News Flash

वस्तुसंग्राहक केळकरांची कहाणी

दिनकररावांचा जन्म १८९६ सालातला. कामशेतजवळील करंजगावचा. वडील गंगाधरपंत रेल्वेत नोकरीला.

‘संग्रहालय-महर्षी : डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’

राम कोल्हटकर

काका केळकर हे ‘महात्मा सदन’ या घरात आमच्या शेजारी, म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकर बुवा यांच्या ‘धर्म चैतन्य’च्या बाजूला राहतात. काका केळकरांच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त कुंपण. माझी आई (राधाबाई) आणि काकू केळकर या दोघी जवळच्या मैत्रिणी. एकमेकींना साथ देणाऱ्या, आपापल्या घरातील विक्षिप्तांना सांभाळणाऱ्या. काकांचे वेड जुन्या वस्तू जमविण्याचं आणि माझ्या वडिलांचं (वा. शि. कोल्हटकर) कीर्तन करणं. ‘महाभारत’, ‘योगवसिष्ठ’, ‘रामायण’, इ. ग्रंथांचा कीर्तनातून प्रचार करणं आणि त्याबरोबर औषधनिर्मितीचा प्रयत्न करणं. दोघेही तसे हुन्नरी, पण आपल्याच दुनियेत रमणारे!

शाळेत असताना ‘अज्ञातवासीं’ची कविता  वाचताना ते आपल्या शेजारील काका केळकर हे मला काय, आमच्या घरातील कुणालाच माहीत नसावेत. ते फक्त निरनिराळ्या वस्तू गोळा करतात आणि त्यांच्या घराला खूप कलाकुसर केलेली असते.. त्यात त्यांची मुलगी प्रभाला त्यांनी एक छान किल्ला कायमचा करून दिला आहे याचेच आम्हाला कौतुक होते! त्यांच्या घरी जाणं-येणं व्हायचंच. त्यांचं घर अजबखाना आहे ते जाणवायचं. त्यामुळेच बहुधा काका केळकर हे ‘अज्ञातवासी’ होते!

मृदुला प्रभुराम जोशी यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ मालिकेमधलं ‘डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’ हे पुस्तक वाचताना या स्मृती जाग्या होणं अपरिहार्य होतं. या पुस्तकातील माहिती वाचताना आपण काकांच्या चिकाटीचं आणि मोठेपणाचं कौतुक करतोच, पण थक्कही व्हायला होतं. वेडात दौडल्याशिवाय असं यश प्राप्त होत नाही हेही जाणवतं.

दिनकररावांचा जन्म १८९६ सालातला. कामशेतजवळील करंजगावचा. वडील गंगाधरपंत रेल्वेत नोकरीला. आई उमाबाई खंबीर गृहिणी. सुशिक्षित. स्त्रीशिक्षण चतुर. तीन मुलांची आई. नरहर, भास्कर आणि दिनकर. शेंडेफळ दिनकर खोडय़ा काढणारा आणि सर्वाचा लाडकाही. शाळा बेळगाव-शहापुरात झाली. कवितेचं आणि मनसोक्त हिंडण्याचं प्रेमही इथलंच.

शहापूर छान गाव. सांगली संस्थानच्या अधिपत्याखालचं. तिथून कुटुंब जवळच्या बेळगावात गेले. मुंजीत दिनकरला कृष्णाचे चित्र असलेली त्या काळातली प्रसिद्ध टोपी मिळाली आणि छायाचित्रही! पुण्यात बदली झाली आणि नाना वाडय़ात (शाळेत) दिनकरचा प्रवेश झाला. तिथेच दगडी इमारती, शनिवारवाडा, गणेश दरवाजा, लाल महाल, बेलबाग, कसबा गणपती शाळेत जाता-येता आणि फिरता फिरता या ऐतिहासिक वास्तू याला दिसू लागल्या. त्यामुळे इतिहासाविषयी प्रेम निर्माण होत गेलं असणार. मृदुला जोशी यांनी वर्णन केलेलं त्या काळचं दिनकरचं संस्कारित मन वाचता वाचता आपण शाळेतून ‘अज्ञातवासीं’च्या कवितेत आणि गडकरी, श्री. म. माटे, डॉ. पां. दा. गुणे, राजवाडे मास्तर यांच्याबरोबर पुढे जात जात आजच्या ‘राजा दिनकर केळकर संग्रहालया’त केव्हा येतो, हे कळतही नाही!

संग्रहालय वृद्धीसाठी काकांनी सगळा भारत पालथा घातला. मद्रासमधील रुक्मिणी देवी अरुंडेलपासून पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत अनेकांना भेटले, त्यांना संग्रहालयात आणले. वस्तुसंग्रहाचा त्यांचा ध्यास हा जगातील एक मोठा विक्रम होता. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून जुन्या वस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, दागदागिने, वाद्यं गोळा करण्याचा घेतलेला ध्यास त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन होईपर्यंत एकांडय़ा शिलेदाराच्या वृत्तीने जपला. त्या साऱ्याची माहिती ओघवत्या भाषेत मृदुला जोशींनी दिली आहे.

‘संग्रहालय-महर्षी : डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’ – मृदुला प्रभुराम जोशी,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,

पृष्ठे – १०७, मूल्य- ११८ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:01 am

Web Title: book review sangrahalay maharshi by author dr dinkar gangadhar kelkar urf kavi adnyatvasi
Next Stories
1 प्रांजळ स्मृतिपट
2 हबल दुर्बिणीचा ज्ञानरंजक वेध
3 वास्तुकलेच्या विश्वात..
Just Now!
X