News Flash

युवा भारताचा उदय… ‘सुवर्ण’युगाची नांदी!

गोल्ड कोस्ट २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची कामगिरी ही आजवरची सर्वोत्तमच मानावी लागेल.

क्रीडा क्षेत्रात होऊ घातलेल्या परिवर्तनाची ही नांदीच आहे.

सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com
२०० जणांचं पथक आणि २० पदकंही नाहीत, ही परिस्थिती बदलत आपल्या युवा खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत २६ सुवर्णपदकांसह ६६ पदकं मिळवली आहेत. क्रीडा क्षेत्रात होऊ घातलेल्या परिवर्तनाची ही नांदीच आहे.

गोल्ड कोस्ट २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची कामगिरी ही आजवरची सर्वोत्तमच मानावी लागेल. राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे ऑलिंपिक आणि आशियाई स्पर्धाच्या तुलनेत सोप्या किंवा लुटुपुटूच्या असतात असं मानण्याचा प्रघात आहे. ते अर्धसत्य आहे. कारण या स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड असतात. नायजेरिया, केनियासारखे तयारीतले आफ्रिकी देश असतात. जमैकासारखे कॅरेबियन देश असतात. ऑस्ट्रेलिया ही क्रीडा जगतातील महासत्ता आहे. मल्टिडिसिप्लीन किंवा बहुप्रकारांमध्ये तिचा वावर असतो. अशा ऑस्ट्रेलियाला गेल्या दोन ऑलिंपिक स्पर्धामध्ये ब्रिटननं मागे टाकलंय. कारण २०१२ मधील लंडन ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक पदकं जिंकण्याच्या दृष्टीने ब्रिटननं तयारी केली होती. त्याचा फायदा त्यांना रिओ २०१६ ऑलिंपिकमध्येही झाला. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये ब्रिटनच्या घटक संघटना इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आर्यलड, वेल्स, आइल ऑफ मान अशा नावांनी भाग घेतात. म्हणजे तितके संघ वाढले आणि स्पर्धाही वाढली. शिवाय आफ्रिकन आणि कॅरेबियन देशांसाठी एशियाडसारखी इतर कोणती स्पर्धा नसते. त्यांच्यासाठी राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक अशा दोनच स्पर्धा असतात. त्यामुळे हे देश राष्ट्रकुल स्पर्धेत चांगल्या तयारीने उतरतात. यासाठीच मग उसैन बोल्टसारख्या विक्रमवीर धावपटूलाही राष्ट्रकुलची वारी करावीशी वाटते. राष्ट्रकुल स्पर्धामधील भारतीय कामगिरीचा आढावा घेण्यापूर्वी ही पाश्र्वभूमी थोडी लक्षात घ्यावी लागेल.

परिवर्तन टक्केवारी

भारताला गोल्ड कोस्टमध्ये एकूण ६६ पदकं मिळाली. यात २६ सुवर्णपदकं होती. तर प्रत्येकी २० रौप्य आणि कांस्यपदकं होती. म्हणजे किमान ४६ वेळा भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली असेल, तर त्यात २६ वेळा आपण बाजी मारलेली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य अशी कमाई केली होती. म्हणजे गोल्ड कोस्टच्या तुलनेत त्यावेळी भारताला दोनच पदकं कमी मिळाली. शिवाय तब्बल ४५ वेळा भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. पण सुवर्णपदकांसाठीच्या लढाईत त्यावेळी भारतीय खेळाडू काहीसे कमी पडले होते. त्यामुळे पदकतालिकेतही आपली पाचव्या क्रमांकावर घसरण झाली होती. अशा स्पर्धामध्ये सुवर्णपदकांची मातब्बरी अधिक. ती जितकी अधिक तितकं पदकतालिकेत प्रमोशन! त्यामुळेच यावेळी आपण तिसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकलो. आपल्यापेक्षा कॅनडानं अधिक म्हणजे ८२ पदकं जिंकली. पण त्यांच्या खात्यात १५ सुवर्णपदकांचीच नोंद झाली. उलट ४० रौप्यपदकं त्यांना मिळाली आणि पदकतालिकेत त्यांची घसरण झाली.

