13 July 2020

News Flash

दसरा विशेष : पानाफुलांचा सोहळा

झेंडूची केशरी फुलं बारमाही महत्त्वाची असतात. तर आपटय़ाच्या हिरव्यागार पानांना दसऱ्याच्या दिवशी ‘सोन्या’चं मोल येतं.

आपट्याची पानं आणि झेंडू

वैभव भाल्डे – response.lokprabha@expressindia.com

झेंडूची केशरी फुलं बारमाही महत्त्वाची असतात. तर आपटय़ाच्या हिरव्यागार पानांना दसऱ्याच्या दिवशी ‘सोन्या’चं मोल येतं. एक फूल, तर दुसरं पान.. दोघांनीही या काळात उत्सवाच्या नवलाईत आपापली भर घातलेली असते.

निर्मल सुवर्णा

ऑफिसमधला एक मित्र गणेशोत्सवानंतर सहा महिने सहकुटुंब परदेशात जाणार होता. दोघेही हौशी, आपल्या सणसमारंभांची मनोमन आवड असणारे. खाण्यापिण्याचं तर बरंच सामान गोळा झालं. बाजारात धावाधाव करून दिवाळीचे उटणे, मोती साबण, एवढंच काय मेण घातलेल्या, मातीच्या. सजवलेल्या दोनच का होईना पणत्याही सामानात होत्या. मी तो उत्साह बघून गंमत केली, का रे दिवाळीची तयारी झाली, दसऱ्याचं काय? त्यावर उत्तर मिळालं, आपटय़ाचं पान तर चांदीचं आहे; पण प्रश्न झेंडूच्या फुलांचा आहे!! खऱ्या ताज्या झेंडूच्या फुलांचं तोरण दारावर लावल्याखेरीज आणि पानात श्रीखंडपुरी असल्याखेरीज काही दसऱ्याची मजा नाही!!

किती ठाम कल्पना असतात ना आपल्या? विचारचक्र सुरू झालं माझं नि जाणवलं की, इतर वेळी झेंडूच्या फुलांना कितीही हिणवलं तरी सणावाराला, शुभकार्याला या फुलांशिवाय काही शोभा नाही. अगदी खरं सांगायचं तर दारावरचं ताजं झेंडूचं तोरण नि आंब्याची डहाळी मांगल्याचं प्रतीक असतं. घरादारावर चतन्याची उधळण करण्याची मेख या जोडगोळीलाच साधते.

तसं बघायला गेलं तर अगदीच साधं फूल हे. आपण निर्माल्यातली फुलं थोडीशी वाळवून कुंडीत टाकली तरी लगालगा अंकुरतात त्या लांबट काळ्या बिया. दोन दोन इवल्या इवल्या पानांच्या छोटय़ाशा रोपांच्या पुंजक्यांनी जागा व्यापली जाते. तजेलदार पोपटी पानं अलगदपणे मोठी होतात नि पानांना किंचित कंगोरे येतात. पुंजक्यांमधली काही रोपं झपाटय़ाने मोठी होतात, काही माना टाकतात. हलक्या पोकळ देठाचं हे झाड तीन-चार फुटांपर्यंत वाढतं. कधी सरळसोट, तर कधी बहुशाखायु असते ही वाढ. पानं नाजूक, निमुळती आणि वाऱ्यावर लवणाऱ्या पात्यांची आठवण करून देणारी असतात. नारळाच्या झापेचा सुबक अवतार जणू!! प्रत्येक फांदीच्या टोकाला यथायोग्य काळात आक्रसल्यासारखी दिसणारी बारीक बोंडं येतात, याच कळ्या. मग त्या मोठय़ा मोठय़ा होत जातात. मस्त गोलमटोल झाल्या की अल्लड कळ्यांमधून दुमडलेल्या पिवळ्या पाकळ्यांची झालर डोकवायला लागते. पाहाता पाहाता पूर्ण फूल उमलतं. मस्त दणदणीत मोठय़ा आकारापासून छोटय़ापर्यंत व पिवळ्याधम्मक रंगापासून केशरीपर्यंत विविध रूपं बघायला मिळतात सामान्यपणे या झेंडूची. मखमली लाल पाकळ्यांचे पंढरपुरी झेंडू आपला वेगळा आब राखून असतात. एकदा फुलायला लागली की चिक्कार फुलतात ही फुलं. एकदा उमललेलं फूल झाडावर जवळपास आठवडाभर छान राहतं आणि तोडल्यानंतरही तीन-चार दिवस तरी पूर्ण वाळत नाही. मुबलकता व टिकाऊपणा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; पण या सुवर्णेला खरा मान मिळतो तिच्या निर्मलतेने!!

