21 February 2019

News Flash

कधी होणार यांचं लग्न?

जगभरातल्या माध्यमांचं ज्याच्याकडे लक्ष असतं असा, देशातल्या सगळ्यात प्रसिद्ध कुटुंबाचा हा युवराज.

कधी होणार यांचं लग्न?

अमुकतमुक माणूस लग्न कधी करणार, कसं करणार, कुणाशी करणार असे प्रश्न सतत मनात घोळवत राहणाऱ्या तमाम भारतीयांना ही दोनतीन मंडळी कधी उजवली जाणार, असा सनातन प्रश्न पडला आहे.

दोनाचे चार..

जगभरातल्या माध्यमांचं ज्याच्याकडे लक्ष असतं असा, देशातल्या सगळ्यात प्रसिद्ध कुटुंबाचा हा युवराज. इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर. याचं लग्न कधी होणार याचा घोर त्याच्या आईला, बहिणीला नसेल इतका काँग्रेसजनांना असणार. अर्थात इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर या त्याच्या उपाधीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक मुलींची ललग्नं झाली, त्या संसाराला लागल्या, पण राहुल गांधी काही अजून बोहल्यावर चढायला तयार नाहीत. नाही म्हणायला गुगलवर राहुल गांधी गर्लफ्रेण्ड असा सर्च दिला की त्यांचे एका परदेशी मुलीबरोबरचे फोटो दिसतात. हीच त्यांची गर्लफ्रेण्डपासून त्यांचा आता ब्रेकअप झालाय अशा वेगवेगळ्या हवाल्यांनी वेगवेगळ्या साइट्सवरच्या बातम्या समोर येतात. पण राहुल गांधी बोहल्यावर कधी चढणार याचं उत्तर काही मिळत नाही. मधल्या काळात विरोधकांनी त्यांची प्रतिमा अगदीच पप्पू अशी रंगवली होती. पण गुजरात निवडणुकांच्या काळात राहुल गांधींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचे ट्वीट्स, वेगवेगळ्या मंदिरांच्या फेऱ्या, त्यांची भाषणं, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या युती या सगळ्यातून त्यांची प्रतिमा बदलत गेली. गुजरात निवडणुकांत काँग्रेसला सत्ता स्थापण्याइतक्या जागा मिळाल्या नाहीत. या नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्षांनी विधानसभा जिंकली नाही पण लोकांची मनं मात्र जिंकली. आता त्यांची लोकांनी चांगल्या प्रकारे दखल घ्यायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी काहीही बोलले की त्यांच्या बाजूने आणि विरोधात असे तट पडायला सुरुवात झाली आहे. आधी त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना भरपूर साहित्य मिळायचं आणि त्यांच्या बाजूने बोलू इच्छिणाऱ्यांना मान खाली घालावी लागायची. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राजकारणात परिपक्व होत चाललेल्या राहुल गांधींनी लवकर बोहल्यावर चढावं आणि दोनाचे चार करावेत ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

आली लग्नघटिका समीप..? 