गेली अनेक र्वष केवळ पदकांवर समाधान मानण्याची सवय भारतीय खेळाडू, रसिक आणि समीक्षकांच्या अंगवळणी पडली होती. आता निव्वळ पदकांवर नव्हे, तर सुवर्णपदकांवरही आमचं लक्ष असतं हा मोठा धडा राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्तानं मिळालेला दिसतो. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा एकाच वर्षी असतात. आशियाई स्पर्धामध्ये चीन, जपान, कोरिया, इराण आणि मध्य आशियाई देश असल्यामुळे राष्ट्रकुलच्या तुलनेत पदकांची लढाई जरा खडतर असते. त्यामुळे तिथं तुलनेनं कमी पदकं मिळतात. अर्थात अ‍ॅथलेटिक्ससारख्या प्रकारांमध्ये राष्ट्रकुलच्या तुलनेत कमी स्पर्धा असते हेही नाकारता येत नाही.

ओ युवा युवा…

१५-१६ वर्षांची पोरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अभावानंच पदार्पण करतात. इतर खेळांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे टीनएजर्स मंडळींनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये निव्वळ भाग घेतला असं नव्हे, तर सुवर्ण वा इतर पदकंही जिंकून दाखवली. ६६ पदकांपैकी २५ पदकं युवा खेळाडूंमुळे भारताच्या पारडय़ात जमा झाली आहेत. सर्वाधिक कमाल अनीश भानवालाची. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पठ्ठय़ानं सुवर्णपदक जिंकून दाखवलं! राष्ट्रकुल स्पर्धाच्या इतिहासातला भारताचा तो सर्वात युवा सुवर्णपदकविजेता ठरला. त्याच्याऐवजी हा मान जिला मिळू शकला असता, ती १६ वर्षीय मनू भाकर खरं तर आता बहुतांश भारतीयांच्या परिचयाची झालेली आहे. ज्या वयात इतर मुलं बोर्डाच्या परीक्षा लिहित असतात त्या वयात मनू ज्युनियर नव्हे, सिनियर वर्ल्डकप स्पर्धा गाजवते. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ती सर्वात युवा जगज्जेती आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं स्पर्धाविक्रमासह सुवर्ण जिंकलं, तेव्हा या खेळातील जाणकारांना फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं.

वेटलिफ्टर दीपक लाथर हा हरयाणाचा अवघा १८ वर्षीय वेटलिफ्टर. ६९ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवत तोही या खेळातला सर्वात युवा पदकविजेता ठरला. तीच कहाणी विशीतल्या नीरज चोप्राची. अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वाटय़ाला फारशी पदकं येत नाहीत. कारण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, जमैका, केनिया, नायजेरिया यांची या खेळात सद्दी असते. मिल्खा सिंग (१९५८), कृष्णा पुनिया (२०१०), महिला रिले (२०१०), विकास गौडा (२०१४) यांच्या सुवर्णपदकांपलीकडे भारताची मजल गेलेली नाही. पण नीरज चोप्रानं भालाफेकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. युवा असूनही त्याची ही कामगिरी फारशी अनपेक्षित नव्हती, यावरून मनू भाकरप्रमाणेच त्याचीही सिद्धता दिसून येते.

२२ वर्षीय मनिका बात्रा ही या स्पर्धेची निर्विवाद स्टार असल्याविषयी बहुतेकांचं मत आहे, त्यात तथ्य आहे. महिला एकेरी आणि सांघिक अशी दोन सुवर्णपदकं, महिला दुहेरीत रौप्यपदक आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक अशी चार पदकं तिनं पटकावली. ही कामगिरी एखाद्या देशानं केली असती, तर असा देश गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत १८व्या क्रमांकावर आला असता! मनिका बात्राचं नाव टेबलटेनिस वर्तुळाबाहेर फारसं ऐकलं/वाचलं गेलं नव्हतं. आज मात्र ती सुपरस्टार बनलीये. सिंगापूरची चार स्पर्धाची सद्दी मोडून भारतीय महिलांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, त्यात मनिकाचं योगदान मोलाचं ठरलं. तिनं यिहान झू या सर्वोत्तम खेळाडूला हरवल्यामुळे महिलांचा अंतिम फेरीतील विजय सुकर झाला. पुढे एकेरीत मात्र तिनं प्रतिस्पर्ध्याला सरळ सेट्समध्ये हरवून दाखवलं. मनिका ही कॉलेज ड्रॉपआऊट आहे. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. त्याबद्दल तिचे आभारच मानले पाहिजेत.

