पंतप्रधान किसान मदत निधी

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान मदत निधी योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १३६४ कोटी रुपये देण्यात आले, असे माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्राने २०१९ मध्ये लागू केली होती, या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. लघु व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशांना ही योजना लागू करण्यात आली होती. कॉमनवेल्थ ह्य़ूमन राइट्स इनिशिएटिव्ह या संस्थेचे माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारातील अर्जावर म्हटले आहे की, या योजनेत दोन प्रकारामध्ये अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. त्यांची वर्गवारी अपात्र शेतकरी व प्राप्तिकर भरणारे शेतकरी अशी करण्यात आली आहे.

अपात्र लाभार्थ्यांपैकी ५५.५८ टक्के लोक हे प्राप्तिकर भरणारे शेतकरी आहेत. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे अपात्र शेतकरी गटात मोडणारे आहेत. सरकारच्या आकडेवारीत पैसा चुकीच्या लोकांना मिळाल्याचे म्हटले आहे. या अपात्र शेतकऱ्यात पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

’ पंजाबमधील २३.१६ टक्के म्हणजे ४.७४ लाख अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

’ आसाम १६.८७ टक्के म्हणजे ३.४५ लाख, महाराष्ट्र १३.९९ टक्के म्हणजे २.८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या तीन राज्यात ५४.०३ टक्के चुकीचे लाभार्थी आहेत. त्यांना पैसे मिळाले आहेत.

’ गुजरात ८.०५ टक्के म्हणजे १.६४ लाख, उत्तर प्रदेश ८.०१ टक्के म्हणजे १.६४ लाख शेतकरी हे चुकीचे लाभार्थी ठरले आहेत. सिक्कीममध्ये एका शेतकऱ्यास चुकीचा लाभ मिळाला.

’ दोन हजार रुपयांप्रमाणे ६८.२० लाख हप्ते देण्यात आले होते त्यातून १३६४.१३ कोटी रुपये चुकीच्या लाभार्थ्यांना मिळाले. ४९.२५ लाख हप्ते प्राप्तिकर भरणाऱ्यांना तर १८.९५ लाख हप्ते चुकीच्या लाभार्थ्यांना मिळाले.

प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार या शेतकऱ्यांकडून आता वसुली करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत ही माहिती मिळाली असून पीएम किसान योजना २०१९ मध्ये लागू केली होती, त्यात १३६४.१३ कोटी रुपये अपात्र किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी या गटातील लोकांना देण्यात आले असे ३१ जुलै २०२० अखेरच्या माहितीत दिसून आले आहे.   

व्यंकटेश नायक, माहिती अधिकार कार्यकर्ते