गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात मोठीच धामधूम असते. सगळीकडे उत्साह, आनंद भरून राहिलेला असतो. हाच उत्साह, हीच धामधूम आपल्याला जिथे मराठी माणसं वास्तव्याला आहेत, अशा राज्यांमध्येही पहायला मिळते.

lp60कानपूर येथे १९२५ मध्ये तात्यासाहेब केळकर यांनी बृहन्महाराष्ट्र चळवळ संघटित करण्याच्या दृष्टीने सर्व महाराष्ट्रीय पुढाऱ्यांना एकत्र आणून बृहन्महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. या सर्व संस्थांचे कार्य जास्त सूत्रबद्ध करण्यासाठी त्यांच्या समान उद्देशांबाबत विचारविनिमय व्हावा, मराठी भाषा, संस्कृतीचे संवर्धन व प्रसार व्हावा, मराठा तितुका मेळवावा म्हणून त्यांचे मेळावे घडवून आणावे या दृष्टीने १९२६ साली बृहन्महाराष्ट्र परिषदेचे प्रथम अधिवेशन झांशी येथे ज. स. ऊर्फ तात्यासाहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ या मध्यवर्ती केंद्रीय संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली. मराठी भाषा संस्कृती जतन संवर्धनाचे कार्य बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिक अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. मंडळामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. वर्षभरातील राष्ट्रीय तसेच धार्मिक उत्सव साजरे केले जातात. गणेशोत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. आजही त्यावर महाराष्ट्राची छाप उमटलेली प्रकर्षांने जाणवते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप आजमितीपर्यंत महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी साधम्र्य राखूनच आहे याचा प्रत्यय येतो. गणेशोत्सवाचे औचित्य साधून एकत्र येणे हाच यामागचा उदात्त हेतू असतो. संपूर्ण बृहन्महाराष्ट्रात कमीअधिक फरकाने मराठमोळ्या वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. आतापर्यंत श्रीगणेशाच्या मूर्ती उत्सवासाठी लागणारी साधनसामग्री, इ. आवश्यक गोष्टी महाराष्ट्रातून मागविल्या जात असत; परंतु बदलत्या काळानुसार परिस्थितीप्रमाणे या गोष्टी ठिकठिकाणी उपलब्ध होऊ लागल्या. मूर्तिकारही निर्माण होऊ लागले. बऱ्याच ठिकाणी काही मंडळी मूर्ती स्वत:च्या हाताने घडवू लागली असून सजावटीचे साहित्यही स्वत:च्या कल्पनेनुसार तयार करतात. अनेक गणेशोत्सवांच्या सजावटीत राजकीय, शैक्षणिक असे देखावे उभे केलेले आढळून येतात. यातूनच नकळत समाजप्रबोधनाचे कार्यही केले जाते.
महाराष्ट्र परिचय केंद्र- दिल्ली येथील महाराष्ट्र शासन संचालित महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे श्रीगणेशाची स्थापना दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात करण्यात येते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना अथवा एक वेळची आरती करण्याची प्रथा आहे. सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर, भक्तगण या उत्सवात आपली हजेरी लावतात. दिल्ली येथील विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या गणेशमंडळांची नोंद परिचय केंद्रात केली जाते. अशा मंडळांची नावे असलेली पत्रिका केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येते. केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.
महाराष्ट्र मित्र मंडळ, लाजपतनगर
अंदाजे १२५ मराठी कुटुंबे असलेल्या या वसाहतीतील मंडळी वेळ मिळेल त्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची धडपड करीत असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आवर्जून ही मंडळी एकत्र येतात. पारंपरिक पद्धतीने, विधिवत गणेशमूर्तीची स्थापना, पूजाअर्चा होते. विविध स्पर्धाचे, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
