News Flash

इंग्लिश फुटबॉलची हुकमत

युरोपीय देशांतील प्रमुख फुटबॉल स्पर्धानंतर आता सगळ्यांचे डोळे ‘चॅम्पियन्स लीग’ आणि ‘युरोपा लीग’कडे लागले आहेत.

|| जयदेव भाटवडेकर

युरोपीय देशांतील प्रमुख फुटबॉल स्पर्धानंतर आता सगळ्यांचे डोळे ‘चॅम्पियन्स लीग’ आणि ‘युरोपा लीग’कडे लागले आहेत. कोणत्या देशाची फुटबॉल लीग सर्वोत्तम आहे यावरून दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांमध्ये वाद सुरू आहेत. कोणी कितीही वाद घातला तरी या वर्षी इंग्लंडच्या ‘इंग्लिश प्रीमियर लीग’ने निश्चितच अख्ख्या युरोपावर हुकमत गाजवली आहे.

दरवर्षी जुल-ऑगस्टच्या दरम्यान जगभरातील अनेक देशांत नव्या फुटबॉल हंगामाची सुरुवात होते. तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीत विविध लीग आणि फुटबॉल स्पर्धा खेळल्या जातात आणि अखेरीस मे महिना सरता सरता कधी संपूच नये, असे वाटणारी चुरस संपते. त्यानंतर उरतात ते जल्लोष करणारे विजेते आणि पुढील हंगामात परिवर्तनाची आशा घेऊन बसलेले चाहते.

मागील पाच ते सहा वर्षांत फुटबॉल विश्वात कमी-अधिक आर्थिक साहाय्यामुळे संघांमधील अंतर वाढू लागले आहे. प्रत्येक लीगमध्ये दोन-चार असे संघ आहेत ज्यांच्या मालकांची लागेल तितके आर्थिक पाठबळ पुरवण्याची तयारी आहे. यामुळे जागतिक दर्जाचे, उत्तम प्रतीचे खेळाडू एकाच संघात खेळताना दिसतात. विजेतेपद मिळाले की फायदा होतोच शिवाय जागतिक कीर्तीच्या खेळाडूंपाठोपाठ चाहत्यांच्या संख्येतही वाढ होते. इतर संघांपेक्षा थोडा जास्त पसा गुंतवला की प्रचंड नफा असा ट्रेण्ड फुटबॉल जगतात तयार झाला आहे. त्यामुळे बरेचदा चाहत्यांची निराशा होताना दिसते. स्पध्रेत चुरस नसेल तर करमणूक होणे अवघड! फ्रान्समधील ‘लीग १’ ही स्पर्धा याचे उत्तम उदाहरण आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेड या संघांनी मागील काही वर्षांत प्रचंड आर्थिक गुंतवणूक करून विजेतेपदाचे दावेदार ठरतील असे संघ उभे केले. २०१७-१८ च्या फुटबॉल हंगामात मँचेस्टर सिटीने अगदी सहज विजेतेपद जिंकले. परंतु युरोपीय विजेतेपदापासून त्यांना वंचित राहावे लागले. २५ वर्षांहून अधिक काळ विजेतेपदापासून लांब राहिलेल्या लिव्हरपूल फुटबॉल क्लबने या वर्षी सिटी आणि युनायटेडप्रमाणेच मोठी गुंतवणूक केली. २०१८-१९ प्रीमियर लीग ही सिटी, युनायटेड आणि लिव्हरपूल अशा तीन दावेदारांसह सुरू झाली. पण हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मँचेस्टर युनायटेडने नांगी टाकली. नवीन प्रशिक्षक घेऊन मदानात उतरलेल्या चेल्सीने स्पध्रेच्या अध्र्या टप्प्यापर्यंत सिटी आणि लिव्हरपूलला तोडीसतोड झुंज दिली. पण त्यानंतर सांघिक संतुलन बिघडले. काही वैयक्तिक चुका महागात पडल्या आणि चेल्सी विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले.

