट्रामध्ये ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. दामिनी अ‍ॅपच्या (आयआयटीएम, पुणे) माध्यमातून लोकांना विजांसंदर्भातली माहिती लगेच मिळते. त्यातून गारा पडणार असतील, तर त्याचेही अंदाज वर्तवता येतात. तशी यंत्रणा हवामान खात्याने उभी केली आहे. विविध मॉडेल्स, उपग्रहांच्या माध्यमातून आपल्याला हे शक्य झालं आहे. हवामान विभागाकडून या अशा घटनांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कोकणात अशा घटना घडत नाहीत. मात्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांची नैसर्गिक रचनाच अशी आहे की तिथे अशा प्रकारच्या घटना घडतात. हवामान खाते यासंबंधीचे पूर्वानुमान विविध माध्यामांतून सतत देत असते. त्यासाठी आम्ही गेल्या दोन-तीन वर्षांत समाजमाध्यमांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला आहे. एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून, फेसबुक यावरून लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कृषी क्षेत्रातील विविध संस्था, महापालिका, मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या संस्था यांच्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून आम्ही आमची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही माहिती विभागाच्या संकेतस्थळावर असतेच, मात्र प्रत्येक जण ते संकेतस्थळ पाहात नाही. परंतु, प्रत्येकाकडे मोबाइल असतो. त्यामुळे मोबाइलवर ही माहिती पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कॉमन अलर्ट प्रोटोकॉल नावाची यंत्रणा आम्ही नुकतीच सुरू केली आहे. त्यातून एखाद्या भागामध्ये तीव्र वातावरण बदल होणार असेल तर, त्याची माहिती संबंधित भागातील लोकांच्या मोबाइलवर ताबडतोब जाईल. भले तो मोबाइल क्रमांक रजिस्टर असो किंवा नसो. याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येत्या मान्सूनपासून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. वातावरणातील तीव्र बदलांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा’ झाला आहे. त्यामुळे हवामान विभागासह शासकीय, निमशासकीय तसंच खासगी संस्था एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे एखाद्या मोठय़ा नैसर्गिक आपत्तीत होऊ शकणारी प्राणहानी टाळली जाते. मात्र, संपत्तीचे नुकसान टाळता येत नाही. उदाहरण सांगायचं झाल्यास १९९९ मध्ये ओडिशामध्ये जे सुपर चक्रीवादळ आले त्यात सुमारे १० हजार माणसे दगावली. मात्र, २०१३ मध्ये चक्रीवादळात ५० लोक दगावले. मृतांची संख्या पाहता असे म्हणता येईल की, हवामान विभागाने वेळोवेळी माहिती दिली. त्यातून पुढील व्यवस्थापन करणे सोपे गेले. आताच आलेल्या फोनी चक्रीवादळाची पूर्वसूचना संबंधित राज्यांना दिल्यामुळेच या अतिधोकादायक चक्रीवादळपासून होऊ शकणारी मोठय़ा प्रमाणातली संभाव्य जीवितहानी टाळता आली.

३ मे रोजी ओडिशामध्ये धडकलेल्या या फोनी चक्रीवादळाच्या मार्गाचे, तीव्रतेचे आणि त्याचे जमिनीवर येण्याचे स्थान यांचे पूर्वानुमान शासनाला दिल्यामुळेच संभाव्य हानी टाळता आली. अशा पद्धतीची माहिती त्या त्या प्रादेशिक भाषेतून देता यावी यावर आता हवामान विभाग काम करत आहे.

अल निनो आणि ला नीनाचा आगामी मान्सूनवर काय परिणाम होईल?