पूर्वाचल महाराष्ट्र मंडळ
पूर्वाचल महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात प्रामुख्याने विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात येते. पाचव्या दिवशी भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेतात. मंडळाच्या गणेशाची मूर्ती, मूर्तिकार श्री. वाघ यांच्या हस्ते तयार करण्यात येते. दिल्लीतील या अग्रगण्य महाराष्ट्र मंडळाच्या उत्सवाला दिल्लीतील मराठी मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. १९८४ पासून हा उत्सव सातत्याने साजरा केला जातो. उत्सवाच्या काळात कीर्तन, हौशी मंडळींचे नाटय़प्रयोग, बालगोपाळांसाठी विविध स्पर्धा, संगीत रजनी, बालगोपाळांसाठी जादूचे प्रयोग आणि सर्वाचा आवडता कौतुक सोहळा म्हणजे बक्षीस समारंभ, इ. कार्यक्रम केले जातात. मंडळातर्फे गणेश उत्सवाच्या निमित्ताने ‘स्मरणिका’ प्रकाशित करण्यात येते. यात उत्साही मंडळींनी लिहिलेले लेख, कविता यांचा समावेश असतो. या स्मरणिकेची विशेषता म्हणजे मंडळाने चालविलेल्या वधुवर सूचक मंडळात नोंदणी केलेल्या मुलामुलींची संपूर्ण माहिती तसेच मंडळातील सर्व सभासदांची डिरेक्टरी असते.
मराठा मित्र मंडळ/ चौगुले हायस्कूल
चौगुले हायस्कूलच्या विद्यालयाच्या उपस्थितीत मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे मराठा मित्र मंडळाचे लेझीम, गणेशोत्सवाला मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. सर्व स्तरांवरील लोकांची उपस्थिती असते. अनेक पालक-वर्गाकडून प्रसाद दिला जातो. करोलबाग वगैरे भागांतून मिरवणूक काढून श्रींचे आगमन होते. तसेच ढोल-ताशांच्या, लेझीमच्या गजरात वाजतगाजत विसर्जन केले जाते.
वसुंधरा एन्क्लेव्ह, सह्य़ाद्री अपार्टमेंट, मयूर विहार महाराष्ट्र मंडळ, करोलबाग महाराष्ट्र मंडळ अशा अनेक मंडळांत पाच दिवस उत्सव साजरा होतो. गणेश मूर्तीचे विसर्जन दहाव्या दिवशी एकत्रितपणे वाजतगाजत केले जाते. गुडगावमध्येही अलीकडे मराठी वस्ती वाढत असल्यामुळे विविध ठिकाणी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
सार्वजनिक उत्सव समिती
१९८९ मध्ये मध्यवर्ती गणेशोत्सव समिती या नावाने सुरू झालेल्या या संस्थेचे १९९५ मध्ये ‘सार्वजनिक उत्सव समिती’ असे नामांतर करण्यात आले. गणेशोत्सवाच्या वेळी आयोजित उत्सव प्रामुख्याने मराठी कलाकार आणि विविध कलाकृतींना राष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आणण्यासाठी योजला जातो. पाच दिवस विधिवत पूजन केल्यानंतर, दिल्ली शहरातील विविध भागांतील गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन मात्र सार्वजनिक उत्सव समितीच्या गणेशमूर्तीबरोबर केले जाते. शेवटी या उत्सावाचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात होते. करोलबाग, चांदनी चौक, इ. भागांतून ही मिरवणूक जाते. शेवटी हिंडण नदीवर अथवा यमुना नदीच्या पात्रात विसर्जित होते. या वेळी मिरवणुकीला सार्वजनिक स्वरूप प्रप्त झालेले असते.
इतर विविध भागांतील गणेश उत्सवाची सांगता पाचव्या दिवशी होते. त्यानंतर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे विविध दर्जेदार, गाजलेले कार्यक्रम आयोजित केले जातात. याचा उद्देश एकच असतो तो म्हणजे जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांना दर्जेदार कार्यक्रम पाहायला-ऐकावयाला मिळावे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे दोन गाजलेली नाटके त्यापैकी ‘एक लव्हबर्ड्स’ आणि उषाताई मंगेशकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम होय.

