News Flash

गणेश विशेष : तू विघ्नकर्ता, तू विघ्नहर्ता!

पुराणपरंपरा विनायकस्वरूपाची ही स्मृतिसूत्रे आपल्या कथांच्या भरजरी शेल्यातून अलगद गुंफून ठेवते.

गणेश विशेष : तू विघ्नकर्ता, तू विघ्नहर्ता!

प्रणव प्र. गोखले response.lokprabha@expressindia.com

गणपती म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत. अनंत नावारूपांनी नटलेल्या या गणरायाविषयी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वानाच जिव्हाळा असतो. मंगलपत्रिका असो वा घराची द्वारपट्टी, त्यांवर गणेशाची प्रतिमा नाही असं सहसा होत नाही. कार्याच्या निर्वघ्नि सिद्धीसाठी आरंभी गणेशपूजन केले जाते. विघ्नांचे निवारण करणारा गणपती विघ्नहर्ता म्हणून आज अधिक प्रसिद्ध असला तरी कधीकाळी त्याची नाना विघ्ने उत्पन्न करणारा विघ्नकर्ता अशीच ओळख होती. आज भक्तिविषय झालेला हा देव कधीकाळी लोकांच्या भीतीचा विषय होता. तर अशा या लोकप्रिय देवतेच्या, विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता या प्रवासाचा आपल्याला येथे थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. खरंतर हा प्रवास गणेश दैवताचा नसून त्या दैवताविषयी प्रचलित असणाऱ्या व काळानुसार बदलत आलेल्या विविध जनधरणांचा हा प्रवास आहे. (सूर्य जसा सर्व ऋतूंमध्ये सामानच असतो मात्र तो कधी ग्रीष्म ऋतूत नकोसा वाटतो तर कधी शिशिराच्या थंडीमध्ये हवाहवासा वाटतो. त्याप्रमाणे दैवतांची स्वरूपे ही अविकारीच असतात मात्र त्यांच्याविषयी वाटणारी भीती वा भक्ती ही कालसापेक्षतेने बदलत जाते.)

वैदिक वाङ्मयातील विनायक : आज प्रचलित असणारे गणेशाचे रूप व उपासना वेदांमध्ये जशीच्या तशी आढळत नसली तरी त्यांची बीजे वैदिक वाङ्मयामध्ये निश्चितच आढळतात. वेदांमध्ये वर्णिलेल्या ब्रह्मणस्पती या देवतेचे पुराणातील परिष्कृत रूप म्हणजे गणपती आहे असे अनेक विद्वानांनी प्रतिपादिले आहे. काहींनी वैदिक दैवतसंघातील मरुद्गण कल्पनेमध्ये गणपती देवतेच्या स्वरूपविकासाची बीजे असल्याचा तर्क मांडला. या सर्वाव्यतिरिक्त एक फार महत्त्वाचा विनायकांचा संदर्भ, कल्प या वेदांगात गणल्या जाणाऱ्या  गृसूत्रांमध्ये येतो. या विषयाच्या दृष्टीने कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील बौधायनगृसूत्र, मानवगृसूत्र तसेच बजवापगृसूत्र हे ग्रंथ अतिशय महत्त्वाचे ठरतात. याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये तर यावर एक स्वतंत्र गणपतिकल्प नावाचे प्रकरण आले आहे. विनायक हे गणेशाचेच एक नाव म्हणून आहे. ‘न विद्यते नायक: यस्य स:विनायक:’ अशी या शब्दाची व्युत्पत्ती केली जाते. अर्थात ज्याचा कोणीही नायक नाही म्हणजे ज्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही तो विनायक होय. गृसूत्रांमध्ये विनायक हा शब्दप्रयोग अनेकवचनी केला आहे. अर्थातच तेथे विनायक म्हणजे एकाहून अधिक देवतांचा एक गण (समूह) कल्पिलेला आहे. या विनायकांची संख्या काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी सहा सांगितली आहे.