अंगभूत गुणांमुळे झेंडूची फुलं मांगल्य निर्माण करतात. इतर फुलांच्या तुलनेत टिकाऊ, कमी किडणारी त्यामुळे सगळ्या सणसमारंभात परिसर सजवायला झेंडू हवाच. झेंडूची माळ करताना नीट लक्ष दिलं की जाणवतं पहा, निवडायला बसलं तर पाण्याने खराब झालेली किंवा अळी लागलेली फुलं असू शकतात; पण बाकी कीड कधीच नसते या सुवर्णेला. म्हणूनच बहुधा शुभकार्यात, सणावारी, घरात – देवळांत सगळीकडेच परंपरागत सजावटीत मुख्यत: झेंडूचा वापर होतो. बाह्य़ रूपापेक्षा मूळ गुणांना महत्त्व देणारी ही आपली संस्कृती!!

आपल्यालाही अध्यात्मात या मनाच्या शुद्धीलाच तर लख्ख करायचं, टिकवायचं असतं नाही का? बाह्य़ रूप सौंदर्य या क्षणिक आणि दिखाऊ गोष्टींच्या आहारी न जाता आपला भाव जपणं आणि तो या सुवर्णेसारखा परिवर्तित करणं फारच लाभदायी ठरतं. कोणतीच नकारात्मकता, विचारांची चंचलता किंवा साशंकता कधीच मनाला स्पर्शू न देणं गरजेचं ठरतं. सकारात्मकतेने मन भरलेलं असेल तर नकारात्मकतेला मनात जागाच राहात नाही. मनाचा हा पेला कायम स्वच्छ दृष्टिकोनाने भरून ठेवला, की अमंगलाची छाया पडत नाही मनावर. आनंदाची उधळण करणाऱ्याला सगळीकडे आनंदच दिसतो,  तशीच ही आतली प्रसन्नता, निर्मलताही बाहेर पडल्याशिवाय राहू शकत नाही.

स्थळाचं मांगल्य वाढवणाऱ्या या निर्मल सुवर्णेचा हा वसा आपणही घ्यायलाच हवा. माझ्यात नकारात्मकता येऊ देणार नाही तसंच मी जिथे असेन तिथेही माझ्या मनातल्या भावामुळे नकारात्मकतेला शिरकाव नसेल. हळूहळू मांगल्याची, सकारात्मकतेची सगळ्या आसमंतात पेरणी होईल व सर्वत्र समाधान नांदेल.

सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत्।

हिरण्यगर्भा रागिणी

अनंत चतुर्दशी झाली की नकळत मनाला वेध लागतात शारदीय नवरात्रोत्सवाचे, दसऱ्याचे. त्यामागून येणारा दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण असला तरी ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा!!’ हे खरेच. सर्वसाधारणपणे बदलत्या ऋतुमानानुसार प्रत्येक सण साजरा करायच्या पारंपरिक पद्धती आहेत, थंडीत येणाऱ्या संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व तर दसऱ्याला श्रीखंड-बासुंदीची चढाओढ. माझ्या आठवणीतला दसरा म्हणजे सकाळी सरस्वतीपूजन, शस्त्रपूजन करून केलेल्या गोड जेवणावर ताव मारून थोडी विश्रांती झाली की उन्हं कलायच्या आधीच सीमोल्लंघन. मग गावातल्या ओळखीपाळखीच्या सर्व घरी जाऊन सोनं लुटणं. मिळणारा जमेल तेवढा खाऊ पोटात व बाकी खिशांत भरून घरी येणं!! घरी पाटावर काढलेल्या तांदळाच्या रावणाला पायाच्या अंगठय़ाने विस्कटून, अर्थात त्याचा वध करून झाला की आई औक्षण करायची!! सर्व आप्तेष्टांच्या भेटीने तृप्त झालेलं मनं कसं आनंदाने भरलेलं असायचं!! मात्र या सगळ्यात आजही दसऱ्याची मुख्य आठवण किंवा खूण ठरतं ते सोनं म्हणून लुटलं जाणारं आपटय़ाचं पान!!