lp61गुजरात
गुजरातमध्ये मराठी भाषा, संस्कृती आजही विशेषत्वाने दिसून येते. १९६० पर्यंत मुंबई इलाका असल्यामुळे भाषा, संस्कृतीची देवाणघेवाण कायम राहिली. येथे विविध भागांत गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. शाडूच्या मूर्ती किंवा इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर गुजरातमध्ये बंदी आहे. लोकही त्याचा कटाक्षाने अवलंब करतात. येथील गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरा करण्यात येतो. पूर्वी कांकरिया तलावात गणेश मुर्तीचे विसर्जन केले जात असे. पर्यावरणाच्या दृष्टीने आता मूर्ती विसर्जन साबरमती नदीमध्ये केले जाते.
नवयुवक महाराष्ट्र मंडळ
मराठीपण टिकविण्याच्या दृष्टीने गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. त्या वेळी संगीत कार्यक्रम, स्थानिक मंडळींनी बसविलेल्या नाटकांचे प्रयोग, मुलांसाठी जादूचे प्रयोग, इ. विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जातो.
बालगणेश मित्र मंडळ
या मंडळाची स्थापना केवळ गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशानेच झाली.
महाराष्ट्र समाज गांधीनगर येथे नोकरीनिमित्ताने आलेल्या मंडळींना एकमेकांची ओळख, परिचय व्हावा या हेतूने मंडळाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकोपा वाढला आणि आज त्याचा वटवृक्ष झाला. छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात मराठी सण, सार्वजनिकरीत्या श्रीगणेश उत्सव साजरे करू न मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. वेळोवेळी मराठीत व्याख्याने व संगीताच्या मराठी भजनांकरवी मायबोली मराठीची जोपासना केली जाते. या प्रवृत्तीस व वेशभूषा स्पर्धेस प्रोत्साहन दिले जाते.
मराठा मित्र मंडळातर्फे मोठय़ा प्रमाणावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१९६२ साली या मंडळाची स्थापना केवळ सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने झाली. गणेशोत्सवाच्या वेळी उत्तम कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून मराठी भाषा संस्कृतीचे जतन केले जाईल. स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम हा या मंडळाचा विशेष हेतू असतो. त्यामुळे स्थानिक कलाकारांचे नाटकांचे प्रयोग, गाण्यांचे कार्यक्रम केले जातात.

lp62

मणिनगर महाराष्ट्र मंडळ
मणिनगर येथील गणेशोत्सव १० दिवस साजरा केला जातो, याचा विशेष म्हणजे पर्यावरण, ‘स्त्रीभ्रूणहत्या’ इ. सामाजिक विषयांवर आधारित कलाकृती करण्यावर भर दिला जातो.
सार्वजनिक गणेशोत्सव समिती
१९७० च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या या समितीचा मुख्य हेतू सार्वजनिक गणेशोत्सव हाच असल्याने त्या दृष्टीने एक ट्रस्ट स्थापन करून तो रजिस्टर करण्यात आला. नियमितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या उद्घाटनास गुजरातचे राज्यपाल येतात, तद्वत मंत्रिमंडळाचे व विधानसभेचे सदस्य आवर्जून दर्शनास येतात.
मंगल भुवन भद्र येथील गणेशोत्सव १० दिवस साजरा करण्यात येतो. या काळात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते.
दत्तमंदिर मेहसाणा
येथील गणेशोत्सव पाच दिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो.
बडोदे
सयाजीराव गायकवाड यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बडोदे नगरीत आजमितीला मराठी संस्कृतीचे दर्शन प्रकर्शाने घडते. येथील मंडळींची महाराष्ट्राशी नाळ अतूट आहे. त्यामुळे येथील गणेशात्स्वाचे स्वरूप महराष्ट्रातील उत्सवाशी मिळतेजुळते आहे. महराष्ट्रातील गणेशोत्सवाप्रमाणेच येथील उत्सव साजरे होतात. गणेशमूर्तीची आरास, पद्धत, इ. विविध कार्यक्रमांचे आयोजनही महाराष्ट्रातील संस्कृतीशी साधम्र्य साधणारे असते. येथील जुम्मादादा आखाडय़ात १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ गणेशोत्सव सातत्याने साजरा करण्यात येतो. या वेळी मुलामुलींची व्यायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतात. याचबरोबर गणेशात्सवात इतरही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
नवसारी श्रीगणेश मंडळ
नवसारीतील महाराष्ट्रीयांत सहचर्य व संघटन या तत्त्वावर महाराष्ट्रीय संस्कृती व आदर्श कायम टिक विण्यासाठी १९२३ मध्ये गणेश मंडळाची स्थापना गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. सातत्याने दरवर्षी गणेशोत्सव विधिवत साजरा केला जातो.
महाराष्ट्र मित्र मंडळ, वापी
वापी दक्षिण गुजरातच्या सीमेवर असलेले एक छोटेसे गाव. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अनेक कुटुंबे नोकरी-धंद्याच्या निमित्ताने आली. अशीच काही कलासक्त, समाजकार्याची आवड असलेली मंडळी एकत्र आली आणि १९७३ मध्ये मंडळाची स्थापना झाली. गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विविध विषयांवर व्याख्याने, संगीताचे कार्यक्रम, नाटय़प्रयोग मंडळातर्फे आयोजित केले जातात. महिला व बालवर्गाच्या संबंधित स्पर्धाचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्र समाज, अमरेली
अमरेली हा पूर्वी गायकवाड स्टेटचा प्रांत होता. त्यामुळे येथे मराठी छाप दिसून येते. गणेशोत्सव उत्साही वातावरणात, विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरा होतो.

