26 February 2020

News Flash

दसरा विशेष : गुंतवणुकीचा ‘सोन्यासारखा’ पर्याय

अडीअडचणीला त्वरित उपयोगी पडणारं सोनं आता गुंतवणुकीचे माध्यम म्हणून प्रचलित झालेलं आहे.

सोनं

अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

सोन्यात गुंतवणूक करता आहात, तर ‘गोल्ड ईटीएफ’कडेदेखील लक्ष द्या. १०० टक्के शुद्ध सोन्याची हमी, खरेदी केलेल्या सोन्याच्या सुरक्षेची जोखीम नाही, खरेदी-विक्री करणेदेखील सोपे, संपत्ती कर भरावा लागत नाही, घडणावळीची किंमत मोजवी लागत नाही, अशा गोष्टींमुळे गोल्ड ईटीएफ लाभदायक ठरते आहे.

सोनं हा विषय भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आहे. प्रतिष्ठा आणि श्रीमंतीचे लक्षण म्हणजे सोने. भारतीय महिलांच्या शंृगारातील अविभाज्य घटक म्हणजे सोने. म्हणून तर सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. तळागाळापासून वरच्या स्तरापर्यंत प्रत्येकाला सोन्याचे आकर्षण असतेच. मात्र, अडीअडचणीला त्वरित उपयोगी पडणारं सोनं आता गुंतवणुकीचे माध्यम म्हणून प्रचलित झालेलं आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक संकटातून बाहेर पडण्यासाठी संचित केलेलं सोनंच आपल्याला साथ देतं. मग, ही गुंतवणूक तितकीच सजग आणि जाणीवपूर्वक का करू नये? सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत; परंतु त्यापैकी ‘गोल्ड ईटीएफ’ हा पर्याय सध्या लोकप्रिय आहे.

२००६ मध्ये ऑस्ट्रेलियात प्रथम ‘गोल्ड ईटीएफ’ या संकल्पनेची सुरुवात झाली. त्यानंतर इंग्लंड आणि अमेरिकेनंतर भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरला. ‘गोल्ड ईटीएफ’ म्हणजे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड होय. यामध्ये धातू स्वरूपात किंवा अलंकार स्वरूपात सोने खरेदी केले जात नाही, तर ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विकत घेता येते. खरेदी केलेल्या सोन्याची पावती खरेदीदाराला मिळते. म्हणूनच त्याला ‘पेपर गोल्ड’ असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे तुम्ही डीमॅटद्वारे शेअर्सची खरेदी-विक्री करता, अगदी त्याचप्रमाणे ‘गोल्ड ईटीएफ’ची खरेदी-विक्री करता येते. मात्र, त्यासाठी आपल्याला डीमॅट खाते उघडावे लागते, कारण हा व्यवहार डीमॅट खात्याद्वारेच करता येतो.

‘गोल्ड ईटीएफ’मध्ये सोने खरेदी करण्याचे परिमाण वेगळे आहे. त्याला युनिट्स असे म्हणतात. साधारणपणे एक ग्रॅम सोने म्हणजे एक युनिट्स मानले जाते. जेवढे युनिट्स खरेदी करता तेवढी युनिट्स तुमच्या डीमॅट खात्यामध्ये जमा होतात. प्रत्येकाला एकरकमी सोने खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळी गोल्ड ईटीएफ उपयोगी पडते. समजा, तुम्हाला ३० ग्रॅमचा सोन्याचा दागिना खरेदी करायचा आहे. मात्र, तुमच्याकडे इतके पैसे नाहीत. अशा वेळी तुम्ही बाजारातून दर महिन्याला ५०० रुपयांचे सोने खरेदी करू शकत नाही; पण गोल्ड ईटीएफमध्ये दर महिन्याला अगदी ५०० रुपयांमध्येसुद्धा सोने खरेदी करू शकता किंवा तितकी युनिट्स विकत घेऊ  शकता. ते सोने तुमच्याच खात्यात अप्रत्यक्ष स्वरूपात संचित होत राहते. तुमचे ३० ग्रॅम म्हणजेच ३० युनिट्स सोने खरेदीचे टार्गेट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही त्याचा प्रत्यक्ष दागिना तयार करू शकता. हळूहळू गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करत कालांतराने जास्त सोने खरेदी करता येऊ शकते. आता प्रश्न उपस्थित होतो की, तुमच्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सोन्याचे किंवा पेपर गोल्डचे प्रत्यक्ष अलंकार स्वरूपात दागिने तयार करायचे कसे? तर, सोपं आहे. तुमच्या डीमॅट खात्यामध्ये असणारे गोल्ड ईटीएफ युनिट्स संबंधित सराफाच्या डीमॅट खात्यामध्ये ट्रान्स्फर करायचे. तो तुम्हाला पेपर गोल्डचे प्रत्यक्ष अलंकार स्वरूपात दागिने तयार करून देईल.

