आयकर विभागाने बंगळुरू आणि चेन्नई येथील एका कंपनीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल १६० कोटी रूपयांची रोकड आणि १०० किलो सोने जप्त केले आहेत. अजूनही तपासकार्य सुरू आहे. एसपीके अँड कंपनी असे छापा टाकण्यात आलेल्या कंपनीचे नाव आहे. राज्य महामार्ग विभागासाठी काम करणारी ही कंपनी आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चेन्नई, अरूपुकोत्तई, वेल्लूर आणि मदुराई येथून १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी एसपीके कंपनीच्या २० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे मारले. ‘ऑपरेशन पार्किंग मनी’ असे या मोहिमेचे नाव असून आजही ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे. नागराजन सेयादुराई हे या समूहाच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. कार्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, ही रस्ते देखभालीचे काम करते. सेयादुराई हे अण्णा द्रमूक पक्षाच्या एका नेत्याचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.

राज्य महामार्गाच्या अनेक योजनांमध्ये कंपनी कार्यरत आहेत. कर चोरीची माहिती मिळाल्यानुसार ही छापेमारी करण्यात आली. काही तासांच्या आत आम्हाला ८० कोटींची रोकड मिळाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चेन्नई येथे समूह संचालकांच्या कार्यालय आणि घरातून मोठ्याप्रमाणात रोकड मिळाल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. सोन्याच्या दागिन्यांशिवाय सोन्याची बिस्किटेही मिळाली आहेत.

नुकतेच टीटीव्ही दिनकरण आणि द्रमूकने महामार्गाच्या कंत्राटात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी यामध्ये अण्णा द्रमूकच्या नेत्याचे नाव घेतले होते.