माकडाने केलेल्या हल्ल्यात बारा दिवसाच्या मुलाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात सोमवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. माकडाने या मुलाला आईच्या मांडीवरुन खेचून नेले. आरुष असे मृत मुलाचे नाव आहे. आरुषचा मृतदेह शेजारच्या घराच्या छतावर सापडला. राष्ट्रीय महामार्ग दोन जवळील रनकाटा भागातील काचहारा ठोक कॉलनीमध्ये ही घटना घडली.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा आरुष आईच्या मांडीवर होता. आरुषचे वडील योगेश रिक्षा चालक आहेत. या घटनेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. आई बाळाला स्तपान देत असताना अचानक माकड घरात शिरले व बाळाच्या मानेला पकडून खेचून नेले. हा सर्व प्रकार नेहाच्या लक्षात येण्याआधीच माकड मूलाला घेऊन पसार झाले होते.

आम्ही माकडाचा पाठलाग सुरु केल्यानंतर त्याने शेजारच्या घराच्या छपरावर आरुषला टाकले व तिथून पळ काढला. आरुषच्या शरीरातून बराच रक्तस्त्राव झाला होता. आम्ही त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर आरुषला मृत घोषित केले असे योगेशने सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरुषला हिसकावून नेण्याच्या १५ मिनिट आधी त्याच माकडाने एका १४ वर्षाच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

सुदैवाने या मुलीला किरकोळ जखमा झाल्या. योगेश आणि नेहाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आरुष त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या डोक्याकडच्या आणि मानेकडच्या भागाला गंभीर जखमा झाल्या आहेत. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून लवकरच मृतदेह आई-वडिलांच्या ताब्यात देऊ असे पोलीस निरीक्षक अतबीर सिंह यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी याच कॉलनीतल्या एका चिमुरडयावर माकडाने हल्ला केला होता. सुदैवाने हे मूल बचावले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागच्या महिन्यात येथील एमजी रोडवर बाईकवरुन जाणाऱ्या युवकासमोर अचानक माकडांचा घोळका आल्याने त्या युवकाचे बाईकवरील नियंत्रण सुटले व त्याने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यामध्ये या युवकाचा मृत्यू झाला.