बांगलादेशात २००९ मध्ये झालेल्या बंडाच्यावेळी हिंसाचारात सामील असलेल्या १५२ बांगलादेशी सैनिकांना मंगळवारी विशेष न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे, त्यांच्यावर लष्करी अधिकाऱ्यांसह ७४ जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. जगातील सर्वात मोठय़ा गुन्हेगारी खटल्यात ही शिक्षा सुनावण्यात आली. एकूण निमलष्करी दलांचे ८२० जवान व २६ नागरिक यांच्यावर हत्येचे आरोप ठेवून त्यांच्यावरील ढाका महानगर सत्र न्यायालयात सुनावणी करण्यात आली. न्या.महंमद अख्तरउझमान यांनी १५८ बंडखोर सैनिकांना मृत्युदंडाची, तर तिघांना १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली तर इतर २५१ जणांना दोषमुक्त करण्यात आले.
बांगला देश रायफल्सचे माजी सहसंचालक तौहिद अहमद यांचा मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्यात समावेश आहे. बंडाचे नेतृत्व त्यांनी केले होते  या सर्वाना मरेपर्यंत फाशी देण्यात यावे असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. एकूण ३४ महिने हा खटला चालला. या सैनिकांनी केलेले अत्याचार भयंकर आहेत, असे न्यायालयाने सांगितले.
बॉर्डर गार्ड बांगलादेशचे संचालक मेजर जनरल अझीज अहमद यांनी या निकालावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, ‘‘ज्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे आप्त गमावले त्यांना न्याय मिळाला आहे, आम्ही या हत्याकांडात काही सहकारी गमावले होते व मित्रही गमावले होते, त्यामुळे या निकालाने आम्हाला समाधान वाटते. २००९ च्या बंडाचे जे म्होरके होते त्यांना अद्दल घडेल अशीच शिक्षा या दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात देण्यात आली आहे.’’
जुन्या ढाक्यातील एका मदरशाच्या मैदानात उभारलेल्या तात्पुरत्या संकुलात हा खटला सुरू होता, त्यामुळे मध्यवर्ती तुरूंगातून या आरोपींना येथे आणण्यात आले होते, त्यामुळे तिथे कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. २५-२६ फेब्रुवारी  २००९ रोजी निमलष्करी दलांनी दोन दिवस वेतन व इतर तक्रारींसाठी लष्कराविरूद्ध बंड केले होते. शेख हसीना यांनी पदभार घेतल्यानंतर दोनच महिन्यात हे बंड झाले होते, त्यात बॉर्डर गार्ड बांगलादेशचे प्रमुख मेजर जनरल शकील अहमद यांची हत्या करण्यात आली होती. तसेच, इतर ७४ जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह एकतर गटारीत फेकण्यात आले तर काही गाडण्यात आले होते.
ज्या नागरिकांना जन्मठेप झाली आहे त्यात बांगलादेश नॅशनल पार्टीचे नसीरूद्दीन अहमद पिंटू  यांच्यासह अवामी लीगच्या एका नेत्याचा समावेश आहे. या दोषींना नंतर कडक सुरक्षेत तुरूंगात नेण्यात आले असून त्या वेळी मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांनी न्यायालयाचे संकुल भरून गेले होते. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, ज्या २४२ सैनिकांना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले आहे त्यांच्याबाबतच्या निकालास आम्ही आव्हान देण्याचा विचार करीत आहोत.
न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात १३०० साक्षीदार तपासण्यात आले व फिर्यादी पक्षाचे ६५५, तर बचाव पक्षाचे २७ साक्षीदार तपासण्यात आले.