अनुभवाची साथही हवीच…

या स्पर्धेत काही युवा खेळाडूंनी मथळे गाजवले, पण याचा अर्थ अनुभवी खेळाडू कमी पडले असं अजिबातच नाही. सर्वाधिक फोकस अर्थातच बॉक्सर मेरी कोम आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यावर होता. पण तेजस्विनी सावंत, सायना नेहवाल यांनीही सुवर्णपदके जिंकून अनुभवाच्या शिदोरीची ताकद दाखवून दिली. मेरी कोम, सुशील कुमार आणि सायना नेहवाल हे ऑलिंपिक पदक विजेते. त्यामुळे त्यांच्याकडून अर्थातच राष्ट्रकुलमध्येही पदकाची – तीही सुवर्णपदकाची – अपेक्षा होती. त्यांच्या गुणवत्तेविषयी कधीच संदेह नव्हता. पण विशेषत ३५ वर्षीय मेरी कोम आणि ३६ वर्षीय सुशीलच्या हालचालींमध्ये मांद्य तर आलेलं नाही ना, अशी शंका उपस्थित केली गेली. सुशीलला गत ऑलिम्पिकसाठी पात्र होता आलेलं नव्हतं हा इतिहासही ताजा होता. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेत दोघांनीही शंकेखोरांना गप्प केलं. मेरी कोमच्या खात्यात यानिमित्तानं पहिल्या राष्ट्रकुल सुवर्णपदकाचीही भर पडली.

टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि अ‍ॅथलीट सीमा पुनिया यांचाही विशेष उल्लेख करावा लागेल. टेबल टेनिसमध्ये मनिका बात्राच्या कामगिरीचा बोलबाला झाला. पण भारतासाठी गेली अनेक र्वष टेबल टेनिसमध्ये चांगली कामगिरी केलेल्या शरथचीही दखल घ्यावी लागेल. या स्पर्धेत शरथनं एक सुवर्ण (सांघिक), एक रौप्य (पुरुष दुहेरी) आणि एक कांस्य (पुरुष एकेरी) अशी तीन पदकं जिंकली. याशिवाय मिश्र दुहेरीत कांस्य पदकाच्या लढतीत त्याचा भारतीय जोडीकडूनच पराभव झाला होता. अन्यथा चार पदकं जिंकून तोही मनिकाच्या बरोबरीला येऊ शकला असता. यावेळी टेबल टेनिस प्रकारात भारतानं बॅडमिंटनपेक्षाही अधिक पदकं जिंकली, यात शरथचाही वाटा आहेच. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं अशी कामगिरी वर्षांनुर्वष एखाद्या खेळात घडत राहावी लागते. शरथनं टेबिल टेनिसमध्ये अशी कामगिरी करून दाखवलेली आहे.

तेजस्विनी सावंत राष्ट्रकुल स्पर्धेत २००६पासून पदकं जिंकतेय. यंदा तिनं ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्ण आणि ५० मीटर्स रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक पटकावलं. २०१०मध्ये जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर तिचा उत्साह दुणावला होता. पण लंडन ऑलिंपिक २०१२मध्ये तिची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. दरम्यानच्या काळात सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे तिला खेळाकडे फारसं लक्ष देता आलं नव्हतं. यावेळी मात्र तिनं आपली गुणवत्ता आणि अनुभव पणाला लावत पदकांची लयलूट केली. एरवी ज्या खेळात युवा खेळाडूंचा बोलबाला होऊ लागलाय, अशा खेळात सहभागींमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ असलेल्या तेजस्विनीची कामगिरी नजरेत भरणारी ठरली. ३४ वर्षीय सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये सलग दुसरे राष्ट्रकुल रौप्यपदक जिंकले. सीमा ही तशी वादग्रस्त अ‍ॅथलीट आहे. मध्यंतरी डोप टेस्टमध्ये ती दोषी आढळली होती. तिचं प्रशिक्षणही संशयातीत नसतं. तरीही तिच्या सातत्याला दाद द्यावी लागेल.