अल निनो विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये आहे. त्याची स्थिती मध्यम ते सौम्य अशी आहे. त्याकडे हवामान विभागाचे संपूर्ण लक्ष आहे. याच्याबद्दल आणखी अद्ययावत माहिती आम्हाला लवकरच मिळेल. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्यावर आम्ही भाष्य करू. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, अल निनो आहे म्हणजे भारतात यंदा पाऊस पडणार नाही. पण प्रशांत महासागरातील अल निनोचा आपल्या देशातील पावसावर परिणाम होईल असं काही नाही. सुमारे ४० टक्केपेक्षा अधिक वेळा असं झालंय की, अल निनो होता, पण आपल्या देशातील पाऊस नेहमीप्रमाणे पडला. म्हणजे अल निनोचा परिणाम दिसलेला नाही. याचा अर्थ असा आहे की, आपला पाऊस फक्त अल निनोवर अवलंबून नाही, तर तो इतरही अनेक घटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांनी अल निनोच्या दबावाखाली राहू नये. मी येथे एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करेन की, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) म्हणजे दक्षिण हिंदी महासागराच्या पाण्याच्या तापमानाचा फरक सकारात्मक असेल तर आपल्या देशात मान्सून चांगला असतो. सध्या आयओडी तटस्थ आहे. तो येणाऱ्या काळात सकारात्मक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मिडेन ज्युलिअन ओसुलेशन (एमजेओ) यावरही संपूर्ण देशाचा पाऊस अवलंबून असतो. फक्त अल निनो किंवा ला नीनावरच पाऊस अवलंबून नसतो तर स्थानिक घटकांवरही तो अवलंबून असतो. मात्र, त्याचा असा अर्थ होत नाही की, अल निनो आणि ला नीनाचा पावसावर परिणाम होणारच नाही. कारण, अल निनो सक्रिय असेल तर दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो. सध्या आयएमडी अल निनोच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या हवामान विभागात प्रगती झाली आहे?

आपल्या हवामान विभागाने १५ ते २० वर्षांत तंत्रज्ञान आणि अंदाज वर्तविण्यामध्ये खूप प्रगती केली आहे. पूर्वी हवामानाच्या नोंदी घ्यायच्या ज्या यंत्रणा होत्या त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. आता संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी आणि भारताच्या अनेक भागांमध्ये डॉप्लर रडार यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळे चक्रीवादळ समुद्राच्या ५०० किलोमीटरच्या आत आलं तर त्याचा वेग डॉप्लर रडार यंत्रणेने कळतो. त्यातून त्याच्या विध्वंसक शक्तीचा अंदाज येतो. तर, ५०० किलोमीटरच्या बाहेर चक्रीवादळाच्या नोंदी उपग्रहाद्वारे मिळतात. उपग्रहाद्वारे अद्ययावत माहिती मोठय़ा प्रमाणात मिळते. समुद्रावरही निरीक्षण यंत्रणा (बीयूओवायएस) उभारलेल्या आहेत. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सचीही संख्या वाढवली आहे. त्यात अ‍ॅटोमॅटिक रेन गेजस आहेत, त्याचीही संख्या वाढली आहे. हवेच्या वरच्या स्तरावरील निरीक्षणं क्षमता वाढली आहे. हवामान विभाग पूर्वी जी मॉडेल्स वापरायचा त्यात आता खूप बदल झाला आहे. पूर्वी आम्ही २५० किलोमीटर रिझोल्युशेनमध्ये काय होणार आहे ते सांगत होतो. आता केवळ १३ किलोमीटर रिझोल्युशेनमध्ये काय होऊ शकते, हे सांगू शकतो. ही अद्ययावत यंत्रणा उभारल्यामुळे अंदाज अचूक येऊ लागले आहेत. पूर्वी विभाग दोन दिवसांनंतर काय होणार याचे पूर्वानुमान देत होते, आता तोच विभाग सात दिवसांनंतर काय होणार याचे पूर्वानुमान देऊ शकतो. ही क्षमता हवामान विभागाने विकसित केली आहे. जागतिक पातळीवर हवामानाच्या नोंदींची देवाणघेवाण करायची असते. समजा, आपण अद्ययावत नसलो तर आपली माहिती किंवा नोंदी इतर देश स्वीकारणारच नाहीत. त्यांच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असते त्यामुळे अद्ययावत होणं गरजेचं, आवश्यकच आहे आणि आपण पूर्णत अद्ययावत आहोत.

फोनी चक्रीवादळाचे येणाऱ्या मान्सूनवर काय परिणाम होतील?

