‘आता यापुढील युद्ध होईल ते पाण्यावरुनच’ असे आपण अनेकदा ऐकतो. दुष्काळ, वापरण्यायोग्य पाण्याची कमतरता हे आपल्याच देशात आहे असे आपल्याला वाटत असते. मात्र जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून याठिकाणचे वापरण्यायोग्य पाणी काही दिवसातच पूर्णपणे संपणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान तिसरा कसोटी सामना पार पडला. या दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंना हॉटेल प्रशासनाकडून काही नियम घालण्यात आले. आंघोळीच्यावेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नये, असे पाणी टंचाईमुळे हॉटेल प्रशासनाने सांगितले होते.

याशिवाय ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा समावेश आहे. त्यामुळे या देशातील लाखो नागरिक अपुऱ्या आणि स्वच्छ पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. येत्या काळात या देशांना पाणी विकत घेणे आणि खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे यांसारखे उपाय करावे लागतील. नाहीतर या ठिकाणच्या लोकांचे दैनंदिन जीवन आणखी कठिण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. देशातील लोकसंख्येच्या ५ टक्के लोक पाणी अव्वाच्या सव्वा किंमतीला खेरदी करतात किंवा आपल्या दैनंदिन गरजांसाठी अतिशय अस्वच्छ पाण्याचा वापर करतात. त्यामुळे ज्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होते त्यांनी त्याचा अतिशय जपून आणि विचार करुन वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या देशालाही अतिशय गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.