ललितलेखांचा वळेसर

‘साद देती गिरीशिखरे’, ‘उत्तरपूर्वेचे इंद्रधनू’ या पुस्तकांतून भटकंतीचा ललितरम्य आलेख चितारणाऱ्या राधिका टिपरे यांचा ‘आठवणीतील पाऊलवाटा’ हा ललित लेखसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे आकर्षण आणि त्याच्या नितळ दर्शनाने झालेल्या मनाच्या उत्फुल्लावस्थेचे वर्णन या संग्रहातील बहुतांश लेखांत आले आहे. निसर्गाच्या सौंदर्यस्थळांचा, अद्भुताचा घेतलेला आस्वाद लेखिकेने मनस्वीपणे मांडला आहे. निसर्गाशी तादात्म्य झाल्याने आलेल्या अनुभूतीचे तठस्थपणे केलेले आत्मचिंतन या लेखांमध्ये वाचायला मिळते. ३७ ललित लेखांचा हा वळेसर वाचकांना निसर्गभेटीचा आनंद देणारा आहे. याशिवाय पशुपक्ष्यांशी जडणारे भावबंधही काही लेखांतून उलगडून दाखवलेले आहेत. लेखिकेच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे, प्रसंगांचेही वर्णन ओघाने काही लेखांतून आले आहे. त्यातून लेखिकेच्या निसर्गोत्कट मनाचे प्रांजळ प्रतिबिंब उमटले आहे. सध्याच्या स्वमग्नतेच्या फेऱ्यात डोंगरदऱ्या, रानवाटा, पाऊसपाणी, पशुपक्षी आणि आपल्या भवतालातील माणसांचे लेखिकेने घडवलेले हे दर्शन जितके वाचनीय आहे, तितकेच विचारप्रवण करणारेही आहे.

‘आठवणीतील पाऊलवाटा’- राधिका टिपरे,

कृष्णा प्रकाशन,

पृष्ठे- २२९, मूल्य- २६० रुपये.

अंतर्मुख करणाऱ्या कथा

‘बिननात्याचा माणूस’ या आपल्या पहिल्याच कथासंग्रहासाठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळविलेल्या विभावरी वाकडे यांचा ‘सर, मी आणि..’ हा नवा कथासंग्रह नातेसंबंध आणि मानवी स्वभाव यांच्यातील गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न करतो. पालकांकडून लहान मुलांवर टाकले जाणारे अपेक्षांचे ओझे आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम यांचे हृद्य चित्रण करणाऱ्या ‘एक छोटा तारा’ व ‘मी म्हणालो..’ या कथा असोत वा दोन अनोळखी व्यक्तींचे अपघातामुळे अल्पकाळासाठी एकत्र येणे आणि त्यातून त्यांच्यात नकळत निर्माण होणारे बंध याचा वेध घेणारी ‘नातं’ ही कथा किंवा ‘कैलासवासी मित्रास..’ आणि ‘प्रतीक्षा’ या मैत्रीच्या नात्यातील कंगोरे दाखवून देणाऱ्या कथा असोत; या संग्रहातील कथांमधून मानवी नात्यांचा घेतलेला वेध वाचकाला अंतर्मुख करणारा आहे. याशिवाय ‘राघू रे’ ही अबोल प्रेमाची कथा, एका दंतकथेवर आधारित ‘दु:ख हवं आहे’, तसेच संग्रहाची शीर्षककथा असलेली ‘सर, मी आणि..’ या कथाही वाचनीय आहेत.

‘सर, मी आणि..’ – विभावरी वाकडे,

अक्षता प्रकाशन, पुणे.

पृष्ठे- १९०, मूल्य- २४० रुपये.