आवडत्या कलाकाराच्या आवडीनिवडीविषयी प्रेक्षक चोख माहिती ठेवतात. त्यांच्या कुटुंबाबाबतही अनेकांना उत्सुकता असते. त्यातही त्यांच्या लग्नसोहळ्यांविषयी तर विशेष कुतूहल. म्हणून काही कलाकार त्यांच्या लग्नसोहळ्याबाबत व्यक्त झाले आहेत. विवाहसंस्थेबद्दल त्यांनी त्यांची मतंही मांडली आहेत.

समजूतदारपणा आहे… – अभिजीत खांडकेकर

कॉलेजमध्ये अनेक मुलींनी प्रपोज केलं होतं, विचारलं होतं. पण मला ‘गोइंग अराऊंड’, ‘डेटिंग’ या गोष्टी कळायच्याच नाहीत. त्यामुळे मी अफेअर्सपासून थोडा लांबच असायचो. पुढे सिनेसृष्टीत करिअर करत असताना सुखदा माझ्या आयुष्यात आली. आम्ही लग्न करायचं ठरवलं. पूर्वी मी लग्नाबाबत फार विचार करत नसलो तरी सुखदासारखी जोडीदार मिळाल्यामुळे फार दडपण आलं नाही. लग्न हे गोड बंधन आहे. पण दोघांनी एकमेकांना सांभाळून, समजून घेतलं तर ते ‘बंधन’ बंधन वाटणारच नाही. उलट एकमेकांच्या साथीने सगळी ध्येये गाठतानाचा प्रवास सुखकर होतो. चांगल्या-वाईट काळात सोबत करणारी हक्काची व्यक्ती असते. हक्काचा मदतीचा हात असतो. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणं, सोबत राहणं यात लग्नाचा खरा अर्थ दडलाय. संसारात बायकोला थोडं आई व्हावं लागतं आणि नवऱ्याला वडील व्हावं लागतं. असं झालं तर लग्नाचं नातं आणखी खुलत जातं. आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमच्यात काही कुरबुरी होतात का, असा प्रश्न मला लोक विचारतात. पण, सुदैवाने मला याचा अजिबात अनुभव नाही. उलट आम्हा दोघांना एकमेकांच्या कौतुकात जास्त रस असतो. तिचं कौतुक होत असतं तेव्हा मला माझं कौतुक झाल्यासारखं वाटतं आणि असंच तिचंही होतं. सुखदा परखडपणे मला माझ्या चुकाही दाखवून देते. मीही दाखवतो. नातं शंभर टक्के गोड कधीच नसतं. मतभेद असतात. पण ते मतभेद वाढणार नाहीत याची काळजी मात्र आम्ही घेतो. एकमेकांच्या मताचा आदर करणं, समजूतदारपणा असणं, सांभाळून घेणं हे नवरा-बायकोचं नातं आणखी घट्ट करतं. या नात्यात नकळतपणे प्रवेश करतात त्या अपेक्षा. प्रत्येक नवरा-बायकोत त्या असतात. आमच्यातही आहेत. पण त्या पूर्ण होण्याचा अट्टहास आम्हा दोघांचाही नसतो. असं म्हणतात की, नवरा-बायकोच्या भांडणात अखेरचा शब्द नवऱ्याचा असतो आणि तो म्हणजे सॉरी. पण, आम्हा दोघांमध्ये शेवटचा सॉरी शब्द कधीकधी सुखदाचाही असतो. माघार तीही घेते. आम्ही काम करत असलेल्या क्षेत्राला ग्लॅमर आहे. म्हणूनच कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीत ग्लॅमर शोधण्याचा प्रेक्षक प्रयत्न करत असतात. पण मी असं म्हणेन, माझ्या क्षेत्राला ग्लॅमर आहे. मला असेलच असं नाही. यातली ही सट्ल रेषा काहींना पटकन लक्षात येत नाही. कलाकारांच्या लग्नाचंही असंच आहे. त्यातलं खासगीपण जपलं गेलं पाहिजे असं मला वाटतं.