सायना नेहवाल ही पी. सिंधूच्या तुलनेत अनुभवी आणि ज्येष्ठ. वय आणि दुखापतींमुळे तिच्या हालचाली मंदावल्या अशी चर्चा गेले काही महिने सुरू  आहे. तिनं राष्ट्रकुल २०१०मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. दोनच वर्षांनी लंडन ऑलिंपिकमध्ये कौतुकास्पद कांस्यपदकही मिळवलं. तिच्या तुलनेत सध्या आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पी. सिंधूची कामगिरी अधिक चांगली होतेय हेही मान्यच. पण राष्ट्रकुलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत युवा ऊर्जेइतकाच अनुभवही मोलाचा असतो. सायनानं ते सिद्ध करत सिंधूला हरवलं. याशिवाय मिश्र सांघिक प्रकारातही तिनं सुवर्णपदक जिंकलंच.

सुवर्णपदक नाही तरी दखलपात्र

ही स्पर्धा म्हणजे केवळ सुवर्णपदक किंवा पदक जिंकलेल्यांचीच कहाणी नाही. इतरही काही आघाडय़ांवर भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी उत्साहवर्धक आहे, पण त्यांची दखल फारशी घेतली गेली नाही. भारताच्या सर्वच्या सर्व बॉक्सर्सनी पदकं जिंकली. त्यातही महत्त्वाचं पण दुर्लक्षित राहिलं सतीश कुमारचं रौप्यपदक. भारतीय बॉक्सर सहसा हलक्या आणि मध्यम वजनी गटांमध्ये चमक दाखवतात. पण सतीश कुमार ९१ किलो म्हणजे सुपर हेवी वजनी गटात उतरला होता. या गटात विशेषत: इंग्लंड आणि वेल्सचे बॉक्सर्स तगडे मानले जातात. इंग्लंडमध्ये हौशी बॉक्सिंगचं जाळं मोठं आहे. पण सतीश कुमारनं या प्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अंतिम फेरीत इंग्लंडच्या फ्रेझर क्लार्कनं त्याला हरवलं. चारही फेऱ्यांमध्ये सतीशला नाममात्र गुणांनी पिछाडीवर राहावं लागलं. अखेर सरस गुणांच्या जोरावर फ्रेझर विजेता ठरला. पण हा अनुभव सतीशसाठी मोलाचा ठरू शकेल.

४०० मीटर्स धावण्याच्या प्रकारात मोहम्मद अनासनं अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पात्रता फेऱ्यांमध्ये त्यानं अतिशय वेगवान वेळ दिली होती. मात्र अंतिम फेरीत त्याचं पदक काही सेकंदांनी हुकलं. आशियाई स्पर्धेत त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. ४०० मीटर्स प्रकारातच महिलांमध्ये १८ वर्षीय हिमा दासनंही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत ती सहावी आली. पण पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरणाऱ्या तिच्यासारख्या धावपटूसाठी ही कामगिरी आश्वासकच मानावी लागेल. यंदाच्या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये फील्ड प्रकारात भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळालं. पण ट्रॅक प्रकारातही भारतीयांची कामगिरी बऱ्यापैकी झाली.

बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग…

यावेळी भारताला सर्वाधिक पदकं अपेक्षेप्रमाणे नेमबाजी (१६) आणि कुस्ती (१२) या प्रकारांमधून मिळाली. मात्र बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी नऊ पदकं मिळाली. बॉक्सिंगमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. मेरी कोम, विकास कृष्णन आणि गौरव सोलंकी यांनी सुवर्णपदकं जिंकली. बॉक्सिंग प्रकारात पदकांच्या क्रमवारीत भारत दुसरा आला आणि आपण ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं. बॉक्सर्सची खाण असलेल्या इंग्लंडनं अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक पदकं जिंकली. स्पर्धेच्या सुरुवातीला सुई धोरणाचा भंग केल्याबद्दल बॉक्सर्सना तंबी मिळाली होती. काही वर्षांपूर्वी शिस्तभंगाची कारवाई म्हणून बॉक्सिंग संघटनाच बरखास्त करण्यात आली होती. गेल्या खेपेला ग्लासगोत भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलं नव्हतं. यंदा नऊच्या नऊ बॉक्सर्सनी पदकं जिंकून दाखवली.

