काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये उनातील घटनेनंतर देशभरातील गोशाळा आणि गोरक्षकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. सद्य:स्थितीत विदर्भातील ६० टक्के गोशाळांची स्थिती अतिशय विदारक असून चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गोशाळांमधून गोसेवेसोबतच त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कृषी आणि आरोग्यक्षेत्रासोबत बेरोजगारांना रोजगाराचे साधन निर्माण करून देण्यासाठी काही गोशाळा प्रयत्न करीत आहेत.

भारतात जोपर्यंत राजेरजवाडे राज्य करीत होते तोपर्यंत गोवध हा मनुष्यवधाइतकाच अपराध समजला जात होता. पुढे देशावर अनेक आक्रमणे झाली. आक्रमकांनी येथील धर्म नष्ट करण्यासाठी जे उपाय योजले त्यात एक होता गोवध! मराठे, राजपूत आणि शीख हे राजे गोरक्षणकर्ते होते. गोहत्येवरून आंदोलन होत असताना त्या काळात इंग्रज हे गोहत्येचे खरे मूळ होते, त्यामुळे देशभरात टीका होऊ लागली आणि त्याच काळात इंग्रज गेले, काँग्रेस आली व गोरक्षणासाठी गोरक्षा समिती स्थापन केली. त्यात सहा सरकारी व सात जनतेचे प्रतिनिधी नियुक्त केले होते. उपयोगी पशूंचा वध तात्काळ थांबवावा आणि लंगडय़ा, लुळ्या, म्हाताऱ्या गाईसाठी गोसदने तयार करण्यात यावीत, असा ठराव करण्यात येऊन तो देशभर उपयोगात आणला गेला. आज प्रत्येक राज्यात गोशाळा निर्माण झाल्या असल्या तरी सरकारचे कुठलेही अनुदान त्यासाठी नसल्यामुळे अनेक गोशाळा हलाखीच्या परिस्थितीत आहे, तर काही गोशाळांमध्ये गाईंची सेवा करण्यासोबत समाजपयोगी आणि लोकहिताच्या दृष्टीने काम करीत आहेत.

विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत सुमारे १६० छोटय़ा-मोठय़ा गोशाळा असून त्यातील ४० टक्के गोशाळांमध्ये गाईंची सेवा करण्याबरोबरच त्या ठिकाणी विधायक आणि सकारात्मक उपक्रम राबविले जातात. पण तरीही ६० टक्के गोशाळांमध्ये आर्थिक परिस्थिती, सोयी-सुविधा आणि गोरक्षकांच्या हलगर्जीपणामुळे गाईंची विटंबना होत असल्याचे समोर आले आहे. त्यावर सरकारचे मात्र कुठलेही नियंत्रण नाही. गाय सुखी तर देश सुखी, असे आज बोलले जात असताना सरकारने काही राज्यांमध्ये गो हत्याबंदी कायदा लागू केला. मात्र गोशाळांसाठी असलेली व्यवस्था, नियमावली आणि धोरण ठरविले नाही, त्यामुळे आज अनेक गोशाळांची स्थिती फारच गंभीर असल्यामुळे गाईंची विटंबना होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत पोलिसांकडून कसायांच्या ताब्यातील सोडविण्यात आलेली जनावरे गोसेवा करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे सोपविली जात असून त्यातून अनेक गोशाळांमध्ये गाईंची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह काही सामाजिक संघटनांनी आणि दानशूर व्यक्तींनी गोसेवेसाठी पुढाकार घेऊन गोशाळा सुरू केल्या आहेत. विदर्भात गोरक्षणाच्या नावाने ट्रस्ट स्थापन केले असून त्या माध्यमातून गोशाळा सुरू केल्या असल्या तरी त्यापैकी ८० टक्के गोशाळा आर्थिक कारणांमुळे दुलíक्षत आहेत. काही गोभक्त हौसेखातर त्या सुरू करतात. मात्र त्यांच्याकडे पुरेशी जागा आाणि गाईंची सेवा करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अशा विदर्भातील अनेक गोशाळांची अवस्था फारच गंभीर झाली आहे.