सहज, सुंदर नातं – गिरिजा ओक-गोडबोले

माझी आणि सुहृदची ओळख एका शोमध्ये झाली. मी अँकरिंग करत होते. सुहृद त्याच शोचा एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर होता. गप्पांमधून लक्षात आलं की आम्हा दोघांचेही अनेक कॉमन मित्र-मैत्रिणी आहेत. त्यापैकीच एकाने ‘तुम्ही एकमेकांचा विचार करायला हवं’ असं सुचवलं होतं. त्यानंतर गप्पांमधूनच सुहृद हरकत नाही; असं म्हणाला. मीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

इतकं साध्या पद्धतीने आम्ही एकमेकांना होकार दिला. सुहृदने स्वत:हून लग्नाचा विषय काढला. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. कारण सहसा मुलं लग्नाचा विषय काढत नाहीत. सुहृदच्या या बोलण्याने मी सुखावले. कारण ‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर बेसिस’वर कोणतीही गोष्ट स्वीकारली तर आपला एक पाय नात्यातून बाहेर असतो. असा एक पाय बाहेर ठेवल्यामुळे कोणत्याही क्षणी पळ काढता यावा म्हणून आपण तसे तयार राहतो. पण, एकदा एखाद्या गोष्टीवर ठाम असलो की सोपं जातं. जे नातं जपण्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत ते नातं घट्ट असतं. माझ्या मैत्रिणी मला त्या वेळी विचारायच्या की तुला कसं माहीत की, याच मुलासोबत तुला संपूर्ण आयुष्य घालवायचंय. तेव्हा मी त्यांना सांगायचे की, ओढून ताणून, मनाला मोडता घालून जे नातं असतं त्या नात्यात राहण्याची मजा येत नाही.

सुहृदसोबतचं नातं माझं अगदी सहज आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती आमच्यात नाही म्हणूनच मला माझं आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे. लग्न हा फक्त एका माणसाचा निर्णय नसतो. यात खूप जण सहभागी असतात. त्यामुळे सगळ्यांची मतं, विचार गृहीत धरून लग्न कसं करायचं हा निर्णय घेतला जातो.

मला विधी हवे होते. विधी झाल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही असा माझा समज आहे. लग्न म्हटलं की अक्षता पडल्याच पाहिजेत असंही वाटायचं. त्यामुळे आमचा साग्रसंगीत लग्नसोहळा झाला. अर्थात त्याला सेलिब्रेटी टॅग नव्हताच. नातेवाईक, मित्रपरिवाराला त्यातून आनंद मिळाला हे आम्हा दोघांसाठी समाधान होतं.

आयुष्यभराची सोबत सुखावणारी – उमेश कामत

मी आणि प्रिया; आमचं आमच्या लग्नाबद्दल एकच मत होतं. आम्हाला सेलिब्रेटींचं लग्न असा टॅग नको होता. आम्ही मीडियाला आमचं लग्न कव्हर न करण्याची विनंती केली होती. मीडियानेही ते ऐकलं होतं. आम्हाला आमचं लग्न हे फार व्यक्तिगत ठेवायचं होतं. कारण लग्न कसं करायचं हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत, पद्धतीत असू शकतो. थोडक्यात पण, चांगलं करू असं आमचं एकमत झालं. आपल्याला, घरच्यांना आनंद मिळेल इतपत लग्न समारंभ साजरा करावा असं आम्हा दोघांनाही वाटतं. लग्नात विधी असावेत अशी घरच्यांची इच्छा होती. विधींमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होतं. अर्थात विधींना आमचा विरोध नव्हताच. त्यामुळे आम्ही दोघांनीही ते एन्जॉय केलं. जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आम्ही सेलिब्रेटी आहोत म्हणून लग्नाला आले नव्हते. आम्हाला जसं हवं होतं तसंच झालं. आमची मतं एक आहेत म्हणून आम्ही एकत्र आहोत. ज्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं असतं त्याच्याशी एकमत होणं गरजेचं असतं. अगदी सगळ्याच बाबतीत एकमत होणं शक्य नसलं तरी एकमेकांच्या मताचा आदर करायला हवा. आम्हा दोघांचं नातं तसंच आहे. विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. ‘विवाहबंधन’ हा शब्द मला खटकतो. लग्न करूनही तुम्ही तुमच्या जोडीदाराला मोकळीक, स्वातंत्र्य देत असाल तर ते बंधन होत नाही. मी आणि प्रिया एकमेकांना मोकळीक देतो. म्हणूनच आमचं नातं खुलतं. दोन व्यक्तींचं ते नातं नसून दोन कुटुंबांचं नातं असतं. आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग अनुभवताना एकत्र असणं, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणी तरी सोबत असणं, कोणाची तरी सोबत एंजॉय करणं हे सगळं सुखावून टाकणारं आहे.
शब्दांकन : चैताली जोशी