अथातो विनायकान् व्याख्यास्याम:।

शालकटङ्कटश्च कूष्माण्डराजपुत्रश्चोस्मितश्च देवयजनश्र्च्ोति ।

(मानवगृसूत्र २/१४/१-२)

शालकटंकट, कूष्माण्डराजपुत्र, उस्मित आणि देवयजन या चार विनायकांचा उल्लेख मानवगृसूत्रात येतो. याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये (१/२८५) – मित, संमित, शाल, कटंकट, कूष्मांड, राजपुत्र या सहा विनायकांचा उल्लेख येतो. (विशेष म्हणजे गणेशभक्तिप्रधान संप्रदायातील गणेशसहस्रनामामध्ये ही नावे येतात- कटङ्कटो राजपुत्र: शालक: सम्मितोऽमित: । कूष्माण्डसामसम्भूतिर्दुर्जयो धूर्जयो जय: ११-१२)

थोडक्यात विनायकांच्या नेमक्या संख्येबद्दल अनेक मतमतांतरे असल्याचे स्पष्ट होते. मात्र या विनायकांद्वारे केल्या जाणाऱ्या उपद्रवांचे वर्णन बहुतांशी सर्वत्र सारखेच आहे. हे विनायक मनुष्यांना पछाडतात. त्यांद्वारे पछाडलेल्या माणसांची विस्तृत लक्षणे पूर्वोक्त ग्रंथांमध्ये येतात. विनायकांद्वारे पछाडल्या गेलेल्या व्यक्तीला वाईट स्वप्ने पडतात. अशा व्यक्ती स्वप्नांत स्वतला पाण्यात बुडताना वा हिंस्र मांसाहारी श्वापदांवर चढताना पाहतात. कधी त्यांना पूर्ण मुंडन केलेली व विटकरी रंगांची वस्त्रे धारण केलेली माणसे दिसतात, तर कधी आजूबाजूला गाढव, उंट असे अमंगल पशू वा माणसे वावरत असल्याचा भास त्यांना होतो. एकटे असतानादेखील सतत कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असे त्यांना वारंवार वाटत राहते. त्यांचे मन:स्वास्थ्य वारंवार ढळते.  विचार आणि कृती या उभयपक्षी अशा व्यक्ती वैफल्यग्रस्त होतात. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वीच ते नकारात्मक विचार करायला लागतात. मग अशा व्यक्ती भले अगदी राजवंशातल्या असल्या तरी त्यांना राज्याधिकार मिळत नाही, उपवर झालेल्या सुस्वरूप युवक-युवतींनाही योग्य जोडीदार मिळत नाही. विवाहितांना अपत्यप्राप्ती होत नाही, विद्वानांना त्यांच्या योग्यते अनुरूप स्थान-मान मिळत नाहीत, व्यापारात वारंवार तोटा होतो, शेतीचे म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. अशा विविध समस्या या विनायकांद्वारे पछाडले गेल्याचे लक्षण आहे असे उल्लेख ग्रंथांतरी आढळतात. थोडक्यात आज आपण जी वेगवेगळी विघ्ने वा संकटे मानतो ती सर्व विनायकांमुळे येतात अशी धारणा तेथे स्पष्ट दिसते. वर उल्लेखिलेल्या बाधेवरील उतारा म्हणून बौधायनगृसूत्र आणि याज्ञवल्क्यस्मृती यांत विनायकशांतिचे विधान वर्णिलेले आहे. बाधित व्यक्तीला विविध औषधी द्रव्यांनी युक्त पाण्याने समंत्रक स्नान घालणे,  त्यानंतर बाधिताकडून विनायकांची व त्यांच्या गणप्रमुखाची पूजा व अखेर सर्व विनायकांसाठी चव्हाटय़ावर बलिकर्म करविणे; हे विधि त्यांत सांगितले आहेत. विनायकांसाठी कोणत्याही पशुबळीचा उल्लेख येत नाही. मात्र विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सुपामध्ये घालून ते चव्हाटय़ावर नेऊन ठेवावेत असे वर्णन बलिविधानात येते. या खाद्यपदार्थामध्ये विशेषत उंडेरक आणि मोदकांचाही उल्लेख आढळतो.

