लौकिकार्थाने लेखक नसलेल्या महादेव जाधव यांचे ‘निवडुंगाचे काटे आणि बोंडे’ हे आत्मकथन नुकतेच प्रकाशित झाले आहे. निराश झालेल्या जीवाला आत्मिक बळ देण्याचे कार्य हे आत्मकथन करू शकते. या पुस्तकात १९३० ते ५० या काळातील विविध रूढी, परंपरा, चालीरीती यांच्या संदर्भाने चित्रित झालेले समाजमन, तसेच लेखकाच्या जीवनात आलेले निरनिराळे अटीतटीचे प्रसंग वाचकाला खिळवून ठेवतात. त्या काळातील विवाहप्रथा, लेखकाचे गाव, त्याचे सुहृद यांच्याविषयी या पुस्तकात वाचायला मिळते. यातील विविध प्रकरणे ही जणू विवक्षित कहाण्यांसारखी आहेत. या कहाण्या प्रेरणादायक तर आहेतच; शिवाय बरेच काही शिकवून जाणाऱ्याही आहेत. समाजसेवेची तळमळ असणाऱ्या महादेव जाधव यांचे वाचन दांडगे असून त्यांच्यावर झालेले वाचनसंस्कार या आत्मकथनातून जाणवत राहतात. साहस वा पराक्रम गाजवणे हा गुण जाधवांच्या पूर्वजांपासून ठासून भरलेला असून, ऐतिहासिक काळापासूनच्या नोंदी असलेला हा वारसा लेखकाकडेदेखील आला आहे. साहस, विवेक आणि समयसूचकतेने जाधव यांना जीवनातील अनेक कसोटीच्या प्रसंगांतून तारले असल्याने या सगळ्या गुणांची माणसाला किती गरज असते, हे या आत्मकथनातून लक्षात येते. जाधव यांचे विद्यार्थिदशेपासूनचे विविध अनुभव आणि नोकरीच्या काळातील घटना-प्रसंगांमधून एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उलगडत जाते.

‘निवडुंगाचे काटे आणि बोंडे’- महादेव जाधव, प्रतिमा पब्लिकेशन,

पृष्ठे- २१६, मूल्य- ३०० रुपये.