पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं.

वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान मंदिराचा शोध लागला आहे. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते, अशी माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.

मंदिराच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडलेत. याशिवाय, तज्ज्ञांना मंदिराच्या जागेजवळ पाण्याचा कुंडही सापडला आहे. हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या कुंडाचा वापर करत असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

स्वात जिल्हा हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन वास्तूंचं घर आहे, आणि परिसरात हिंदू शाही काळातील खुणा पहिल्यांदाच सापडल्यात, असं यावेळी खलीक यांनी सांगितलं. तर, स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे पहिलं मंदिर असल्याची माहिती इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका यांनी दिली. बौद्ध धर्माचीही अनेक पूजास्थळं स्वात जिल्ह्यात आहेत.