lp63

गजानन मंडळी भद्र, पाटण
समग्र भारतात नव्हे तर समग्र आशिया खंडात सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ सर्वप्रथम गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्य़ात वसलेल्या ‘पाटण’ येथे झाला. श्रीगजानन मंडळी ही महराष्ट्रीय संस्था १८७८ पासून उत्तर गुजरातच्या पाटण या नावाच्या (एकेकाळी गुजरातची राजधानी असलेली) नगरीत अस्तित्वात असून, सातत्याने श्रीगणेशोत्सव साजरा करीत आहे. ही संस्था केवळ धार्मिक स्वरूपाचे कार्य करीत नसून गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकशिक्षण प्रदान करणारे व भारतीय संस्कृती जतन करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते. संस्थेच्या मालकीची श्रीगणेशवाडी नावाची इमारत असून, या जागी श्रींचा उत्सव मोठय़ा थाटामाटात शास्त्रोक्त पद्धतीने साजरा होतो. पाटण नगरीची जनता मोठय़ा उत्साहाने व भावनेने उत्सवात सहभागी होते.
महाराष्ट्र मंडळ गांधीधाम, कच्छ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त एकांकिका, मराठी व हिंदी नाटकांचे प्रयोग करण्यात येतात. संगीत व नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून स्थानिक कलाकारांना विशेषत: बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यात येते.
महाराष्ट्र स्नेह संवर्धक मंडळ, भुज
गणेशोत्सवाच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी निरनिराळ्या बौद्धिक स्पर्धाचे आयोजन, गुणी विद्यार्थ्यांना विद्वानांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते.
राजस्थान
नूतन महाराष्ट्र सेवा समिती, कोटा
नूतन महाराष्ट्र समितीतर्फे ५ दिवस गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पहिल्या दिवशी श्रींची विधिवत स्थापना उत्सवाच्या निमित्ताने विविध भागांतून एकत्र येणाऱ्या स्त्रियांसाठी संगीत संध्या व हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. भक्तांसाठी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन, एकपात्री प्रयोग, इ. कार्यक्रम केले जातात.
चितौडगढ महाराष्ट्र मंडळ
जिल्हा पर्यावरणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातो. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला सभासदांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो.
जोधपूर महाराष्ट्र समाज
सूर्यनगरी जोधपूरमध्ये १९०५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. गणेशोत्सवात एखादे मराठी नाटक सादर केले जाते. त्याचबरोबर सर्व वयोगटांतील व्यक्तीसाठी विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात येते. स्थानिक कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्याची संधी दिली जाते.

