लाहोर : पाकिस्तानातील लाहोरमधील ‘दाता दरबार’ या आशियातील सर्वात मोठय़ा सुफी दग्र्यात बुधवारी झालेल्या स्फोटात १० जण ठार झाले आणि २० जण जखमी झाले. रमझानचा महिना असल्याने या दग्र्यात मोठी गर्दी होती.

या दग्र्याच्या प्रवेशद्वारावरील पोलीस हे या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य होते. त्यामुळे तेथील चौकीलगतच हा स्फोट झाला. पाकिस्तानी तालिबान्यांच्या हिजबुल अहरार या गटाने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. स्फोट झाला ती वेळ भाविकांच्या वर्दळीची नव्हती तसेच यात एकाही नागरिकाचा मृत्यू ओढवलेला नाही, असा दावा या संघटनेने केला आहे. सरकारने मात्र तीन नागरिकांचा मृत्यू ओढवल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी या स्फोटाची कठोर निंदा केली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या चार पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. या ठिकाणी अनेक वाहनांचे केवळ सांगाडे उरले आहेत. कडेकोट बंदोबस्त असूनही हा स्फोट झाला. हल्लेखोर हा पोलीस वाहनाच्या जवळ आला व त्याने स्वत:ला उडवून दिले. त्यात तोही ठार झाला आहे.

२०१० मध्ये याच ठिकाणी आत्मघाती हल्ल्यात ५० जण ठार झाले होते. पाकिस्तानात आयसिससह काही दहशतवादी गटांनी सुफी स्थळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा हल्ला घडला आहे.

११व्या शतकातील सुफी संत अबुल हसन अली हजविरी ऊर्फ दाता गंज बक्ष यांचा हा दर्गा असून तेथील उत्सवाला दहा लाख भाविक भेट देतात.