पृथ्वीराज कपूर यांचा पणतू, राज कपूर यांचा नातू अशी दमदार पाश्र्वभूमी असलेला रणबीर कपूर चित्रपटसृष्टीत आला तेव्हापासून चर्चेचा विषय ठरला आहे. देखणं रूप, अभिनयाचा वरदहस्त, नृत्यकौशल्य अशा बॉलीवूडमध्ये गरजेच्या असलेल्या गोष्टी त्याच्याकडे ओतप्रोत भरलेल्या. अशा वेळी त्याची भुरळ कुणाला पडणार नाही.. पण त्याच्याकडूनही प्यार का मामला फिट होऊन केमिस्ट्री जुळून आली ती दीपिका पदुकोणबरोबर. दोघंही समवयस्क, सिनेमासृष्टीत नव्यानेच आलेले लव्हबर्डस. पण त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सुरू होई होईपर्यंत ते संपूनही गेले होते. त्यांनतर रणबीरच्या आयुष्यात आली ती सुंदर कतरिना. अभिनय, संवादफेक, हिंदी बोलणं या पातळीवर मार खाणारी कतरिना सलमान खानचं बोट धरून बॉलीवूडमध्ये आली. पण प्रत्यक्षात चर्चा रंगल्या त्या तिच्या आणि रणबीरच्या. त्यांचं डेटिंग, त्यांनी घेतलेलं घर, त्यांचं लिव्ह इन रिलेशन या चर्चा पाहता हे क्यूट कपल लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जाऊ  लागला. खरं तर ते लग्न करणार ही चर्चा रणबीरच्या चाहत्या काळजावर दगड ठेवून करायच्या. पण बघता बघता ते सगळंच बिनसलं. कतरिना पुन्हा सलमानच्या कंपूत परतली आणि रणबीरच्या चाहत्या त्याच्या सिंगल स्टेट्समुळे पुन्हा खूश झाल्या. पण रणबीरनं त्यांना फार काळ हा आनंद उपभोगू दिला नाही. तो आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांना न्यूयॉर्कमध्ये एकत्र बघितलं गेलं आणि पुन्हा एकदा रणबीरचं खासगी आयुष्य चर्चेत आलं. त्याच्या आयुष्यातल्या या सगळ्या घडामोडींमुळे त्याची आई नीतू सिंग भयंकर काळजीत आहे आणि त्यांनी जोमाने लेकासाठी वधूसंशोधन सुरू केलं आहे असं कळते, समजते. बघू या आता त्यांच्या लेकाच्या अंगाला हळद कधी लागते ते!

हवेत शादी के लड्डू

पहिल्या दुसऱ्या सिनेमापासूनच ‘मैने प्यार किया’ असं सांगणारा हा दबंग खान अजूनही प्रेमाच्या पायऱ्या ओलांडून लग्न करायला तयार नाही. सलमान खानची लोकप्रियता पाहता त्याने पन्नाशी ओलांडली असली तरीही तो कधी लग्न करणार हा त्याच्या तमाम चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.  सलमान आणि वेगवेगळे वाद असं एक अपरिहार्य गणित आहे. काळवीट शिकार प्रकरणापासून ते गाडी चालवताना रस्त्यावर झोपलेल्यां पाच जणांच्या अंगावरून गाडी नेण्याचं, त्यात एक जण मृत्युमुखी पडण्याचं प्रकरण असो, आपला लेक या वादग्रस्त गोष्टींपासून चार हात लांब राहून संसाराला कधी लागणार ही चिंता सलीम खानना सतावतेच, शिवाय सलमानच्या चाहत्यांनाही आपल्या या बजरंगी भाईजाननं आता लग्न करून स्थिरस्थावर व्हावं असंच वाटतं. पण सलमान खान काही ते मनावर घ्यायला तयार नाही. आजही त्याचं नाव वेगवेगळ्या मुलींशी जोडलं जातं. ऐश्वर्या रायशी त्याचं नाव सगळ्यात पहिल्यांदा जोडलं गेलं. ऐश्वर्या आणि सलमानचं शुभमंगल होणार असं सलमानच्या चाहत्यांना वाटत असतानाच त्यांचं बिनसलं. अभिषेकशी लग्न करून ऐश्वर्या एका मुलीची आईपण झाली पण सल्लूमिया काही संसाराला लागायचं नाव घ्यायला तयार नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांना कतरिना कैफसारखी सुंदरीही भेटली. आता तरी सलमानची नाव किनाऱ्याला लागेल असं सगळ्यांना वाटत असतानाच तीही आपल्या वाटेनं निघून गेली. संगीता बिजलानी, सोमी अली यांचीही नावं सलमान खानशी जोडली गेली. पण सल्लूमिया काही दोनाचे चार झाले नाहीत. आताही सलमानचं नाव लुलिया वेंटूर हिच्याशी जोडलं जातंय. तो लग्न कधी करणार याच्या चर्चा रंगताहेत. पण सलीम खान आणि सलमानचे चाहते कुणालाच शादी के लड्डू मिळतीलच याची खात्री नाही.

First Published on January 26, 2018 1:15 am

Web Title: lokprabha wedding special issue article 6