पण याच पानाला का दिला जातो सोन्याचा मान? एक कथा आहे त्या मागे!! रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाची. कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुगृही राहून ज्ञान संपादन केले. अखेरीस त्याने गुरुदेवांना दक्षिणा घेण्यास सुचविले. शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी नकार दिला पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. शिष्योत्तमाने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केलेली असल्याने असमर्थता दर्शविली. मात्र दारी आलेला याचक विन्मुख पाठवणे प्रशस्त न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे मुदत मागितली. त्याने ठरविले की कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची. याची कुणकुण लागताच कुबेराने राजाला सांगितले की तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सुमुहूर्तावर जंगलात कौत्स आपटय़ाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. अतिआनंदित कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी १४ कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. त्या हिरण्याचं पावित्र्य त्या आपटय़ाच्या पानांना लाभलं ते या प्रसंगापासून!! म्हणून ही हिरण्यगर्भा!!

पांडवांनी अज्ञातवासातून परत यायला विजयादशमीचा मुहूर्त साधला आणि श्रीरामांनीदेखील रावणवध याच मंगलपर्वावर केला. दुग्रेने नऊ दिवस युद्ध करीत असुरांचा नायनाट विजयादशमीलाच केला. या गोष्टींचा संदर्भ जोडला की आपल्या परंपरांचं उत्तरदायित्व स्वीकारणं सहज जमतं नाही का?

वर्षभर क्वचितच नजरेला पडणारी ही काहीशी कोरडी गोखुराच्या आकाराची पानं सहसा गावकुसाबाहेर किंवा जंगलातच वाढतात. वनराज म्हणून गौरविला गेलेला हा साधारण तीन ते पाच मीटर वाढणारा वृक्ष थोडा वेडावाकडाच वाढतो. याची मुळं एवढी शक्तिशाली असतात की जमिनीत वाढीच्या आड येणाऱ्या खडकांना फोडून वाढतात म्हणे. आयुर्वेदातही या मुळांचा काढा मूतखडय़ावर गुणकारी सांगितलाय, या गुणांमुळेच या लढवय्या रागिणीचं एक पारंपरिक नाव अश्मंतक आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पिवळसर पांढरी पाच लांबट पाकळ्यांची फुलं येऊन गेली की चपटय़ा शेंगा लागतात झाडाला. या शेंगेतील बियांपासून पुनर्निर्मिती होते या रागिणीची. दसऱ्याला होणाऱ्या छाटणीमुळे फुटणारी नवीन फूट या झाडाचे आयुष्य वाढवते!!

एकदाच सुवर्णवर्षांवात न्हाऊन निघालेल्या त्या आपटय़ाच्या पानांकडे पाहून जशी त्या हिरण्याची, पावित्र्याचीच भावना मनोमनी उत्पन्न होते तसेच ईशकृपेचे पाईक म्हणून ती अनुभवलेली सात्त्विकता आपल्या विचारातून परिवर्तित करायचा सहज भाव शिकवते ही हिरण्यगर्भा रागिणी. अडचणींवर, नकारात्मकतेवर मात करण्याची क्षमता जोपासली की सद्विचारांची पाळंमुळं आपोआप खोलवर रुजतात.  सोन्यासारखेच अमूल्य विचार व आचार जेव्हा परिवर्तित होतात तेव्हा ती एक श्रेष्ठ साधनाच ठरते. ज्योतीने उजळणाऱ्या ज्योतीप्रमाणेच ही अखंड विचारदीपमाला मनामनांत ज्ञानानंदाचा प्रकाश पसरवते!! तुमचे आमचे जीवन या सकारात्मकतेच्या परीसस्पर्शाने उजळून निघो हीच सदिच्छा!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 1:09 am

Web Title: dasara special dasara festival of leaves and flowers
टॅग Dussehra
Next Stories
1 दसरा विशेष : आर्थिक घसरणीतही झळाळी कायम
2 दसरा विशेष : गुंतवणुकीचा ‘सोन्यासारखा’ पर्याय
3 दसरा विशेष : साज सोन्या-चांदीचा
Just Now!
X