भारताच्या पदकमालिकेची सुरुवात वेटलिफ्टर्सनी केली. भारतीय वेटलिफ्टर्सची प्रतिमा विशेषत: राष्ट्रकुल स्पर्धेत फार उजळ नाही. ऑकलंडमधील एका स्पर्धेत खंडीभर वेटलिफ्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर भारतीय वेटलिफ्टरांकडे प्रत्येक स्पर्धेत संशयानं पाहिलं जाऊ लागलं. यावेळी मात्र त्याचं कोणतंही सावट त्यांच्या कामगिरीवर नव्हतं. मीराबाई चानू, संजिता चानू आणि सतीश शिवलिंगम यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. एकूण पाच सुवर्णपदकं आणि प्रत्येकी दोन रौप्य व कांस्यपदकं या कामगिरीनं स्पर्धेच्या सुरुवातीला इतर खेळाडूंमध्येही विश्वास निर्माण केला.

टेबल टेनिसमध्ये ग्लासगो २०१४मध्ये भारताला एकच पदक जिंकता आलं होतं. यावेळी मात्र तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकं अशी एकूण आठ पदकं भारतानं जिंकली. विशेष म्हणजे, बॅडमिंटनमधील पदकांपेक्षाही ती अधिक होती. आजवरची या खेळतली ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीच. शिवाय सिंगापूरची चार स्पर्धाची सद्दी भारतानं मोडून काढली.

राष्ट्रकुल स्पर्धेपलीकडे…

राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा एकाच वर्षी होतात. राष्ट्रकुलपेक्षा आशियाई स्पर्धा तुलनेने खडतर असतात, याविषयी आपण चर्चा केलेलीच आहे. पण राष्ट्रकुल स्पर्धाचा विचार करता ही आपली आजवरची सर्वोत्तम स्पर्धा ठरली. निव्वळ आकडेवारीचा विचार केल्यास भारताची राष्ट्रकुल स्पर्धामधली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरते. यापूर्वी नवी दिल्ली २०१० स्पर्धेत १०१ पदके, तर मँचेस्टर २००२ स्पर्धेत भारताने ६९ पदके जिंकली होती; पण दिल्लीतील स्पर्धेत तिरंदाजी, टेनिस असे क्रीडा प्रकार होते. ते यंदा नव्हते. शिवाय मँचेस्टरमधील स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात स्नॅच आणि क्लीन व जर्क या प्रकारांमध्ये, तसेच एकूण कामगिरीसाठी स्वतंत्र पदकांची खिरापत वाटली गेली होती. तीही या वेळी नव्हती. पुढील स्पर्धा २०२२मध्ये बर्मिगहॅममध्ये होताहेत. पण तत्पूर्वी अर्थातच जाकार्ता आशियाई स्पर्धा आणि टोकियो ऑलिम्पिक ही आव्हानं आहेत. या स्पर्धेत इतक्या मोठय़ा संख्येनं युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी पाहता, या दोन्ही स्पर्धामध्ये भारताकडून अधिक चांगल्या कामगिरीची आशा करायला काहीच हरकत नाही. नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती या खेळांमध्ये पदकं मिळतील. पण आता अ‍ॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बॉक्सिंग या खेळांमधूनही आशा बाळगता येईल, अशी स्थिती आहे. आयपीएलच्या माहोलमध्येही देशातील क्रीडारसिक आणि विशेषत युवा वर्ग राष्ट्रकुल स्पर्धाचा आस्वाद घेत होता. अपडेट्सकडे डोळे लावून बसला होता. क्रिकेटेतर क्रीडा संस्कृती देशात रुजू लागल्याचं हे लक्षण नक्कीच मानता येईल. टीनेजर क्रीडापटू केवळ क्रिकेटमध्येच न दिसता ते इतरही खेळांमध्ये दिसू लागलेत. खडतर परिस्थितीवर मात करून पालक त्यांच्या मुलांना ऑलिम्पिक पदकांचं स्वप्न दाखवू लागलेत. एरवी २०० जणांचं पथक आणि २० पदकंही नाही अशी स्थिती पाहण्याची आम्हाला सवय होती. यंदा मात्र २०० जणांतून ६६ पदकविजेते मायदेशी परतले, हे प्रमाण नक्कीच उत्साह दुणावणारे आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:04 am

Web Title: cwg 2018 achievement of young indian sports persons
Next Stories
1 खासगी मराठी वाहिन्यांची २० वर्षे प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी रस्सीखेच
2 हाही रडीचा डाव! चेंडू कुरतडणे ही तर फसवेगिरीच
3 ‘डिजिटल इंडिया’मध्ये माहिती सुरक्षा कायद्याला एका तपाची प्रतीक्षा
Just Now!
X