हिंदी महासागरातील महासुनामीला २६ डिसेंबरला दहा वर्षे पूर्ण होत असून  उच्च तंत्राधिष्ठित इशारा यंत्रणा बसवण्यात येऊनही त्यातून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे आत्मसंतुष्टतेमुळे दुर्लक्ष होत आहे. खरेतर अशी दुर्घटना पुन्हा न होण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे.
२६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर ९.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या वेळी प्रलयंकारी लाटांनी चौदा देशातील २,२०००० लोक मरण पावले होते. त्सुनामीचा फटका बसलेल्या देशात इंडोनेशिया, श्रीलंका, सोमालिया यांचा समावेश होता. मृतांमध्ये परदेशी पर्यटक जास्त होते कारण ते थायलंडच्या किनाऱ्यावर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आले होते. त्या वेळी तेथे इशारा देणाऱ्या यंत्रणा नव्हत्या किंवा लोकांना उंचावर जाण्याची संधी मिळाली नाही. सुनामीला दहा वर्षे पूर्ण होत असताना तज्ज्ञांनी सांगितले की, त्या दिवसाच्या कटू स्मृती विसरता येणार नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती निवारण कार्यालयाच्या प्रमुख मार्गारेटा वॉलस्ट्रोम यांनी सांगितले की,आपण जर विसरलो तर आपण कधीच तयारीत असणार नाही. जर तुम्ही गाफिल राहिलात तर संपलात अशी स्थिती असते. त्यावेळी असेह येथे किनाऱ्यावर ३५ मीटर उंचीच्या लाटा धडकण्यास भूकंपानंतर २० मिनिटे लागली होती. तेथे इंडोनेशियाचे १७०००० लोक मरण पावले होते. त्यानंतर दोनतासांनी सुनामी लाटा थायलंड, भारत व श्रीलंकेत पोहोचल्या.  अमेरिकेच्या सरकारच्या पॅसिफिक त्सुनामी सूचना यंत्रणेचे संचालक चार्लस मॅकक्रीअरी यांनी सांगितले की, आपण त्या वेळी अंध होतो,  हिंदी महासागरात कुठलेही संवेदक नव्हते. १०० वर्षांच्या शांततेनंतर हिंदी महासागरात ७.९ रिश्टर व त्यावरचे सहा भूकंप २००४ पासून झाले. हिंदी महासागर सुनामी यंत्रणा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांसाठी २०११ पासून काम करीत आह.

सुनामी संकट
भूकंपाची तीव्रता- ९.३ रिश्टर
ठिकाण- इंम्डोनेशिया
लाटांची उंची- ३५ मीटर
इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर येण्यास लागलेला वेळ- २० मिनिटे
फटका बसलेले इतर देश- श्रीलंका, भारत, थायलंड, सोमालिया (लाटा दोन तासात पोहोचल्या)