आस्रेनल फुटबॉल क्लब सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा दावेदार नव्हता, पण तब्बल दोन दशकांत पहिल्यांदाच प्रशिक्षक बदललेल्या आस्रेनलची वाटचाल कशी होते हे पाहण्यास लोक आतुर होते. आस्रेनलची वाटचाल अडखळत झाली, सातत्याचा अभाव आणि स्पध्रेच्या शेवटच्या टप्प्यात उडालेली धांदल यामुळे आस्रेनलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. टॉटेनहॅम क्लब नेहमीप्रमाणेच सातत्याने चांगला खेळ करत होता. पण मोक्याच्या क्षणी आपले भान हरपून महत्त्वाचे सामने गमावण्याची प्रथा या वर्षीदेखील कायम राहिली आणि अखेरच्या टप्प्यात टॉटेनहॅमने शरणागती पत्करली. वूल्व्हरहॅम्पटन वंडर्स (वुल्फ्स) या ‘ब’ श्रेणीतून प्रीमियर लीगमध्ये बढती मिळालेल्या संघाने चाहत्यांची मने जिंकली. शेवटपर्यंत चिवट बचावफळी कायम ठेवत सुरेख आक्रमण करून प्रीमियर लीगमध्ये बडय़ा संघांनासुद्धा घाम गाळायला भाग पाडले.

मँचेस्टर सिटीच्या मागील हंगामातील विध्वंसक विजयानंतर ‘प्रीमियर लीग अत्यंत कंटाळवाणी होत आहे. दरवर्षी विजेते कोण होणार हे लवकरच स्पष्ट होते’  अशी टीका फुटबॉलजगतात कानावर येत होती. सिटी मागील वर्षीचा विजयी संघ कायम ठेवणार ही बातमी कळताच आज ना उद्या सिटी इतर संघांपेक्षा पुढे जाणार अशीच चिन्हे दिसत होती, पण लिव्हरपूलच्या मनात काही वेगळेच होते.

अनेक वर्षांत बघायला मिळाली नाही अशी विजेतेपदासाठीची झुंज अख्ख्या जगाला पाहायला मिळाली. अगदी पहिल्या दिवसापासून एकमेकांना तगडी टक्कर देत सिटी आणि लिव्हरपूल विजेतेपदाकडे वाटचाल करत होते. बडय़ा खेळाडूंचा समावेश असलेले आणि जगातील दोन उत्तम प्रशिक्षक साथीला असलेले हे संघ अगदी स्पध्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत झुंजले. प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलने केवळ एक सामना गमावला आणि तो सिटीच्या विरोधात! हा एक सामना लिव्हरपूलला अत्यंत महागात पडला. स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी सिटीचा सामना दुबळ्या ब्रायटन संघाविरुद्ध होता आणि गुणतालिकेत सिटीकडे एका गुणाची आघाडी होती. सिटीने ब्रायटनवर सहज मात केली आणि विजेतेपद राखले. लिव्हरपूलला विजेतेपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली.

सिटीने चेल्सी, लिव्हरपूल, टॉटेनहॅम यांना नमवून इंग्लंडमध्ये आपले विजेतेपद राखले खरे, पण चॅम्पियन्स लीगमध्ये टॉटेनहॅमने सिटीला बाहेरचा दरवाजा दाखवला. सिटीला युरोपीय स्पर्धामध्ये पुन्हा एकदा अपयश आले.

स्पेनमधील ‘ला लीगा’ या मुख्य फुटबॉल स्पध्रेत बार्सिलोनाने या वर्षीदेखील वर्चस्व राखले. सलग तीन वर्षे चॅम्पियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवणारा रियल माद्रिदचा संघ बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच रोनाल्डोशिवाय खेळताना दिसला. दरवर्षी बार्सलिोनाशी दोन हात करणारा हा कट्टर प्रतिस्पर्धी या हंगामात कसाबसा तग धरून उभा होता. चॅम्पियन्स लीग तर लांबच, ला लीगामध्येदेखील रियल माद्रिद यंदा फार चमक दाखवू शकले नाही. फ्रान्समधील लीग १ मध्ये वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणावे तसे पी-एस-जी संघाने अनेक गुणांच्या फरकाने अजिंक्यपद राखले. पण पुन्हा एकदा गुंतवणूक कितीही केली तरी मदानातील सांघिक खेळ महत्त्वाचा ही समज चॅम्पियन्स लीगने पी-एस-जीला दिली.

इटलीमधील ‘सिरी आ’चे विजेतेपद हे युवेंटसच्या मालकीचेच आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दरवर्षीप्रमाणे चांगला खेळ करून युवेंटसने विजेतेपद राखले. हिरेजडित मुकुटावर कोहिनूर लावावा त्याप्रमाणे युवेंटसने रोनाल्डोला संघात आणले. पण डच लीगचे विजेते आयाक्सने युवेंटसच्या आशा धुळीत मिळवल्या. बहुतांश खेळाडू पंचविशीच्या आतले असलेला आयाक्सचा तरुण संघ हा निव्वळ खेळाडूंच्या गुणवत्तेच्या जोरावर आणि संघातील एकजुटीमुळे चॅम्पियन्स लीगमध्ये बलाढय़ संघांचा पाडाव करू शकला.