महाराष्ट्राच्या मान्सूनवर त्याचा काही परिणाम होणार नाही. देशाच्या मान्सूनवरही तसा काही परिणाम होणार नाही. सर्वसाधारण केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होतो. तेव्हा अरबी समुद्रावर किंवा बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ निर्माण झाले तर त्या वेळी मान्सूनची सक्रियता कमी होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा लोकांना अशी भीती असते की, मान्सून लवकर किंवा उशिरा आला तर पाऊस कमी किंवा जास्त होईल. पण, तसं काही नसतं. आता, हे फोनी वादळ मान्सूनच्या एक महिना अगोदर आलेलं आहे. त्यामुळे त्याचा तसा परिणाम होणार नाही.

बहुतेक वेळा केरळमध्ये काही दिवस अगोदर मान्सून दाखल झालेला असतो. मात्र, हवामान विभागाने याबद्दल माहिती दिलेली नसते, असं का?

त्यासाठी काही निकष आहेत. त्यातील एक निकष असा आहे की, दक्षिणेतल्या ६० टक्के निरीक्षण केंद्रांनी सलग दोन दिवस अडीच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद करणे गरजेचे आहे. तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची खोली (६०० मिलीबार हवेचा दाब) व जमिनीपासून निघणारी रेडिएशन्स आदी घटकांवरून मान्सून दाखल झाला असं हवामान विभाग सांगतो. त्याचबरोबर वाऱ्याची उंची समुद्रापासून वपर्यंत साधारण ६०० मिलीबापर्यंत आम्हाला दिसली तर आम्ही मान्सून आला, असे जाहीर करतो. आपण विषुववृत्तीय प्रदेशात राहतो. त्यामुळे हवामानातील बदल वारंवार होत असतात. तसेच अचानक घडणारे बदल पुष्कळ आहेत. अचूक पूर्वानुमान देणे, ते लवकरात लवकर देणे, तसेच परिणामकारक अंदाज देणे, ही हवामान विभागाची उद्दिष्टे आहेत. अगदी लहानात लहान भागासाठी पूर्वानुमान देता येणे हे हवामान विभागाचे लक्ष्य आहे. त्यासाठी आणखी हवामान केंद्रांची गरज आहे. कारण, त्यातून जास्त माहिती विभागाकडे उपलब्ध होईल, त्याच्या आधारे अचूक पूर्वानुमान देता येईल. शासन, खासगी संस्थांच्या मदतीने हे शक्य होऊ शकते.

गेल्या ५० वर्षांत वातावरणात अनेक बदल झालेले आहेत. आताही सातत्याने होत आहेत. हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणता येईल का?

हो. हे आपण स्वीकारायला हवं. तापमान वाढ कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कार्बनचं उत्सर्जन थांबवलं पाहिजे. हरित क्षेत्र वाढविलं पाहिजे. सूर्यप्रकाश, पाणी आणि वारा यातून वीजनिर्मिती करायला हवी. प्रयत्न चालू आहेत, पण ते आणखी गांभीर्याने होणे गरजेचे आहे. तापमान वाढ ही गोष्ट लोक गांभीर्याने घेत नाहीत. त्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे.

हवामान खात्यातील या सगळ्या बदलांविषयी लोकांच्या मनात जागरुकता कशी निर्माण होईल?

विषुववृत्तीय भागातील पूर्वानुमान देताना आमच्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. हवामान विभागाच्या माहितीकडे लोकांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. कारण, लोकांचे आरोग्य, व्यवसाय आणि देशाचे अर्थकारण हे हवामानावर अवलंबून आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शालेय स्तरावर पाठय़पुस्तकात हवामानासंबंधीचे धडे असतात. मात्र, शिक्षकांना अधिक माहिती मिळण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना हवामानाविषयी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यातून शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात हवामानाकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी निर्माण करू शकतील. खरंतर त्यांनी हवामानाचे दूत व्हावे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात अशा पद्धतीने हवामानाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली तर भविष्यात त्याचा त्यांना तसंच देशाला  फायदा होईल.