सोन्यामध्ये गुंतवणूक करताना नाणी, वळी, बिस्किट्स, बार आणि अलंकार स्वरूपात भारतात सोने खरेदी केली जाते. ही मागणी इतकी जास्त असते की, आपल्या देशात केवळ चार टक्के उत्पन्न होणारे सोने ती मागणी पूर्ण करू शकत नाही. परिणामी, ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला दरवर्षी सुमारे ८०० टन सोने आयात करावे लागते. या ८०० टन सोन्यापैकी साधारण ७५ टक्के सोने हे दागिने तयार करण्यासाठी वापरले जाते, तर उरलेले २५ टक्के सोने (धातू स्वरूपातील) बचत म्हणून ठेवते जाते. दागिने तयार करण्यासाठी वापरलेले सोने म्हणजे घाटय़ाचा सौदा म्हणावा लागेल, कारण एखादा दागिना तयार केला, तर त्याच्या घडणावळीची किंमत तुम्हाला मोजावी लागते. तसेच त्याच्यावरील संपत्ती करदेखील भरावा लागतो. म्हणजे खरेदीमधील १० ते १५ टक्के रक्कम ही दागिन्यांची विक्री करताना वजा होते. भविष्यात आपल्याकडे असलेल्या दागिन्यांची किंमत ही आपण मोजलेल्या किंमतीपेक्षा १५ टक्क्यांनी कमीच असते. तसेच स्थानिक सराफ आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या दर यांच्यामध्ये ३ ते ४ टक्क्यांची तफावत आढळते. याचबरोबर ब्रॅण्डेड कंपन्यांचे सोने खरेदी केले, तर जवळजवळ २३ टक्क्यांनी महाग मिळते. सारांश असा की, तुम्ही विकत घेतलेल्या सोन्याची किंमत ही विक्री करताना मिळत नाही.

याचा अर्थ प्रत्यक्ष धातू किंवा अलंकार स्वरूपात सोने खरेदी केले, तर तुम्हाला थोडा तोटा सहन करावाच लागतो. अशा वेळी गोल्ड ईटीएफ हा उत्तम पर्याय ठरतो. कारण, डीमॅट खात्याद्वारे विकत घेतलेल्या सोन्याचे स्वरूप इलेक्ट्रॉनिक असते. त्याला घडणावळीची किंमत असत नाही. ज्या किमतीला आपण सोने विकत घेतो तितक्याच किमतीला (जागतिक बाजारातील सोन्याच्या दरानुसार) पुन्हा त्याची विक्री करता येते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला संपत्ती कर भरावा लागत नाही.

सोन्याच्या शुद्धतेबाबत ग्राहक नेहमीच शंकाग्रस्त असतात. मात्र, गोल्ड ईटीएफमध्ये खरेदी केलेले सोने ९९.०५ टक्के शुद्ध असते. साधारणपणे २४ कॅरेटचे सोने हे अस्सल सोने मानले जाते. मात्र, अशा सोन्याचे दागिने तयार करता येत नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या सराफाकडून दागिने तयार करता तेव्हा ते सोने २२ कॅरेट किंवा १८ कॅरेटचे सोने असते. याचाच अर्थ ते शंभर नंबरी सोने असत नाही. मात्र, ज्या वेळी गोल्ड ईटीएफमध्ये तुम्ही सोने खरेदी करता तेव्हा ते २४ कॅरेटचे शुद्ध सोने असते, कारण त्यापासून आपण कोणतेही अलंकार तयार करत नाही. ते पेपर गोल्ड स्वरूपात विकत घेतो. हा शुद्धतेचा दर्जा प्रमाणित असल्याने तुम्ही अगदी निर्धास्तपणे गोल्ड ईटीएफ सोने खरेदी करू शकता.

याचा दुसरा फायदा असा की, गोल्ड ईटीएफमधील इलेक्ट्रॉनिक सोन्याचे प्रत्यक्ष दागिने तयार करून घ्यायचे असतील तर, संबंधित सराफाच्या डीमॅट खात्यावर तुम्ही विकत घेतलेले युनिट्स ट्रान्स्फर केल्यानंतर तो तुम्हाला दागिने तयार करून देतो. या वेळी तुम्हाला घडणावळीची किंमत मोजावी लागत नाही, कारण तुम्ही सराफाला दिलेले सोने २४ कॅरेटचे असते आणि सराफातर्फे तयार करून देण्यात येणारे दागिने २२ कॅरेटचे असतात. साहजिकच घडणावळीची किंमत तुम्हाला मोजावी लागत नाही. तुम्ही धातू स्वरूपात किंवा अलंकार स्वरूपात सोने खरेदी करता, तेव्हा त्याच्या सुरक्षेची जोखीम स्वीकारावी लागते. असे सोने कपाटातील लॉकर्समध्ये किंवा बँकेतील सुरक्षित जमा कक्षामध्ये ठेवले जाते. मात्र, गोल्ड ईटीफची सुरक्षा फंड हाऊसद्वारे १०० टक्के घेतली जाते. असे सोने डिपॉझिटरी असल्याने गोल्ड ईटीएफला नामांकनाची सुविधा आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. बहुतांश लोक दसरा-दिवाळीमध्ये थोडे तरी सोने खरेदी करतात. अशा वेळी गुंतवणुकीच्या दृष्टीने धातू किंवा दागिन्यांच्या स्वरूपात मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केले जाते. मात्र, अशी खरेदी टाळून गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफमधील डीमॅटद्वारे खरेदी केलेले सोने सुरक्षित आणि लाभदायक ठरते. चला तर, यंदाच्या दसरा-दिवाळीमध्ये गोल्ड ईटीएफमधील सोन्यातील गुंतवणूक निश्चित करा.

First Published on October 4, 2019 1:07 am

Web Title: dasara special investment in gold
टॅग Dussehra
Next Stories
1 दसरा विशेष : साज सोन्या-चांदीचा
2 दसरा विशेष : सोन्याहून अनमोल कोल्हापूरचा शाही दसरा
3 दसरा विशेष : गरबो रमतो जाय…
Just Now!
X