इतर सगळ्या स्पर्धामधील चुरस काही खास नसली तरी इंग्लिश लीगच्या बरोबरीलाच जर्मनीमधील बुन्देस लीगादेखील शेवटच्या दिवसापर्यंत अनुत्तरित होती. डॉर्टमुंडने गुणतालिकेतील आघाडी सहज गमावली आणि स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी विजेतेपदाचे प्रतिस्पर्धी बायर्न म्युनिक दोन गुणांच्या फरकाने जिंकले.

खरे तर जर्मनी आणि इंग्लंड दोन्ही देशांतील स्पर्धा आणि त्यांची चुरस तोडीसतोड होती. पण इंग्लिश फुटबॉलने युरोपावर कब्जा करून आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. युरोपा लीगच्या अंतिम फेरीत चेल्सी आणि आस्रेनलने जागा मिळवली. तर दुसरीकडे लिव्हरपूल आणि टॉटेनहॅमने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात झेप घेतली. युरोपीयन स्पर्धाच्या अंतिम फेरीत चारही संघ एकाच देशातून येण्याची ही पहिलीच वेळ! ही मजल मारून इंग्लिश फुटबॉलने इतिहास रचला. या दोन्ही स्पर्धाचे अंतिम सामने अजून खेळले गेलेले नाहीत, परंतु युरोपातील दोन्ही विजेते हे इंग्लंडमधलेच असणार हे ठरलेले आहे.

 ‘विखुरलेले युनायटेड’

मँचेस्टर युनायटेड, प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब. प्रत्येक वर्षी विजेतेपदाचा भक्कम दावेदार असणारा संघ! पण सर अलेक्स फग्र्युसन यांच्या निवृत्तीनंतर युनायटेडचे सोनेरी दिवस जणू हरवून गेले आहेत. २०१८-१९च्या प्रीमियर लीगमध्ये संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी पाहता प्रशिक्षक मोरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात आली. मागील सहा वर्षांत संघावर चौथ्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलण्याची पाळी आली. त्याच दरम्यान खेळाडूंमधील ऐक्यदेखील संपुष्टात आल्याच्या बातम्या गाजू लागल्या आहेत. पॉल पोग्बा, डेव्हिड डी हेआ असे काही संघातील महत्त्वाचे खेळाडू संघ सोडू पाहत आहेत. संघातील तरुण खेळाडूदेखील अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ करण्यात कमी पडले आहेत. २०१८-१९ मध्ये सहाव्या स्थानी आल्यामुळे चॅम्पियन्स लीग स्पध्रेची पात्रता गमावलेल्या या एके काळच्या फुटबॉलजगताच्या ऐरावतासाठी अतिशय खडतर वाटचाल पुढे दिसत आहे. नवीन प्रशिक्षक ओले गनर सोल्षार संघाची बांधणी कशी करतात यावर येत्या काळातील यश-अपयश ठरणार आहे.

विखुरलेले युनायटेड

मँचेस्टर युनायटेड, प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब. प्रत्येक वर्षी विजेतेपदाचा भक्कम दावेदार असणारा संघ! पण सर अलेक्स फग्र्युसन यांच्या निवृत्तीनंतर युनायटेडचे सोनेरी दिवस जणू हरवून गेले आहेत. २०१८-१९च्या प्रीमियर लीगमध्ये संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी पाहता प्रशिक्षक मोरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात आली. मागील सहा वर्षांत संघावर चौथ्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलण्याची पाळी आली. त्याच दरम्यान खेळाडूंमधील ऐक्यदेखील संपुष्टात आल्याच्या बातम्या गाजू लागल्या आहेत. पॉल पोग्बा, डेव्हिड डी हेआ असे काही संघातील महत्त्वाचे खेळाडू संघ सोडू पाहत आहेत. संघातील तरुण खेळाडूदेखील अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ करण्यात कमी पडले आहेत. २०१८-१९ मध्ये सहाव्या स्थानी आल्यामुळे चॅम्पियन्स लीग स्पध्रेची पात्रता गमावलेल्या या एके काळच्या फुटबॉलजगताच्या ऐरावतासाठी अतिशय खडतर वाटचाल पुढे दिसत आहे. नवीन प्रशिक्षक ओले गनर सोल्षार संघाची बांधणी कशी करतात यावर येत्या काळातील यश-अपयश ठरणार आहे.

response.lokprabha@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 12:03 am

Web Title: english football league
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : धोकादायक अफगाणिस्तान!
2 Afghanistan cricket team history : इतिहास
3 इंग्लंडच्या जोस बटलरपासून सावधान!
Just Now!
X