नागपूर जिल्ह्य़ात कुही तालुक्यातील सिल्ली या गावात दत्तुराम जीभकाटे या व्यक्तीने १९९० पासून सरकारी जागेवर अतिक्रमण करून गोशाळा सुरू केली. गावातील चार-पाच लोकांना सोबत घेऊन ट्रस्ट स्थापन केल्यावर अनेक वर्षांपासून तेथे गोसेवेच्या नावाखाली गाईंची विटंबना केली जात आहे. त्यांच्याकडे १७० पेक्षा जास्त जनावरे आहेत. त्यातील शंभरपेक्षा जास्त मरणासन्न असून त्यांच्यावर कुठलेही उपचार होत नाहीत. मृत झालेली जनावरे गावातीलच नदीत फेकली जात असल्यामुळे गावात प्रदूषण वाढले आहे. स्वत:ला बजरंग दलाचा माजी पदाधिकारी म्हणवून घेणाऱ्या या दत्तुराम जीभकाटेचा गोसेवेच्या नावाखाली असलेला भंपकपणा अलीकडेच समोर आला. अशाच पद्धतीच्या गोशाळा अमरावती, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, लाखनी, काटोल, रामटेक, हिंगणा येथेही आहेत. नागपूर जिल्ह्य़ात शांतीनगर परिसरात कुत्तेवाला बाबांच्या मठात गोशाळा आहे. मात्र, तेथीलही स्थिती विदारकच आहे. लाखनी परिसरातील गोशाळेत गाईंची सेवा करताना तेथे स्वच्छता राखली जात नाही आणि गाईंवर उपचारही केले जात नसल्याने गायींची अवस्था वाईट आहे. काही दानशूर या गोशाळांना आर्थिक मदत देत असले तरी त्याचा उपयोग जनावरांसाठी होत नसल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

एकीकडे विदर्भातील काही गोशाळांची स्थिती अतिशय गंभीर असतानाच काही गोशाळांमध्ये गाईंची सेवा करण्यासोबतच शेण, गोमूत्राचा उपयोग कृषी आणि आयुर्वेदातील औषध निर्मितीसाठी केला जात असून त्याचा समाजासाठी उपयोग होत आहे. नागपूरपासून ७० कि.मी.वरील जबलपूर मार्गावर देवलापार परिसरात गेल्या २०-२५ वर्षांपासून गोविज्ञान अनुसंधान केंद्राची गोशाळा असून तेथे ६०० पेक्षा अधिक गाई आहेत. पंचगव्यासोबत विविध संशोधन प्रकल्प तेथे राबविले जात आहेत. विविध व्याधींवर आयुर्वेदिक औषधांची आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची निर्मिती करण्यात येत असून देशभरात ती पाठविली जात आहेत. शिवाय कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेती करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून त्याचा फायदा अनेकांना झाला. युवकांना या गोशाळेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्य़ात २६ गोशाळा आहेत. अकोलामधील आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पात विविध विधायक उपक्रम राबविले जातात. या गोशाळेत १०४६ गाई असून त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांपासून त्यांना लागणाऱ्या खाद्याची व्यवस्था केली जाते. मोठय़ा प्रमाणात दुधाची विक्री तेथे  होत असून अनेकांना रोजगारही दिलेला आहे. आकोटमधील गोरक्षण सेवा समितीत सुमारे ५०० गाई आहेत. याशिवाय, वर्धाला सेवाग्राममधील गोशाळेत विविध प्रकल्प राबविले जात असून गाईंची सेवाही केली जात आहे. नागपूर शहरात बर्डी परिसरात गोरक्षण सभेची गो शाळा, कान्होलीबारामध्ये बृहस्पती मंदिरातील गोशाळा, चंद्रपूरमध्ये हरिओम गोशाळांमध्ये गाईंची सेवा केली जात असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांना गाईंची आवश्यकता आहे अशांना त्या नि:शुल्क देण्याचे काम सावनेरमधील गोशाळेच्या माध्यमातून केले जात आहे असले तरी तेथे सरकारचे कुठलेही आर्थिक अनुदान नसल्याने गाईंची अवस्था चांगली नाही.
राम भाकरे – response.lokprabha@expressindia.com