lp64

जयपूर महाराष्ट्र मंडळ
जयपूरमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९०१ मध्ये झाली. जयपूर ज्योतिष विद्येचे संस्कृत शिक्षणाचे प्रमुख स्थान असल्यामुळे मध्य भारत, महाराष्ट्र व आसपासचे विद्यार्थी विद्याध्ययनासाठी येथे येऊ लागले. महाराष्ट्रीय परिवार विभिन्न सणवारानिमित्त एकत्र येऊ लागले. हळदी कुंकू, श्रावणी, इ. निमित्ताने महाराष्ट्रीय स्त्रियांचे संबंध वाढू लागले. एका खोलीत गणपती स्थापनेला प्रारंभ झाला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व छोटी-मोठी नाटके करण्यासाठी घराच्या समोरच्या पटांगणात एक अस्थाई स्टेज बनविले जात असे. सुरुवातीला एक १६x१६ फुटाची जिप्सी हट बांधून त्यात मंडळाच्या भवनातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गेल्या ७० वर्षांपासून सातत्याने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात विविधरंगी कार्यक्रम साजरे केले जातात. दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे गणेशोत्सवाची परंपरा लक्षात घेऊन फक्त स्तरीय मराठी भाषी कार्यक्रमच सादर केले जातात. यात संगीत रजनी, नवोदित कलाकारांचे कार्यक्रम, सर्व वयोगटांसाठी खेळांच्या विविध स्पर्धा, हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार, इ.चा समावेश असतो.

 

बंगलोर महाराष्ट्र मंडळ
बंगलोरमधील महराष्ट्र मंडळाची गांधीनगरमधील इमारत १९३९ मध्ये बांधण्यात आली. समोरच्या आवारात मंडप घालून गणेशोत्सव उत्साहाने साजरा होऊ लागला, अगदी महाप्रसादाच्या पंगतीसह. आजही बंगलोर महाराष्ट्र मंडळात गणेशोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या या उत्सवात विविध कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्याने, इ. भरगच्च कार्यक्रम साजरे केले जातात. मुलांच्या अंगच्या गुणांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला जातो. महाप्रसादाचा अनंत चतुर्दशीचा दिवस वगळता सर्व दिवशी खाद्यपदार्थाच्या व वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स हे उत्सवाचे आकर्षण ठरते. यंदाच्या वर्षीदेखील मंडळाने विविधरंगी कार्यक्रम आखले आहेत.
श्रींची विधिवत स्थापना व पूजा झाल्यानंतर कीर्तनाने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर प्रत्येक दिवस प्रेक्षकांसाठी रसिक मंडळींसाठी खास असेल. कार्यक्रमांत कीर्तन, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे मराठीतून सादरीकरण, ‘हसवेगिरी’ हा एकपात्री प्रयोग, ‘हास्यकथी’ हा अभिजात विनोदी कथाकथनाचा कार्यक्रम, शिवानी मिरासदार यांचे उपशास्त्रीय गायन, नाटय़ाविष्कार, लेझीम खेळणारी पोरे, इ. कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्व लहानथोरांसाठी, महिलांसाठी, रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध गुणदर्शन व एकांकिका स्पर्धाचे आयोजन मंडळातर्फे केले आहे.

इथेही साजरा होतो गणेशोत्सव
देशभरातील पुढील काही ठिकाणी मराठी जनांकडून गणेशचतुर्थी साजरी केली जाते. पण त्यांची संख्या मात्र तुलनेत खूपच कमी आहे.
मराठी वाङ्मयप्रेमी मंडळ, गदग
१) ६ सप्टेंबर १९२९ गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाची स्थापना
२) मराठी मंडळ धारवाड
३) महाराष्ट्र मंडळ, हुबळी. १९३७ पासून गणेशोत्सवास सुरुवात
४) छत्रपती शिवाजी एज्युकेशन व कल्चरल सोसायटी, तमिळनाडू स्थापना १६.८.१९२६
५) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो)
६) कोची महाराष्ट्र समाज
७) कन्याकुमारी मराठी समाज- विशेष करून गणपती उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा
८) भुवनेश्वर महाराष्ट्र मंडळ (ओरिसा)
९) महाराष्ट्र मंडळ, सुनाबेडा (ओरिसा)
१०) महाराष्ट्र मंडळ, राऊरकेला (ओरिसा)