तर अशा या विनायकगणाचे वैदिकसाहित्यातील रूप आपण पाहिले. पुराणेतिहासामध्येही विनायकांविषयीच्या या कल्पनांची काही सूत्रे हाती लागतात. उदा. महाभारताच्या काही प्रतींमध्ये प्रारंभी ॐ नम: सर्वविघ्नविनायाकेभ्य: असा विनायका शब्दाचा अनेक वचनी प्रयोग असो किंवा –

‘‘डाकिन्यो यातुधान्याश्च कूष्माण्डा येऽर्भकग्रहा:।

भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षोविनायका:।।’’

हा भागवतपुराणामध्ये (१०/६/२७) येणारा यक्ष-राक्षसांसोबतचा उल्लेख; विनायकाच्या स्वरूपकल्पनेमागे तात्कालीन समाजाला भासणारे उपद्रवमूल्य या सर्व संदर्भातून जाणवत राहते. लोकसंप्रदायामध्ये फार प्राचीन काळापासून देवांप्रमाणेच यक्ष-राक्षसांचीही पूजा केली जात होती. या यक्ष-राक्षसांची ठाणी ही सामन्यत चव्हाटा, चत्यवृक्ष वा त्यांचे पार, स्मशान या ठिकाणी असत. त्यांचा अवमान झाल्यास हे यक्ष-राक्षस लोकांना पछाडतात अशी समजूत होती. मग त्यांच्याही शांतीसाठी केली जाणारी विधिविधाने ही विनायकशांतीप्रमाणेच असत. एकूणच रुद्र, चंडी, स्कंद आणि विनायक या दैवतांच्या उपासनांमध्ये कुठेतरी या यक्ष-राक्षसपूजेमधील यातुप्रधान परंपरांचा समन्वय अथवा उन्नयन झाल्याचे स्पष्ट जाणवत राहते.

पुराणागमांच्या परंपरेमध्ये बदलत्या काळाबरोबर विनायकगणांचे संदर्भ हळूहळू अस्पष्ट होताना दिसतात मात्र त्याचबरोबरीने गणांचा अधिपती म्हणून गणेश गजानन हा हरी-हरांच्या बरोबरीने तितकाच लोकप्रिय देव होत गेल्याचेही स्पष्ट दिसते. जो विघ्न निर्माण करतो तोच ती घालविण्यासही समर्थ असतो या न्यायाने विघ्नकर्त्यां विनायकाला प्रसन्न केले तर तो आपल्या उपासकांसाठी विघ्नहर्ता मंगलमूर्ती होतो ही धारणा जनमानसात अधिक दृढ होत गेली. त्यावर आधारित अनेक कथाख्यानेही पौराणिक ग्रंथांतून वर्णिली गेली. या स्थित्यंतरांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आज पुजल्या जाणाऱ्या विघ्नहर्त्यां गजाननाच्या  स्वरूपामागे दडलेला विघ्नकर्ता पूर्णत लुप्त होत नाही. पुराणपरंपरा विनायकस्वरूपाची ही स्मृतिसूत्रे आपल्या कथांच्या भरजरी शेल्यातून अलगद गुंफून ठेवते. म्हणूनच तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या नामावलीतील विकट, विघ्नराज, प्रमथपती ही भयसूचक विशेषणे आपण तितक्याच भक्तिभावाने उच्चारतो. वक्रतुंड, लंबोदर ही नावे घेतानाही आपल्याला गजाननाचे महा-लावण्य-लाघवच आठवते.

हे सर्व पाहत असताना, सहजच मनात एक विचार डोकावतो – नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता, वैरुप्यामध्ये सौंदर्य, वाईटामध्ये चांगले पाहण्याचे याहून उत्तम उदाहरण जगात आणखी कोठे असणार!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2021 1:46 am

Web Title: ganesh chaturthi 2021 ganesh festival 2021 ganeshotsav 2021 article 01
Next Stories
1 मर्यादांवर मात!
2 सणासुदीत कोविडचे आव्हान
3 पालकच म्हणतायत.. पडद्यावरची शाळा आता पुरे
Just Now!
X