25 February 2021

News Flash

कलात्मक आणि चिंतनीय

किशोरी ही या कादंबरीची नायिका. पुण्यात शिक्षणासाठी आलेली किशोरी वसतिगृहात राहते.

‘किशोरीचे हृदय’ - दिवाकर कृष्ण,

दिवाकर कृष्ण हे गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील मराठी कथाकार. त्यांचे पूर्ण नाव दिवाकर कृष्ण केळकर. ‘अंगणातला पोपट’ या १९२२ मध्ये मासिक मनोरंजनच्या एका अंकात प्रसिद्ध झालेल्या कथेपासून त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. पुढील काळात त्यांचे ‘समाधी व इतर सहा गोष्टी’, ‘रूपगर्विता आणि सहा गोष्टी’, ‘महाराणी आणि इतर कथा’ हे कथासंग्रह प्रकाशित झाले. ‘मराठी गोष्टीं’ना ‘लघुकथे’चे स्वरूप येण्यात दिवाकर कृष्ण यांच्या कथांचा महत्त्वाचा वाटा होता.

एक समर्थ कथाकार अशीच दिवाकर कृष्ण यांची ओळख दृढ झाली असली तरी, दरम्यानच्या काळात त्यांनी कादंबरीलेखनही केले होते, हे फारच थोडय़ाजणांना ठाऊक असेल. १९३५ साली त्यांची ‘किशोरीचे हृदय’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली होती. नंदिनी पब्लिशिंग हाऊसतर्फे ही कादंबरी नुकतीच पुनप्र्रकाशित करण्यात आली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिलेल्या या कादंबरीतून तत्कालीन पुण्या-मुंबईतील भावजीवन चित्रित झाले आहे.

किशोरी ही या कादंबरीची नायिका. पुण्यात शिक्षणासाठी आलेली किशोरी वसतिगृहात राहते. सुरुवातीला बुजरी, भित्री असलेली किशोरी लवकरच तिथल्या वातावरणात रुळू लागते. दरम्यान शांत व ध्येयवादी चैतन्य व रंगेल-चैनी विश्वासराव अशा दोन तरुणांचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो. विश्वासराव तिला लग्नाची मागणी घालतो, पण ती चैतन्यची जीवनसाथी म्हणून निवड करते. असे या कादंबरीचे कथानक आहे. त्यातून किशोरीच्या मनातील सत्-असत्चे द्वंद्व दिवाकर कृष्ण यांनी चित्रित केले आहे. मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत ही कादंबरी तत्कालीन तरुण पिढीचे भावविश्व उलगडून दाखवते. कलात्मकता व समाजविषयक चिंतन यांचा मेळ असणारी ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी.

‘किशोरीचे हृदय’ – दिवाकर कृष्ण,

नंदिनी पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १८४, मूल्य- १८० रुपये.

नाटय़मय थरारकथा

इंग्रजीत अनुवादित झालेल्या इतर परदेशी भाषांमधील साहित्याचे मराठीत भाषांतरीत पुस्तके प्रकाशित करण्याचा सपाटा अलीकडच्या काळात काही मराठी प्रकाशक करताना दिसतात. अशा पुस्तकांमध्ये सहसा प्रेमकथा, थरारक व युद्ध-संघर्षांच्या काळातील वैयक्तिक अनुभवांवर आधारित व चरित्रपर पुस्तकांचाच प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसते. या पुस्तकांना सरावलेला वाचकवर्गही मराठीत आहे. अशा पुस्तकांच्या प्रभावातून लिहिलेली वाटावी व त्यांच्या श्रेणीत मोजता येईल अशी, परंतु स्वतंत्रपणे लिहिलेली अमोल जाधव यांची ‘ग्रेट एस्केप’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांतील राजकीय-सामाजिक पर्यावरणात कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. कादंबरीचा नायक शरद हा पेशाने पत्रकार आहे. त्याच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अंमली पदार्थाची तस्करी, अंमली पदार्थाच्या विळख्यात उच्चभ्रूंची मुले कशी अडकतात आणि नंतर त्यातून सुटका करून घेतल्यावर त्यांची काही काळ होणारी घुसमट याचे चित्रण कादंबरीत येते. शरदला अफगाणिस्तानमध्ये पत्रकारितेसाठी जाण्याची संधी मिळते. तेथील स्थानिक घटनांमध्ये त्याचे गुंतणे आणि त्यातून एका टोळीचा पर्दाफाश करणे असे या कादंबरीचे कथानक आहे. वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर स्वार्थापायी भ्रष्टतेकडे होणारी जगाची वाटचाल कथानकातून अधोरेखित होते. अफगाणीस्तानमधील सामाजिक व राजकीय वातावरणाचे वर्णन करणारी पुस्तके व वर्तमानपत्रीय माहितीचा आधार या पुस्तकातील अफगाणीस्तानच्या इतिहासवर्णनासाठी घेतला असल्याचे, लेखकाने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.  इतिहास, प्रेमकथा आणि सामाजिक आशय यांची गुंफण करून नाटय़मय थरारकथा रचण्याचा लेखकाचा प्रयत्न असला तरी तो कथामांडणीतील तुटकपणामुळे सलग अनुभव देत नाही. कथानिवेदनात सुसूत्रतेचा अभाव असला की उरते ती केवळ घटनांची जंत्री, तीच बाब ही कादंबरी वाचतानाही जाणवत राहते. त्यामुळे विषय वेगळा असला तरी ती परिपूर्ण कादंबरी ठरत नाही.

‘ग्रेट एस्केप’- अमोल जाधव,

महाजन ब्रदर्स, पुणे,

पृष्ठे- १६८, मूल्य- २३५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:21 am

Web Title: review of new releases marathi books
Next Stories
1 प्रेरणादायी जीवनप्रवास
2 जातिसंघर्षांचे वास्तवदर्शन
3 अभिनेता विवेक यांचा कलाप्रवास
Just Now!
X